07 July 2020

News Flash

खेळ मांडला.. : लिव्हरपूलची जर्मन ‘संस्कृती’

इंग्लिश प्रिमियर लीग या जगातील सर्वात लोकप्रिय फुटबॉल साखळीचे अजिंक्यपद लिव्हरपूल फुटबॉल क्लबने जवळपास सात सामने आधीच निश्चित केले.

लिव्हरपूलने जुन्या स्वरूपातील इंग्लिश प्राथमिक साखळीचे अजिंक्यपद सर्वाधिक १८ वेळा पटकावले आहे.

सिद्धार्थ खांडेकर – siddharth.khandekar@expressindia.com

इंग्लिश प्रिमियर लीग या जगातील सर्वात लोकप्रिय फुटबॉल साखळीचे अजिंक्यपद लिव्हरपूल फुटबॉल क्लबने जवळपास सात सामने आधीच निश्चित केले. ही कामगिरी पराक्रमी मानावी लागेल. कारण अगदी अलीकडेपर्यंत मँचेस्टर युनायटेड, आर्सेनल, चेल्सी आणि मँचेस्टर सिटी या मोजक्या क्लबांची या साखळीत अघोषित मक्तेदारी असायची. वास्तविक लिव्हरपूलने जुन्या स्वरूपातील इंग्लिश प्राथमिक साखळीचे अजिंक्यपद सर्वाधिक १८ वेळा पटकावले आहे. पण १९९२मध्ये प्रिमियर लीग स्थापन झाल्यापासूनचे हे पहिलेच अजिंक्यपद, त्यामुळे सध्याच्या पिढीला तर ते ठाऊकही असण्याची शक्यता नाही. इंग्लिश फुटबॉलमधील सर्वाधिक पारंपरिक द्वंद्व म्हणजे या मिलेनियल पिढीच्या लेखी मँचेस्टर युनायटेड विरुद्ध लिव्हरपूल नव्हे, तर मँचेस्टर युनायडेट विरुद्ध इतर कोणताही क्लब असे असायचे! तेही साहजिकच, कारण आजवर १३ अजिंक्यपदे या क्लबच्या नावावर आहेत. मग चेल्सी, मँचेस्टर सिटी आणि आर्सेनेल यांच्या नावावर अनुक्रमे ५,४ आणि ३ अजिंक्यपदे.

पण मँचेस्टर युनायटेडचे जहाज सर अलेक्स फग्र्युसनसारखा कप्तान निवृत्त झाल्यानंतर जे भरकटले, ते किनाऱ्याकडे आलेलेच नाही. मँचेस्टर सिटी, चेल्सी, गतदशकात आर्सेनल (यांची गत आर्सेन वेंगरसारखा मुरब्बी व्यवस्थापक/ मार्गदर्शक सोडून गेल्यामुळे केविलवाणी) असे मोजकेच विजेते इंग्लिश प्रिमियर लीगमध्ये आलटूनपालटून दिसत होते. गेलाबाजार लीस्टर सिटी आणि ब्लॅकबर्न रोव्हर्स यांचा सणसणीत अपवाद. त्या रांगेत आता लिव्हरपूलही जाऊन बसलेत. लिव्हरपूल आणि मँचेस्टर युनायटेड या दोन्ही शहरांना आपापल्या फुटबॉल संस्कृतीचा विलक्षण आदर आहे, आणि विरोधी संस्कृतीचा तितकाच तिटकारा. लिव्हरपूल आणि इंग्लंडचा माजी विख्यात फुटबॉलपटू स्टीफन जेरार्डने केवळ एकाच क्लबविरुद्धचा सामना संपल्यानंतर कधीही स्वत:च्या जर्सीची अदलाबदल केलेली नाही. तो क्लब म्हणजे मँचेस्टर युनायटेड. निव्वळ आकडेवारीचा विचार करायचा झाल्यास दोन्ही क्लब परस्परांना तोडीस तोड ठरतील. मँचेस्टर युनायटेडच्या नावावर २० इंग्लिश लीग आणि प्रिमियर लीग अजिंक्यपदे आहेत, तिथे यंदाचा हंगाम गृहित धरून लिव्हरपूलच्या नावावर १९ अजिंक्यपदे आहेत. पण युरोपमध्ये मँचेस्टर युनायटेडपेक्षा (३) लिव्हरपूल (६) अधिक यशस्वी ठरलेला दिसतो. नवीन सहस्रकात मँचेस्टर युनायटेडने प्रिमियर लीग अनेकवेळा जिंकलेली असली, तरी युरोपियन चँपियन्स लीग त्यांना जिंकता आली नाही. याउलट २००५ आणि २०१९ अशी दोन वर्षे लिव्हरपूल युरोपात अजिंक्य ठरला होता. तेव्हा गेल्या वर्षी युरोपियन अजिंक्यपद आणि यंदा इंग्लिश अजिंक्यपद – तेही विक्रमी सात सामने शिल्लक ठेवून पटकावणाऱ्या लिव्हरपूलच्या यशाची कारणे अनेक असली, तरी ही उलथापालथ घडवून आणण्याचे श्रेय एकाच व्यक्तीकडे जाते. तिचे नाव जुर्गन क्लॉप.

