|| संकल्प गुर्जर

सामाजिक – धार्मिक सुधारणांची आणि बुद्धिप्रामाण्यवादाची परंपरा सांगणाऱ्या महाराष्ट्रातच डॉ. नरेंद्र दाभोलकरांची साडेपाच वर्षांपूर्वी हत्या झाली. या हत्येमुळे डॉ. दाभोलकरांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि इतर (उदा. ‘परिवर्तन’ व ‘विवेकवाहिनी’) संस्थांचे काम कोसळून पडेल, अशी एक भीती व्यक्त केली जात होती. मात्र तसे काहीही झालेले नाही. इतका मोठा धक्का पचवूनदेखील गेल्या साडेपाच वर्षांतल्या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत या संस्था केवळ नेटाने टिकून राहिल्या आहेत असे नव्हे, तर त्या ‘वर्धिष्णू’च झालेल्या आहेत. नेत्याच्या हयातीतच ऱ्हास पावणाऱ्या इतर अनेक संस्थांची उदाहरणे समोर असताना या संस्थांबाबत मात्र असे का झाले नाही, हा प्रश्न कोणत्याही ‘विचारक्षम’ व्यक्तीला पडू शकतो. याचे उत्तर शोधण्यासाठी डॉ. हमीद दाभोलकरांचे ‘विवेकाच्या वाटेवर : उन्मादी कालखंडातील लढय़ाची गोष्ट’ हे नवे पुस्तक वाचायला हवे.

मानसोपचारतज्ज्ञ असलेले डॉ. हमीद दाभोलकर हे केवळ नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येमुळे अंनिसच्या कामात सहभागी झाले, असा अनेकांचा गैरसमज झाला होता. वारसाहक्काने सामाजिक चळवळी चालवता येत नाहीत. त्यासाठी पक्की वैचारिक बैठक, संघटनाबांधणीचे कौशल्य आणि समाजकेंद्री मनोवृत्ती आवश्यक असते. ती असल्यानेच हमीद दाभोलकरांना वैयक्तिक दु:ख बाजूला ठेवून गेल्या साडेपाच वर्षांत इतर सहकाऱ्यांसमवेत अंनिसच्या कार्यकर्त्यांचे मनोधैर्य टिकवणे, संघटनेचे चालू असलेले काम पुढे नेणे (व शक्य त्या प्रमाणात विस्तारणे), जादूटोणाविरोधी कायदा व सामाजिक बहिष्कारविरोधी कायद्याची लढाई लढणे, डॉ. दाभोलकरांच्या हत्येचा तपास आणि त्या संदर्भातील कायदेशीर कार्यवाही, आजूबाजूला सतत घडणाऱ्या विविध सामाजिक घटना-घडामोडींवर (उदा. शनिशिंगणापूरच्या मंदिरात महिलांना प्रवेश देण्यासाठीचे आंदोलन) विवेकवादी भूमिका घेणे, ती जाहीररीत्या मांडणे व त्या दृष्टीने आवश्यक ती कृती करणे.. अशा विविध आघाडय़ांवर काम करता आले.

या पुस्तकात गेल्या पाच वर्षांच्या प्रवासावर वेळोवेळी लिहिलेले, चार विभागांत विभागलेले ३७ लेख आहेत. हे लेख यापूर्वी ‘लोकसत्ता’, ‘साप्ताहिक साधना’ व इतर काही नियतकालिकांत येऊन गेलेले असले, तरीही एकत्रितपणे वाचताना त्यांचा खूपच जास्त प्रभाव पडतो. जसा काळ लोटत जाईल तसे या लेखनाचे महत्त्व अधिकच वाढत जाणार आहे. गेल्या पाच वर्षांतील अंनिसच्या लढय़ाचे व वैचारिक भूमिकांचे दस्तावेजीकरण होणे या दृष्टीनेही या लेखनाचे महत्त्व आहे. या लेखनातून जसा चिकित्सेचा वैचारिक आनंद मिळतो, तशीच थेट कृतीची प्रेरणा व दिशाही सापडते. त्यामुळेच वैचारिक वाचन करू पाहणारे अभ्यासक आणि प्रत्यक्ष कृती करू पाहणारे कार्यकर्ते अशा दोन्ही समूहांसाठीचे हे लेखन आहे.

