22 July 2019

News Flash

लोकधर्मी साहित्यिक

ज्येष्ठ हिंदी साहित्यिक आणि विचक्षण समीक्षक  नामवर सिंह यांचे नुकतेच निधन झाले.

|| चंद्रकांत पाटील

ज्येष्ठ हिंदी साहित्यिक आणि विचक्षण समीक्षक  नामवर सिंह यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या साहित्यिक कर्तृत्वाचा धांडोळा घेणारा लेख..

एका साधारण खेडय़ात जन्मून हिंदी साहित्याच्या विशाल क्षेत्रात सात दशकं अधिराज्य गाजवणाऱ्या नामवर सिंह यांचं १९ फेब्रुवारीला दिल्लीच्या इस्पितळात देहावसान झालं. त्यानिमित्तानं त्यांच्यावर भरभरून लिहून आलं. त्यांच्या विरोधकांनाही समीक्षेच्या क्षेत्रातलं त्यांचं कर्तृत्व मान्य करावं लागलं. आचार्य रामचंद्र शुक्ल, आचार्य हजारीप्रसाद द्विवेदी, डॉ. रामविलास शर्मा यांच्या परंपरेतले ते एक लोकप्रिय समीक्षक होते. या सर्वानी संस्कृतच्या गहन अध्ययनानं आणि त्याच्या जोडीला पाश्चात्त्य समीक्षेच्या सूक्ष्म अध्ययनानं आपली दृष्टी विकसित केली आणि हिंदी समीक्षेला संपन्न केलं. नामवरजींचं वाचन अफाट आणि अद्ययावत होतं. त्यांनी आयुष्यभर साहित्याचा लोकधर्मी भूमिकेतून आणि मुळापासून विचार केला. साहित्याचं खास भारतीय समाजशास्त्र मांडलं. कुशाग्र बुद्धिमत्ता, अफाट कुतूहल, हुकमी स्मरणशक्ती, बोलण्या-लिहिण्यात भाषेचा अचूक वापर, तर्काधिष्ठित मांडणी, कायम विरोधापासून सुरुवात आणि वादविवादात झोकून देण्याची उपजत वृत्ती ही त्यांची वैशिष्टय़े होती. ते उत्तम समीक्षक होते. उत्तम संशोधक होते. उत्तम प्राध्यापक होते. उत्तम भाषा वैज्ञानिक होते. उत्तम संपादक होते. ते उत्तम सिद्धान्त-मीमांसक होते आणि प्रभावी वक्तेही होते. त्यांच्या ठायी सहृदयता, सहिष्णुता, संयम, सौजन्य आणि साधेपणा होता. त्यांच्यात अस्सल देशीपणा होता. बनारसी पान ही त्यांच्या देशीपणाची खूण होती. पानाला ते ‘गंगामय्या का प्रसाद’ म्हणत.

नामवर सिंहांचा जन्म २८ जुल १९२६ ला बनारस जिल्ह्यतल्या जियनपूर नावाच्या एका लहानशा खेडय़ात झाला. शिक्षण जन्मगावी आणि जवळच्या गावात झालं. महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते बनारसला आले. तिथून बी. ए., एम. ए. झाले. पीएच. डी. केली. पुढे बनारस विद्यापीठातच ते प्राध्यापक झाले. कम्युनिस्ट पक्षात सक्रिय झाल्यामुळे त्यांची ही नोकरी गेली. कम्युनिस्ट पक्षाच्या तिकिटावर त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवली, पण त्यात अपयश आलं. नंतर डॉ. नंददुलारे वाजपेयींनी सागर विद्यापीठात त्यांना बोलावून घेतलं. वाजपेयींच्याच समीक्षेवर घणाघाती हल्ला केल्यामुळे तीही नोकरी गेली. पुढे ते जोधपूर विद्यापीठात गेले आणि पुन्हा तिथेही तोच प्रकार. पुढे ते आग्य्राला गेले. पण लवकरच तीही नोकरी गेली. त्यानंतरची काही र्वष त्यांनी हलाखीत काढली. नंतरच्या काळात त्यांनी पत्रकारिता केली. स्तंभलेखन केलं. यादरम्यान त्यांनी स्वत:ला सखोल वाचन व अभ्यासात तसंच चिंतनात झोकून दिलं. याच काळात त्यांच्या समीक्षालेखनाचा पाया घातला गेला. त्यांनी समीक्षेची भाषा बदलून हिंदी समीक्षेला नव्या वळणावर नेऊन ठेवण्याचं महत्त्वाचं कार्य केलं. लोकप्रिय प्रभावी वक्ता म्हणून त्यांची कीर्ती चौफेर वाढत गेली. कालांतरानं ते दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठात प्राध्यापक झाले आणि त्यांना भाषा विभागाचं अध्यक्षपदही मिळालं. इथं त्यांचं आयुष्य स्थिर झालं. इथं त्यांनी एकाहून एक सरस विद्यार्थी घडवले. हिंदीचा क्रांतिकारी नवीन अभ्यासक्रम तयार केला. आणि हिंदी विभागाला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा मिळवून दिली. कुठल्याही पदवीपेक्षा नामवरजींचा विद्यार्थी असणं प्रतिष्ठेचं मानलं जाऊ लागलं. याच काळात त्यांच्याकडे ‘आलोचना’ या वाङ्मयीन नियतकालिकाच्या संपादनाचीही जबाबदारी आली. त्यात त्यांनी अनेक नव्या समीक्षकांना घडवलं आणि एकूणच समीक्षाव्यवहारात चतन्य निर्माण केलं.