गेले दोन हंगाम इंग्लिश हंगाम मँचेस्टर सिटी क्लब अजिंक्य ठरत असला, तरी विशेषत: २०१९ या कॅलेंडर वर्षांत लिव्हरपूलची कामगिरी थक्क करणारी ठरते. या वर्षभरात ते ३७ सामने खेळले, त्यांतील ३१ जिंकले, पाच वेळा बरोबरी आणि एकदा हार. या काळात त्यांनी चँपियन्स लीग, युएफा सुपर कप, फिफा क्लब कप ही जेतेपदे मिळवून आता ते इंग्लिश चँपियनही ठरलेत. युर्गन क्लॉप हे जर्मन. बरीच वर्षे बोरुसिया डॉर्टमुंड या तिथल्या क्लबचे प्रशिक्षक होते. २०१५मध्ये ते लिव्हरपूलचे प्रशिक्षक बनले. मंचेस्टर युनायटेड, चेल्सी, मँचेस्टर सिटी यांच्याइतका लिव्हरपूल क्लब श्रीमंत नाही. त्यामुळे एखाद-दोन फुटबॉलपटूवर दशलक्ष बरसून क्लबच्या अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडणे शक्य नाही, हे क्लॉप यांना बजावले गेले. पण क्लॉप यांना याची सवय होती. बोरुसिया डॉर्टमुंडचे प्रशिक्षक असताना, अत्यंत आक्रमक व्यूहरचनेसाठी ते प्रसिद्ध होते. ‘गेगेनप्रेसेन’ नावाने ओळखली जाणारी ही व्यूहरचना, चेंडूचा ताबा मिळवून प्रतिस्पध्र्यावर पूर्ण दडपण आणण्यासाठी वापरली जाते. या दशकाच्या सुरुवातीला दोन प्रणालींनी फुटबॉल जगतावर अधिराज्य गाजवले. त्यांतील एक होती स्पॅनिश टिकी-टाका. यातही चेंडूवर ताबा राखणे आवश्यक मानले जाते. दुसरी जर्मन पद्धती बरीचशी गेगेनप्रेसेनच्या जवळ जाणारी. त्यावेळी जर्मनीत बोरुसिया डॉर्टमुंडने बलाढय़ बायर्न म्युनिचसमोर मोठे आव्हान उभे केले, तेव्हा त्याचा मुकाबला करण्यासाठी बायर्नकडूनही आक्रमक प्रणालीचा वापर होऊ लागला. २०१०मध्ये स्पेन आणि २०१४मध्ये जर्मनी जगज्जेते ठरावेत हा योगायोग नाही. त्यांनी आत्मसात केलेल्या शैलींना याचे श्रेय द्यावे लागेल. त्यावेळचे दोन प्रशिक्षक क्लब पातळीवर ही शैली रुजवण्यास कारणीभूत होते. त्यांपैकी एक होते टिकी-टाका फेम पेप गार्डियोला आणि दुसरे होते युर्गन क्लॉप. याच काळात बार्सिलोना, बायर्न म्युनिच, रेआल माद्रिद, बोरुसिया डॉर्टमुंड हे त्यांच्या-त्यांच्या देशातील तसेच युरोपियन क्लब स्पर्धा गाजवत होते हाही योगायोग नाही. ही