जगाच्या समस्या सोडवण्यासाठी नावीन्यपूर्ण विचार देणाऱ्या असामान्यांच्या कार्याची ओळख करून देणारे ‘विवेकीयांची संगती’ हे ज्येष्ठ पर्यावरण अभ्यासक अतुल देऊळगावकर लिखित पुस्तक मनोविकास प्रकाशनातर्फे नुकतेच प्रसिद्ध झाले. त्यातील एका प्रकरणाचा संपादित अंश..

विसाव्या शतकात ‘जग सुंदर करण्याचे कार्य भांडवलशाही करेल की साम्यवाद?’ यावर जगाची विभागणीच झाली होती. त्यावेळी- ‘या दोन्ही विचारसरणींना जगाच्या समस्या सोडवता येणार नाहीत. किंबहुना, हे काम राजकारणाचे नाहीच’ असा अफलातून नावीन्यपूर्ण विचार (लॅटरल थिंकिंग) मांडणारे काही अवलिया होते. रिचर्ड बकमिन्स्टर फुलर हे त्यांमध्ये अग्रभागी होते. संपूर्ण विश्व हेच त्यांच्या विचारांच्या केंद्रभागी होते. ते स्पष्टपणे सांगत, ‘राष्ट्रवाद व राष्ट्र-राज्य (नेशन स्टेट) हे भग्नावशेष असून त्या संकल्पना काळानुरूप कालबा करणे आवश्यक आहे. मानवजात ही आजवर कधीही आले नाही अशा भयावह संकटाकडे वाटचाल करीत आहे. हे संकट पर्यावरण, पाणी वा ऊर्जेचे नसून अज्ञान हेच संकट आहे.’ फुलर यांचा वसा ‘पर्यावरणाला अथवा मानवाला इजा न करता, संपूर्ण जगाने संपूर्ण मानवजातीसाठी सहकार्याने कार्य करणे आवश्यक आहे’ हा होता.

light
विश्लेषण: डोळे दिपवणारी रोषणाई प्रदूषणकारक आहे का ?
Buddhism, Renovation of Buddhist Stupa at Karnataka
२५०० वर्ष जुन्या मौर्यकालीन बौद्ध स्तूपाचे पुनरुज्जीवन; का महत्त्वाचे आहे हे स्थळ?
RBI repo rate announcement Shaktikanta Das
आरबीआयकडून रेपो रेट जैसे थे ठेवण्याचे कारण काय? जाणून घ्या
Government decision not to increase read reckoner for elections
रेडीरेकनर वाढीला निवडणुकीची वेसण; घरांच्या किमती घटणार? रिअल इस्टेटमधील गुंतवणुकीवर काय परिणाम?

फुलर हे स्वतच- ‘मानवजातीला पृथ्वीवर प्रदीर्घ काळ उत्तम प्रतीचे आयुष्य कंठण्यात यशस्वी होता येईल काय? व कसे?’ असा सवाल करीत असत. या महासंकटाचा सामना करून यश मिळविण्याचा चंग त्यांनी बांधला होता. चाळीस वर्षांपूर्वी फुलर यांनी जागतिक अर्थ-राजकारण करणाऱ्या यंत्रणांना जोखले होते- ‘करांसाठी आसुसलेली शासनसंस्था आणि नफ्यासाठी भुकेली व्यापारी यंत्रणा लोकांचे मूलभूत प्रश्न सोडवू शकणार नाहीत.’ अभिनव वैज्ञानिक अभिकल्प (डिझाइन) आणि तंत्रज्ञान यांच्या वापरातून पृथ्वीतलावरील कूट वाटणाऱ्या समस्या सहज सुटू शकतील, असा दुर्दम्य आत्मविश्वास त्यांना होता. फुलर यांची जागतिकीकरणाची दृष्टी कैक पटींनी काळाच्या पुढे होती. त्यामुळेच- ‘संपूर्ण मनुष्यजातीला पुरेल एवढं अन्नधान्य तयार करण्याची क्षमता आपल्या पृथ्वीवर आहे. परंतु सार्वभौम राष्ट्रे, आंतरराष्ट्रीय व्यापार यंत्रणा यांना असं सर्वसमावेशक वितरण त्यांच्या हिताविरुद्ध वाटतं. म्हणूनच समानता आणण्यासाठी पहिल्यांदा या सार्वभौमत्वाला तिलांजली दिली पाहिजे. ही काळाची गरज ओळखून आपण एकत्र आलो नाही, तर सर्वाचा विनाश अटळ आहे. २१ व्या शतकात युद्धे लुप्त (ऑब्सलीट) होतील अथवा माणूस! पहिलं पाऊल टाकण्यासाठी जागतिक विद्युतजाल (एनर्जी ग्रीड) आणि जलजाल (वॉटर ग्रीड) करून जागतिक अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करावी लागेल’ असा काळाच्या पुढचा विचार फुलर यांनी मांडला होता.

