22 July 2019

News Flash

सोलो!

विशी.. तिशी.. चाळिशी..

|| डॉ. आशुतोष जावडेकर

तेजस आणि त्याचा दहा वर्षांचा मुलगा निवांत रविवारी घरच्या सोफ्यावर बसून ‘कोको’ नावाचा सिनेमा पाहत होते. सोबत रेळेकाकाही होते. कारण त्यांच्या अमेरिकेतल्या नातवालाही तो पिक्चर आवडला होता म्हणे! मेक्सिकोमधली ती सुंदर कहाणी! मिगेल नावाच्या पोराची गिटार शिकण्याची ऊर्मी आणि त्या ध्यासात योगायोगाने मृत्युलोकात पडलेलं त्याचं पाऊल! तिथे त्याला भेटलेले त्याचे सगळे मृत नातलग! आणि मग फँटसीमधला प्रवास. तेजसचा मुलगा जाम रंगला होता सिनेमात. नेहमीच्या चाळिशीच्या चतुराईने तेजस एकीकडे सिनेमा, एकीकडे रेळेकाकांशी गप्पा आणि एकीकडे अरिनने ‘विशी-तिशी-चाळीशी’ ग्रुपवर टाकलेले बालीमधले फोटो बघणं हे लीलया करत होता. अरिनचे फोटो बघताना तो रेळेकाकांना म्हणाला, ‘‘च्यायला! ही पोरं एकटी एकटी काय प्रवास करतात! सोलो ट्रॅव्हल म्हणे! म्हणजे सारखं बायका-मुलांसोबत कुणाही पुरुषाला बोअरच होतं फिरणं! पण एकटं? निदान मित्रांसोबत जायचं!’’ रेळेकाका हसून म्हणाले, ‘‘फिरतोय हे मोलाचं!’’ आणि सिनेमा बघत राहिले. एकाग्रपणे. मग तेजसला आठवली- अरिन बालीला निघण्याआधीची चर्चा. अरिन कॉफी ढोसताना म्हणलेला : माझ्या पॉकेट मनीमधून दोन वर्षांत मी पसे साठवलेत. मी बॅगपॅकर बनून एकटा ट्रिप करणार बालीला. तेजस लगेच म्हणाला, ‘‘कुणाला तरी सोबत घेऊन जा. एकटा जाऊ नकोस. आणि बोअर नाही का होणार तू?’’ माही तेजसला म्हणाली, ‘‘अरे तेजस, सोलो ट्रॅव्हल ही फॅशनच आहे सध्या विशीतल्या या पोरांची.’’ अरिन शेवटी उत्तरला, ‘‘तेजसदा, बोअर होणार की नाही, हे मी आत्ता कसं सांगू! मी कुठे कधी सोलो फिरलोय! ‘लेट्स डू इट’ एवढंच मी मला सांगितलंय.’’

परवा तो विमानतळावर पोचला तोपर्यंत तेजसचे ग्रुपवर चार काळजीचे मेसेजेस पडलेले : विमानतळावर पोचल्या पोचल्या मेसेज कर. अनोळखी माणसाकडून फॉरीन एक्स्चेंज करू नको. समुद्रात खोल जाऊ नको. तिथे उकाडा असेल तर पाणी पीत राहा. रात्री उबुडच्या युथ हॉस्टेलवर नव्याने भेटलेल्या न्यूझीलंडच्या एका पोरासोबत गार बिअर पितानाचा सेल्फी पाठवून अरिनने लिहिलं, ‘‘पितोय रे तू म्हणालास म्हणून.’’ आणि मग एक स्माइली माहीने ग्रुपवर टाकलेली. पण तेजस उखडण्याआधी अरिनने त्याला पर्सनल मेसेज करत लिहिलं, ‘‘गंमत सोड. तू असं काळजीने लिहिलेलं वाचून मला मस्तच वाटलं. त्या विमानतळाबाहेर आल्यावर सगळी ‘गुगल-तयारी’ असूनही एकदम मला लॉस्ट झाल्याचं फीलिंग आलेलं. पण तुझे मेसेज वाचून म्हटलं, ‘दा मागे आहे! लेट्स डू इट!’ ’’

