धर्मगुरू असण्यानं आड येणारी बंधनं

‘लेखनप्रवाहात खेचून घेणारा साहित्यिक’ हा दिलीप माजगावकर यांचा लेख (लोकरंग – २९ सप्टेंबर) वाचला. फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी झालेल्या निवडीनंतर त्यांच्या ‘नाही मी एकला’ या आत्मकथनाचे प्रकाशक आणि त्यांचे मित्र दिलीप माजगावकर यांनी दिब्रिटो यांना लिहिलेल्या या पत्ररूप लेखाचे महत्त्व निर्वविाद आहे. विशेषत: फादर दिब्रिटो यांच्या निवडीविषयी जो वाद उद्भवला आहे, त्यासंदर्भात या लेखातील शेवटचा काही भाग – जो ‘नाही मी एकला’ या त्यांच्या आत्मकथनाविषयीचा आहे, तो महत्त्वाचा आहे. ‘‘वाचकांनी अंतर्मुख व्हावे, असे थांबेच या प्रवासात लागत नाहीत. अर्थात तुमच्या म्हणून काही अडचणी असतील, बंधने असतील, ती मी नजरेआड करत नाही. आत्मचरित्रात हीच मोठी अडचण असते. काही प्रसंगी स्वत:वर कडक आसूड ओढून घेण्याचा आपला निर्धारही आसुडाचे टोक इतर कोणाला लागेल अशा भीतीने गळून पडतो. तसेच थोडेफार इथे झालेले आहे.’’ हे माजगावरांनी फादर दिब्रिटोंबाबत व्यक्त केलेले विचार महत्त्वाचे वाटतात. इथे ज्या बंधनांचा, अडचणींचा उल्लेख आलेला आहे, ती बंधने फ्रान्सिस दिब्रिटो यांनी सेमिनरी शिक्षण पूर्ण करून ख्रिश्चन धर्माचे अधिकृत धर्मगुरूपद स्वीकारल्यामुळे आलेली बंधने आहेत, हे स्पष्ट आहे. या बंधनांमुळे आत्मकथनात आलेल्या उणिवा किंवा दोष माजगावकर यांनी दिब्रिटो यांचे सुहृद असूनही अत्यंत परखडपणे दाखवून दिलेले आहेत. इथे हे लक्षात घ्यावे लागेल, की जी बंधने ख्रिश्चन धर्मगुरू म्हणून त्यांच्या आत्मनिवेदनातसुद्धा आड आली, ती बंधने अर्थातच त्यांच्या इतर साहित्यातही आड आलीच असणार आणि येणार! आणि नेमके हेच त्यांच्या साहित्यिक गुणवत्तेला व संमेलनाध्यक्षपदी झालेल्या निवडीला मुख्य आव्हान आहे.

रोमन कॅथोलिक ख्रिश्चन धर्मपंथ हा अत्यंत बंदिस्त, प्रसंगी कठोर म्हणावा इतपत शिस्तबद्ध आहे. शिवाय ‘फादर’ (धर्मगुरू) म्हटल्यावर त्या पदावरील व्यक्तीवर अधिकच जाचक बंधने येणार, येतात. दिवसाचे चोवीस तास, वर्षांचे ३६५ दिवस, ‘फादर’ हा सर्वप्रथम ‘फादर’च असतो, तशी त्यांच्या वरिष्ठांची रास्त अपेक्षा असते. अर्थात ती व्यक्ती जीवनाच्या इतर क्षेत्रांत (साहित्य, काव्य, कला आदी) जे काही करील, बोलेल, लिहील, व्यक्त होईल, ते ते सर्व ख्रिश्चन धर्माला यित्कचितही विसंगत किंवा विरोधी नसण्याची काळजी सतत घ्यावी लागेल. माजगावकर यांनी प्रकाशक म्हणून आत्मकथनातील ज्या उणिवांवर बोट ठेवलेय, त्या नेमक्या यातूनच आलेल्या आहेत.

