लालकृष्ण अडवाणी हे स्युडो-हिंदू संघाचे प्यादे!

‘शापित नायक’ या सुधींद्र कुलकर्णी यांच्या लेखात रंगवलेल्या अडवाणींच्या प्रतिमेपेक्षा सत्य काही वेगळंच आहे. १९९५ मध्ये भारत विश्व व्यापार संघटनेचा सदस्य देश झाला आणि नंतर अटलबिहारी वाजपेयी सत्तेत आल्यावर आधी आंध्र प्रदेशात आणि मग सबंध देशात शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरू झाल्या. भारत ‘गॅट’चाही सदस्य होता आणि गॅटच्या १९८६ च्या उरुग्वे बठकीतच शेतीमालाच्या आयात-निर्यातीचा अंतर्भाव असावा असा डंकेल प्रस्ताव ठेवला गेला होता. डंकेल प्रस्तावांतर्गत सर्व कृषी अनुदानं कमी करायची होती. आधी ‘तुम्ही कमी करा, मग आम्ही’ म्हणत आपापल्या अनुदानांसाठी श्रीमंत देश भांडायला लागले. भारत विशेष काही अनुदानं देतच नसल्यामुळे बघ्याच्या भूमिकेत राहिला. पण जगातल्या श्रीमंत देशांतल्या शेतकऱ्यांना कोणकोणती अनुदानं मिळतात, आयात-निर्यात खुली झाल्यावर आपल्याला फायदा होणार की तोटा, यावरील चच्रेसाठी नंतरची चार-पाच वर्षे महत्त्वाची होती. १९९१ मध्ये नरसिंह राव यांनी रुपयाचं अवमूल्यन करून बहुराष्ट्रीय कंपन्यांना देशाची दारं खुली करून टाकली. पण याची साधकबाधक चर्चा शेतकऱ्यांच्या कानावर पडूच नये यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने शेती करणाऱ्या जातींच्या नायकाचे- रामाचे भजन गायला सुरुवात केली. त्यापूर्वी गावांमध्ये ज्या दोन-चार घरांत रामाचा फोटो असायचा किंवा पंचक्रोशीतल्या एखाद्या गावात रामाचे एखादे देऊळ असायचे त्यातला राम कुटुंबवत्सल- ज्याच्या एका बाजूला सीता उभी असायची, एकीकडे लक्ष्मण, पायाशी मारुती- पाठीला तीर लटकवलेले आणि एका हातात धनुष्यबाण, एका हाताने आशीर्वाद देणारा राम हिंदूंना परिचित होता. मात्र अडवाणींच्या रथावर थेट प्रत्यंचा ताणलेला, आक्रमक, एकटा, क्रुद्ध असा राम दाखवला गेला आणि अशा रामाचे उदाहरण हिंदूंच्या मनावर ठसवणारे अडवाणी हे सुधींद्र कुलकर्णी यांच्या ‘शापित नायक’ या लेखातील म्हणण्यानुसार, मुस्लिमांना सहिष्णुता शिकवायला निघाले होते! तेही गावागावात एकमेकांना नमस्कार करताना म्हटले जाणारे ‘राम राम’ आणि भजनांमध्ये गायले जाणारे ‘जय सीताराम’चे ‘जय श्रीराम’ करून.. म्हणजे त्यातली सीता वगळून!

