29 September 2020

News Flash

स्किझोफ्रेनियाचा ‘शुभंकर’ वेध

आय.पी.एच.ची धुरा वाहणारे समर्पित मनोविकारतज्ज्ञ व मनोज्ञ कार्यकर्ते डॉ. आनंद नाडकर्णी यांची प्रस्तावना या पुस्तकाला आहे.

|| डॉ. सुजला वाटवे

डॉ. सविता आपटे यांनी ‘इन्स्टिटय़ूट फॉर सायकॉलॉजिल हेल्थ (आय.पी.एच.)’मध्ये करीत असलेल्या कामाच्या अनुभवांवर आधारीत ‘रोज नवी सुरुवात’ हे पुस्तक लिहिले आहे. स्किझोफ्रेनिया किंवा भग्नमनस्कता या आजारात विचारांची विकृती निर्माण होते आणि भास, भ्रम, अनारोगी विचार यांच्यामुळे रुग्ण वास्तव जगापासून दूर जातो. अशांच्या वास्तव कथा वेगवेगळ्या प्रकरणांमधून या पुस्तकात दिलेल्या आहेत. यामध्ये रुग्णांना मानसिक त्रास होतच असतो; परंतु त्यांच्याशी रोज व्यवहार करणाऱ्या आणि त्यांची काळजी घेणाऱ्या नातेवाइकांना काय करावे लागते, सोसावेही लागते याची माहिती संवादांच्या आधाराने येथे येते. अत्यंत शास्त्रीय दृष्टिकोनातून, परंतु सर्वसामान्यांना उमजेल आणि व्यवहारात आणता येईल या पद्धतीने डॉ. आपटे यांनी हे अनुभव सर्वासाठी खुले केले आहेत. तसेच रुग्ण म्हणजे ‘शुभार्थी’ आणि त्यांना या आजारातून सर्वसामान्य जगात वावरण्यासाठी साथ करणारे ‘शुभंकर’ या संकल्पनांची ओळखपुस्तकातून होते.

आय.पी.एच.ची धुरा वाहणारे समर्पित मनोविकारतज्ज्ञ व मनोज्ञ कार्यकर्ते डॉ. आनंद नाडकर्णी यांची प्रस्तावना या पुस्तकाला आहे. डॉ. आपटे यांनी उभ्या केलेल्या ‘सुहृद’ या स्व-मदत गटाच्या कामाची आणि ‘त्रिदल’ या कार्यशाळांची ओळख ते प्रस्तावनेत करून देतात.

आपल्या आजारग्रस्त व्यक्तीला आतून बाहेर ओढण्यासाठी, त्याला कार्यक्षम करण्यासाठी ‘वाटेल ते’ करण्याची प्रेरणा कुटुंबीयांना अस्वस्थ करत असते. पण स्किझोफ्रेनियाचे शास्त्रीय स्वरूप माहिती नसल्याने अनेकांचे अपेक्षाभंग होत राहतात, हे डॉ. आपटे यांना जाणवले. यासाठी कुटुंबीयांना ‘सज्ञान’ करण्याची, विविध गैरसमजुती दूर करण्याची आणि शास्त्रोक्त पद्धतींचा आधार घेऊन रुग्णांना मदत करण्याची त्यांची धडपड सुरू झाली. कार्यशाळांचे आयोजन करून अनेक कुटुंबीयांचे त्यांच्यामधील ‘शुभार्थी’ना मदत करणारे ‘शुभंकर’ तयार करण्यात आले.

‘नवी सुरुवात’ या प्रकरणात रुग्णाच्या सुरुवातीच्या काळात त्यातील लक्षणांकडे कसे दुर्लक्ष होते, याचे वर्णन केले आहे. अशातूनच लक्षणे विकोपाला जातात, आपल्या नियंत्रणात काही नाही असे वाटू लागते आणि मगच नाइलाजाने मानसिक समस्या म्हणून मदत घेतली जाते. सुशिक्षित आणि भावनाप्रधान असूनही ही मंडळी अशी का वागतात, याची कारणे समजावून घेऊन डॉ. आपटे यांनी विषयमांडणी केली आहे. शुभार्थीच्या कुटुंबीयांच्या विचारांवर ‘उपचार’ करण्यासाठी विवेकनिष्ठ विचारपद्धतींचा वापर कसा उपयोगी ठरेल, याची चिकित्सा करत कुटुंबीयांना ‘शुभंकर’ करण्याची सहज गोष्टच त्या सांगतात.

