वृद्धत्व- आयुष्याच्या मालिकेतील शेवटचा भाग! अजूनही वृद्ध व्यक्ती/ वृद्धत्व म्हटलं की मला माझी आजी, माझे आजोबा आठवतात. आजीची सुरकुतलेली त्वचा, त्याच्यावरून हात फिरवणं मला खूप आवडायचं. अजूनही तिला जमेल ते काम करणारी, फारशी शिकलेली नसतानादेखील पेपर वाचायचा प्रयत्न करणारी आजी मला आठवते. माझे आजोबा शेवटपर्यंत आनंदी होते. लहान मुलांशी, नातवंडांशी ते अगदी लहान मूल होऊन खेळायचे. फिरायची, निसर्गाची त्यांना खूप आवड होती. ते उत्तम खवय्ये होते. त्यांच्या वृद्धपणी त्यांच्या बालपणापेक्षा किंवा तरुणपणापेक्षा आजूबाजूची परिस्थिती नक्कीच बदललेली होती. पण त्या परिस्थितीशीसुद्धा त्यांनी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. कॅन्सरने त्यांना गाठूनसुद्धा त्यांची जीवनेच्छा प्रबळ होती. मृत्यूपूर्वीसुद्धा लाडकी क्रिकेटची मॅच बघून ते झोपले होते. असं जणू ते ‘आनंदाचं झाड’ होतं.
परवा एक वृद्ध गृहस्थ माझ्याकडे आले होते. त्यांच्या वागण्यात अलीकडे खूप चिडचिडेपणा आला होता. छोटय़ा छोटय़ा गोष्टींवरून त्यांना खूप राग यायचा. मग आक्रस्ताळेपणाने बोलणं सुरू होत असे. झोप नाही, सतत काळजी, भविष्याबद्दल नकारात्मक विचार, पत्नी नसल्यामुळे आलेलं एकाकीपण असा सगळा प्रकार होता. ते म्हणाले, ‘काय करू डॉक्टर काहीच उत्साह वाटत नाही हो. सकाळी फिरायला जातो, आमचे मित्र वगरे तेवढाच काय तो थोडा विरंगुळा. घरी आल्यावर वर्तमानपत्र वाचायला घेतलं की कसं होणार आपल्या पुढच्या पिढीचं, विशेषत: नातवंडांचं, त्यांच्या मोठेपणी आणखीच सगळं भयावह होणार असं वाटायला लागतं. नातू घरी असतो तेव्हा सारखा कॉम्प्युटर, टीव्ही नाहीतर त्याचा अभ्यास, क्लासेस यात बिझी असतो. म्हणून मुलाने मला दुसरा टीव्ही माझ्या खोलीत लावून दिला. तर मग एकटय़ाने काय बघायचा म्हणून कंटाळा येतो. बाहेर गेल्यावर किंवा कधीही संपर्कासाठी उपयोग व्हावा म्हणून मुलाने चांगला मोबाइल दिला, पण मला काही त्यात आवड वाटत नाही. काय करायचं ते यंत्र? नातवाने एकदा बसून शिकवलंदेखील, पण मीच ते मनापासून शिकलो नाही.
‘दुसरा मुलगा अमेरिकेत असतो. तिथे जातो. काही काळ जरा बरं वाटतं. कारण सगळं कसं छान वैभवशाली असतं. सुलभ आयुष्य असल्यामुळे सुरुवातीला बरं वाटतं. पण पुन्हा रिकामपण, मनुष्यवस्ती नाही, त्यामुळे सुनसान वाटायला लागतं. आपला देश बरा म्हणून परत येतो, तर इथे हे प्रॉब्लेम्स आ वासून उभे राहतात.
‘माझे मित्र मात्र छानपकी मोबाइल वापरतात. काही मित्र तर कॉम्प्युटरसुद्धा लीलया हाताळतात. अगदी नेट सìफग, नेट बँकिंग, नेटवरून रेल्वे, विमानाचं बुकिंग, ई-मेल वगरेसुद्धा करत असतात. मला आश्चर्य वाटतं.’
‘तुमची मुलं, सुना बोलतात का तुमच्याशी?’, मी विचारलं. ते म्हणाले, ‘बोलतात, गप्पा मारायला बसतात. ऑफिसमधून फोन करतात. पण माझा सूर नकारात्मक व्हायला लागला की बोलणंच खुंटतं.’
नंतर एक दुसरे वृद्ध गृहस्थ आले होते, त्यांच्या पत्नीबरोबर. ते व त्यांची पत्नी एका फ्लॅटमध्ये तर जवळच्याच इमारतीत त्यांचा मुलगा, सून, नातवंडे असे राहात होते. नातवंडे दिवसभर त्यांच्याकडे सांभाळायला असायची. पण नंतर सुट्टीच्या दिवशी कुठे बाहेर जायचं आहे, सिनेमाला जायचं आहे अशा कारणांमुळे मुलांचा सांभाळ करावा लागायचा. त्या बदल्यात मुलगा पसे किंवा काही आवश्यक गोष्टी वगरे सर्व द्यायचा. परंतु कुठेतरी या दोघांच्या ‘अवकाशावर’ सतत अतिक्रमण होत असल्याचे विचार त्यांच्या मनात येत होते आणि त्यावर बराच खल करून दोघांनी काही महिने वृद्धाश्रमात जाऊन राहायचा व कधी मधून मधून या घरात राहायला यायचा निर्णय घेतला होता.
