मराठीत एकुणातच मूळ पुस्तकांच्या दुसऱ्या आवृत्त्यांबाबत अनास्था असताना, अनुवादित पुस्तकांच्या दुर्लभ आणि दुर्मीळ झालेल्या पुस्तकांच्या जीर्णोद्धाराची कल्पनाच करणे अशक्य आहे. स्वातंत्र्यपूर्व-उत्तर काळाच्या आगेमागे वीस वर्षांपासून वाचन व्यवहाराला गती आली. साठोत्तरीच्या काळात लेखन आणि अनुवादकार्याचा झपाटा मोठा होता. जागतिक साहित्यातील अभिजात आणि नावाजलेल्या कलाकृतींचे अनुवाद जोमाने होत होते. ‘प्रतिभेची फुले’ या मालिकेद्वारे १९६६ साली ‘मॅजेस्टिक प्रकाशना’ने हेन्री जेम्स, सिंक्लेअर लुईस, नॅथिनिल हॉथार्न, एडगर अ‍ॅलन पो, जेम्स फेनिमोर कूपर, मार्क ट्वेन, अर्नेस्ट हेमिंग्वे, विल्यम डीन हॉवेल्स यांच्या कलाकृतींचे अनुवाद प्रकाशित केले होते. गंगाधर गाडगीळ, दुर्गा भागवत, मालती बेडेकर, कमला फडके, भा. रा. भागवत, दि. बा. मोकाशी, अरविंद गोखले, श्री. ज. जोशी या त्या काळातील बिनीच्या साहित्यिकांनी अनुवादित केलेल्या या साहित्यरत्नांमध्ये भानू शिरधनकर यांनी अनुवादित केलेल्या हर्मन मेलव्हिल यांच्या सागरसाहस कादंबऱ्यांचाही समावेश होता.

आज मोजक्या वाचनालयांमध्ये आणि निवडक संग्राहकांकडे या साहित्यरत्नांच्या जर्जरावस्थेतील प्रती शिल्लक असतील. भा. रा. भागवत यांनी मार्क ट्वेनच्या ‘द अ‍ॅडव्हेन्चर ऑफ हकलबरी फिन’चे केलेले ‘भटकबहाद्दर’, दि. बा. मोकाशी यांनी हेमिंग्वेच्या ‘फॉर हूम द बेल टोल्स’चा केलेला ‘घणघणतो घंटानाद’ याव्यतिरिक्त बाकीचे अनुवाद काळात हरवून गेले. मेहता पब्लिशिंग हाऊसने या हरवलेल्या अनुवादित ग्रंथांपैकी भानू शिरधनकर यांनी अनुवादित केलेल्या दोन पुस्तकांना नुकताच पुनर्जन्म दिला आहे. हर्मन मेलव्हिल याच्या ‘टैपी’ (‘पाचूचे बेट’) आणि ‘बिली बड’ (‘शिस्तीचा बळी’) या दोन्ही कलाकृतींचा क्रमांक त्याच्या ‘मोबी डीक’ या सागर साहसकथांनंतर लागत असला, तरी त्या त्याच्या अत्यंत लोकप्रिय कादंबऱ्या आहेत. १९४०च्या दशकापासून देशातील सागरीतटावर घडणाऱ्या अद्भुत आणि धाडसी घटनांचे वार्ताकथा (रिपोर्ताज) ‘किलरेस्कर’मध्ये लिहिणाऱ्या भानू शिरधनकर यांच्या खाती अनेक विषयांवरची पहिली पुस्तके आहेत. मात्र ‘उधानवारा’, ‘शिमाळ आलं, शिमाळ’ ही शिरधनकर यांची पुस्तके भारतीय दर्यावर्दी जीवनाचे सूक्ष्मलक्षी चित्रण दाखवितात. त्यांच्याकडे हर्मन मेलव्हिल यांच्या दर्यासारंगांच्या अभिजात गाथांचा अनुवाद येणे स्वाभाविकच होते. कारण खलाशांचे, खवळलेल्या सागराचे आणि महिनोन् महिने चालणाऱ्या समुद्र प्रवासाचे प्रत्यक्ष अनुभव त्यांच्या गाठीशी असल्याने या अनुवादांमध्ये जिवंतपणा आला आहे.

‘बिली बड’ ही एका युद्धनौकेवरील अस्थिर वातावरणात वावरणाऱ्या रांगडय़ा खलाशाची गोष्ट आहे. जहाजावरील कर्मचारी वर्गातील हेवेदाव्यांमुळे कथानकाचा रोमहर्षक प्रवास वाचकाला अनुभवायला मिळतो. तर ‘टैपी’ या कादंबरीत जहाजावरील प्रतिकूल परिस्थिती टाळण्यासाठी एक बेट दिसताच पळ काढणाऱ्या दोन खलाशांची कहाणी आहे. जहाजावरील जुलमी वागणुकीहून अधिक हिंस्र अवस्था त्यांना बेटावरील टैपी लोकांमध्ये पाहायला मिळते. या दोघांची सुटकेसाठी चालणारी चार महिन्यांहून अधिक काळाची धडपड ‘टैपी’चा गाभा आहे. शिरधनकरकालीन मराठी शुद्धलेखनाच्या नियमांऐवजी नव्या नियमांबरहुकूम अनुवाद झाला आहे. १९६६ साली एकाच ग्रंथात समाविष्ट असलेले हे अनुवाद आता चंद्रमोहन कुलकर्णी यांच्या नव्या मुखपृष्ठचित्रांसह स्वतंत्र पुस्तकांत पाहायला मिळणे हा आनंद आहे. मात्र भानू शिरधनकर यांच्या हरविलेल्या दोन अनुवादित पुस्तकांचे पुनप्र्रकाशन करण्याचे स्तुत्य कार्य करताना त्यांच्या अफाट लेखनकार्यापैकी थोडे तपशील प्रस्तावनेसह या पुस्तकांत येणे अपेक्षित होते. सदैव काळापुढे असणाऱ्या या लेखकाची दखल आजतरी घेतली जाणे आवश्यक आहे. या पुस्तकांच्या निमित्ताने त्यांच्या इतर पुस्तकांचे शोधकार्य सुरू झाले, तर उत्तमच होईल!

‘पाचूचे बेट’ आणि ‘शिस्तीचा बळी’

मूळ लेखक- हर्मन मेलव्हिल,

अनुवाद- भानू शिरधनकर,

मेहता पब्लिशिंग हाऊस,

पृष्ठे- अनुक्रमे १८६, ७४,

मूल्य- अनुक्रमे २४०, १०० रुपये