|| अरुण नूलकर

हिंदी चित्रपटसंगीताच्या सुवर्णकाळाचे मानकरी जसे गायक-गायिका आणि संगीतकार आहेत, तसेच प्रतिभावान गीतकारही आहेत. यातलंच एक महत्त्वाचं नाव म्हणजे कोणाही सामान्य व्यक्तीच्या मनाला भिडणारी, तरीही अलंकारयुक्त, गेय, सुबोध अशा गीतरचना करणारे चतुरस्र गीतकार शैलेंद्र! हे नाव हिंदी चित्रपटसंगीत रसिकांच्या मनात येताच त्यांची अनेक गाणी रुंजी घालू लागतात. ‘बरसात में हमसे मिले तुम सजन’, ‘आवारा हूँ’, ‘ओ सजना, बरखा बहार आयी’, ‘पान खाएँ सैंया हमारो’, ‘आज फिर जीने की तमन्ना है’, ‘जीना यहाँ मरना यहाँ’, ‘तू प्यार का सागर है’ आणि अशी अनेक गाणी- तीही वैविध्यपूर्ण, आशयानं परिपूर्ण आणि तरीही चित्रपटातल्या प्रसंगांना चपखल बसणारी! हे सर्व लिहिणाऱ्या शैलेंद्र या प्रतिभावान गीतकाराविषयी रसिकसुलभ उत्सुकता निर्माण होणे स्वाभाविकच आहे. त्याचं आयुष्य कसं होतं, साहित्यिक व कौटुंबिक पाश्र्वभूमी, आयुष्यातले चढ-उतार हे सगळं जाणून घेण्यासाठी ‘सुहाना सफर और.. : कवी शैलेंद्र यांचा गीतमय जीवनप्रवास’ हे चित्रपट आस्वादक विजय पाडळकर यांनी लिहिलेलं अतिशय हृद्य असं रसग्रहणात्मक पुस्तक वाचायलाच हवं!

पुस्तकाच्या प्रास्ताविकात पाडळकर लिहितात- ‘गीतकारांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे सन्मान दिला जात नाही. गीतकारांची उपेक्षा थोडीतरी कमी व्हावी, यासाठी मी हिंदी सिनेमातील ९० गीतकारांचे जीवन आणि कार्य यावर ‘बखर गीतकारांची’ हे पुस्तक २०१४ साली लिहिले. त्यात शैलेंद्रवर प्रदीर्घ लेख लिहिताना जाणवलं, की ‘शैलेंद्र’ हा स्वतंत्र पुस्तकाचा विषय आहे.’ या उद्देशानं पाडळकरांनी स्वत:च्या संग्रहातील शैलेंद्रची गाणी आणि (शैलेंद्रचं अधिकृत चरित्र उपलब्ध नसतानाही) ‘गीतों का जादूगर- शैलेन्द्र’ या ब्रज भूषण तिवारी यांच्या पुस्तकाचा उपयोग करून प्रस्तुतचं पुस्तक लिहिलं आहे. एक नक्की की, पाडळकर यांनी शैलेंद्रच्या गीतांचा किती सखोल अभ्यास केला आहे, हे प्रत्येक प्रकरणातून, प्रत्येक गाण्याच्या आस्वाद-रसग्रहणातून सतत जाणवतं आणि म्हणूनच ते विलक्षण वाचनीय ठरतं. प्रास्ताविकात त्यांनी म्हटलं आहे : ‘शैलेंद्र नेहमीच मला माझ्या हृदयाच्या अगदी जवळचा कवी वाटतो. बुद्धिमत्ता आणि भावोत्कटता यांचा अपूर्व मिलाफ त्याच्या गीतात झाला आहे. पांडित्याचा, वैचारिकतेचा कसलाही उसना भाव न आणणारी त्याची गीतं सोप्या, सहज साध्या शब्दांत, ‘सिधी सी बात न मीर्च मसाला’ असं म्हणत प्रकट होतात आणि थेट हृदयात प्रवेश करतात, ‘विनाकारण’ आठवत राहतात. त्याची गाणी आठवण्यासाठी काही कारण लागत नाही आणि मग ती आठवतच राहतात!’

‘मोरी बगिया में आग लगा गयो रे..’ या शीर्षकाच्या पहिल्याच प्रकरणात वाचकाला शैलेंद्र यांची वैयक्तिक माहिती कळते. म्हणजे मूळ नाव शंकरदास. जन्म ३० ऑगस्ट १९२३, रावळपिंडीतला. दलित कुटुंब. वडील केशरीलाल हे स्वत: अशिक्षित, मोलमजुरी करणारे; पण मुलानं- शंकरनं शिकून मोठं व्हावं ही त्यांची इच्छा. जवळपासच्या मंदिरात शंकर आरत्या गात असे. ताल-लय-सूर यांची जन्मजात जाण त्याच्यात होती. पुढे कॉलेजमधला प्रवेश, अभिजात हिंदी साहित्याचे वाचन आणि आपणही कविता कराव्यात ही ऊर्मी. कबीर आणि तुलसीदास हे त्याचे आवडते कवी होते. कॉलेजमध्ये असतानाच त्यानं ‘शैलेंद्र’ हे टोपण नाव घेऊन कविता लिहायला सुरुवात केली व भविष्यकाळात हेच नाव हिंदी चित्रपटसृष्टीत अजरामर झालं!