पण आता त्यांच्या जिवाची घालमेल होत होती की, मग आता नातवंडांना कोण बघणार? तिथे त्यांचा नीट सांभाळ होईल का? मुलगा, सुनेला काय वाटेल? घराकडे तो नीट लक्ष देईल का? त्याने त्यास नकार दिला तर काय करायचं? वानप्रस्थाश्रमात जायचा निर्णय मनाशी घेतला तर होता, पण अवस्था झाली होती, ‘आवा चालली पंढरपुरा’सारखी! त्यामुळे दोघांनाही खूप अस्वस्थ वाटत होतं.
थोडक्यात, पहिल्या केसमधील काकांना, कुठल्याही नवीन गोष्टींशी वा परिस्थितीतील बदलाशी जुळवून घेणं कठीण वाटत होतं. भोवतालच्या परिस्थितीतून येणाऱ्या वैफल्यामुळे भविष्याची चिंता सतत रवंथ करत होती.
हा जो परिणाम झाला होता, तो वृद्धत्वाविषयीच्या, तसंच एकूणच परिस्थितीबद्दलच्या अविवेकी दृष्टिकोनामुळे. सभोवतालची परिस्थिती अमुक अशीच असलीच पाहिजे, मला हवी तशीच असली पाहिजे हा दृष्टिकोन असल्यामुळे जी गोष्ट मुळातच हातात नाही ती बदलण्याचा किंवा बदलली जाण्याचा अट्टहास मनाशी बाळगल्यामुळे ज्या गोष्टी बदलणे हातात आहेत, तेही जमत नव्हतं. पदरी निराशा येत होती.
वृद्धत्वात शरीरात बदल होतात. उदा. शक्ती कमी होणे, विविध आजार, दुखणी बळावणं वगरे जरी होत असलं तरी त्या बदलांना स्वीकारलं पाहिजे. म्हणजे असं- थोडं दुखणं-खुपणं होतच राहणार, असं मानून, पण आपण आपलं मन हिरव्या देठाप्रमाणे तरतरीत ठेवायला हवं, लवचिक ठेवायला हवं. असा दृष्टिकोन ठेवला म्हणजे नव्या जमान्यातील नवीन बदल सहज ‘स्वीकारता’ येतात. या बदलांमुळे मन आनंदित राहील की जी परिस्थिती (वाईट) बदलता न येण्यासारखी असली तरी ती बदलण्यासाठी थोडा खारीचा वाटा उचलण्याचं बळ मिळतं. थोडक्यात, ‘वृद्धत्वी निज शैशवास जपणे’ ही वृत्ती/ असा विवेकी दृष्टिकोन ‘आनंदाची झाडे’ निर्माण करतो.
तर दुसऱ्या केसमधल्या वृद्ध जोडप्यास आपलं ‘अवकाश’ जपण्यासाठी वृद्धाश्रमात जावंसं वाटत होतं. पण तरी मनाने ते ‘आवा’प्रमाणे मुला-नातवंडांतच गुंतून राहात होते. येथे त्यांना जबाबदारी/ कर्तव्य व स्वातंत्र्य यांचा योग्य मेळ घालण्यात अपयश येत होतं. यासाठी त्यांनी स्वत:साठीची प्राथमिकता ठरवून त्याप्रमाणे मुलगा-सुनेशी संवाद साधणं आवश्यक होतं. त्यासाठी वृद्धाश्रमात जायचा टोकाचा निर्णय घेण्याची गरज नव्हती, पण आपल्या निर्णयामुळे मुलगा दुखावता कामा नये असा अविवेकी दृष्टिकोन त्यांना संवाद साधण्यापासून रोखत होता. मनाची अस्वस्थता
वाढवत होता. त्यामुळे समोरच्यास न दुखावता पण आपलं योग्य मत मांडायची संवादशैली शिकवण्याची गरज होती. योग्य वेळी साधलेल्या योग्य प्रकारच्या संवादातून नातेसंबंधातल्या समस्या सुटू शकतात. त्याचबरोबर माझ्या निर्णयामुळे काही जण दुखावले जाऊ शकतात, मी सगळ्यांना आनंदी करू शकत नाही असा विवेकी दृष्टिकोन असेल तर ते अधिक सोपं होईल.
स्वत:ला आहे तसं स्वीकारायचं व जगाने बदलायचं अशी अपेक्षा करायची यापेक्षा स्वत:बरोबरच जगालाही आहे तसं स्वीकारा म्हणजे जगाकडे बघण्याची तुमची दृष्टी बदलून जाईल. जगाच्या योगे आयुष्य सुंदर बनून जाऊ द्या. ‘जग असलं तरी आयुष्य सुंदर बनू द्या’, असं तत्त्वज्ञ द व्हाइस रॉ यांनी म्हटलं आहे. असं करण्याचा प्रयत्न केला तर प्रत्येकाला ‘आनंदाचं झाड’ नक्कीच बनता येईल!    
adwaitpadhye1972@gmail.com