दिब्रिटो यांच्या संमेलनाध्यक्षपदी निवडीला होणारा विरोध हा त्यांच्या नुसते ख्रिश्चन असण्यातून नव्हे, तर ख्रिश्चन धर्मात अंतर्भूत असलेल्या या बंदिस्तपणामुळे आहे, हे लक्षात घ्यावे लागेल.

– श्रीकांत पटवर्धन, मुंबई</p>

फादर दिब्रिटो यांची निवड – संवादपर्वाची नांदी

दिलीप माजगावकर यांनी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांना लिहिलेले पत्र (लोकरंग- २९ सप्टेंबर) वाचताना त्यांच्या लिखाणाचे आणि सुस्वभावाचे अनेक पलू समजले. फादर यांची अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अध्यक्षपदी झालेली निवड म्हणजे सुसंवाद, सद्भावना या गुणांना मिळालेले प्रोत्साहन! साहित्य संमेलन चांगल्या पद्धतीने व्हावे, त्यात नवीन उपक्रम व्हावेत आणि संमेलनाला जोरदार प्रतिसाद मिळावा ही अपेक्षा! वादविवाद न होता संवादपर्व सुरू होऊन चांगले वातावरण निर्माण व्हावे व वाचनसंस्कृतीची जोपासना व्हावी.

– प्रफुल्लचंद्र काळे, नाशिक

भारत प्रगतिपथावर कधी पोहोचणार?

सत्तरीतील समाजवादी चीन हा परिमल माया सुधाकर यांचा आणि आर्थिक महासत्ता आणि कोंडी हा अभय टिळक यांचा लेख ‘लोकरंग’मध्ये (६ ऑक्टोबर) वाचला. साम्यवादी चीनला सत्तर वर्षे होत असल्याच्या पाश्र्वभूमीवर चीनच्या सत्तर वर्षांतील प्रवासाचा आढावा लेखकद्वयीने या लेखांद्वारे घेतला आहे.

चीन आणि भारत एकाच वेळी स्वतंत्र झाले. जेव्हा जुलूमशाही सत्तांच्या अंमलातून हे देश मुक्त झाले तेव्हा दोन्ही देशांची आर्थिक सामाजिक स्थिती जवळपास सारखीच होती. परंतु दोघांनी स्वीकारलेले मार्ग भिन्न होते. भारताने मिश्र अर्थव्यवस्था स्वीकारली तर चीनने समाजवादी व्यवस्थेचा स्वीकार केला.

दोन्ही देशांच्या आजच्या स्थितीची तुलना केली तर चीन आपल्यापेक्षा कोसो दूर पुढे गेला आहे. तो जगातील नंबर दोनची अर्थव्यवस्था तर बनलेला आहेच, परंतु त्या देशाचा मानव विकास निर्देशांकदेखील चांगला आहे. तेथे सर्वाना मोफत आणि सक्तीचे शिक्षण आहे. आरोग्यासह सर्व मूलभूत गरजा उत्तम पद्धतीने भागवल्या जातात.

चीनशी तुलना करता बहुतांश भारतीयांची स्थिती मात्र फारशी समाधानकारक नाही. भारतात उच्च आणि व्यवसायिक शिक्षणही सामान्य माणसाच्या आवाक्यात राहिलेले नाही. स्वातंत्र्याची फळे मूठभर लोकांनाच चाखायला मिळत आहेत, तर देशातील मोठय़ा शेतकरीवर्गाला शेतात झालेल्या खर्चाचीदेखील हमी नाही. आर्थिक विपन्नावस्थेत असलेला हा वर्ग आत्महत्या करतो आहे. हाताला काम नसल्याने बेरोजगारांचे तांडे निर्माण झाले आहेत. खरं म्हणजे आपला देश जगातील मोठी लोकशाही; मग सर्वच पातळ्यांवर आपण चीनच्या पुढे असायला हवे. पण आपण तुलनेने खूप मागे पडलेलो आहोत. मग कोणती व्यवस्था यशस्वी आहे, हा मोठाच प्रश्न आहे.

– राजकुमार कदम, बीड