शैलेंद्र कविसंमेलनातून भाग घ्यायला लागला. एका कविसंमेलनात त्यानं एक कविता गायली होती :

‘मैं चित्रकार भी हूँ,

कभी कुछ चित्र भी बना लेता हूँ।

मैं कवि रूप भी हूँ,

कभी कुछ कविता कर लेता हूँ।

मैं हूँ अखंड पृथ्वी के

इक कोने का लघु खिलौना।

जब तक कोई खेल सके खेले,

टूट जाए तो क्या रोना।’

शैलेंद्र स्वत:ची कविता गाऊनच दाखवायचा. यावर त्याचं म्हणणं असं की, ‘कावित्त पढंत की चीज है, गीत गाने की’!

या पुस्तकातल्या प्रकरणांना अत्यंत चपखलपणे शैलेंद्रच्या गाण्यांच्या ओळींची शीर्षकं दिली आहेत. दुसऱ्या प्रकरणाचं शीर्षक आहे- ‘जलता है पंजाब..’! स्वातंत्र्यलढा, गांधीजींच्या ‘भारत छोडो’च्या आंदोलनात शैलेंद्र सहभागी झाला होता आणि तुरुंगातही गेला होता. नंतरच्या काळात रेल्वेतली नोकरी, पुढे मुंबईला आल्यावर कामगारांच्या विशाल समुदायाचं झालेलं दर्शन, त्यातून आलेलं आत्मभान आणि समाजभान याचं त्याच्या काव्यातून उमटलेलं प्रतिबिंब, मार्क्‍सवादी विचारांचा प्रभाव हे सगळं या प्रकरणात विस्तृतपणे येतं व पुढील काळातील शैलेंद्रच्या विविध गाण्यांतल्या विचारांची बीजं आपल्याला जाणवतात!

‘आग’ चित्रपटासाठी गाणी लिहिण्याकरिता राज कपूरचा प्रस्ताव नाकारणारा शैलेंद्र इथे भेटतो. ‘मैं पैसों के लिए नहीं लिखता। कोई ऐसी बात नहीं है जो मुझे आपकी फिल्म में गाना लिखने के लिए प्रेरणा दे। मैं क्यूँ लिखू?’ असं राज कपूरला चकित करणारं उत्तर त्यानं दिलं होतं! परंतु काळाचा महिमा असा की, नंतर हाच शैलेंद्र पैशाच्या गरजेतून राज कपूरला भेटतो, गीतलेखनाची विनंती करतो आणि इथूनच सुरू होतं हिंदी चित्रपट संगीतातलं ‘शैलेंद्र-युग’! या साऱ्याबद्दल सुरुवातीच्या काही प्रकरणांतून वाचायला मिळतं.

१९४९ साली झळकलेल्या ‘बरसात’ या चित्रपटानं शैलेंद्रची गीतलेखन कारकीर्द सुरू झाली. ती पुढची सुमारे ४० वर्ष बहरत राहिली. ‘बरसात में हमसे मिले तुम सजन, तुमसे मिले हम बरसात में..’ हे ते पहिलं गाणं!

‘गर्दिशमें हूँ, आसमान का तारा हूँ..’ या प्रकरणात शंकर-जयकिशन बरोबर जमलेले सूर, ‘आवारा’ची गाणी आणि त्यातलं ड्रीम साँग या सगळ्याचं सुंदर विश्लेषण वाचायला मिळतं.

‘आर.के.’ बॅनरव्यतिरिक्त इतर निर्माते-दिग्दर्शक तसंच अन्य प्रतिभाशाली संगीतकार अशा सर्वाकडे शैलेंद्रचं गीतलेखन सुरू झालं. शैलेंद्रच्या या बहरलेल्या काळात १९५३ मध्ये त्याची गाणी असलेले दहा चित्रपट पडद्यावर आले. त्यातल्या ४३ गाण्यांनी त्याला आघाडीच्या गीतकारांत नाव मिळवून दिलं. ‘दो बिघा जमीन’ या चित्रपटामुळे सलील चौधरीसारख्या मातब्बर संगीतकाराशी शैलेंद्रचं उत्तम टय़ुनिंग जमलं.

