ज्येष्ठ अभिनेत्री रत्ना पाठक-शाह यांना बालपणी घरातच उदारमतवादाचा वारसा लाभला. त्यातून त्यांची घडण होत गेली. पुढे कलाक्षेत्रात आल्यावर त्यांचे विचार अधिक परिपक्व होत गेले. कला, तिची अभिव्यक्ती, सामाजिक-राजकीय वास्तव, सद्य:स्थिती.. या साऱ्यावरचं त्यांचं हे मुक्त चिंतन.. ‘लोकसत्ता गप्पा’च्या मंचावरचं!

१९७५-७६ सालची गोष्ट असेल. मी तेव्हा नुकतीच नाटय़क्षेत्रात धडपड करू लागले होते. पं. सत्यदेव दुबेंसोबत काम करत होते. त्यांचे ‘आधे अधूरे’चे प्रयोग चालले होते. त्यात एका मुलीची भूमिका करणारी अभिनेत्री काही कारणांनी प्रयोगाला येणार नव्हती. मी त्या पात्राच्या वयात परफेक्ट बसत होते. म्हणून मग तिच्या बदली मला ती भूमिका करायला सांगितलं गेलं. तालमीसाठी हातात वेळ खूपच कमी होता. दोन दिवसांत मला अमरीश पुरी यांच्याबरोबर तालीम करायला सांगितलं गेलं. अमरीश पुरींबरोबर अख्खा दिवस तालीम चालली. अखंड दिवसभर त्यांचा तो वरच्या पट्टीतला आवाज ऐकून तालमीतून बाहेर पडल्यावर ट्रॅफिकचाही आवाज मला ऐकू येईना. पण त्या दोन दिवसांत त्यांच्याबरोबर मी जी नाटकाची तयारी केली.. आणि ज्या पद्धतीने त्यांनी माझ्या मागे लागून त्या भूमिकेची तयारी करवून घेतली, त्यावेळी मला पहिल्यांदाच जाणीव झाली, की ज्या क्षेत्रात मी काम करू इच्छिते, ते क्षेत्र किती मेहनतीचं आहे. इथे मस्ती करून चालणार नाही. खरं तर हे मी आधीही अनुभवलं होतंच. कारण माझी आईही (दीना पाठक) अभिनेत्री होती. ती गुजराती नाटकांतून कामं करायची. त्यावेळची गुजराती नाटकं खूप भडक, मेलोड्रॉमॅटिक असत. माझ्या आईला तर बहुतेकदा अन्याय-अत्याचार सहन करण्याचं, रोनाधोन्याचंच काम असे. मी आईची नाटकं बघायला जात असे. दोन-तीन वेळा तर मला नाटक सुरू असताना जबरदस्तीनं बाहेर घेऊन जावं लागलं होतं. कारण मी ‘माझ्या आईला मारताहेत’ म्हणून तेव्हा गोंधळ घातला होता. नाटकात आईला सतत मारण्याचे प्रसंग असत. अशा पद्धतीची फार भयंकर मेलोड्रॅमॅटिक नाटकं असायची ती. ही नाटकं मला कधीच आवडली नाहीत. पण रंगमंचाच्या मागे बॅकस्टेजला जे वातावरण असायचं ते मला फार आवडायचं.

मी पुन्हा पुरीसाहेबांकडे येते.. कारण शिस्तीची गोष्ट त्यांच्यामुळेच मला कळली. ‘आधे अधूरे’चे प्रयोग सुरू होते. एक दिवस छबिलदासला साडेसातचा प्रयोग होता. म्हणून मी सहा वाजता छबिलदासला पोचले. मी वेळेत पोचलेय असं मला वाटत होतं. पण पुरीसाहेबांनी मला चांगलंच दटावलं. ‘साडेसातच्या प्रयोगाला तू आत्ता येतेयस? कुठून आलीस?’ त्यांनी विचारलं. आणि मी सहज सांगितलं, ‘दुपारचा चित्रपट बघून मी आलेय.’ हे ऐकताच पुरीसाहेब प्रचंड भडकले. ‘प्रयोगाच्या दिवशी चित्रपट बघतेस? नाटक ही एकाग्रतेनं करण्याची गोष्ट आहे. जाता जाता करण्याची गोष्ट नाही.’ खूप ओरडले ते मला. त्यावेळी मला वाईटही वाटलं आणि एकीकडे हसूही येत होतं.. की, काय हे छोटय़ा छोटय़ा गोष्टीवरून झिकझिक करताहेत. पण जसजसं मी नाटकांत काम करत गेले तसतसं हळूहळू मला नटाची शिस्त म्हणजे काय, ती का असणं गरजेचं आहे, हे मला कळत गेलं.

