22 July 2019

News Flash

राणी/ लक्ष्मी/ बाई?

टपालकी

|| सॅबी परेरा

प्रिय मित्र दादू,

आम्ही तुमच्या पत्राचं जरासं कौतुक काय केलं तर तुम्ही म्हणता की, आम्हाला हरभऱ्याच्या झाडावर चढवू नका, पाय रोवून जमिनीवरच उभं राहू द्या. अरे यार, खरंच मनापासून कौतुक करतोय रे. उगाच कुणाला (हरभऱ्याच्या झाडावर का होईना!) वर चढायला मदत करून मी स्वत:च्या मराठीपणाला बट्टा का लावून घेईन? आणि हे बघ, जमिनीवर पाय रोवून उभं राहायची चन तुम्हा धोतरवाल्या गावकऱ्यांनाच परवडू शकते. आम्ही शहरी लोकांनी जमिनीवर पाय रोवून उभं राहायचं ठरवलं तर आमचे शॉर्ट्स आणि ट्राऊझर्स घालायचे वांधे व्हायचे! हा हा हा!  ही ‘चला हवा येऊ द्या’ लेव्हलची गंमत रे ! लेका, मीही तुझ्यासारखाच- ज्याला इंग्रजीत ‘डाऊन टू अर्थ’ म्हणतात- असा आपल्या औकातीत राहणारा आहे. इतका औकातीत राहणारा, की समजा, उद्या मला करोड, दोन करोडची लॉटरी लागली तर मी टॉप क्लास बीएमडब्ल्यू कार विकत घेऊन त्याला सीएनजी किट लावून घेईन. थोडक्यात काय, तर हाडाचा मध्यमवर्गीय माणूस स्वप्न पाहतानाही वास्तवाचा हात सोडत नाही.

मित्रा, तू म्हणशील की, हा मुंबईकर सदू पक्का बनेल आहे. आपण पाठवलेल्या पत्रातील मुद्दय़ांविषयी बोलायचे सोडून स्वत:च्याच सीरियलचे एपिसोड पाणी घालून वाढवत बसतो. यार, खरं सांगू, पत्रात तू गावाकडील नदीपल्याडच्या लावणीच्या फडाचा उल्लेख केला आणि मी फ्लॅशबॅकमध्ये गेलो. माझी कित्येक वर्षांची तमाशा पाहायची इच्छा पुन्हा जागृत झाली. म्हणजे तसा मी एकदा इथे गिरगावच्या साहित्य संघात एक तमाशा पाहिला होता. पण आमचा नानू म्हणाला, हा शहरातल्या थेटरातला तमाशा म्हणजे बॉयलर कोंबडीवानी पचपचीत! आस्सल गावठी कोंबडीवानी झणझणीत तमाशा अन् लावणी पाहायची आसंल तर माझ्यासंगट आमच्या गावाला चल. पण दुर्दैवाने त्यानंतरच्या आठवडय़ाभरातच शरीरातील दारूत रक्ताचं प्रमाण कमी झाल्यामुळे नानू गचकला. असं म्हणतात की, नानूच्या श्राद्धाच्या वेळी कावळा पिंडाला शिवत नव्हता तेव्हा गावातल्या सागर-कुशल-भाऊ या त्रिकुटाने साडय़ा नेसून एक झकास लावणीचा परफॉर्मन्स दिला, तेव्हा कुठे कावळा पिंडाला शिवला. असो.

खरं सांगू दादू, पत्रामध्ये तू आपल्या बायकोच्या नावाने रडगाणे गाऊन माझा खांदा ओला केलास, ते बाकी आपल्याला आवडलं नाही. अरे, असं आपल्या बायकोविषयी दुसऱ्याकडे कागाळी करणं पुरुषाला शोभत नाही. अशाने आपला तर काही फायदा होत नाहीच, उलट त्या दुसऱ्याला उगाचच्या उगाच बरं वाटतं. अरे, बायका सगळ्या सारख्याच! त्या जेव्हा डिप्रेस होतात तेव्हा एकतर शॉपिंगला तरी जातात किंवा काहीतरी खातात. आणि खायला बाकी काहीच नाही मिळालं तर नवऱ्याचं डोकं त्यांच्या हक्काचं असतंच.