‘बूट पॉलिश’ या चित्रपटातल्या सर्वात गाजलेल्या- ‘नन्हे मुन्ने बच्चे तेरी मुठ्ठी में क्या है’ या गाण्यात मुलांना विचारलेले प्रश्न आणि त्यांची त्यांनी दिलेली उत्तरं याबद्दल पाडळकरांनी लिहिलं आहे : ‘मार्क्‍सवादावर श्रद्धा असल्यानं सामान्य माणसाच्या स्वप्नांना शैलेंद्रनं नेहमीच आपल्या गीतांतून वाचा फोडली.’ येणाऱ्या उद्या प्रत्येक माणसाच्या डोक्यावर राजमुकुट असेल असं स्वप्न तो बघत राहिला. म्हणूनच ‘सुहाना सफर और..’ वाचताना या ‘और’मध्ये बरंच काही दडलंय व पाडळकरांच्या रसपूर्ण विश्लेषणातून ते आपल्याला समजत जातं!

‘बूट पॉलिश’ चित्रपटातल्या स्वत:च्या ‘चली कौन से देस, गुजरिया तू सज धजके’ या गाण्यावर राज कपूरच्या आग्रहाखातर शैलेंद्रनं चक्क अंगात धोतर, बंडी आणि डोक्याला रुमाल बांधून बेंजो वाजवत रस्त्यावर गाणं म्हणणाऱ्या गायकाची भूमिका केली होती.

‘श्री ४२०’मधल्या ‘प्यार हुआ इकरार हुआ’ आणि ‘रमय्या वस्तावय्या’ या गाण्यांवर भरभरून लिहिताना पाडळकरांनी शेवटी म्हटलं आहे- ‘‘श्री ४२०’चं गीत-संगीत हे हिंदी चित्रपट संगीतातील जणू गौरीशंकर शिखरच आहे!’ तसंच ‘चोरी-चोरी’, ‘बसंत बहार’ यांतल्या शैलेंद्रच्या गाण्यांचं रसभरीत वर्णन आहे. तीच गोष्ट ‘जागते रहो’तल्या गाण्यांची. ‘जागो मोहन प्यारे’तील प्रसंगाचं शिवधनुष्य शैलेंद्रनं लीलया पेललंय, हे लेखक विस्तृतपणे सांगतात.

शैलेंद्रच्या गाण्यांत ‘मधुमती’ चित्रपटातील गाणीही महत्त्वपूर्ण ठरली. खरं तर हे त्याच्या प्रत्येक गाण्याबद्दलच म्हणावं लागेल! त्याची विलक्षण चित्रमयी लेखनशैली कॅमेऱ्यानं तितकीच परिपूर्ण टिपलीय, हे ‘सुहाना सफर और ये मौसम हंसीं’ या गाण्यातून जाणवतं!

काळानुसार चित्रपटसंगीतात आलेला आरडाओरडा, निर्थक शब्द, वाद्यवृंदाचा अतिरेकी वापर यालाच गाणं म्हणायचं हे शैलेंद्रसारख्या जातिवंत कवीला आवडत नव्हतं. म्हणून त्यानंच एका गाण्यातून (चित्रपट : ‘लव्ह मॅरेज’) हे व्यक्त केलंय..

‘टीन-कनस्तर पीट पीटकर,

गला फाडकर चिल्लाना

यार मेरे, मत बुरा मान,

ये गाना है न बजाना है..’

किशोर कुमारसाठी शैलेंद्रनं चमत्कृतीपूर्ण अशी अनेक गाणी लिहिली. त्यासंदर्भात पाडळकर लिहितात : ‘‘शरारत’साठी त्यानं एक अर्थहीन गाणं लिहिलं आहे. त्याच्या सर्व गीतसंभारात हे गाणं वेगळेपणानं उठून दिसतं.’ ते गाणं असं आहे –

‘लुस्का लुस्का लुई लुई सा

इसका, उसका, किसका, लुई लुई सा

तू मेरा कॉपीराइट, मै तेरी कॉपीराइट

दुनिया ब्राइट, ब्राइट, ब्राइट..’

राज कपूरनंतर जर शैलेंद्रचं कुणा दिग्दर्शकाशी जवळचे संबंध निर्माण झाले असतील तर ते बिमल रॉय यांच्याशी, असं लेखक सांगतात. ‘मधुमती’पासून दृढ झालेलं हे नातं ‘परख’मुळे अधिक घट्टं झालं आणि पाठोपाठ सलीलदांशीसुद्धा! ‘उसने कहा था’मधील या जोडीची गाणी केवळ अप्रतिम.. ‘आहा रिमझिमके ये प्यारे प्यारे गीत लिये’ तसंच लतादीदींनी गायलेलं ‘ओ हो मचलती आरजू खडी बाँहे पसारे’!

