News Flash

जल्लोष.. जीवनाचा!

माणसाच्या जन्माला संघर्ष पाचवीलाच पुजलेला आहे.

| September 6, 2015 02:46 pm

माणसाच्या जन्माला संघर्ष पाचवीलाच पुजलेला आहे. कोणी दैनंदिन माफक गरजा भागवण्यासाठी, तर कोणी सतत वाढत्या गरजांसाठी, कोणी आपल्या भूतकाळापायी, तर कोणी उज्ज्वल भविष्याकरता संघर्ष करतच असतो. या संघर्षांत माणसांतली माणुसकी, भावभावना, निसर्गाशी आणि समाजाशी असलेलं त्यांचं नातं हरवू नये म्हणून की काय प्रत्येक प्रांतांत, प्रत्येक धर्मात विविध सणांची योजना केलेली आढळते. सण कुठलाही असो- त्यात जीवनातील संघर्ष थोडासा बाजूला ठेवून जल्लोष आणि जगण्याचा उत्सव साजरा करायची संधी माणसाला मिळते. संयुक्त अरब अमिरातही (यूएई) याला अपवाद नाही. भारतासारखा हजारो वर्षांचा इतिहास या देशाला नाही. तरीही विविधता असलेले अनेक सण इथे अनुभवायला मिळतात. हा असा एक दुर्मीळ प्रांत आहे- जिथे परंपरा आणि आधुनिकता यांचा दुग्धशर्करा योग बघायला मिळतो.इस्लामिक परंपरेनुसार सगळ्यात महत्त्वाचे असे दोन सण ‘ईद अल फित्र’ म्हणजे रमझान महिन्याच्या सांगतेचा सण आणि ‘ईद अल अधा’ हा त्यागाचा प्रतीक असलेला हजवरून परतलेल्या भाविकांचा सण हे दोन पारंपरिक सण जितक्या जल्लोषाने साजरे केले जातात तितक्याच जोशात ‘यूएई नॅशनल डे’सुद्धा सणासारखाच इथे साजरा केला जातो. यशिवाय ‘अल दफ्रा फेस्टिव्हल’, ‘आर्ट अँड म्युझिक फेस्टिव्हल’ अशा सांस्कृतिक उत्सवांनाही इथे राष्ट्रीय महत्त्व आहे.या सगळ्या सण-उत्सवांमध्ये अरब संस्कृतीचे विविध पैलू समोर येतात. धर्माशी आणि परंपरेशी घट्ट बांधलेली जीवनशैली, कलेची आवड, हौसमौज आणि महत्त्वाचे म्हणजे अरबांची कौटुंबिक आणि सामाजिक बांधीलकी प्रकर्षांने सर्व सणांमध्ये जाणवते. सणाच्या दिवशी शहरातील सर्व महत्त्वाची स्मारके सर्वसामान्य जनतेसाठी खुली केली जातात. अरब संस्कृतीची ओळख करून देणारे विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. रस्ते, मॉल्स, गगनचुंबी इमारतींवर रोषणाई केली जाते. भव्य आणि तितकेच कलात्मक फटाक्यांचे शोज् आयोजित केले जातात. अवघे शहर सणाच्या आनंदात बुडून जाते. मग हा सण तुमच्या धर्माचा असो वा नसो; तुम्ही आपसूकच त्या सोहळ्यात मिसळून जाता.अरब कुटुंबातील सगळे लोक एकत्र येऊन हे सण साजरे करताना दिसतात. अर्थातच सगळे एकत्र आले म्हणजे मेजवान्या ही अर्थातच सणानिमित्ताची महत्त्वाची रीत आलीच. या मेजवान्यांमध्ये मांसाहारी पदार्थाना प्राधान्य आहे. ज्याला राष्ट्रीय पदार्थ म्हणता येईल असा ‘हारीस’ किंवा ‘हारिसाह्’ त्यात हवाच. हारीस म्हणजे तुकडा गहू किंवा दलिया. रात्रभर गहू भिजवून दुसऱ्या दिवशी मटणाबरोबर शिजवला जातो. त्यात केवळ दालचिनी, मीठ, मिरी आणि लोणी घालायचे.. इतकी ही साधी-सोपी पाककृती असूनही ‘हारीस’च्या स्वादात सोहळ्याचे वातावरण निर्माण करण्याचे सामथ्र्य असते. याशिवाय