आता तुला काय वाटतं, मला माझ्या बायकोपासून काय कमी त्रास आहे? पण मी कधी हे उघडपणे कुणापाशी बोलतो का? मागे एकदा काय झालं, मेकअप्बिकअप् करून झाल्यावर तिने मला ‘मी कशी दिसते?’ म्हणून विचारलं. (तुला माहीतच आहे, बायकोच्या कौतुकाव्यतिरिक्त मी आयुष्यात कधी खोटं बोलत नाही.) मी तोंडाने जरी ‘छान’ म्हटलं तरी मला नक्की काय म्हणायचं होतं ते तिने माझ्या चेहऱ्यावरून ताडलं आणि अशी काही माझी खरडपट्टी निघाली, की यंव रे यंव. खरं म्हणजे तिने मला झोडलंच असतं, पण नेलपॉलिश सुकेपर्यंत तिचा बिचारीचा नाइलाज होता.

आता हेच बघ ना, आधीच अल्पसंख्य असलेले माझ्या डोक्यावरचे केस सफेद होत चाललेत. निदान ते काळे तरी करून घ्या, असं बायको सतत म्हणत असते. मी ‘नया हिंदुस्थान’चा नागरिक असल्यामुळे मला अल्पसंख्याकांचं लांगुलचालन आवडत नाही. आणि त्यात मी आळश्यांचा जेम्स बॉण्ड असल्यामुळे ‘डाय अनदर डे’ म्हणत हे आजचं काम उद्यावर ढकलत असतो. बायको सारखी पिरपिर करीत असते, पण आपण फारसं मनावर घेत नाही. तूही इतकी वष्रे संसार करतोयस. त्यामुळे तुला माहीत असेलच. तरीही एक सिक्रेट सांगतो- जेव्हा केव्हा आपली चूक असेल तेव्हा ती लगेच मान्य करायची आणि जेव्हा आपली काहीच चूक नसेल तेव्हा चूप राहायचं.. एवढय़ा एका मंत्रावर आमचा संसार इतकी वष्रे सुखाने चालला आहे. फक्त एक प्रश्न नितीनभौ गडकरींच्या घशात अडकलेल्या ‘अच्छे दिन’च्या हड्डीसारखा माझ्या घशात अडकलाय, तो म्हणजे- बायकोने स्वत:वर केलेल्या विनोदाला हसावे की हसू नये!

सांगायचा मुद्दा एवढाच, की आपल्या बायकोविषयी दुसऱ्याकडे कागाळी करणं बरं नव्हे. एक लक्षात घे की- कधी त्रागा करून ती ‘तुमच्यासोबत माझ्या आयुष्यातली महत्त्वाची वष्रे सडली..’ असं म्हणत असली आणि आपणही माज करून शत-प्रतिशत नवरेशाहीचे फुत्कार टाकीत असलो तरी काळजाच्या कोपऱ्यात कुठेतरी युती केल्याशिवाय आपल्या संसाराला तरणोपाय नाही याची जाणीव दोघांनाही असतेच की! पुन्हा.. असो.