‘मारे गये गुलफाम..’ आणि ‘तेरा मेरा प्यार अमर..’ या प्रकरणांत शैलेंद्र निर्मित ‘तिसरी कसम’ या चित्रपटाबद्दल वाचायला मिळतं. यातच एक महत्त्वाचा संदर्भ येतो तो हरमिंदरसिंग हमराज यांचा, ज्यांनी हिंदी चित्रपटसंगीताच्या १९३१ ते १९८० या ५० वर्षांतील सर्व गीतांची नोंद पाच खंडांत करून ठेवली आहे.

‘तिसरी कसम’ चित्रपटाच्या निर्मितीसाठी शैलेंद्रनं आपलं सर्वस्व पणाला लावलं होतं. हे सगळं ‘सजनवा बैरी हो गये हमार..’ या प्रकरणात आलंय. अत्यंत हलाखीची परिस्थिती शैलेंद्रच्या कुटुंबावर ओढवली होती. पाडळकर लिहितात : ‘या कठीण काळात शैलेंद्रनं या परिस्थितीबद्दल कोणालाही दोष दिला नाही. एका पत्रात त्यानं रेणूंना लिहिलं, ‘सब भाग गये, अपने, पराये, दोस्त यार। इसलिए की ‘तिसरी कसम’ को पूरा करने का श्रेय शायद मुझे अकेले को मिले! रोऊ या खूष होऊ – कुछ समझमें नहीं आता। पर ‘तिसरी कसम’पर मुझे नाझ रहेगा, पछतावा नहीं!’ जीवनापेक्षा जास्त आपल्या कलाकृतीवर प्रेम असणं ही अस्सल कलावंताची एक महत्त्वाची खूण आहे.’

यातूनच शैलेंद्रच्या जीवनाचं अखेरचं पर्व सुरू झालं. कोर्टकचेऱ्या, वसुलीचे दावे यांना तोंड देणं अशक्य झालं. अति मद्यपानामुळे लिव्हर सिरॉसिस झाला. तब्येत झपाटय़ानं खालावली आणि यातच त्याचा अंत झाला. त्याच्या अंत्ययात्रेचं अतिशय भावपूर्ण वर्णन पुस्तकात केलं आहे.

‘सब को राम राम राम..’ या अखेरच्या प्रकरणात कवी अंजान, शकील बदायुनी, हसरत जयपुरी, राज कपूर आदींच्या प्रतिक्रिया आहेत. अखेरीस शैलेंद्रच्या कारकीर्दीचा आढावा घेताना त्याच्याविषयी, त्याच्या गीतांविषयी मतमतांतरंही आली आहेत. त्यातल्या काही त्रुटीसुद्धा स्पष्टपणे मांडल्या आहेत. अर्थात शेवटी पाडळकर लिहितात ते महत्त्वाचं, ‘सुदैवानं भारतात शैलेंद्रची योग्यता जाणणारे अनेक लेखक, कलावंत, टीकाकार आहेत. त्यांनी त्याच्यावर भरभरून लिहिलं आहे. अनेकांनी त्याला ‘कविराज’ म्हटलं. प्रसिद्ध लेखक कमलेश्वर त्याला ‘लोकधर्मी मानवतावादका शाश्वत कवी’ म्हणतात, तर कवी नीरज शैलेंद्रला ‘कालत्रयी गीतों के प्रणेता’ अशी उपाधी देतात. रसिक त्याला कसलीच उपाधी देत नाहीत; फक्त मनात त्याची आठवण काढतात, त्याची गीतं पुन्हा पुन्हा ऐकतात आणि तृप्त होतात..’ एकूण पुस्तकात शैलेंद्रची मोजकीच छायाचित्रं आहेत. मात्र शैलेंद्रनं हिंदी चित्रपटांसाठी लिहिलेल्या गीतांची तपशिलासह सूची आहे. ती अभ्यासकांना आणि रसिकांना नक्कीच महत्त्वाची आहे. त्यानंतरचा शैलेंद्रचा संक्षिप्त परिचय त्याची उत्तुंग कामगिरी सांगणारा आहे.

एकंदरीत हिंदी चित्रपट संगीताच्या सुवर्णकाळाच्या या शिल्पकाराचं हे गीतमय जीवन-चरित्र त्याच्या गाण्यांइतकंच संस्मरणीय झालं आहे. विजय पाडळकरांच्या अनुभवसिद्ध, अभ्यासपूर्ण, ओघवत्या लेखनशैलीमुळे त्यांच्याइतकाच शैलेंद्रच्या गाण्यांचा ‘आस्वाद’ आपणही घेत राहतो!

‘सुहाना सफर और.. : कवी शैलेंद्र यांचा गीतमय जीवनप्रवास’- विजय पाडळकर,

रोहन प्रकाशन,

पृष्ठे – २७०, मूल्य – ३०० रुपये