आपल्यासारखे अनेक आहेत आणि तेही या तडफडीतून गेले आहेत, त्यांनी आपले मार्ग यशस्वीपणे आक्रमत शुभार्थीनाही होईल तेवढी मदत केली आहे, असा दिलासा सुरुवातीच्या प्रकरणांतून (‘आधारगटाचा आधारवड’, ‘शुभंकर असण्याचा खरा अर्थ’) मिळतो.

शुभार्थीच्या स्थितीमुळे नातेवाइकांत निर्माण होणारे ताण व गैरसमज दूर करणे, सुरुवातीची निरोगी नाती प्रस्थापित करणे आवश्यक ठरते. हे काही उदाहरणांद्वारे ‘आजार कोणता आणि स्वभाव कोणता?’ या प्रकरणात समजावून दिले आहे.

‘शॉक ट्रीटमेंट (ई. सी. टी.) द्यायची की नाही?’ या प्रकरणात ‘इलेक्ट्रोकन्व्हल्सिव्ह थेरपी (ई.सी.टी.)’ची माहिती दिली आहे. या उपचारपद्धतीबद्दल सामान्यजनांत अनेक गैरसमज आहेत. मात्र, आजार जुनाट होण्यापूर्वीच या उपचारपद्धतीचा उपयोग साकल्याने झाला पाहिजे, हे डॉ. आपटे आग्रहाने मांडतात. आजार जुनाट होऊ लागला वा पुन:पुन्हा उद्भवू लागला, की शुभार्थी व शुभंकर हतबल होताना दिसतात. अशावेळी स्वमदतगटांची, कार्यशाळांची विशेष गरज भासते हे ‘आजार ‘जुना’ होतो, तेव्हा..’ या प्रकरणात नमूद केले आहे.

स्किझोफ्रेनिया हा आजार वेळीच लक्षात आला, त्यावर उपचार मिळत गेले आणि कुटुंबीयांनी त्याचा स्वीकार करून योग्य पद्धतीने रुग्णाला मदत केली, तर व्यक्ती पुष्कळ अंशी पूर्वस्थितीत येते. आपले आयुष्य समर्थपणे पुढे नेते. तरीही काही टक्के रुग्ण हे त्यातून बाहेर येऊ शकत नाहीत. त्यांच्या भविष्याची तरतूद पालकांना करून ठेवावी लागते. त्यासाठी प्रदीर्घ काळ काळजी घेणाऱ्या पुनर्वसन केंद्रांची (‘रिहॅब सेंटर्स’) आवश्यकता डॉ. आपटे यांनी अधोरेखित केली आहे. तसेच शुभार्थीचं लग्न करावं की नाही, केल्यास काय काळजी घेतली पाहिजे, याचे विवरण एका स्वतंत्र प्रकरणात केले आहे.

एकुणात काही प्रश्न उपस्थित करणाऱ्या, काही मार्ग दाखवणाऱ्या आणि काही नवे शोध घेण्याची प्रेरणा देणाऱ्या या पुस्तकामुळे या विषयाबाबत समृद्ध दस्तावेज उपलब्ध झाला आहे.

‘रोज नवी सुरुवात: सल्लागार साथी’ – डॉ. सविता आपटे,

मनोविकास प्रकाशन,

पृष्ठे – १५६, मूल्य – १६० रुपये

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2019 12:18 am

Web Title: loksatta book review 48
Next Stories
1 सहृदय गिरीश
2 आम्ही तुम्हाला मिस करतोय..
3 ‘सर सर सरला’
Just Now!
X