शिस्त दुसऱ्यांनी लादून उपयोगी नाही. प्रत्येकानं आपणच आपल्यात शिस्त बाणवणं आणि त्या पद्धतीनं वागणं आवश्यक आहे. हे खूप अवघड काम आहे. संयम पाळणं- मग तो कुठल्याही गोष्टीत असो- अवघडच असतं. आणि तुम्ही जर कलाकार असाल, फिल्म स्टार असाल तर ते जास्तच कठीण असतं. कारण तुमच्याकडून कसलीच अपेक्षा केली जात नाही. तुम्ही शूटिंगला आला आहात हेच उपकार आहेत असं मानलं जातं. मला आठवतंय, नासीरचे एक दिग्दर्शक शॉट लागला की स्वत: मेकअप रूममध्ये येऊन नासीरला सांगायचे की, ‘तुमचा शॉट तयार आहे. तुम्ही आरामात या.’ अरे, शॉट तयार आहे आणि तुम्ही आराम करा.. याला काय अर्थ आहे? तुम्ही इथे काम करायला आला आहात की आराम करण्यासाठी?

नटाची शिस्त म्हणजे काय, ती कशी असायला हवी, हे हळूहळू उमगत गेलं. आणि पहिल्यांदाच लक्षात आलं, की बाहेरची परिस्थिती कशीही असू दे.. तिचा विचार न करता तुमची शिस्त तुम्हालाच पाळावी लागते. त्यामुळे समस्या सोप्या होत नाहीत खऱ्या; परंतु रात्री मात्र सुखाची झोप लागते.

माझं अभिनयाशी असलेलं नातं गमतीशीर आहे. लहानपणी मी अभिनय क्षेत्रात जायचं नाही असंच ठरवलं होतं. कारण प्रत्येक जण शाळेत मला हेच चिडवायचा, की तुझी आई अभिनेत्री आहे म्हणजे तूही अभिनयच करणार. पण मी ठामपणे त्यांना नकार द्यायचे. मला अभिनेत्री व्हायचं नाहीए. मला हवाईसुंदरी व्हायचं आहे. मी मोठेपणी काहीही होईन, पण अभिनेत्री बिलकूल होणार नाही, हे पक्कं ठरवलं होतं. मात्र, मी नववीत असताना आमच्या शाळेनं पहिल्यांदाच अभिनय स्पर्धा ठेवली होती. मोनो अ‍ॅक्टिंगची स्पर्धा. खरं तर ते एक महान आश्चर्यच होतं. कारण आमच्या शाळेत मुलींना काय शिकवायचं हे ठरलेलं होतं. आम्हाला लाँड्री, कुकरी, शिवणकाम या सगळ्याचं रीतसर शिक्षण दिलं जायचं. पण नाटक? छे.. छे.. ते वाईट असतं. गाणी गायची परवानगी होती खरी; पण तेही ‘झंडा उँचा रहे हमारा..’ पद्धतीचं देशभक्तीपर वगैरेच. त्यामुळे ‘अशा’ वातावरणात कलाकार होण्याची इच्छा कुणाच्या मनात जागण्याची शक्यताच नव्हती.

तर.. ही जी मोनो अ‍ॅक्टिंगची स्पर्धा ठेवायची कल्पना न जाणो कोणा शिक्षिकेला सुचली.. पण- सुचली. त्यात मी झाशीच्या राणीचा मोनो अ‍ॅक्ट सादर केला. आईने माझी कसून तालीम करून घेतली होती. हा जो तालमीचा भाग होता तो मला खूप आवडला. आणि पहिल्यांदाच इतक्या लोकांसमोर मी जेव्हा स्टेजवर गेले तेव्हा मला अजिबातच भीती वाटली नाही. दुसरं म्हणजे तो मोनो अ‍ॅक्ट करताना मला एक वेगळीच मजा येत होती. एका दुसऱ्या व्यक्तीचा अनुभव मला या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवता येतो आहे ही भावना त्यावेळी खूप सुखावून गेली. माझ्या शिक्षकांनी माझं खूप कौतुक केलं. माझ्या मित्रमत्रिणींमध्ये माझा भाव वाढला. एका मत्रिणीच्या आईने तर मला घरी नेऊन ‘किती छान केलंस!’ म्हणत केकही खायला घातला. हे सगळं मला कुठंतरी आवडून गेलं. तेव्हा जाणवलं की मला हे सगळं आवडतंय. आणि मला हेच करायचं आहे. अर्थात, त्यानंतर अभिनयातही खूप मोठा प्रवास झाला. सुरुवातीला मी खूप वाईट अभिनयही केला. खूप गोंधळलेले होते मी त्या काळी.