हे विश्व ही एक क्रीडा (वर्ल्ड गेम) आहे. या विश्वक्रीडेमध्ये प्रत्येक रहिवासी सहभागी आहे. त्यामुळे त्याला जगातील बारीकसारीक बाबींची माहिती असली, तरच तो कोणत्या ना कोणत्या समस्येवर उपाय सुचवू शकेल. मात्र कमालीच्या जुनाट व्यवस्थेत काम करीत राहिल्याने शास्त्रज्ञ, वास्तुविशारद व अभियंतेही गुलामगिरीच्या मनोवृत्तीचे होतात. आदेशानुसार काम करीत राहिल्याने वेगळ्या वाटेचा विचार करण्याची क्षमता ते गमावून बसतात. या दुष्टचक्रातून बाहेर काढण्याकरता फुलर यांनी- ‘संपूर्ण जगातील नागरिकांकरिता संगणक व इलेक्ट्रॉनिक उपकरणे यांच्या साहाय्याने सर्व प्रकारची माहिती (डेटा) देणारा एक ६० मीटर व्यास असणारा विशाल गोल.. ‘जिओस्कोप’.. उभारला पाहिजे. कळ दाबली, की हवी ती माहिती विशाल पडद्यावर दिसावी. त्यामधून (पाहणाऱ्या / माहिती घेऊ इच्छिणाऱ्याला) जगाचा इतिहास, वर्तमान व भविष्य दृश्यमान केले जावे. जगाची अवस्था, सध्याची आपापल्या भूभागाची स्थिती आणि आपली परिस्थिती सुधारण्यासाठीचे उपाय कधीही पाहता यावेत. लोकसंख्या, जीवसृष्टी, हवामान, साधनसंपदा, मानवी उपभोगाचे प्रमाण हे सहज समजून यावे. काळाच्या ओघात तंत्रज्ञानामुळे कसे बदल होत गेले, जगभरातील विविध नमुन्यांच्या नियोजनानुसार जगाची पुढील वाटचाल कशी असेल, याचे अर्थशास्त्रीय व समाजशास्त्रीय भान दिले जावे. जागतिक आणि स्थानिक पातळीवरील सर्व घटनांचा अन्वय जगातील प्रत्येक नागरिकास लावता यावा’ असे शिक्षण घडवणाऱ्या ‘जिओस्कोप’चे स्वप्न पाहिले होते.

ब्रिटानिका विश्वकोशात ‘रिचर्ड बकमिन्स्टर फुलर (१२ जुलै १८९५- १ जुलै १९८३) अभियंता, संशोधक, अभिकल्पक (डिझाइनर), फ्युचरॉलॉजिस्ट, गणितज्ञ, विचारवंत व तत्त्वज्ञ’ असा आदरपूर्वक उल्लेख त्यांच्या नावापुढे आहे. विविध संशोधनांतून २५ पेटंट्स, हजारो लेख व २८ पुस्तकांचे लेखन, ४७ सन्माननीय डॉक्टरेट, व्याख्यान व सल्ला देण्याकरिता संपूर्ण जगभरास ५७ प्रदक्षिणा होतील एवढी भ्रमंती असं त्यांचं संक्षिप्त वर्णन केलं जातं. फुलर यांनी घर, शहर व वाहन यांच्या परंपरागत रूढ रचना नाकारल्या. दुरितांचे तिमिर घालविणाऱ्या प्रतिसृष्टीसाठी आयुष्यभर नवे अल्पखर्ची पर्याय दिले.

