अनुवादात घोळ

१५ डिसेंबरच्या ‘लोकरंग’मध्ये प्रसिद्ध झालेलं दि. मा. देशमुख यांचं ‘म्हणीचा गैर अर्थ’ या शीर्षकाचं पत्र वाचलं. त्याविषयी खुलासा करावा म्हणून हे पत्र. ज्या ‘लेखा’च्या संदर्भात ते लिहितात, तो मुळात लेख नव्हताच. १७ नोव्हेंबर रोजी Tata Literature Live या संस्थेने मला जीवनगौरव पुरस्कार दिला, तो स्वीकारताना मी जे इंग्रजीत भाषण केलं त्याचा ‘लोकसत्ते’ने केलेला तो अनुवाद होता. म्हणींविषयी बोलताना मी माझ्या भाषणात आईचा संदर्भ देत म्हटलं होतं, she would happily describe a miser as one who would not piss on your cut finger- kaaplya karanglivar mutnaar naahi. I will not translate the proverb she used to describe those who are all noise and no action.’ याचं भाषांतर पुढीलप्रमाणे व्हायला हवं होतं : ‘ती एखाद्या कंजूष माणसाविषयी बोलताना सहज म्हणायची, ‘तो कापल्या करंगळीवर मुतणार नाही.’ नुसतीच हवा, पण कृती शून्य अशा माणसाविषयी ती जी म्हण वापरायची त्याचं मात्र मी इथे भाषांतर करणार नाही.’

– शांता गोखले, दादर

प्रजेच्या खऱ्या प्रश्नांना बगल

‘लोकरंग’मधील (२९ डिसेंबर) ‘प्रजासत्ताक प्रतिपालक’ हा गिरीश कुबेर यांचा लेख आवडला. लेख वाचताना ‘गव्हर्नमेंट ऑफ द पीपल, फॉर द पीपल, बाय द पीपल’ या वचनाची आठवण झाली. मग अपेक्षा आणि वस्तुस्थिती यात खूप अंतर असल्याचे प्रकर्षांने जाणवले. आपल्या देशापुरते बोलायचे झाले तर ‘मायनॉरिटी गव्हर्नमेन्टस्’ची कामगिरी (वाजपेयी सरकार, मनमोहन सिंग सरकार) ‘मेजॉरिटी गव्हर्नमेन्टस्’पेक्षा (इंदिरा गांधी सरकार, नरेंद्र मोदी सरकार) अधिक चांगली असल्याचे दिसून येते.

सद्य:स्थितीत आपल्या लोकशाहीचे नेतेशाहीत जे रूपांतर झाले आहे ते थांबविले पाहिजे. लोकांना अर्थ, उद्योग, व्यवसाय, शेती, रोजगार या विषयांवर उत्तरे हवी असतात. जनतेसमोरील हे ‘खरे प्रश्न’ आहेत. पण मोठय़ा मताधिक्याने निवडून आलेले सरकार मात्र ‘खऱ्या प्रश्नांना’ बगल देऊन चतुराईने नगण्य प्रश्नांचा बागुलबुवा उभा करते. जसे की, पुलवामा हल्ला, कलम ३७०, अयोध्या निकाल, नागरिकत्व सुधारणा कायदा, राष्ट्रीय जनगणना नोंद, इ. महत्त्वाची बाब म्हणजे शिक्षणासारख्या मूलभूत गोष्टीला आपल्या देशात महत्त्व दिले जात नाही.

एकंदरीतच आर्थिक, शैक्षणिक, सामाजिक, औद्योगिक अशी सर्वागीण प्रगती साधल्याखेरीज ‘प्रजासत्ताक प्रतिपालका’ची पूर्तता होणे कठीण आहे. ‘हम होंगे कामयाब’ असे गाणे आपण गुणगुणतो. ‘लेकिन कब?’ हा प्रश्न महत्त्वाचा आहे.

– डॉ. विकास इनामदार, पुणे</p>