डॉ. मंगला नारळीकर यांना आपल्या भ्रमंतीमय आयुष्यात देशविदेशात दिवाळी साजरी करण्याची संधी मिळाली. त्यांच्या या वैविध्यपूर्ण दिवाळी अनुभवांबद्दल..
नवरात्र चालू झालं, दसरा जवळ आला, की आता दिवाळी लांब नाही हे जाणवायचं. अगदी लहान.. म्हणजे चार-पाच वर्षांची असताना मी आजीजवळ बसून करंज्या, शंकरपाळे, कडबोळी हे पदार्थ स्वत:च्या हाताने करायचा हट्ट करत असे. आजी ते तसे करू देई. अर्थात तळण्याचं काम आजीचं किंवा काकूचं असायचं. या माझ्या हातच्या फराळाचा लहानसा डबा वेगळा असे. शाळेत जायला लागल्यावर मात्र फटाके, फुलबाज्या, रांगोळ्या, किल्ले अशा गोष्टींकडे माझं अधिक लक्ष असे. त्यातही फटाक्यांची भीती वाटायची. फुलबाज्या, भुईनळे, फार तर भुईचक्र एवढेच मी उडवीत असे. रंगीत उजेड देणाऱ्या काडेपेटय़ा आणि ‘साप’ नावाचे फुगून सर्पाकृती होणारे, भयानक धूर सोडणारे, लहान काडीसारखे फटाक्याचे प्रकारही असायचे. आता जाणवतं की, आम्ही तेव्हा किती प्रदूषण करत होतो. अलीकडे फटाके व प्रदूषण करणारे इतर प्रकारही वापरू नयेत अशी चळवळ सुरू झाली आहे. तिला माझा पूर्ण पाठिंबा आहे.
त्याकाळी शाळेला दिवाळीची सुट्टी लागण्याआधी कधी कधी सहामाही परीक्षेस आम्हाला तोंड द्यावे लागे. त्यानंतर मग मोठी सुट्टी. सुटीत शक्य असेल तेव्हा आकाशकंदील बनवणे हा एक उद्योग असे. कलाकार आतेभावांची मदत असेल तर ते काम सुरेख व्हायचं. विकत आणलेल्या आकाशकंदिलात ते समाधान नसायचं. फटाके, फुलबाज्या, फराळाचे पदार्थ, पहाटे उठून सुवासिक तेल व उटणे लावून अंघोळी, नवीन कपडे, भाऊबीजेला केवळ सख्ख्याच नव्हे तर हजर असणाऱ्या आते-मामे-मावस-चुलत कुठल्याही भावांकडून उकळायची भाऊबीज.. या सगळ्याची धमाल असायची. दारासमोर कुणाची रांगोळी सुंदर आहे याचं परीक्षण व्हायचं.. कौतुक व्हायचं. घरी केलेल्या फराळाची ताटे शेजारीपाजारी जायची.. त्यांच्याकडूनही यायची. मग कुणाची चकली मऊ पडलीय, कुणाची फार कडक आहे, कुणाचे लाडू मस्त जमलेत, कुणाच्या करंज्या नाजूक हलक्या आहेत, याची चर्चा. एखाद्या घरी फराळाचे पदार्थ करायला कुणी नसेल किंवा सवड नसेल तर त्यांच्या घरून बर्फी किंवा पेढय़ांचा बॉक्स यायचा. तो त्याच्या वेगळेपणामुळे आवडायचा. चार दिवस फराळाचे पदार्थ खाऊन कंटाळा आला की मग साधं पिठलं-भात अतिरुचकर लागे. वाचनाची आवड असल्याने दिवाळी अंकांची मेजवानी असायची. सुट्टी संपता संपता सुट्टीत करायला दिलेल्या अभ्यासाची आठवण होई. मग कसातरी दोन दिवसांत तो अभ्यास उरकायचा.
आमची दिवाळी कधी पुण्याला आजोळी, तर कधी मुंबईत होई. मुंबईत फटाक्यांचे आवाज जास्त. चाळीत किंवा लहान सदनिका असलेल्या मोठय़ा इमारतींत राहणारे ठरवून एकेका मजल्यावर एकसारखे आकाशकंदील लावत. एकसारख्या कंदिलांची ती शोभा, मोठय़ा दुकानांमधली आरास, एकेका वाडीतले किल्ले पाहायला जाणे, याची तेव्हा खूप मजा वाटे. पुण्यात किल्ले अनेक अंगणांत असत. मुंबईच्या मानाने थंडी जास्त; त्यामुळे पहाटे तेल लावून गरम पाण्याने अंघोळ करण्याची मजाही आगळी. शिवाय मामीने संत्र्याच्या, लिंबाच्या साली घालून दळून आणलेल्या शिकेकाईचा सुवास नाहताना मोहक वाटे.