फुलर यांनी शिक्षणाची रीतसर पदवी कधी घेतलीच नाही. हार्वर्डमधले अभियांत्रिकीचे शिक्षण त्यांना अर्ध्यावरच सोडावे लागले. ६ एप्रिल १९१७ रोजी अमेरिकेने पहिल्या महायुद्धात उडी टाकली आणि फुलरना नाविक दलात सहभागी व्हावे लागले. रसायनशास्त्र, धातुशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स शाखांमधील संशोधनामुळे अमेरिकेकडे अत्याधुनिक शस्त्रास्त्रे होती. कमीत कमी वजन, कमी आकार, कमी ऊर्जा व कमी वेळात जास्त अंतर कापणारी अधिक परिणामकारक उपकरणे फुलरनी हाताळली. त्या वेळी स्टेनलेस स्टीलचा वापर अत्यंत गोपनीय स्वरूपाचा होता. ऑइलवर चालणारे जहाज, डिझेल इंजिनच्या पाणबुडय़ा, वेगवान विमान, रडार यंत्रणा यांची बाहेर वाच्यता होत नव्हती. स्वयंचलित वाहनांची सखोल माहिती घेत फुलरनी नाविक दलासाठी हत्यारे, उपकरणांच्या कार्यक्षमतेत सुधार घडवून आणले. वर्षभरातच त्यांची कनिष्ठ लेफ्टनंटपदी पदोन्नती झाली. अ‍ॅडमिरलांसाठी साहाय्यक म्हणून प्रत्यक्ष युद्धभूमीवर त्यांची नेमणूक केली गेली. त्याच वेळी कन्येला अर्भकावस्थेत अर्धागवायू झाल्याने फुलरनी नाविक दलाचा राजीनामा दिला.

तीन वर्षे दोन कंपन्यांमध्ये फुलर विक्री अधिकारी होते. १९२२ साली त्यांनी बांधकाम सामग्रीचं उत्पादन आणि प्रत्यक्ष बांधकाम यांना प्रारंभ केला. २४० इमारती बांधूनही त्यांना नफा मिळवण्याचं तंत्र काही जमलं नाही. ते मित्रांच्या ठेवी घालवून बसले. व्यवसाय बंद करावा लागला. अतिशय यातनादायक प्रसंगातून फुलर जात होते. स्वतकडे तटस्थपणे पाहण्याची वृत्ती त्यांनी जोपासली असल्यामुळे स्वतच्या दुखांना ते कुरवाळत बसले नाहीत. वस्तुनिष्ठपणे स्वतच्या अनुभवांचे विश्लेषण आयुष्यभर केले. १९१७ सालापासून फुलरनी स्वविषयक नोंदीचे जतन ‘कालवृत्तांत’मध्ये केले. ‘गिनिपिग-बी’ (बकी) असे त्यांचे नामकरण स्वत: त्यांनी करून टाकले. उर्वरित आयुष्यातील पत्रव्यवहार, प्रयोग, आराखडे, निष्कर्ष यांचा त्यात समावेश आहे. वैज्ञानिक तंत्रज्ञानाचा अप्रतिम चिकित्सक इतिहास त्यातून साकार झालाय.