‘एनएसडी’त (नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा) जाणं हा माझ्यासाठी संमिश्र अनुभव होता. तिथं थिएटरविषयी खूप काही समजून घेता आलं. परंतु थिथं अभिनयाविषयी मात्र शून्य ज्ञान मिळालं. उलट, अभिनयाबद्दलच्या चुकीच्याच गोष्टी मी तिथं शिकले. आणि त्या सुधारण्यासाठी एनएसडीतून बाहेर पडल्यावर मला दहा-बारा वर्ष तरी लागली. त्यावेळी (पं. सत्यदेव) दुबेजींचा हात डोक्यावर पडला आणि त्यांनी समजावून सांगितल्यावर अभिनयासंबंधीच्या अनेक गोष्टी माझ्या लक्षात यायला लागल्या.

नासीरने मला कलाकार म्हणून घडविण्यात खूप मदत केली. तो तेव्हा थिएटर वर्कशॉप्स घेत असे. मी त्यात सहभागी झाले. त्या कार्यशाळांचा मला खूप फायदा झाला. आणि २००१ मध्ये जेव्हा आम्ही ‘इस्मत आपा के नाम’ हे नाटक केलं तेव्हा मला खऱ्या अर्थाने जाणीव झाली की मी चांगला अभिनय करू शकते. म्हणजे बघा- मी १९७५ पासून छोटी-मोठी कामं करत होते, परंतु कलाकार म्हणून मला साक्षात्कार व्हायला तब्बल २००१ साल उजाडावं लागलं. खरं तर इतका वेळ लागता कामा नये. पण अनेकदा काही गोष्टींना- विशेषत: सर्जनशील माध्यमांमध्ये तेवढा वेळ द्यावा लागतोच. आजच्या तरुण पिढीसमोर हे मोठंच आव्हान असणार आहे. त्यांना एकीकडे आपण नेमकं काय करायचंय हे ठरवण्यासाठी वेळ द्यावा लागणार आहे; परंतु हे जग त्यांना तेवढा वेळ देऊ शकणार नाही. या द्वंद्वातून त्यांचा त्यांनाच मार्ग काढावा लागणार आहे.

नाटकातून परिवर्तन शक्य..

नाटकात संहिता महत्त्वाची असते. कारण लेखक काही ना काही साहित्यिक, वैचारिक महत्त्वाकांक्षा समोर ठेवूनच नाटक लिहीत असतो. प्रेक्षकांनाही हे माहीत असतं की समोर रंगमंचावर जे चाललेलं आहे ते ‘नाटक’ आहे. ते सत्य नाहीए. तो सत्याचा आभास आहे. आणि तरीही नाटककाराला जे पोहोचवायचं आहे त्याची अनुभूती प्रेक्षकांना त्या क्षणी होत असते. त्या जाणिवा त्यांच्यापर्यंत पोहोचतात. आणि म्हणूनच नाटकातून परिवर्तन होणं शक्य आहे असं मला वाटतं.

राग वळवता आला पाहिजे..

रागाशिवाय नट होणं कठीण आहे. पूर्वी नाटक आवडलं नाही की प्रेक्षक टोमॅटो फेकून मारायचे. आताचे प्रेक्षक मोबाइलवर खेळत बसतात. पण मग ते पूर्वीचे प्रेक्षकच खरे होते असं म्हणायला हवं. कारण ते तुमचं ऐकत तरी होते. म्हणूनच नाटक नाही आवडलं तर ते सरळ टॉमेटो फेकून मारत. मात्र आता नाटक पाहताना मोबाइलवर चॅट करणारा माणूस आधीच नाटकापासून तुटलेला असतो. तुम्हाला नाटक पाहायचेच नसेल तर मग तुम्ही येताच कशाला?

