15 November 2019

News Flash

साधा निसर्गाचा समतोल..

‘लोकरंग’मधील (१२ मे) ‘पौर्णिमेचा मंत्रभारला जंगलानुभव’ हा डॉ. विनया जंगले यांचा नेहमीप्रमाणे चित्तथरारक लेख वाचला.

‘लोकरंग’मधील (१२ मे) ‘पौर्णिमेचा मंत्रभारला जंगलानुभव’ हा डॉ. विनया जंगले यांचा नेहमीप्रमाणे चित्तथरारक लेख वाचला. वन्यप्राण्यांविषयीचे त्यांचे लेख ‘लोकसत्ता’त अधूनमधून प्रसिद्ध होत असतात, जे वाचल्यावर एकदाच मिळालेले निसर्गाचे देणे सार्थकी कसे करायचे, याची प्रचीती येते. आजवर मनुष्यबळाचा वापर करून जंगलातील प्राणिमात्रांची होणारी गणना यापुढे अद्ययावत यांत्रिकीकरणाच्या साहाय्याने होणार आहे. ही जरी प्रगती असली, तरी त्यांनी कथन केलेले अनुभव मानवाने आपल्या अस्वस्थ प्रकृतीला स्वस्थ बनविण्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात गेले पाहिजे या विचाराला पुष्टी देणारे आहेत. कर्मधर्मसंयोगाने एकदा एका जिल्ह्यत त्या कार्यरत असताना एका वाडय़ात लपलेल्या वाघाला जिवंत ताब्यात घेताना संपूर्ण रात्रभर सहकाऱ्यांसोबत त्यांनी केलेली टेहळणी अंगावर शहारे आणणारी होती. लोकवस्तीत शिरलेल्या वाघ, सिंह यांसारख्या वन्यप्राण्यांना ताब्यात घेताना त्यांना प्रथम गुंगीचे औषध देण्यासाठी दूर अंतरावरून सुई मारावी लागते. मात्र ती सुई त्यांच्या डोके किंवा छातीत न जाण्याची काळजी घेण्यासाठी तासन्तास वाट पाहात बसावे लागते. या प्राण्यांशी जवळीक साधण्यासाठी त्यांची भाषा समजणे आवश्यक आहे. हे वन्यप्राणी म्हणजे जणू निसर्गाचे प्रक्षेपण केंद्र आहे. मात्र तेथून प्रक्षेपित केलेल्या ध्वनीलहरी आपल्यापर्यंत पोहचविण्याचे अमोल कार्य डॉ. जंगले यांच्यासारख्या वनअधिकारी ज्या तळमळीने करीत असतात, त्यातून एकच संदेश पसरविला जातो तो म्हणजे- ‘साधा निसर्गाचा समतोल, नका करू प्राणीहत्या आणि वृक्षतोड।’

सूर्यकांत भोसले, मुंबई

 

मुलांच्या भावविश्वात ‘मामाचा गाव’ असावा!

‘लोकरंग’मधील ‘टपालकी’ या सदारतील कौस्तुभ केळकर-नगरवाला यांचा ‘मामाच्या गावाला जाऊ  या..’ हा लेख (१९ मे) वाचताना जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. वडिलांची बदली ऐंशीच्या दशकात नगर जिल्ह्यत झाली होती. बालपण या जिल्ह्यत गेल्याने नगर आणि जिल्ह्यतील तालुक्यांबद्दल जिव्हाळा वाटतो. कारण त्यावेळी वातावरण आपुलकीचे होते. त्या वेळच्या बालपण आणि शाळकरी वयात ‘मामाचा गाव’ या शब्दाला महत्त्व होते. मे महिन्याच्या सुट्टीत काही दिवस तरी या गावाला जाणे होई. मौजमजेच्या आठवणी मनात टिकून राहत. मात्र, आता यांत्रिक युगात बऱ्याच गोष्टी हरवत आहेत. त्यात बालपणीचा मामाचा गाव आहे. किमान अशा लिखाणामुळे काका-मामाच्या गावाला जावे अशी इच्छा निर्माण व्हावी, तसेच काका-मामा-मावशीच्या गावाहून भाचे-पुतण्यांना सुट्टीत येण्याबद्दल आग्रही निमंत्रण मोबाइलवर यावे ही सदिच्छा! मुलांच्या भावविश्वात ‘मामाचा गाव’ असावा!

प्रफुल्लचंद्र काळे, नाशिक

First Published on May 26, 2019 12:15 am

Web Title: lokrang review