२० व्या शतकाच्या आरंभी कलेच्या क्षेत्रात ‘अल्प हेच अधिक आहे’ (लेस इॅज मोअर) हा किमानतावाद (मिनिमलिझम) दिसू लागला होता. वास्तुशिल्पी लुडविग मिए व्हॅन दर रोव्ह यांनी १९२० च्या सुमारास वास्तुकलेमध्ये कमीत कमी सामग्रीत बांधकाम करण्याची गरज प्रत्यक्षात उतरवली. १९६० नंतर चित्रकला, संगीत या क्षेत्रांतही किमानतावादी तयार झाले. फुलर हे ‘किमानतावादा’चे अग्रणी होते. त्यांनी १९२२ मध्ये ‘फॉच्र्युन’ या नियतकालिकाच्या विशेषांकात- ‘‘किमान निवेशातून अधिक कार्यक्षमता’ (मोअर विथ लेस) हा मंत्र मानवतेला आर्थिक उत्पन्न आणि भौतिकदृष्टय़ा जीवन सुकर करण्यासाठीच आहे’ अशी निसंदिग्ध ग्वाही दिली होती.

पहिल्या महायुद्धात अमेरिकेच्या नाविक दलाचा अनुभव फुलर यांची विज्ञाननिष्ठा गाढ करून गेला. सामग्रींचे बदलते, परिणामकारक आकार, अधिकाधिक कार्यक्षमतेचा ध्यास यांतून ते उज्ज्वल भविष्यकाळाची पहाट पाहू लागले. ‘अखिल विश्वाला सुखी करण्याचा मार्ग विज्ञान-तंत्रज्ञानातूनच जातो. त्यासाठी अभिनव संरचना आल्या तर जुनाट संरचनांवर उभ्या अनेक संकल्पना आणि समस्या सुटू शकतील’ याची खूणगाठ त्यांनी नाविक दलातच बांधली. सुखाची नवी दालने खुली करण्यासाठी किमान व्ययातून अधिक कार्यक्षमता देणारी अवजारे, वस्तू, उपकरणे यांचा धांडोळा घेण्यासाठी फुलर सज्ज झाले.

प्रचलित घराच्या बांधकामासाठी अधिक सामग्री जाते. चौकोन हा आकारच अनसर्गिक आणि कमकुवत. अशा चौकोनी आकारावर वरून दाब आला (कॉम्प्रेशन) तर तो चौकोन वाकणार. हे रोखण्यासाठी भारवाही (लोड बेअिरग) घरांच्या भिंती जाडजूड होत गेल्या. ‘चौकोनाऐवजी गोल घर करता येईल. त्रिकोणांचे पंचकोन, षट्कोन करून त्यांना जोडत फुटबॉलसारखा गोल हा अधिक भक्कम असेल. त्रिकोण ही अतिशय स्थिर भौमितिक रचना आहे. त्यावर बल आल्यास पायाकडे जाऊन विभागले जाते. भुजांवर बल आल्यास ताण सहन करण्याची क्षमता वाढवणारी सामग्री वापरली, तर मालामध्ये बचत होईल. त्या गोलाकार घरांच्या भिंती रूढ नसल्याने त्यांना भारवाही रचनेचे नियम लागू होणार नाहीत.’ अशी गोलाकार, टुंड्रा प्रदेशातील इग्लूसारखी घररचना फुलर यांनीच जगाला दिली. त्याला त्यांनी ‘जिओडेसिक डोम’ हे संबोधन दिलं. अवकाशाचा सुयोग्य वापर करावयाची कला फुलर यांनीच शिकवली. नवोन्मेषी रचना व त्याकरता चपखल संज्ञासुद्धा त्यांनीच आणल्या. डायमॅक्सिअन, टेन्सिग्रिटी, सिनर्जी, सिन्ट्रॉपी, लिव्हिंगरी, स्पेसशिप अर्थ या त्यांच्याच अभिनव संकल्पना होत्या. डायनॅमिक, मॅक्झिमम व टेन्शन यांतून ‘डायमॅक्सिअन’ हे विशेषण त्यांनी कार आणि घर यांच्यासाठी वापरले. ताण व दाब दोन्ही बल घेणाऱ्या संरचनेला ‘टेन्शनल इंटिग्रिटी’ घेणारी ‘टेन्सिग्रिटी’ हे संबोधन दिले. कमीत कमी ऊर्जेत अधिकाधिक कार्य करणाऱ्या ऊर्जेस ‘सिनर्जी’ म्हटले. उष्मागतिशास्त्राच्या दुसऱ्या सिद्धांतानुसार ऊर्जेच्या रूपांतरामध्ये सर्व ऊर्जा प्राप्त होत नाही; न प्राप्त होणाऱ्या ऊर्जेला अव्यवस्था- ‘एन्ट्रॉपी’ म्हणतात. वनस्पतींच्या प्रकाश संश्लेषणामध्ये ही अव्यवस्था कमी होते. म्हणून अशा सुव्यवस्था निर्माण करणाऱ्या क्रियांना फुलर यांनी ‘सिन्ट्रॉपी’ म्हटले. सर्व राष्ट्रांनी युद्धासाठी शस्त्रास्त्रांचा (वेपनरी) ध्यास घेतला आहे. वास्तविक जगातील जीवसृष्टी वाचविण्याकरिता ‘जीवनास्र’ (लिव्हिंगरी) म्हणजे ‘आपण एकत्र येणे’ आवश्यक आहे. आपण सगळे ‘पृथ्वी’नामे अंतरीक्षयानाचे प्रवासी आहोत. (मनुष्य- हय़ूमन हा शब्दप्रयोग टाळून ‘पृथ्वीवासीय- अर्थियन्स’ असा शब्दप्रयोग ते करीत.) या ‘स्पेसशिप अर्थ’च्या यच्चयावत प्रवाशांच्या कल्याणासाठी ‘विज्ञानाधारित अभिकल्प क्रांती’ची निकड असल्याचे फुलर वारंवार सांगत असत.

