|| सीमा भानू

एका लेखकाच्या आयुष्यातल्या कठीण कालखंडावरचे ‘आकाश पाताळ’ हे पुस्तक वाचकाला सुन्न करून सोडते. थोमास मेले या जर्मन लेखकाच्या या पुस्तकाचा सुनंदा विद्यासागर महाजन यांनी अनुवाद केला आहे.

थोमास मेले हे मुख्यत: नाटय़लेखक आहेत. त्यांनी अनेक पुस्तकेही भाषांतरित केली असून त्यांना त्यासाठी पुरस्कारही मिळाले आहेत. तौलनिक साहित्याभ्यास आणि तत्त्वज्ञान याचे ते अभ्यासक आहेत. त्यांना वयाच्या २४ व्या वर्षी एका विचित्र मानसिक आजाराने गाठले. बायपोलर डिसऑर्डर वा उभयावस्था असे त्याचे वैद्यकीय भाषेतील नाव. गेली अनेक वष्रे ते या आजाराचे रुग्ण आहेत. १९९९, २००६ आणि २०१० या काळात त्यांना या आजाराचे झटके आले. त्याचे अंगावर काटा आणणारे वर्णन त्यांनी या पुस्तकात केले आहे.

या आजारात रुग्ण काही काळ उन्मादी अवस्थेत असतो. अविश्वसनीय गोष्टी तो या काळात करतो. इतक्या, की आतापर्यंत सवयीचे असलेले आयुष्य जगणे त्याला अशक्य होऊन जाते. तो स्वत:ला जे ओळखतो किंवा आपण असे आहोत असे त्याला जे वाटत असते, त्याला काही आधारच राहत नाही आणि त्यानंतर येते ती नराश्यावस्था. या अवस्थेत रुग्ण काही उणेपर्यंत खाली घसरतो आणि मग विश्वास ठेवावा असे त्याच्याबाबतीत काही उरत नाही. हॉलीवूडमध्ये या आजारावर बेतलेले अनेक चित्रपट आले आहेत. ‘द घोस्ट अ‍ॅण्ड द व्हेल’ हा त्यातला अगदी अलीकडचा. लेखक म्हणतो त्याप्रमाणे, ‘मी खाली पडलो तर तिथे किंवा वर उडालो तर तिथे जास्त काळ त्याच अवस्थेत राहतो. मग मला कुणीही थांबवू शकत नाही. मग ते आकाशातले उड्डाण असो वा पाताळातील बुडी.’ बाकीच्या समाजातील जीवनाशी जोडून घेण्यासाठी असलेला धागा त्यांच्याबाबतीत हरवून गेलेला असतो. तो समाजव्यवस्थेच्या बाहेर फेकला गेलेला असतो. त्याला स्वतलाच काही समजत नसते; तर बाकीचे त्याला काय समजून घेणार?

मग हे सगळे सांगायचे कारण काय? यावर लेखक म्हणतो, ‘माझ्या बाबतीत हे अमुक अमुक घडले आहे. त्याचे कारण कोणते आहे, परिणाम कोणता आणि आजाराशी संबंध नसलेली अवस्था कोणती, हे समजून घेण्यासारखे व्हावे म्हणून माझी गोष्ट मला सांगावी लागणार आहे.’

सुरुवातीचा झटका थोमासला आला ते कारण अगदीच तात्कालिक होते. पण त्यानंतर त्याच्याच शब्दात सांगायचे, तर त्याच्या मेंदूने विचार करायचे काम थांबवले आणि मग या मेंदूचा मालक भरकटत गेला. ही अवस्था महिनोन् महिने, वष्रेही टिकू शकते. उन्मादात प्रत्येक गोष्ट तीव्रपणे जाणवते, व्यक्त होते. आक्रमकता वाढते. लक्ष सतत विचलित झालेले असते. या अवस्थेतील रुग्ण स्वत:ला अतिशय आकर्षक आणि भारी समजतो. तो काम करतो किंवा करत नाही. घरे बदलतो. लोकांशी बोलताना, वागताना बेताल असतो. त्यांना ओळखतो, ओळखत नाही. थोडक्यात, मेंदूवर कसलेच नियंत्रण नसते. उन्मादाचा झटका जेवढा मोठा तेवढी नराश्याची स्थिती खोल. या अवस्थेत रुग्ण दु:खी आणि नकारात्मक असतो. यात त्यांनी आत्महत्या करण्याचे प्रमाण जवळजवळ १५ टक्के एवढे आहे. या आजाराच्या रुग्णाच्या मनात काय चालू असते, त्याची ही कहाणी आहे असे म्हटले तर ते चुकीचे ठरणार नाही.

या आजाराची कारणे पाहिली, तर अनुवांशिक घटक हा त्यातला सगळ्यात महत्त्वाचा आहे. त्याचबरोबर मेंदूतील पेशीत होणारे बदल. परिस्थिती, आजाराला बळी पडू शकेल अशी मनोवस्था, व्यक्ती म्हणून झालेली जडणघडण या गोष्टीही महत्त्वाच्या ठरतात. एकप्रकारे हा मेंदूतील पेशींचा खेळ आहे. आईच्या कुटुंबाकडून लेखकाला मानसिक आजाराचा मिळालेला अनुवांशिक वारसा, पौगंडावस्थेत असताना आपल्याला आपल्या त्रिज्येतून बाहेर फेकले आहे, बाहेरच्या जगात आणि आपल्यात एक मोठी दरी आहे- ती ओलांडावी लागणार आहे, असे थोमासला सतत वाटणे यात कुठेतरी या आजाराची बीजे दडली असावीत.

या पुस्तकात लेखकाच्या अवस्थेची वर्णने वारंवार येतात. ती वाचकाला अस्वस्थ करतात यात काहीच शंका नाही; पण लेखक ज्या भयानक स्थितीतून गेला आहे किंवा पुढेही जायची शक्यता आहे, त्याची काही संगती लावून तो आपल्या आजारातून बाहेर यायचा प्रयत्न करतो आहे, हे लक्षात घेतले की या तपशिलांचे महत्त्व लक्षात येते. लेखकाने या काळात अनेक गोष्टी गमावल्या. त्यात काही जवळचे मित्रही होते. ‘उन्मादाचा झटका आला असेल तर मी असे काही करून किंवा लिहून जातो, जे एरवी मी करणारच नाही. पण तसे स्पष्टीकरण देऊन मी स्वत:ला त्यापासून वेगळे करू शकत नाही. या गोष्टी करणारा ‘मी’ होतो, पण ‘मी’ तो नव्हतोही; हे कसे सांगणार? माझ्या आत ही बारीक फट आहे, ती घेऊनच मला जगणे भाग आहे.’ – असे तो म्हणतो, तेव्हा त्याचा प्रांजळपणा लक्षात येतो. हा प्रांजळपणा, थेटपणाच या पुस्तकाचे वैशिष्टय़ आहे!

‘आकाश पाताळ’ – थोमास मेले,

अनुवाद – सुनंदा विद्यासागर महाजन,

कॉन्टिनेन्टल प्रकाशन,

पृष्ठे – ३५२, मूल्य – ४०० रुपये