‘लोकरंग’चे नवे स्वरूप आवडले. प्रत्येक नवीन सदर वाचण्यासारखे आहे. २५ जानेवारीच्या अंकात ओबामा यांच्या भारत- भेटीच्या निमित्ताने लिहिलेले दोन्ही लेख समयोचित आहेत. त्यांच्यासाठी योजलेल्या प्रचंड lok03सुरक्षाव्यवस्थेचा आढावा चांगल्या रीतीने घेतला गेला. लता राजे यांच्या लेखात अपेक्षिलेले भारत-अमेरिका मैत्रीचे नवे पर्व नक्की कधी सुरूहोईल आणि त्याचा कोणाला किती फायदा किंवा तोटा होईल, ते येता काळच ठरवेल.
सलील कुलकर्णी यांनी ‘ङ्रल्लॠ ऋ डरकाळी’ द्वारे आधुनिक गोबेल्सचे (सोशल मीडिया) प्रचारतंत्र किती प्रभावी असू शकते त्याची चुणूक दाखविली. दीपक देवधर यांचे ‘तंत्रजिज्ञासा’ सदर नक्कीच जिज्ञासापूर्ती करणारे आहे. आपल्या नेहमीच्या वापरातील वस्तूंविषयी अजूनही आश्चर्यमिश्रित कौतुक वाटत राहते.
‘अप्पा बळवंत’ २०१५ मध्येसुद्धा कार्यरत आहेत म्हणून बरे वाटले. त्यांनी सांगितलेली भक्तीची बदललेली रूपे झकास.  प्रशांत सावंत यांनी ‘देशोदेशी’त करून दिलेली लंडनवासीयांची ओळख आवडली.  त्यांच्या प्रथा, आचारविचार आणि कलेबद्दलची आसक्ती वाचून पुलंनी रेखाटलेले लंडन फारसे बदललेले नाही असे वाटले. मनाली रानडे यांची बौद्धिक कोडी नेहमीच भुरळ घालतात. वयाची साठी आली तरी शाळकरी उत्सुकतेने ही कोडी सोडवायचा प्रयत्न करतो. त्यांनी दिलेली वेबसाइट पाहिली व आपल्या सर्वाच्या माहितीचे ‘माणूस, कोल्हा, बकरी आणि कोबी’ हे कोडे सोडवले. मजा आली.
अभय दातार, मुंबई.