माणसानं.. कलाकारानं राग दाखवायलाच हवा. पण तो कशा पद्धतीने दाखवायचा याचाही नीट विचार झाला पाहिजे. राग ओरडूनही दाखवता येतो.. जो आपण मोर्चामध्ये घोषणा देताना ओरडून दाखवत असतो. मात्र, दुसऱ्यांवर ओरडून आपला राग लोकांपर्यंत पोहोचत नाही. उलट, तो अडथळाच ठरतो. इस्मत चुगताई यांच्या मनात स्त्रियांना ज्या पद्धतीने वागवलं जात होतं त्याबद्दल कमालीचा राग होता. तो त्यांनी त्यांच्या कथांमधून खूप चांगल्या पद्धतीने व्यक्त केला. जे चुकीचं वाटतं त्याबद्दल इस्मत ज्या पद्धतीने बोलते ते मला जास्त जवळचं वाटतं.

कलाकाराचं शस्त्र..

असंख्य लोकांना भेटून, व्याख्यानं ऐकून, वाचन करून, संगीत ऐकून, कलाप्रदर्शनं पाहून अशा वेगवेगळ्या माध्यमांतून कलाकाराला विशिष्ट व्यक्तिरेखा कशी साकारायची याबद्दलची माहिती मिळत असते. अर्थात सगळ्यात जास्त मदत मिळते ती पुस्तकं वाचून. कारण कलाकार झाले तरी माझ्याकडे एकच आयुष्य आहे. या एकाच आयुष्यात मी अनेक वेगवेगळी आयुष्यं प्रत्यक्ष जगून बघू शकत नाही. अशावेळी माझी कल्पनाशक्ती माझ्या मदतीला येते. माझ्या कल्पनाशक्तीला कोण अडवणार? मला एका नाटकात ‘माया साराभाई’च्या नजरेतून जग बघायचं होतं, तर दुसरीकडे ‘अँटिगनी’च्या नजरेतून जग पाहायचं होतं. यासाठी त्या- त्या व्यक्तिरेखेकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता, त्यासाठीचा तुमचा अभ्यास व संशोधन हे महत्त्वाचं ठरतं. मात्र कधी कधी तुम्ही त्याकरता जे संशोधन करता, त्यातही फसगत होऊ शकते. याबद्दलचा एक किस्सा आठवतो. आम्ही एनएसडीत असताना टॉलस्टॉयचं ‘पॉवर ऑफ डार्कनेस’ हे नाटक हिंदीत करत होतो. त्यात आम्हाला शेतकऱ्यांची पात्रं वठवायची होती. एनएसडीत देशभरातून वेगवेगळ्या प्रांतांतून आलेले विद्यार्थी होते. पण अधिककरून शहरी विद्यार्थी होते. त्यावेळी शेतकऱ्यांचा एक मोर्चा दिल्लीत आलेला होता. तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं की, तुम्ही या शेतकऱ्यांचं निरीक्षण करा आणि भूमिका करा. आता त्या नाटकाचा व्हिडिओ उपलब्ध होत नाही. काही छायाचित्रं तेवढी आहेत. परंतु आता ते सगळं आठवलं तरी शरमेनं मान खाली जाते. किती वाईट अभिनय केला होता आम्ही!

तुम्ही असं पाच-दहा मिनिटांत एखाद्याचं निरीक्षण करून ते अभिनयात उतरवूच शकत नाही. त्यासाठी तुम्हाला मुळात ते आतून जाणवलं पाहिजे. आणि त्यासाठी आयुष्यभर कलाकाराने आजूबाजूच्या गोष्टींचं सतत निरीक्षण करत राहिलं पाहिजे.

कलाकाराचं त्याच्या आवाजावर, देहबोलीवर नियंत्रण असलं पाहिजे. आवाजातली, शरीरातली लवचिकता त्यानं आत्मसात केली पाहिजे. कारण कलाकार त्याच्या संपूर्ण शरीरासह रंगमंचावर वावरत असतो. तुमचा आवाज नाटक पाहायला आलेल्या शेवटच्या माणसापर्यंत तितक्याच प्रभावीपणे पोहोचला पाहिजे. तुमचा नाजूक स्वर तसंच तीव्र स्वर दोन्ही प्रेक्षकांपर्यंत योग्य तऱ्हेनं पोहोचले पाहिजेत. अभिनयातली लवचिकता जशी महत्त्वाची, तसंच एका विवक्षित क्षणी रंगमंचावर स्थिर, ठाम उभं राहता येणंही तितकंच आवश्यक आहे. नटाचं शरीर आणि आवाजावरचं नियंत्रण, त्यातली लवचिकता, चेहऱ्यावरचे हावभाव आणि त्याला तडका मिळतो तो सौंदर्यातून.. तुमच्या सादरीकरणातून जेव्हा प्रेक्षकांच्या मनात खळबळ माजते, त्या क्षणात सौंदर्य दडलेलं असतं. आपण सारे त्या एका क्षणासाठीच तर धडपडत असतो.