वैचारिक स्तरावर बुद्धिप्रामाण्यवादाची मूल्यव्यवस्था स्वीकारली तरीही त्यावर आधारित प्रत्यक्ष कृती कशी करावी, असा प्रश्न कोणत्याही समाजातल्या बुद्धिप्रामाण्यवाद्यांना नेहमीच पडतो. शोषण करणाऱ्या अंधश्रद्धांना विरोध, वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार व प्रसार, कालसुसंगत धर्मचिकित्सा आणि व्यापक परिवर्तनाच्या चळवळीला जोडून घेणे या चतु:सूत्रीवर आधारित असलेले अंनिसचे काम ही कोंडी फोडते. या कामाची कक्षा विवेकी व्यक्तिगत जीवनापासून ते सामाजिक-मानसिक आरोग्य, शिक्षणव्यवस्था, राजकीय व्यवस्थेचे वर्तन, पर्यावरण रक्षण आणि अंतिमत: मानवतावादी विचार इतकी व्यापक आहे. तसेच शिक्षणाचा कोणताही स्पर्श न झालेल्या अज्ञानी समूहांपासून उच्चशिक्षित असूनही अंधश्रद्धच राहिलेल्या समूहापर्यंत सर्वाना प्रभावित करून जाणारे असे हे काम आहे. अर्थात, विचारांची कक्षा इतकी व्यापक असली तरीही त्याची आपल्या रोजच्या जगण्यात, आजूबाजूच्या प्रतिगामी सामाजिक परिस्थितीत अंमलबजावणी कशी करावी? धर्माच्या नावाने, ढोंगी बाबाबुवांच्या माध्यमातून होणाऱ्या शोषणाला विरोध, जातपंचायतींसारख्या असंवैधानिक शक्तीविरोधी लढा, पर्यावरणपूरक गणपती, फटाकेमुक्त दिवाळी, तरुणाईमध्ये विवेकी विचारांचा प्रसार व त्यांचे संघटन अशी ही कामाची दिशा आहे. याविषयीचे लेखन या पुस्तकात आहे. त्यामुळेच ढोंगी बाबाबुवांचा समाजावर इतका प्रभाव का पडतो, असा प्रश्न निर्माण होतो, तेव्हा डॉ. हमीद यांना त्याचे मूळ आपल्या समाजाच्या ‘गप्प बसा’ संस्कृतीत दिसते. तसेच देव आणि धर्म अशा संकल्पनांच्या चिकित्सेचे शिक्षण शालेय जीवनापासूनच द्यायला हवे, हा मुद्दाही त्यांच्या लेखनात अधोरेखित होतो.

अंधश्रद्धेमुळे नरबळी दिले जाणे, शारीरिक व मानसिक आजारांवर अघोरी उपाय केले जाणे, राज्यघटनेत स्त्री-पुरुष समानतेचे मूल्य असूनही धार्मिकस्थळी स्त्रियांना प्रवेश नाकारणे आदींचा संबंध थेट राज्यकर्ते आणि शासनाच्या स्तरावरील जागरूकतेशी येऊन पोहोचतो. मात्र, जादूटोणाविरोधी कायदा पारित करायला लावलेला अक्षम्य उशीर, डॉ. दाभोलकरांच्या हत्येच्या तपासातील दिरंगाई, असंवेदनशीलता आणि ढिसाळपणा, सामाजिकदृष्टय़ा प्रतिगामी भूमिका घेणारे, निवडणुकीची गणिते समोर ठेवून ढोंगी बाबा-बुवांची मदत घेणारे राजकीय पक्ष पाहिले की राजकीय व्यवस्थेकडून व निर्ढावलेल्या समाजाकडून काय आणि किती अपेक्षा ठेवायची, याविषयीचे प्रश्न डॉ. हमीद यांच्या लेखनात येऊन जातात. मात्र असे असले तरीही, आपण संवैधानिक चौकटीत राहूनच, सनदशीर मार्ग वापरून आपला लढा पुढे चालवायचा आहे हे सूत्र त्यांच्याकडून वारंवार अधोरेखित होते. त्यामुळेच कितीही अडचणी आल्या तरीही निवेदने, धरणे, मोर्चे, आंदोलने, प्रसारमाध्यमांचा वापर आणि अहिंसक चळवळी आदी मार्गानीच अंनिस आपले काम पुढे नेत आहे. याचाच पुढचा टप्पा असा की, काहीही झाले तरी अविवेकी सामाजिक शक्तींशी विवेकी मार्गानेच लढा द्यायला हवा, ही जाणीव संघटनेमध्ये खोलवर रुजलेली आहे. त्यामुळेच ‘आम्ही दगड मारण्याऐवजी नाटक करतो’, ‘हिंसेला नकार, मानवतेचा स्वीकार’, ‘आम्ही कासवाचे बळ आणले आहे..’ अशी विचारसूत्रे त्यांच्या लेखनात जागोजागी दिसून येतात.

