हुकूमशाहीत हे कसे शक्य आहे?

‘प्रजासत्ताक प्रतिपालक’ हा गिरीश कुबेर यांचा लेख वाचला. ‘आपण आपले गोब्राह्मण प्रतिपालकाचे गोडवे गात मोठे झालो. ते तसे मोठेपण त्या व्यक्तीच्या ठायी होतेही. पण आधुनिक लोकशाहीची तहान आणि गरज त्या गोडव्याने भागणार नाही. त्यासाठी आपल्याला ‘प्रजासत्ताक प्रतिपालक लागतील’ हे लेखातील म्हणणे योग्यच आहे. परंतु जिथे सत्ता ठरावीक व्यक्तींभोवती केंद्रित होते, जिथे बहुसंख्येच्या आधारावर, जनतेला विश्वासात न घेता आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी देशाच्या राज्यघटनेस दावणीला बांधले जाते, जिथे आपल्या मंत्रिमंडळातील सदस्यांनाच विश्वासात न घेता निर्णय घेतले जातात व त्याची अंमलबजावणी केली जाते, जिथे धक्कातंत्राच्या आधाराने देशातील प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न केला जातो, जिथे मंत्र्यांनाही आपल्या खात्याविषयीचे निर्णय घेण्याची मुभा नाही, तसेच त्याची माहितीही नसते, जिथे स्वायत्त संस्थांच्या नियामकांना काडीचीही किंमत दिली जात नाही अशा हुकूमशाही वातावरणात प्रजासत्ताक ‘प्रतिपालक’ तयार होणे कठीणच. उलट, बहुसंख्येच्या जोरावर व मिजाशीवर हुकूमशाही वृत्ती वाढण्याचाच धोका जास्त. आणि अशा हुकूमशाही वातावरणात व्यवस्थेत बदल करण्यासाठी इतरांनी सुचवलेले बदल मान्य करणे तर दूरच; उलट ‘आम्ही म्हणू तीच व्यवस्था व धोरणे’ हीच वृत्ती वाढण्याचा धोका आहे. त्यामुळे सरकार नावाचा जगन्नाथाचा रथ हाकण्यासाठी सर्व यंत्रणांमध्ये संवाद असणे, विरोधी विचार ऐकणे आवश्यक आहे. तरच आधुनिक प्रजासत्ताकाचे चित्र सत्यात उतरेल.

– मिलिंद नेरलेकर, डोंबिवली