दादू, मार्च उगवलाय. महिलादिन जवळ आलाय आणि आपण इथे बायकांची उणीदुणी काढत काय बसलोय. मित्रा, मागील काही वष्रे महिला दिनाचा जो उदोउदो चाललाय तो पाहून आमचा नरुभाऊ एकदा म्हणाला, ‘‘साला, आम्ही पुरुषांनी काय घोडं मारलंय? पसे कमावण्यासाठी आम्ही रात्रंदिवस मेहनत करतो, बायकांचे नखरे सहन करतो, तिचं म्हणणं पटो- न पटो.. आम्ही मुंडी हलवतो, बायकोने मुलांसमोर केलेला अपमान मुकाटय़ाने गिळतो, पत्नीव्रता असण्याचा.. निदान तसं दिसण्याचा प्रयत्न करतो, बायको जेव्हा टीव्हीवर ‘तुला पाहते रे’मध्ये कोवळ्या इशाचा थोराड सरंजामेबरोबर रोमान्स पाहत असते तेव्हा आपण पुतीन, पुलवामा, सेन्सेक्स अशी टेन्शन वाहत असतो, देशविदेशातल्या निवडणुकांचे टेन्शन, दुसऱ्या टाइम झोनमध्ये होणाऱ्या क्रिकेट, फुटबॉल सामन्याचं टेन्शन.. अरे, आपल्याला किती कॉम्प्रोमाइज करायला लागतं. कपडय़ांमध्ये व्हरायटी नाही, चपला-बुटांमध्ये फार चॉइस नाही, अंगात १०४ ताप असला तरी बसमध्ये कुणी उठून सीट देत नाही. साला, त्या देवाने आपल्याला रंगांधळं बनवलंय. आणि बायका आपल्याला कपाटातून मोरपिशी, राणी, चटणी, रामा ग्रीन अशा अतरंगी रंगाची साडी शोधायला लावतात. अरे, आपण कुठे लग्नाला किंवा मॉलमध्ये गेलो आणि आपल्या शर्टसारखाच शर्ट घातलेला कुणी दिसला तर कुंभमेळ्यात हरवलेल्या भावासारखी त्याला जाऊन मिठी मारतो आणि त्याच्याबरोबर सेल्फी घेतो. याउलट, बायकांना दुसरी कुणी त्यांच्यासारखी इयरिरग घातलेली जरी दिसली, तरी त्या जन्माच्या वैरिणी असल्यासारख्या एकमेकींच्या वाऱ्यालाही उभ्या राहत नाहीत. आपण इतके चांगले, गरीब, बिचारे, बापडे असताना महिलांचा दिवस आहे; मग आपला का नाही?’ मी त्याला म्हटलं, ‘नरुभाऊ, तसं पाहिलं तर १९ नोव्हेंबरला जागतिक पुरुष दिन असतो, पण पुरुषांची अवस्था इतकी शोचनीय झालेली आहे की नेमका त्याच दिवशी जागतिक शौचालय दिनही असतो.

दादू, मार्च सुरू झाला की सोशल मीडियावर महिला दिनाचे मेसेज दुथडी भरून वाहायला सुरुवात होते. पण मला सांग, हे मेसेज पाठवणाऱ्यांपकी किती लोक आपल्या घरच्या कामवालीला महिला दिनाची सुट्टी देतात? महिला दिन काय फक्त आपल्या बायकोचाच असतो का? गरीब कामगार बायकांचा नसतो? महिला दिनानिमित्त मध्यम आणि उच्चवर्गीय स्त्रिया एखाद्या राणीसारखे मनसोक्त मिरवून घेतात. समाजही या दिवशी त्यांना देवी लक्ष्मीचा अवतार म्हणून मखरात बसवतो. आणि मग वर्षांचे उरलेले ३६४ दिवस कामवाल्या बाईसारखा राबवून घेतो. महिलादिनी नारीशक्तीची नारेबाजी करायची आणि एरवी त्यांना ‘आयटम, माल, पत्रा’ संबोधायचं, हे सारं आपल्या राष्ट्रीय दांभिकपणाला साजेसंच आहे. पुन्हा एकदा.. असो.

महिला दिनानिमित्ताने झाशीसाठी लढणाऱ्या लक्ष्मीबाईपासून आणीबाणी लादणाऱ्या इंदिराबाईपर्यंत, पहिली भारतीय महिला डॉक्टर होण्याचा मान मिळविणाऱ्या आनंदीबाई जोशींपासून ‘ध’चा ‘मा’ करणाऱ्या आनंदीबाईपर्यंत, मुलींना शिकवण्यासाठी हाल सोसणाऱ्या सावित्रीबाईंपासून गांधीजींच्या छायाचित्राला गोळ्या घालणाऱ्या पूजा पांडेपर्यंत सर्वाचे स्मरण करून तुझ्या-माझ्या आई, बहीण, बायको, मुलीपासून ते पुरुषी अत्याचाराला बळी पडलेल्या निर्भयापर्यंत आपल्या जीवनावर बरा-वाईट प्रभाव पाडणाऱ्या तमाम महिलांना महिला दिनाच्या शुभेच्छा!

तुझा मित्र..

सदू धांदरफळे

sabypereira@gmail.com

First Published on March 3, 2019 12:09 am

Web Title: loksatta lokrang marathi article 4