गेगेनप्रेसेन शैली क्लॉप यांनी लिव्हरपूलला वेगळ्या स्वरूपात रुजवली. त्याची फळे दिसू लागली आहेत. प्रिमियर लीग आणि चँपियन्स लीग अजिंक्यपदांबरोबरच दोन्हींमध्ये एकेक  उपविजेतेपदही क्लॉप यांच्या मार्गदर्शनाखाली लिव्हरपूलने पटकवले आहे याची नोंद घ्यावी लागेल. क्लॉप यांच्या आजच्या लिव्हरपूल संघात बचावपटूही आक्रमणात सहभागी होऊ शकतात. विंगर मंडळी गोल करू शकतात. वेळ पडल्यास मधली फळी बचावासाठी सरकू शकते. अशा प्रकारच्या व्यूहरचनेत शारीरिक तंदुरुस्ती परमोच्च महत्त्वाची असते. त्याचबरोबर एकाग्रताही महत्त्वाची असते. याच गुणांवर जर्मनीने २०१४मध्ये विश्वचषक जिंकला. पण जवळपास त्याच संघाची धार – तंदुरुस्ती पातळी आणि एकाग्रता – २०१८मध्ये मात्र बोथट झाली होती. याचा मोठा फटका त्या संघाला बसला. त्यामुळे गेगेनप्रेसेन हे दुधारी शस्त्र आहे. पण त्याचबरोबर ते एक फुटबॉल तत्त्वज्ञानही आहे. या तत्त्वज्ञान वैयक्तिक खेळापेक्षा सांघिक खेळाला प्राधान्य देते. त्याअर्थी क्लॉप यांनी जर्मन फुटबॉल संस्कृती इंग्लंडमध्ये रुजवली आहे. त्यामुळे स्टीफन जेरार्ड किंवा लुइस सुआरेझ यांना एका मर्यादेपेक्षा मोठे होऊ दिले जात नाही. मोहम्मद सालाह, सादिओ माने, व्हर्जिल व्हॅन डाइक, अँडी रॉबर्ट्सन, ट्रेंट अलेक्झांडर-अरनॉल्ड, रॉबेटरे फर्मिन्यो असे अनेक दर्जेदार फुटबॉलपटू या संघातून खेळतात. त्यामुळे एका मेसी वा रोनाल्डोवर ते अवलंबून नसतात. गेल्या दशकात जर्मन फुटबॉलने कात टाकली आणि ते धसमुसळ्या खेळाकडून आक्रमक नेत्रसुखदतेकडे आवर्जून सरकले. क्लॉप या बदलाचे साक्षीदारच नव्हे, तर भागीदारही होते. हीच नेत्रसुखद आक्रमकता आणि संघभावना त्यांनी लिव्हरपूलमध्ये आणली. त्यातून इंग्लिश फुटबॉलही समृद्ध झाल्यासारखे वाटते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2020 12:06 am

Web Title: liverpool football club german culture khel madiyala dd70
Next Stories
1 अस्तित्व आणि पुरोगामित्व…
2 आणीबाणी, मूलभूत स्वातंत्र्य आणि आज
3 देशउभारणीत नेहरूंचे मोठेच योगदान
Just Now!
X