सेन्स ऑफ ह्य़ुमर..

माझ्याकडे सेन्स ऑफ ह्य़ुमर आहे असं मला कधी वाटलंच नव्हतं. पण ह्य़ुमरनेच मला आजवर वाचवलंय. मला तर आईने ड्रिमी रोलसाठी तयार केलं होतं. पण ते तसे मिळणं शक्यच नव्हतं. त्यावेळी काही अभिनेत्रींनी स्ट्राँग कॅरेक्टर्स निवडून ती करायला सुरुवात केली होती. मला वाटलं, मीही हे करू शकते. त्यादृष्टीनं चाचपणी करायला मी लागले होतेच. परंतु एनएसडीत प्रशिक्षण घेऊनही मला काम मिळत नव्हतं. खूप काळाने मला आनंद महेंद्रूंच्या ‘इधर उधर’मध्ये काम मिळालं. यात पहिल्यांदाच मला काहीतरी गमतीशीर करायची संधी मिळाली होती. आनंद महेंद्रू मला विचारायला आला होता. त्यात दोन भूमिका होत्या. एक सुंदर, हुशार सेक्रेटरीची आणि दुसरी- बावळटपणे वागणाऱ्या हवाईसुंदरीची. ‘तू आणि सुप्रिया या भूमिका करा,’ असं त्याने सांगितलं. तेव्हा मला ती हुशार सेक्रेटरीच करायला लागणार आणि सगळी मजा सुप्रियाकडे जाणार असं वाटलं होतं. पण आश्चर्य म्हणजे त्या हवाईसुंदरीची भूमिका आनंदने मला करायला सांगितली. मीही खूश होऊन होकार दिला. पण तेव्हा मला विनोदी भूमिकेत काय करावं लागतं याची सुतराम कल्पना नव्हती. त्यापूर्वी चुटुरपुटुर विनोदी भूमिका मी रंगभूमीवर केल्याही होत्या; परंतु विनोदाचं अचूक टायिमग, संवादफेक या गोष्टी मला फारशा माहिती नव्हत्या. मात्र मी सतीश शहाबरोबर ‘फिल्मी चक्कर’ केलं तेव्हा सतीशकडून मला विनोदी अभिनयाविषयी खूप काही शिकायला मिळालं. परिस्थितीतून विनोद कसा निर्माण करायचा याचं तंत्र त्याला चांगलंच अवगत होतं. ते मला त्याच्याकडून शिकायला मिळालं. आणि मी तर म्हणते की, विनोदानंच मला वाचवलं.. नाहीतर मी सतत खूप कंटाळवाण्या, गंभीर भूमिका करणारी अभिनेत्रीच झाले असते. विनोदाने माझा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलला. स्त्रियांनी तर विनोदावर अधिकच जोर दिला पाहिजे असं मला वाटतं. कारण स्त्रियांना प्रत्येक गोष्ट ही लढून, झगडूनच मिळवावी लागते. आपलं आयुष्य आधीच कष्टदायी आहे, त्याला विनोदाची जोड दिली तरच ते जगणं सोपं होईल.

उदारमतवादवादी विचार..