या देशातील सामाजिक-धार्मिक सुधारणांच्या इतिहासाचे सम्यक आकलन असल्यानेच शनिशिंगणापूरच्या मंदिरप्रवेशाच्या लढय़ाविषयी ते लेख लिहितात, तेव्हा डॉ. आंबेडकर यांनी चालवलेल्या नाशिकच्या ‘काळाराम मंदिर’ सत्याग्रहाची आणि साने गुरुजींनी चालवलेल्या पंढरपूर येथील मंदिरप्रवेशाच्या लढय़ाची आठवण करून देतात. तसेच एकीकडे वैज्ञानिक दृष्टिकोन, कालसुसंगत धर्मचिकित्सा आणि आधुनिकतावादी विचारप्रवाह यांची कास धरलेली असली, तरीही गेली काही वर्षे अंनिस (आणि इतर काही पुरोगामी व्यक्ती व संस्था) वारीत सहभागी होत आहे. त्यामागील कारणमीमांसा अशी की, आज जसे अंनिस करते तसेच संतांनीही सामाजिक शोषण, विषमता, अंधश्रद्धा यांच्यावर कठोर प्रहार केलेले आहेत. तसेच ‘वारीला समतासंगराचे सामर्थ्य लाभावे’ अशी इच्छा डॉ. नरेंद्र दाभोलकरांनीही व्यक्त केली होती. त्यामुळे वारकरी प्रवाहातील सुधारणावादी गट आणि अंनिस यांच्या संवादातून आपले कार्य पुढेच जाणार आहे, असा विश्वास त्यांना वाटतो.

अंनिस केवळ हिंदूंवर टीका करते, असा अज्ञानमूलक आरोप नेहमीच केला जातो. अशा लोकांनी डॉ. हमीद यांनी मुस्लीम सामाजिक सुधारणांविषयी घेतलेली भूमिका मुळापासून पाहायला हवी. मुस्लीम समाजात सुधारणा व्हाव्यात यासाठीच काम करणाऱ्या हमीद दलवाई यांची आठवण म्हणूनच लेखकाचे नाव ‘हमीद’ ठेवले गेले होते. त्याच दलवाई यांचे कार्य पुढे चालवणाऱ्या ‘मुस्लीम सत्यशोधक मंडळाला बळ द्यायला हवे’ असे हमीद दाभोलकरांना वाटते. तसेच तिहेरी तलाकच्या प्रथेला बंदच करायला हवे, ही ठोस भूमिकाही ते मांडतात. पुरोगामी म्हणवणाऱ्या अनेक विचारवंतांनी या मुद्दय़ावर केलेल्या बौद्धिक कसरती पाहिल्या, की डॉ. हमीद यांच्या भूमिकेचे वेगळेपण लक्षात येईल. मदर तेरेसांना ‘संतपद’ देणाऱ्या ख्रिश्चन धार्मिक व्यवस्थेवरही ते टीका करतात. तसेच ‘संतपद देण्यासाठी चमत्काराची अट रद्द करायला हवी’ या मागणीसाठी शास्त्रज्ञ व वैद्यकीय व्यावसायिक यांना सोबत घेऊन पोप फ्रान्सिस यांना ईमेल, पत्रे पाठवण्याची, सह्य़ांची मोहीमही अंनिसने हाती घेतली होती. सर्वच धर्मातील कट्टरपंथीय, अविवेकी प्रवृत्तींना विरोधच करायला हवा व सुधारणावादी भूमिकाच पुढे घेऊन जायला हवी हे सूत्र त्यांच्या लेखनात ठळकपणे येऊन जाते. पश्चिम आशियातील आयसिस, नायजेरियातील बोको हराम, बांगलादेशातील नास्तिक ब्लॉगर्सच्या निर्घृण हत्या, ब्राझीलमधील चमत्कारांच्या बातम्या याचे संदर्भ त्यांच्या लेखनात डोकावत राहतात.

पुस्तकातील पहिला विभाग- ‘बाबांना आठवताना..’ हा सर्वात हृद्य आणि तरीही सर्वाधिक अस्वस्थ करणारा आहे. समाजकार्यातच रमलेल्या एका बाप-लेकातील ‘समाजकेंद्री’ नाते उलगडून दाखवणाऱ्या या विभागामधील ‘कायदा झाला, डॉक्टर’, ‘माझ्या ‘हमीद’ असण्याचा अर्थ’ अशा लेखांना वाचून संवेदनशील वाचकांच्या मनात बौद्धिक आणि भावनिक अशी दोन्ही प्रकारची अस्वस्थता दाटून येते. अर्थात आपल्या समाजावर असलेली अविवेकाची गडद काजळी पाहिली, की ही अस्वस्थता आणखीच दृढ होऊ  शकते. मात्र ‘आपला लढा दशकांच्या नव्हे तर शतकांच्या कालावधीत मोजायला हवा’ याची पूर्ण जाणीव असणारे आणि तरीही निराश न होता, दुर्दम्य आत्मविश्वासाने आपले काम करत राहणारे डॉ. हमीद यांच्यासारखे अभ्यासक-कार्यकर्ते पाहिले, की ही अस्वस्थता निश्चितच थोडी कमी होते. त्यासाठीच हे पुस्तक वाचायला हवे.

  • ‘विवेकाच्या वाटेवर: उन्मादी कालखंडातील लढय़ाची गोष्ट’ – डॉ. हमीद दाभोलकर
  • राजहंस प्रकाशन,
  • पृष्ठे- १७७, मूल्य- २२५ रुपये