नामवर सिंह शालेय दशेपासूनच कविता करत असत. शिवाय कवितेचं प्रभावी सादरीकरणही ते करीत. इंटरच्या परीक्षेत एकाच प्रश्नाचं वेळ संपेपर्यंत उत्तर लिहिल्यामुळे ते नापास झाले होते. नंतर मात्र ते कायम पहिल्या वर्गात पहिले येत गेले आणि अत्यंत बुद्धिमान विद्यार्थी म्हणून त्यांची ख्याती सर्वदूर पसरली. विद्यापीठात शिकत असताना त्यांच्यावर त्यांचे गुरू आचार्य हजारीप्रसाद द्विवेदी यांचा खोल परिणाम झाला. हजारीबाबूंबद्दल त्यांना प्रचंड आदर आणि अभिमान होता. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली नामवरजींनी ‘हिंदी के विकास में अपभ्रंश का योगदान’ हा मोलाचा प्रबंध लिहिला. भाषाविज्ञानातल्या या मूलभूत संशोधनामुळे एक महत्त्वाचे भाषा वैज्ञानिक म्हणून त्यांना मान्यता मिळाली. मात्र, पुढे त्यांनी या क्षेत्रात काम न करता साहित्य समीक्षालेखनात विशेष रस घेतला आणि आयुष्यभर ते त्यातच रमले. निव्वळ पूर्वसुरींचा अमूर्त समीक्षाविचार ग्रा न मानता नव्या गृहितकांसाठी आणि नव्या सिद्धांतासाठी त्यांनी निरंतर प्रयत्न केले. ते कायमच साहित्यकृतीकडून समीक्षेकडे जात आणि अनेक प्रश्नांचा तर्काधिष्ठित उलगडा करण्याचा प्रयत्न करीत असत. कलाकृतीची समीक्षा करताना त्यांना संवेदना आणि बौद्धिकता यांचा परस्परसंबंध महत्त्वाचा वाटत असे. त्यामुळे त्यांची समीक्षा कधीच रूक्ष झाली नाही.

नामवरजींना ऐन तारुण्यातली बरीच र्वष बेकारीत आणि हलाखीत काढावी लागली. याच काळात दिल्लीत येऊन त्यांनी आपल्या वाचनाचा आणि चिंतनाचा परीघ वाढवला आणि एका झपाटलेल्या अवस्थेत लेखन केलं. त्यांनी लिहिलेली ‘छायावाद’, ‘कविता के नये प्रतिमान’ आणि ‘दुसरी परंपरा की खोज’ ही समीक्षापर पुस्तकं समीक्षेच्या क्षेत्रात मानदंड मानली जातात. एखाद्या उन्मनी अवस्थेत केलेलं सर्जन जसं असतं तशी ही पुस्तकं लिहून झाली आहेत. ‘छायावाद’ हे पुस्तक त्यांनी दहा दिवसांत लिहिलं. ‘कविता के नये प्रतिमान’ २१ दिवसांत, तर ‘दुसरी परंपरा की खोज’ दहा दिवसांत लिहिलं गेलं आहे. मात्र, यानंतरची त्यांची सर्व पुस्तकं (‘इतिहास और आलोचना’, ‘कहानी : नयी कहानी’, ‘ वाद-विवाद-संवाद’ इत्यादी) त्यांनी वेळोवेळी लिहिलेल्या निबंधांचे किंवा दिलेल्या व्याख्यानांचे संग्रह आहेत.