माझं बालपण मोकळ्या, खुल्या वातावरणात गेलं. माझे वडील बिझनेसमन होते. आर. एस. एस.च्या विचारसरणीकडे झुकलेले होते. त्यांचे मित्रही बहुतेक तसेच. तर माझ्या आईकडची मंडळी पक्की कम्युनिस्ट. डाव्या विचारसरणीची. काही तर कार्डधारकही. त्यामुळे आमच्या घरात नेहमी सामाजिक-राजकीय विषयांवर चर्चा, वादविवाद होत असत. सगळे अगदी हमरीतुमरीवरही येत. परंतु ती चर्चा कधी हाणामारीपर्यंत जात नसे. परस्परांचे विचार पटले नाही तरी ते ऐकून घेतले जात.  आपलाच विचार योग्य आहे, तोच दुसऱ्याने स्वीकारायला हवा असलं वातावरण आमच्या घरात आजही नाही. तुझं अधिक बरोबर असेलही कदाचित; पण माझंही चुकीचं नाही, अशाच तऱ्हेने आमच्या घरात संवाद होतो. कोणीही अगदी सहजपणे माझं म्हणणं मान्य केलेलं मला आवडत नाही. याचा अर्थ समोरची व्यक्ती त्या विचाराबरोबर झगडत नाहीए असंच मला वाटतं. आपण कोणाचंही म्हणणं कसं काय सहजपणे मान्य करतो? कोणतीही कल्पना असेल, विचार असेल, त्यावर विभिन्न मतं ही असायलाच हवीत. वेगवेगळ्या विचारांतूनच प्रगतीचा मार्ग जातो. अन्यथा सगळंच एकरंगी होईल. हा.. आता ही वेगवेगळी मतं एका सूत्रात कशी बांधायची, हे मात्र कौशल्याचं काम आहे. आणि ते अनुभवांतून हळूहळू विकसित करता येतं.

हा अनुभव मी एका वेगळ्या कामातून घेतला आहे.. घेते आहे. मी एक उपक्रम राबवतेय गेली काही वर्ष. ‘अवेही अबॅकस प्रोजेक्ट’ या संस्थेबरोबर मी काम करते. आम्ही मुलांना शिकवण्या/शिकण्यासाठीच्या वेगळ्या पद्धती विकसित करतो आहोत. यात अबॅकसचा उल्लेख असला तरी आम्ही त्यातून गणित शिकवत नाही. पण अबॅकस हे खूप साधं साधन आहे, ज्याच्या मदतीने खूप गुंतागुंतीची गणितं सोडवली जातात. तसंच अबॅकसचा वापर करून समाजातील मोठय़ा प्रश्नांचा कशा पद्धतीने मुलांना विचार करता येईल, यासाठी आम्ही प्रयत्न करतो. आपल्या आजूबाजूचे वास्तव काय आणि कसे आहे हे मुलांना समजावून देण्यासाठी आम्ही त्याचा वापर करतो. शाळांमध्ये अनेक विषयांची माहिती विखुरलेली अशी दिली जाते. शिवाय शाळांमधून जे शिकवलं जातं त्याचा बाहेरच्या परिस्थितीशी काही संबंध नसतो. बाहेर जे चाललं आहे ते बाहेर राहू दे आणि आम्ही शाळेत जे शिकवतो आहोत ते तुम्ही पाठ करा आणि उत्तीर्ण व्हा, अशी आत्ताची शिक्षण व्यवस्था आहे. यातून मार्ग काढण्यासाठी आम्ही जे साधन वापरतो आहोत ते शांता गांधी यांनी १९५० मध्ये तयार केलं होतं आणि त्या काळी गुजरातमधील भरूच येथे आदिवासी शाळांमध्ये मुलांना या साधनांच्या मदतीने त्या शिकवत असत. आदिवासी मुलांना शहरी अभ्यासक्रम शिकवून उपयोग नसतो. त्यांना त्यातलं काहीच कळत नाही. कारण ते त्यांना माहीतच नसतं. तर त्या काळी त्यांनी या शैक्षणिक साधनांचा वापर केला होता. आता आम्ही १९९० पासून काही महापालिका शाळांमधून या साधनांच्या माध्यमातून शिकवतो आहोत. आम्ही या साधनांचे सहा संच केले आहेत. ज्यात शिक्षकांसाठीही साहित्य आहे. तुम्ही जर मेकॉलेची शिक्षणव्यवस्था अभ्यासली तर तुमच्या लक्षात येईल की त्याकाळी मुलांच्या शिक्षणासाठी एक अभ्यासपद्धती विकसित करण्यात आली होती. तेव्हा बिहारमधील जमीनदारांनी त्याविरोधात उठाव केला होता. त्यांचं म्हणणं होतं की, तुम्ही या मुलांना शिक्षण दिलंत तर आमच्या घरची कामं कोण करणार? हा जो सरंजामी दृष्टिकोन होता शिक्षणाबद्दलचा- तोच आजही आहे. फक्त तो कोणी बोलून दाखवीत नाही, तर थेट अंमलातच आणला जातो. प्राथमिक शिक्षणाचा तर आपण खेळखंडोबाच केलेला आहे. आणि आता माध्यमिक शिक्षणाच्या मागे लागलो आहोत. आपल्या मुलांनी अशिक्षित, अडाणी राहावं अशीच आजची शिक्षणव्यवस्था आहे.