१९२७ मध्ये फुलरनी मानवजातीसाठी कल्पक आणि पूर्णपणे नवे अभिकल्प द्यायला सुरुवात केली. ‘चौमिती घर’ हे त्यांचे पुस्तक प्रकाशित झाले. त्यामध्ये त्यांनी डायमॅक्सिअन घराचा नमुना सादर केला. एक खांबी तंबूसारखी ही रचना होती. मध्यभागी एकच खांब आणि तोच भिंतीचा भार वाहतो, म्हणून जास्त खांबांची अथवा जाड भिंतीची गरज नाही. खोल्यांना विभागणाऱ्या भिंतीसुद्धा (पार्टिशन वॉल) कमी केल्या. सामग्रीची बचत थक्क करणारी होती. घरामध्ये अवकाशाचा उपयोग करून वाया जाणारी जागा कामात आणणारा हा अभिकल्प तीन नाही, चार भिंतींचा असल्याचा दावा फुलरनी केला. बहुत्पादन करण्यास योग्य, जगभर कुठेही उपयोगात आणता येऊ शकणारे घर ही त्यांची महत्त्वाकांक्षा होती. परंतु हे पर्याय स्वीकारायला काही काळ लागेल याचीही त्यांना कल्पना होती. ‘फॉच्र्युन’ नियतकालिकाने ‘डायमॅक्सिअन’ घरांची ‘उद्योगांनी न जाणलेला उद्योग’ अशी प्रशंसा केली होती.

१९३३ साली झालेल्या शिकागो प्रदर्शनात फुलर यांनी ‘डायमॅक्सिअन कार’चा नमुना (प्रोटोटाइप) सादर केला. अनेक विज्ञान लेखकांनी कल्पना केलेली ही कार जमीन, पाणी व आकाशातून प्रवासाकरता उपयोगात यावी असा तो अभिकल्प होता. वायूगतिशास्त्राचा (एरोडायनॅमिक्स) विचार करून रचलेली ही कार वजनाला अतिशय कमी असल्यामुळे वेगवान होती. या कारची चाचणी घेत असतानाच ती दुसऱ्या कारवर आदळल्याने झालेल्या अपघातात चालक मरण पावला. यानंतर हा प्रकल्प बाजूला पडला. हे रूढार्थाने अपयश असले, तरीही त्या संकल्पनेमुळे फुलर यांच्या कल्पनाशक्तीची व सर्जनशीलतेची भरारी जगाच्या लक्षात आली. २०१२ साली ‘जग बदलून टाकणाऱ्या ५० कार’ या पुस्तकात डायमॅक्सिअन कारचा उल्लेख केला आहे.