‘छायावाद’ हे विसाव्या  शतकाच्या दुसऱ्या-तिसऱ्या दशकांत निर्माण झालेलं हिंदी कवितेचं महत्त्वपूर्ण आंदोलन आहे. जयशंकर प्रसाद, सुमित्रानंदन पंत, महादेवी वर्मा आणि सूर्यकांत त्रिपाठी निराला हे यातले प्रमुख कवी होत. या कवींनी ब्रज भाषेतील कवितेविरुद्ध बंड करून खडीबोलीत कविता लिहिल्या. या कवितांचं स्वरूप स्वच्छंदतावादी आणि रहस्यवादी होतं. नामवर सिंह यांनी छायावादी कवितेनं आधीच्या रूढीपासून कवितेला मुक्त केलं आणि राष्ट्रीय नवजागरणाचं काम केलं, असं मत मांडून ‘कलेच्या स्वातंत्र्या’चा आधुनिक विचार पहिल्यांदाच मांडला. नामवरजींच्या समीक्षा- लेखनाची प्रेरणा आंतोनिओ ग्रामशी, वॉल्टर बेंजामिन, अडोर्नो इत्यादींच्या विचारांत होती. मात्र, हे करीत असताना त्यांनी भारतीय समाजाचा व भारतीय मानसाचा खोलवर विचार केलेला होता. नामवरजी जेव्हा ग्रामशी, ल्युसीए गोल्डमन, रेमंड विलियम्स, बेंजामिन इत्यादींच्या समीक्षा-विचारांवर वर्गात व्याख्यान देत असत तेव्हा त्यांच्या व्याख्यानातली सुस्पष्टता, अतिशय सोपी, सहज भाषा आणि शिस्तबद्ध मांडणी दीर्घकाळ विसरता येत नसे. ते स्वत:ला ‘वाचिक परंपरे’चे पाईक समजत असत. ज्या समाजात सुमारे पन्नास टक्के लोक निरक्षर आहेत तिथं ‘वाचिक’ म्हणजे मौखिक परंपराच स्वाभाविक व सयुक्तिक आहे असा त्यांचा दावा होता. व्याख्यानांच्या बाबतीत त्यांच्यासारखा मर्मग्राही व प्रभावी वक्ता इतर भाषांत अपवादानंच आढळेल. वादविवादाशिवाय संवादाला अर्थच नाही अशी त्यांची ठाम समजूत होती. त्यांच्या मते, ‘वह संवाद क्या जिस में वादविवाद न हो.’

नामवर सिंहांचं सगळं लेखन वादविवादाच्या पायावरच उभारलेलं आहे. भीष्म साहनींच्या मते, नामवरजी एक वेळ कामधंद्याशिवाय, घरादाराशिवाय, बायकोपोरांशिवाय दीर्घकाळ राहू शकतील, पण शत्रूशिवाय राहूच शकत नाहीत. शत्रू निर्माण करण्याच्या कलेत ते अतिशय पारंगत आहेत. ‘कविता के नये प्रतिमान’मध्ये त्यांनी डॉ. नगेंद्र यांना धारेवर धरलं, तर ‘दूसरी परंपरा की खोज’ या पुस्तकात आचार्य रामचंद्र शुक्ल यांना लक्ष्य करून त्यांच्याविरोधात आपले गुरू हजारीबाबूंचं मोठेपण विशद केलं. समाजशास्त्रीय समीक्षेमुळे त्यांनी तुलसीदासांच्या तुलनेत कबीराची श्रेष्ठता स्पष्ट केली. ‘कविता के नये प्रतिमान’मध्ये अज्ञेयांच्या विरोधात गजानन माधव मुक्तिबोधांना आधुनिक कवितेचं केंद्र केलं.

नामवरजींची बांधिलकी साम्यवादी विचारधारेशी  होती. ते प्रगतिशील लेखक संघाचे दीर्घकाळ अध्यक्ष होते. मात्र, केवळ प्रगतिशील व साम्यवादी विषयवस्तूवर अवलंबून राहून त्यांनी कधीच समीक्षा लिहिली नाही, तर ते विषयवस्तू, रूपबंध, संरचना, भाषाशैली, शिल्प, काळ, इतिहास, सामाजिक परिवेश अशा अनेक घटनांचा सम्यक विचार करून साहित्यकृतीची श्रेष्ठता-कनिष्ठता ठरवीत असत. त्यामुळे बऱ्याचदा त्यांचे भक्त त्यांच्यावर रुष्ट होत असत. आपला धाकटा भाऊ काशिनाथ सिंह आणि ज्ञानरंजन यांच्या कथांच्या तुलनेत त्यांनी साम्यवादविरोधी निर्मल वर्मा यांची कथा श्रेष्ठ ठरवली. त्यांच्या मते, हिंदीतील पहिली आधुनिक कथा निर्मल वर्मा यांची ‘परींदे’ ही आहे. काशिनाथ सिंह यांचे व्याही दूधनाथ सिंह यांच्या कथेतील उणिवाही त्यांनी आडपडदा न ठेवता जाहीरपणे मांडल्या. आपला आवडता कथाकार उदय प्रकाश हे ‘पव्‍‌र्हशन’च्या अवस्थेतून जात असल्याचं सांगायलाही ते कचरत नाहीत.