आपल्या बिर्याणीसारखा इथला ‘माचबूस’ आणि समुद्रात मिळणारा हामुर मासा ‘समॅक मगली’ (तळलेला मासा) हे पदार्थही इथे प्रचलित आहेत. गोडधोड खाल्ल्याशिवाय सण इथेही साजरे होत नाहीत. ‘लुकाइमत’ नावाचे मिष्टान्न यूएईमध्ये प्रसिद्ध आहे. हा पदार्थ दिसायला गुलाबजामसारखा दिसला तरी खजूरच्या पाकात घोळवल्याने त्याला खास अरेबिक बाज येतो. कुटुंबातील सर्वचजण सणाला एकत्र सहभोजन करतात. जेवताना केवळ उजवाच हात वापरावा, वाढताना किंवा भांडे पुढे सरकवतानाही उजव्याच हाताचा वापर करावा अशी इथे प्रथा आहे.कौटुंबिकतेप्रमाणेच सामाजिक बांधीलकीही प्रत्येक सणात अधोरेखित होताना दिसते. खासकरून रमझानच्या महिन्यात आणि त्यानंतर येणाऱ्या ईदमध्ये खूप दानधर्म केला जातो. या काळात वर्षभर कमावलेल्या संपत्तीवर इस्लामिक संकल्पनेनुसार जकात देण्याची प्रथा आहे. जकात हा एक प्रकारचा टॅक्स असतो- जो गरीबांच्या हितासाठी वापरला जातो. रमझानचा पूर्ण महिना हा एक सोहळा असतो. एकीकडे रोज उपास सोडताना होणाऱ्या इफ्तारमध्ये लोक एकमेकांना भेटून कौटुंबिक नात्यांमध्ये पुन्हा नव्याने रंग भरत असतात, तर दुसरीकडे मशिदींमध्ये हजारो आश्रितांना कपडे, जेवण आदीचे वाटप करून सामाजिक जबाबदारीही पार पाडली जाते. हे झाले यूएईपुरते. पण दुबई हे असे शहर आहे की जिथे ८० पेक्षा जास्त देशांतील लोक नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने वास्तव्यास आहेत. दुबईतील वास्तव्यात अनेक देशांतील मित्र-मैत्रिणींमुळे त्यांची संस्कृती, प्रथा, रूढी, परंपरा, उत्सव, सण  समजण्यास मदत झाली आणि होते आहे आणि मित्रांच्या या सणांत सहभागी होण्याची संधीही मिळते. कदाचित हा माझा भारतीयत्वाचा अभिमान असेल; पण नवरात्री आणि दिवाळी या आपल्या सणांबद्दल यूएईतील लोकांना आणि एकूणच तिथे वास्तव्य असलेल्या विविध देशांतील माझ्या मित्रांना विशेष आकर्षण वाटते. दांडियाच्या निमित्ताने होणाऱ्या बांधणी प्रिंटच्या कपडय़ांची खरेदीत परदेशी मित्र-मैत्रिणीही मागे नसतात अन् दिवाळीला पणत्या लावून घरे सुशोभित करण्यातही अनेक परदेशी मित्र आता चांगलेच सरावले आहेत. गंमत म्हणजे करंज्या असोत किंवा पुरणपोळ्या- हे पदार्थ म्हणजे स्वर्गीय चवीची अनुभूती देतात, अशी प्रशंसा या सणांनिमित्ताने न चुकता मिळतेच.वेगवेगळ्या देशांतील विविध सण अनुभवताना जाणवले की, सण साजरे करण्याचे रीतिरिवाज व रीती जरी वेगवेगळ्या असल्या तरी सगळ्या सणांचा गाभा असतो त्यातला आनंद आणि या आनंदाची देवाणघेवाण! खरे तर सणांमध्ये देश वा धर्म असा नसतोच; असतो फक्त जल्लोष.. जीवनाचा आणि माणुसकीचा उत्सव!
shilpa@w3mark.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2015 1:39 am

Web Title: life celebration
Next Stories
1 मॉन्टेरोसोचा लिंबू महोत्सव
2 ‘खूप लोक आहेत’, पण श्याम मनोहर एकमेव अपवाद!
3 ऐंशीतले सिंहावलोकन
Just Now!
X