वापरात येणाऱ्या अवजाराची उपयोगिता वाढवण्यासाठी कसून शोध हा त्यांचा स्थायिभाव असल्याने साधा शेल्फसुद्धा बदलून टाकावासा वाटला. अर्धवर्तुळाकाराचा फिरता उभा शेल्फ आडवा शेल्फ केल्याने आपल्याला हवी ती वस्तू एका जागी उभे राहून समोर आणता येते. याचे फुलरकृत नामकरण झाले- ‘रिव्हॉल्व्हिंग शेल्व्ह्ज’! प्रिन्स्टन विद्यापीठाच्या प्रचंड वाचनालयात ग्रंथ हातात घेण्यासाठी असे फिरते शेल्फ आहेत.

डायमॅक्सिअन कार, डायमॅक्सिअन आकाश, सागरदर्शी विश्वनकाशा, चतुष्फलक (टेट्राह्रेडन) तरंगते शहर, घुमटाकृती शहररचना अशा चमत्कृतीपूर्ण अभिकल्पांचे जनकत्व फुलर यांच्याकडे जाते. साहजिकच त्यांना जपान, अमेरिका, भारत, इग्लंड इथल्या वास्तुकला महाविद्यालयांत, विद्यापीठांत व्याख्यानांची नियमित निमंत्रणे येऊ लागली. जगभर सल्ला देण्यासाठी ते जाऊ लागले. शिक्षणापासून कारखान्यापर्यंत कुठल्याही क्षेत्रात त्यांचा संचार चालायचा.

१ जुलै १९८३ रोजी फुलर गेले. परंतु फुलर यांचा गोल वैज्ञानिकांच्या मनात घर करून बसला होता. १८२५ साली षट्कोनाच्या कोपऱ्यांवर कार्बन अणू बसवून सी-६ ही बेन्झिन रिंग तयार झाली होती. त्यामुळे रसायनशास्त्रात पॉलिमर क्रांती झाली व प्लास्टिक युग अवतरले. १९९५ साली बकीगोलाच्या कोपरांवर कार्बन अणू बसवून सी-६० व सी-७० हे नवे कार्बन रेणू तयार करण्यात रसायनशास्त्रज्ञांना यश मिळाले आणि नॅनो टेक्नॉलॉजीची पायाभरणी झाली.

फुलर यांना अपेक्षित अभिकल्प बदल आता वेगाने होत आहेत. जीवसृष्टीतील घरटी व रचना यांकडून प्रेरणा घेत जैविक नक्कल (बायोमिमिक्री) करण्याचे प्रयत्न चालू आहेत. कोळ्याचे जाळे, वारूळ यांसारख्या असंख्य रचना पाहून संशोधक नवे पदार्थ (मटेरिअल) आणि अभिकल्प करीत आहेत. हरित इमारती, हरित शहरे यांतून निसर्गाच्या जवळ जाण्याची आटोकाट धडपड चालू आहे. मनाला सुखावणाऱ्या अभिकल्पांचा वेध घेणारी मेंदू वास्तुकला (न्युरो आर्किटेक्चर) ही ज्ञानशाखा विकसित झाली आहे. ‘जिओस्कोप’च्या धाटणीचे विश्वदर्शन घडविण्याच्या तयारीत ‘गुगल’ आहे. फुलर यांचे ज्ञान व तंत्रज्ञान हे आजही जगाच्या उपयोगी पडत आहे. त्यांना अभिप्रेत जागतिक विद्युत जाल व जलजाल, विश्वक्रीडा व संपूर्ण जगासाठी एकसंधता अवतरावी अशी अपेक्षा आपण करू शकतो.