‘लोकरंग’ (२२ मार्च) मधील ‘महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले..?’ हा गिरीश कुबेर यांचा लेख म्हणजे भ्रष्टाचारात आकंठ बुडालेल्या राजकीय नेतृत्व आणि नोकरशाहीवर ओढलेला सणसणीत आसूड आहे.
lok03महाराष्ट्र सरकारने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालाचा योग्य पुरावा त्यांनी सादर केला आहे. त्या अधिकृत माहितीनुसार, त्यांनी गुजरात प्रांत हा उद्योगक्षेत्रात वास्तविकतेच्या आधारावर महाराष्ट्रापेक्षा कसा पुढे गेला आहे, हे सिद्ध केले आहे.  त्याला आणखी एक आयाम जोडण्याची आवश्यकता आहे. तो आहे उद्योगांसाठी उपलब्ध असलेल्या विविध संसाधनांचा! जमिनीचे क्षेत्र, कुशल कर्मचारी, पाणी आणि वीज ह्या घटकांचा तौलनिक अभ्यास केला तर महाराष्ट्रातील उद्योग हे गुजरातपेक्षा किमान दीडपटीने वाढायला हवे होते.
महाराष्ट्र शेतीत पुढारलेला आहे असा सर्वसामान्य समज आहे. आणि तोही पूर्णपणे चुकीचा असल्यामुळे आपल्या प्रांतात दरवर्षी शेतकऱ्यांच्या विक्रमी आत्महत्या होतात. ह्याचाही पुरावा सर्वेक्षण अहवालातच उजागर  केला गेलेला आहे. २०१३-१४ च्या अहवालापर्यंत तरी अन्नधान्याच्या उत्पादकतेत आमचा क्रमांक २९ प्रांतांपैकी २८वा (शेवटून दुसरा) होता. आमच्या शेतीतील दुर्लक्षामुळे आम्ही यावर्षी तोही  गमावून बसलो आहोत. यावर्षी आमचा क्रमांक अगदी शेवटचा म्हणजे २९वा आहे.
शेवटी एवढेच म्हणावेसे वाटते, की महाराष्ट्र आपल्या इच्छेने मरत आहे; निदान देशाने तरी असे मरू नये.

 विज्ञानाची जोड
‘लोकरंग’ (२२ मार्च) मधील ‘महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले..?’ या गिरीश कुबेर यांच्या लेखात नमूद केलेली स्थिती सत्य आहे. धर्म चिकित्सा विज्ञानाचे नियम लावून केली जाते, तसेच त्याचा आग्रहही धरला जातो ते योग्यच आहे. परंतु राजकीय निर्णय व प्रशासकीय निर्णय यांना विज्ञानाचे नियम लावून परीक्षण केले पाहिजे व विज्ञानाचे नियम लावून निर्णय होण्यासाठी प्रसार माध्यमे व तज्ज्ञ यांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. असे कितीतरी राजकीय व प्रशासकीय निर्णय आहेत, जे विज्ञानाच्या नियमानुसार घेतले असते तर जीवित व भौतिक (आर्थिक) हानी पूर्णत: टाळता आली असती.
शैक्षणिक संस्थांमधील प्रवेश, लोकसंख्या वाढ, जिल्हा व तालुका निर्मिती, प्रकल्प प्रारंभ व त्याचे प्राधान्यक्रम, मनुष्य सबलीकरण व सामाजिक संरक्षण योजना, इत्यादी योजनांची कार्यवाही विज्ञानाचे नियम लावून अधिक लाभदायकरीत्या करता आली असती; अजूनही करता येईल. प्रसार माध्यमांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
दिलीप सहस्रबुद्धे, सोलापूर