नामवरजी  कुशल आणि सूक्ष्म दृष्टी असलेले संपादक होते. आधी ‘जनयुग’ आणि नंतर दीर्घकाळपर्यंत ‘आलोचना’चं यशस्वी संपादन करून त्यांनी अनेक नव्या लोकांना प्रकाशात आणलं. निर्मल वर्मा, अमरकांत, शेखर जोशी, उषा प्रियंवदा, ज्ञानरंजन, धूमिल, लीलाधर जगूडी, मंगलेश डबराल, अरुण कमल, उदय प्रकाश, अलका सरावगी अशा अनेकांच्या साहित्यकृतींवर पहिल्यांदा समीक्षा लिहून त्यांनी त्यांच्याकडे वाचकांचं आणि समीक्षकांचंही लक्ष वेधलं. त्यांची शक्तिस्थानं आणि मर्यादांविषयीही परखडपणे लिहिलं. विष्णू खरेंनी त्यांच्यावर जबर टीका केली, तरीही त्यांनी विष्णू खरेंच्या महाभारतावरील कवितांची मुक्तकंठाने प्रशंसा केली होती.

नामवरजींना सगळ्या भारतीय भाषांमध्ये काय चाललं आहे याची अद्ययावत माहिती असे. मराठीत तर त्यांना विशेष रस होता. मराठीतले गं. बा. सरदार, दि. के. बेडेकर, अशोक केळकर यांच्याविषयी त्यांना आस्था होती. अशोक केळकर आणि ते काही काळ आग्य्राला सहकारीही होते. गो. पु. देशपांडे यांचे तर ते जवळचे सहकारी, मित्र आणि साम्यवादी सहप्रवासी होते. तरीही गो. पुं.च्या नाटकाचा (हिंदी) प्रयोग बघून ते म्हणाले, ‘बात कुछ बनी नहीं. इस में विचार है, लेकिन नाटक गायब है.’ भालचंद्र नेमाडेंवर त्यांचं विशेष प्रेम होतं. नेमाडेंच्या ‘हिंदू’च्या हिंदी अनुवादाच्या प्रकाशनासाठी प्रूफ रीिडगपासून ते छोटय़ा-मोठय़ा भाषिक सुधारणांपर्यंत त्यांनी विशेष कष्ट घेतले होते. पण नेमाडेंच्या देशीयतेच्या सिद्धांताबद्दल ते बरेच साशंक होते. पॉप्युलर प्रकाशनानं प्रकाशित केलेल्या धनंजय कीरलिखित डॉ. आंबेडकर चरित्राच्या हिंदी अनुवादाला त्यांनी अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहिली होती. नागपूर इथं २००७ मध्ये भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते उद्घाटक होते. विंदा करंदीकर आणि भालचंद्र नेमाडे यांच्या  ज्ञानपीठ पुरस्कारांत त्यांचं योगदान मोलाचं होतं.

नामवरजींना अनेक महत्त्वाचे राष्ट्रीय पुरस्कार मिळाले होते. साहित्य अकादमी पुरस्कार, कुवेम्पू पुरस्कार, शलाका सन्मान, भारत भारती सन्मान हे त्यातले काही ठळक पुरस्कार. त्यांनी देशातल्या सगळ्या महत्त्वाच्या साहित्यिक संस्थांमध्ये महत्त्वाची पदं भूषविली होती. वध्र्याच्या महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाचे ते कुलपतीही होते. राजा राममोहन रॉय फाऊंडेशनचेही ते अध्यक्ष होते. भारतातल्या बहुतेक सर्व विद्यापीठांमधून त्यांनी व्याख्यानं दिली होती. आणि परदेशातही अनेकदा व्याख्यानांनिमित्त त्यांनी प्रवास केला. अफाट लोकप्रियतेबरोबरच त्यांना प्रचंड टीकाही सहन करावी लागली. ‘ते आपल्या भूमिका सोयीनुसार बदलतात, आधी दलित आणि स्त्रीसाहित्य-मीमांसेच्या विरोधात भूमिका घेऊन नंतर आपली मतं बदलली, सतत सत्तेच्या जवळ राहिले, ते ‘अवसरवादी’ आहेत,’ असंही त्यांच्याबद्दल उघड उघड बोललं गेलं. अखेरीस तर त्यांच्या आयुष्याचा प्रवास ‘लालकडून भगव्याकडे’ झाल्याचं बोललं गेलं.

असं असूनही एक प्रतिभाशाली समीक्षक म्हणून त्यांना नाकारता येणं केवळ अशक्य आहे.

patilcn43@gmail.com

First Published on March 3, 2019 12:10 am

Web Title: loksatta lokrang marathi article 3