‘भाऊबीजेला भावाला अंघोळीच्या आधी तेल लावून दिले पाहिजे, त्याची छोटी-मोठी कामे केली पाहिजेत, नाहीतर भाऊबीज मिळायची नाही,’ अशी घरातून ताकीद असायची. मीना माझ्याहून चार-पाच वर्षांनी लहान. ती असेल पाच वर्षांची. तर अनिल माझ्याहून दीड वर्षांने मोठा. त्याच्या पाठीला तेल लावायचं म्हणून मीना उत्साहाने त्याच्या पाठीवर तेल थापत असे. तेव्हा तो वैतागून ‘पुरे पुरे तुझं तेल लावणं.. साबण लावून ते धुवायला मला त्रास होईल!’ असं म्हणे. मग ते थापलेलं तेल चोळून जिरवायची जबाबदारी माझ्यावर यायची. पुढे मोठा होऊन तो मिळवायला लागल्यावर त्याच्या कमाईची पहिली भाऊबीज म्हणून आम्ही साडी आणायला गेलो, ती खास आठवण आहे.
एका दिवाळीला अनिल आणि मी आत्याकडे अहमदनगरला गेलो होतो. तिथे खूपच मोठं आवार. त्यात कलाकार असणारे मोठे आतेभाऊ. त्यांनी तर बराच मोठा किल्ला केला होता. केवळ हळीव किंवा मोहरी पेरून उगवलेली हिरवळ आणि किल्ल्यावर मांडलेल्या भावल्या एवढंच नव्हतं, तर खाली बाजाराचा देखावाही होता. पुठ्ठय़ाचे माणसांचे आकार कापून, रंगवून ती माणसं बाजारात, रस्त्यावर उभी केली होती. वाहने, दुकाने मांडली होती. गावातले कितीतरी लोक पाहायला येत होते, कौतुक करत होते. आम्ही बहिणींनी दाराजवळ रांगोळ्या काढल्या होत्या. काही ठिपक्यांच्या, तर काही मुक्तहस्त. माझी फुलबाज्या उडवणारी मुलगी माझ्या आठ-नऊ वर्षे वयाच्या मानाने बरी आली होती. आत्याने मला पोटाशी घेऊन त्याबद्दल कौतुक केलं.
लग्न झाल्यावर केंब्रिजमध्ये राहायला गेलो तेव्हा नलिनचंद्र विक्रमसिंह या मानलेल्या भावाप्रमाणेच लंडनमध्ये सीएचा अभ्यास करणारा मामेभाऊ प्रकाशही यायचा दिवाळीला. मी चुकतमाकत केलेले पदार्थ सगळेजण कौतुकाने खात. तिथल्या ख्रिसमसच्या सणाच्या वेळी आपल्या इथल्या दिवाळीसारखं वातावरण असतं, तेही तिथं अनुभवलं. त्यानंतर मुंबईत परतल्यावर सासूबाई, सासरे, मुली यांच्यासह टीआयएफआरच्या वसाहतीतील इतर शास्त्रज्ञांच्या कुटुंबांबरोबर साजऱ्या केलेल्या दिवाळ्याही आठवतात. याचदरम्यान मी सासूबाईंकडून काही खास बनारसी पदार्थ बनवायला शिकले.
एक अगदी असामान्य अशी दिवाळी १९९५ च्या खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी अनुभवली. तिची आठवण अनेक कारणांसाठी विसरता येत नाही. त्यावेळी आम्ही पुण्यात आयुकामध्ये राहत होतो. खग्रास सूर्यग्रहण ही खगोल निरीक्षकांसाठी अपूर्व संधी असते. काही शास्त्रज्ञ व विद्यार्थी जाणार होते आग्रा येथे, तर काही कोलकात्यात. काही भरतपूरला गेले. जयंत, मी व आमची धाकटी लीलावती आम्ही गेलो अलाहाबादला. तिथे एका सधन, उच्चशिक्षित कुटुंबात आमचं वास्तव्य होतं. साधारण आमच्याच वयाचं जोडपं. गृहस्थांची नव्वदीला टेकलेली वृद्ध आई, तिची वयस्क दाई, इतर नोकरचाकर असा मोठा परिवार होता. जरा जुन्या विचारांचे, परंपरा पाळणारे, सश्रद्ध लोक होते ते. आम्ही सकाळी लवकर उठून जुन्या व वापरात नसलेल्या विमानतळावर ग्रहण पाहायला जाणार होतो. त्यांच्या घरात सूर्यग्रहण व त्यावेळी येणारे सूर्यकिरण अत्यंत अशुभ मानले जात असत. वास्तविक सूर्यग्रहणाच्या वेळी घरात खाणेपिणे तर वज्र्य होतेच; पण शिजवलेले पदार्थही दूषित होतात म्हणून ते टाकून दिले