आणि असे जर आपण वागत असू, तर स्वत:ला आपण सभ्य समाज कसे काय म्हणवून घेऊ शकतो?

‘भूमिका’ घेणं..

कलाकारांनी सामाजिक-राजकीय मुद्दय़ांवर भूमिका घ्यावी का? खरं तर चांगले चित्रपट बनवणं हे त्यांचं पहिलं काम आहे. तेही त्यांना धडपणे येत नाही. ‘पॅरासाईट’ चित्रपटातील अभिनेत्याने ऑस्कर पुरस्कार स्वीकारताना केलेल्या भाषणात म्हटलं होतं की, कोरिअन प्रेक्षकांनी आमच्याकडून सातत्याने चांगल्या चित्रपटांची मागणी केली, त्यांचे आभार मानले पाहिजेत. आपण का नाही हे करू शकत? २००६ साली आम्ही ‘साराभाई वस्रेस साराभाई’ मालिकेचा शेवटचा भाग केला. आज १४ वषेर्ं लोटली. रामही वनवासातून परतले होते चौदा वर्षांनी. परंतु त्यानंतरच्या काळात आपल्याकडे एकही चांगली, चमकदार कल्पना मालिकांतून विकसित झालेली दिसत नाही. त्या काळात एकाच वेळी अनेक चांगल्या मालिका निर्माण झाल्या. परंतु त्या मंडळींनाही पुन्हा तसंच नवं काही सादर करता आलं नाही. एक कल्पना क्लिक् झाली की ती तशीच छापत राहायचं, ही आपली वृत्ती झालीय.

मुलं-मुली भेद

मुलामुलींमध्ये आजही घरात भेदभाव केला जातो. याचा परिणाम दोघांवरही होणारच. मुलांनी कोणाला थोबाडीत मारली तर आपण त्याचं कौतुक करतो. मुलीला मात्र असं वागू नकोस, असं बोलू नकोस असं सांगतो. आपण मुलांना अशा पद्धतीने वागायला शिकवतो. दोन गोष्टी आपण बदलल्या पाहिजेत. आपल्या घरातील जाणत्या, बुजुर्ग व्यक्तींना सगळं काही समजतं, हे एक आणि दुसरं म्हणजे आपली मुलं मूर्ख आहेत, ही दुसरी समजूत. या दोन्ही गोष्टी खऱ्या नाहीत. आपण आपल्या मुलांना उत्तम ‘माणूस’ म्हणून घडवलं पाहिजे. येणारा काळ खूप कठीण आहे. पती-पत्नी दोघांनाही एकमेकांना समजून घेत, काम करतच पुढे जावं लागणार आहे. त्यासाठी पुरुष हा फक्त बाहेरची कामं करणार, हा स्त्रियांचा विचार बदलला पाहिजे. आणि स्त्री ही फक्त मुलं जन्माला घालण्यासाठी आहे, ही पुरुषांची धारणा बदलायला हवी. यापलीकडे जात आपण ‘माणूस’ म्हणून पुढे आलं पाहिजे. आज घराघरात खळबळ माजली आहे. आई-वडील मुलांना सांगतात ‘तू अमूक भानगडीत पडू नकोस.’ मुलांना विनाकारण काही त्रास होईल, ही पालकांची त्यामागची भीती असते. जी खरीही आहे. त्याचवेळी मुलं विचारतात की, ‘आम्ही का पडू नये यात? हा आमच्या भविष्याचा प्रश्न आहे.’ त्यांचा राग आणि त्यांची भविष्याची चिंताही तितकीच खरी आहे. आई-वडील म्हणून त्यांना आपण हे वर्तमान दिलं आहे. हे सगळं बदलावंच लागणार आहे. ते कसं बदलायचं याची मला कल्पना नाही. पण आपण सगळ्यांनी एकत्र येऊन याचा विचार करायलाच हवा.