कुलकर्णी म्हणतात, अडवाणींना पुस्तकं वाचण्याची आवड आहे. पण त्यात त्यांनी नेमकी मुस्लिमांनी हिंदूंची देवळे पाडल्याची उदाहरणं देणारीच पुस्तकं वाचली! मुस्लीम शासकांनी मशिदी पाडल्याची, हिंदूंनी हिंदूंचीच देवळे पाडल्याची, हिंदूंनी बौद्ध आणि जैनांची देवळे पाडल्याची, तिथे घुसखोरी केल्याचे दाखले देणारी पुस्तकं अडवाणी यांनी वाचलीच नाहीत. हा योगायोग नसून इथल्या सांस्कृतिक संघर्षांचे अज्ञान हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एक उठून दिसणारे लक्षण आहे. भारतात होते तशी जगात कुठेच स्त्रीदेवतांची इतक्या मोठय़ा प्रमाणात पूजा होत नाही. त्यातही भारतातल्या गावागावातल्या वेशीवर असलेल्या मरीमाय, मातामाय, नोकामाय या इतर धर्मातल्या पूजनीय स्त्रियांहून अगदी वेगळ्या असूनही आजही हिंदू समाज त्यांना पूजतो. अडवाणींना आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला भारताचे हे वैशिष्टय़ जपावेसे वाटत नाही. तर त्यांच्यासमोर आदर्श आहे तो मुस्लीम, ख्रिश्चन धर्माचा, त्यांच्या मक्का-मदिनेचा, त्यांच्या व्हॅटिकनचा! अयोध्येतल्या कथित राम मंदिराला लागून असलेल्या ‘सीता की रसोई’ची संपूर्ण राम मंदिर आंदोलनात कुठेच चर्चा नाही.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ‘पाकिस्तान’ किंवा ‘पार्टशिन ऑफ इंडिया’मध्ये सोमनाथवरील हल्ल्याचा उल्लेख आहे, असे कुलकर्णी म्हणतात. म्हणून सोमनाथ मंदिर बांधणे आवश्यक होते- असेल तर ‘अ‍ॅनिहिलेशन ऑफ कास्ट’मध्ये बाबासाहेबांनी ब्राह्मणांनी लिहिलेल्या स्मृती, शास्त्र आणि इतर धार्मिक ग्रंथांची निंदा केली आहे, ते नाकारण्याचे आव्हान आणि आवाहन दोन्ही केले आहे. तसा एखादा कार्यक्रम संघाने किंवा अडवाणींनी का हाती घेतला नाही? २५ डिसेंबरला डॉ. बाबासाहेबांनी मनुस्मृती जाळली होती. त्यासोबतच ऋग्वेद, अथर्ववेदात स्त्रीनिंदा काठोकाठ भरली असल्यामुळे तेही जाळण्याचा कृती कार्यक्रम संघाने हाती घेतला पाहिजे. कारण इथल्या मूळ स्त्रीपूजक समाजाची अस्मिता ठेचण्यासाठीच संस्कृत ग्रंथांमध्ये स्त्रियांना कमी लेखले गेले, हेही मुबलक पुस्तकांमध्ये, संशोधनामध्ये सिद्ध झालेले आहे. बाबरी मशीद पाडली गेल्याची इतकी चुटपुट अडवाणींच्या मनाला लागून होती.. त्यांची रथयात्रा मुस्लीमविरोधी असल्याच्या वार्तेत ‘कणभरही सत्य नव्हते’, तरीही २००२ मध्ये ते देशाचे गृहमंत्री असताना  गुजरातेत मुस्लिमांचा संहार झाला! इतकं करूनही २००४ मध्ये हिंदूंच्या मतांचं एकत्रीकरण होऊन पुन्हा सत्ता मिळाली नाही, म्हणून मग त्यांना पाकिस्तानात जाऊन हिंदू-मुस्लीम ऐक्याची भाषा करावीशी वाटली असणार. सत्तेसाठी हिंदू-मुस्लीम वैर वाढवणारे, हिंदू शेतकरी/ शेतमजुरांच्या हिताची चर्चाच न होऊ देणारे, हिंदू पुरुषी मानसिकतेवर हिंदू स्त्रीविरोधी संस्कार करणारे उपद्व्याप करणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघच मुळात ‘कृतक हिंदू’ असून लालकृष्ण अडवाणी त्याचे पाईक आहेत. ते शापित नायक नसून संघाने पुरुषसत्ताक ‘सांस्कृतिक’ प्रभुसत्तेसाठी वापरून फेकून दिलेले प्यादे आहेत.

– प्रज्वला तट्टे, नागपूर</p>

म्हणीचा गैर अर्थ

‘द्वैभाषिक लिखाणाचा दुस्तर घाट’ (लोकरंग- २४ नोव्हेंबर) या शांता गोखले यांच्या लेखात त्यांनी त्यांची आई वापरत असलेली ‘हा / ही कापल्या करंगळीवरही मुतणार नाही’ ही म्हण दिली असून तिचा अर्थ- ‘काहीच कृती न करणारा वाचाळवीर’ असा दिला आहे. या म्हणीचा जनमानसात रुजलेला अर्थ वेगळा असून ‘कुणावरही थोडेसुद्धा उपकार न करणारा / कंजुष’ असा आहे. कापलेल्या करंगळीतून होणारा रक्तस्त्राव थांबविण्यासाठी मूत्राचा उपयोग होतो. नाही तरी आपण ते शरीराबाहेर फेकून देत असतो. त्यातील थोडेसे एखाद्याच्या उपयोगी पडत असेल तर तेवढा तरी उपकार दुसऱ्यावर करायला काय हरकत आहे? पण ‘तेवढेसुद्धा न करणारा’ असा या म्हणीचा अर्थ आहे.

– दि. मा. प्रभुदेसाई, कुर्ला