पाहिजेत, हा नेम त्यांच्याकडे पूर्वी पाळला जात असे असं समजलं. दिवाळी असल्यामुळे कितीतरी फराळाचे जिन्नस, मिठाई घरात होती. आता काय करायचं? सासूबाईंच्या परवानगीने बाईंनी युक्ती योजली. घरी गोठय़ात गाय होती. सगळे ठेवायचे अन्न फ्रीजमध्ये ठेवून फ्रीजच्या चारही बाजूंना गाईच्या शेणाचे पट्टे काढले. टेबलावर जे मिठाईचे बॉक्स होते, त्यांच्यावर तुळशीच्या पानांचे गुच्छ ठेवले. त्यामुळे ते सगळे अन्न अशुभ किरणांपासून वाचले. घरातले सगळे लोक ग्रहणाच्या वेळी घरात सुरक्षित बसणार होते आणि ग्रहण संपल्यावर अंघोळी करणार होते. इकडे आम्ही मात्र खास सूर्यग्रहण पाहायला मोकळ्या मैदानावर निघालो होतो. मी त्या लोकांना खूप सांगितलं की, सूर्याकडे न पाहताही त्यांना झाडाखाली ग्रहण पाहता येईल. खंडग्रास म्हणजे अर्धवट ग्रहण चालू असेल तर सूर्याचीदेखील चंद्रकोरीसारखी कोर दिसते आणि सपर्ण झाडाखाली सूर्यकोरीचे कवडसे सुरेख, लेस विणल्यासारखे दिसतात. एरवी सूर्यप्रकाशाचे कवडसे गोल किंवा जरा लंबगोल दिसतात. मला हे सत्य १९८० च्या ग्रहणाच्या वेळी मुंबईत गवसले होते. सूर्याचे कवडसे म्हणजे पानांच्या मध्ये असणाऱ्या सूक्ष्म छिद्रांतून पिन-होल कॅमेरे तयार झाल्यामुळे पडलेल्या सूर्यप्रतिमा असतात हे त्यावेळी लक्षात आलं आणि त्याचं थ्रिल मी तेव्हा अनुभवलं होतं. हवं तर त्या लोकांनी छत्री धरून बाहेर बागेत जावं आणि झाडाखाली सूर्यकोरी पाहाव्यात असं त्यांना सुचवून आम्ही ग्रहण पाहायला गेलो.
ग्रहण पाहिलं. त्याचवेळी टीव्हीवर विविध शहरांतून घेतलेली ग्रहणाची छायाचित्रे दाखवली जात होती. सुरुवातीला सूर्याची कोर व तिचे कवडसे, सूर्य चंद्रामागे पूर्ण लपल्यावर झालेला अंधार, झाडांकडे परतणारे पक्षी, आकाशात दिसणारे तारे.. हे सारं पाहून झाल्यावर आम्ही घराकडे परतलो. त्या घरातल्या गृहिणी व दाई यांनी आयुष्यात प्रथमच झाडाखाली का होईना, ग्रहणाच्या प्रतिमा त्या दिवशी पाहिल्या. आम्ही त्याच दिवशी लवकरच सुटणाऱ्या कोलकाता मेलने परतीची तिकिटे काढली होती. आम्हा दोघांना बर्थचे आरक्षण मिळाले होते, परंतु लीलावतीचे नाव प्रतीक्षायादीत होतं म्हणून जरा काळजी होती. पण स्टेशनवर पोचलो तेव्हा ती दूर झाली. कारण स्टेशनवर गर्दी अगदीच कमी होती. आगगाडी आली, ती तर अर्धी रिकामीच होती. ग्रहणाच्या दिवशी प्रवास करणे अशुभ असल्याने लोक त्या दिवशी प्रवास करायला घाबरत होते. त्यामुळे लीलावतीलाही बर्थ मिळाला. आमचा प्रवासही शांत, निर्विघ्न पार पडला. त्या अनुभवाने उत्तर हिंदूुस्थानातले लोक जास्त अंधश्रद्ध आहेत असं माझं मत झालं.
पुण्याला परत आल्यावर एका पीएच. डी. झालेल्या जेमतेम तिशीच्या तरुणीला मी विचारलं, ‘सूर्यग्रहण पाहिलं का?’ तर धक्कादायक उत्तर मिळालं. तिच्या सासूबाईंची आज्ञा होती की, तिची नणंद व ती अशा दोघी लेकुरवाळ्या असल्याने त्यांनी आपापल्या मुलांना घेऊन घरात बसावं. कुणीही अशुभ सूर्यप्रकाशात किंवा बाल्कनीतही जायचं नाही. म्हणून तिने ग्रहण टीव्हीवरच पाहिलं. मला काय बोलावं कळेना. पण माझी नाराजी तिला चेहऱ्यावर दिसली असणार. कारण ती काहीसं सावरून घेत म्हणाली, की तिचं जरा चुकलंच! पुढच्या ग्रहणाच्या वेळी ती नक्की बाहेर जाऊन ग्रहण बघेल.