देशभरात सध्या जे अस्थिरतेचे वातावरण आहे त्यात तरुणांची ऊर्जा विनाकारण खर्ची पडते आहे. त्यातही माझ्या वयाची पिढी हा देश चालवते आहे. आम्ही आमच्या मुलांच्या भविष्याचा विचार न करता अनेक गोष्टी करत गेलो. त्यामुळे आता तुम्ही तरुणांनीच तुमचा नवीन काहीतरी विचार करायला हवा. तुम्ही आमची मदत घ्या, पण विचार तुमचे असू देत. स्वातंत्र्यपूर्व काळातही अनेकजण असे होते की जे म्हणत होते- ‘इंग्रजांनीच आपला देश उभा केला आहे आणि तुम्ही त्यांनाच बाहेर काढणार?’ पण तरीही काही माथेफिरू होते जे म्हणाले, ‘चूक-बरोबर कसाही असेल, पण आम्ही आमचा देश चालवू.’ आणि त्यांनी गेली सत्तर वर्ष हा देश चालवला आहे. याच्या उलट आपल्यावर जे राज्य करत होते त्यांचं काय झालं? तेही आज दु:खात आहेत.. जसे आपण आहोत. या सगळ्या परिस्थितीत मला एकच आशा वाटते. ती म्हणजे आपल्या देशात इतके सुशिक्षित तरुण याआधी कधीच नव्हते. आज त्यांचा आवाज ऐकला जातो आहे. त्याला वेळ लागेल कदाचित.. पण तो आवाज ऐकू येणार आहे. चित्रपट-नाटकांमधून तो हळूहळू ऐकू येऊ लागला आहे. डॉक्युमेंटरीत तर तो आधीपासूनच ऐकू येत होता. त्यामुळे बुद्धिवंताना मार्ग नक्की सापडणार आहे. फक्त तो चटकन सापडेल अशी अपेक्षा करू नका.

ज्यावेळी मी तरुण होते, एनर्जेटिक होते त्यावेळी मला कोणी काम दिलं नाही. मला कोणी नाटकासाठी विचारलं नाही की चित्रपटांसाठी विचारलं नाही. दुबे वगळता कोणी मला नाटकातून काम दिलं नाही. माझ्याच घरात त्याकाळी नव्या समांतर धारेतील  चित्रपटांच्या चर्चा व्हायच्या. कारण नासीर तेव्हा त्या चित्रपटांतून काम करत होता. त्यावेळी असा एकही चित्रपट नव्हता, ज्यात नासीर किंवा ओम पुरी नसे. तेव्हा माझ्याच घरी जमून, माझीच कॉफी पित, खाणं खात ‘अरे, कोणी अभिनेत्रीच मिळत नाहीए रे..’ अशा चर्चा त्यांच्यात व्हायच्या. मग मी कोण होते? मी मोलकरीण बनून राहिले आहे का? मी अभिनेत्री नाही का? असं माझ्या मनात यायचं. पण या उपेक्षेचा फायदा मला असा झाला की मला स्वत:ला प्रशिक्षित करायला पुरेसा वेळ मिळाला. खरं तर त्यावेळी मला अभिनयातलं काही येत नव्हतं फारसं.. मी फक्त कोणीतरी आपल्याला काम देईल, ही आशा लावून बसले होते. यादरम्यान मला स्वत:वर मेहनत घ्यायला वेळ मिळाला आणि मला ‘इधर उधर’सारखी मालिका मिळाली. त्यावेळी काय माहौल होता टेलीव्हिजनचा तो! आम्ही ‘इधर उधर’ करत होतो, त्याचवेळी ‘बुनियाद’ बनत होती, ‘हमलोग’ बनत होती. त्यानंतर ‘उडान’ आली. ‘माऊथफुल ऑफ स्काय..’ ‘तारा’ आली. तरुण माणसं तरुण आशयावर मालिका बनवत होती. त्या वातावरणात मला काम करता आलं, स्वत:ला घडवता आलं. दुर्दैवाने, आज तसा माहौल नाही.

आपली नेते मंडळीसरकारी खर्चाने कितीतरी गोष्टींचे फायदे घेत असतात. पण आपण त्यांना कधी विचारतो का, की बाबा.. तुम्ही एवढे गलेलठ्ठ पगार आणि भत्ते घेता ना, मग आणखी या सवलती कशासाठी? आपल्याला मात्र त्यांनी जरा कशात काही सूट दिली की लगेचच मोठमोठी होìडग्ज् लावून त्याची जाहिरातबाजी केली जाते. तुम्हाला (जनतेला) अमूक सूट दिली.. सिलेंडर कमी किमतीत दिले.. वगैरे वगैरे.

शब्दांकन : रेश्मा राईकवार