‘‘बाबा, अरे, हे गाणं बघ तर..’’ तेजसला मधेच मुलाने ढोसलं तसं त्याने ‘कोको’मधलं गाणं बघितलं. मस्त होतं. मिगेलची गिटार-ओढ आणि एका दिवसात वरदान न मिळाल्यास मिगेलही मृत्युलोकात कायमचा राहण्याचं नवं भय! गाण्यानंतर पुन्हा फिरून तेजस बाली-फोटो बघू लागला. उबुडच्या मार्केटमध्ये फिरणारा अरिन. त्याला जेवताना भेटलेली जर्मन मुलगी. तिथल्या राजवाडय़ात संध्याकाळी झालेलं बालीतलं पारंपरिक नृत्य. महाभारतातल्या सुंद-उपसुंदाच्या कहाणीवर आधारलेल्या त्या नृत्याची शेजारी बसलेल्या अमेरिकन मुलीने अरिनसाठी केलेली फोड. आणि मग तो वरमून गार झालेला असतानाचा सेल्फी. कचकचीत बांध्याचे शर्टाविना फिरणारे ते तरुण. ‘सवयच नाही यार भर रस्त्यात असं आपल्याला चालायची!’ असं उद्गारत, हळहळत सॅन्डोवर फिरणारा अरिन. मग माहीसाठी त्याने तिथल्या बाजारात घेतलेली चित्रे. टेकडीवरून पाहिलेल्या सूर्यास्ताचा फोटो. ‘आत्ता मात्र खरंच टेरिफिक एकटं एकटं  वाटतंय.’ अशी कबुली ग्रुपवर देणारा अरिनचा तेव्हाचा मेसेज. तेजसला वाटलं, आपण फिरलो असतो असे कधी? विशीत? तिशीत? बाली सोडाच, पसे नव्हतेच; पण नांदेडहून सहस्रकुंडला तरी कधी एकटे गेलेलो का आपण? आत्ता जाऊ? ऑफिसच्या कामाला परदेशात जातानाही सोबत ओळखीचा कलीग टीममधला असेल याचीही आपण काळजी घेतो. आणि वार्षकि उन्हाळी किंवा दिवाळी ट्रिप होते ती घरच्यांसोबत! हनिमूनलाही आपण ट्रॅव्हल एजन्सीसोबत हनिमून पॅकेज घेऊन गेलेलो यार!! आपण नाही एकटे फिरू शकत. सिनेमा संपला तोवर. मुलगा व्हीडिओ गेम खेळायला निघून गेला. रेळेकाका एकूण नूर ओळखून म्हणाले, ‘‘झुम्पा लाहिरीचं ‘नेमसेक’ हे पुस्तक आत्ताच वाचलं म्हणून त्यातलं आवडलेलं एक वाक्य सांगतो. झुम्पाने लिहिलंय, Pack a pillow and a blanket. वळकटी गुंडाळून सगळं जग बघा. त्याचा कधी तुम्हाला पश्चात्ताप होणार नाही! डल्ली One day it will be too late! तेजसने गुगलवर इमेज शोधून ते वाक्य माहीला पाठवलं. माहीचा फोनच आला लगेच! तेजस वाजणाऱ्या फोनकडे बघत स्वत:शीच पुटपुटला- ‘मुली!! मुली या अशाच असतात! थेट फोन!!’ मग फोनवर माही मुद्दय़ावर येत म्हणाली, ‘‘तेजस, मलाही करायचाय रे एकटय़ाने एकदा प्रवास.’’ तेजस म्हणाला, ‘‘कर की! तुला पॉकेट मनीचीही गरज नाहीये. तू कमावतेस!’’ माही सुस्कारा सोडत म्हणाली, ‘‘सिप आणि एफडीमध्येच पगार जातो माझा. पण ते करेन मी मॅनेज! खर्च करायचे वेळच्या वेळी! मेन पॉइंट हा आहे की, अरिन कुठेही रस्त्याकडेला मोकळं व्हायला जाऊ शकतो. त्याचे घरचे ‘तू मुलगा असून एकटा कसा निघालास फिरायला?’ असं म्हणत नाहीत. तो मुंबईच्या विमानतळावर एकटा आहे म्हणून दहा बायका त्याला हेरत, निरखत बसत नाहीत. त्याला पीरियड येण्याची कटकट प्रवासात नाही. आणि टेक्निकली तरी त्याच्यावर रेप होण्याची त्याला भीती नाही! हे सगळं एकटी मुलगी प्रवासाला निघाली की होतं. आज मला खरंच जाणवलं, की मुलगी असणं खरंच बेक्कार आहे. म्हणजे फिरतात बायका एकेकटय़ाही; पण सर्रास नाही. आपल्या इथल्या तर नाहीतच.’’

तेजसने दुसऱ्या दिवशी हे सगळं जेव्हा त्याच्या बायकोला सांगितलं तेव्हा ती म्हणाली, ‘‘मी माहीला ट्रीट देणार आहे. परफेक्ट आहे ती.’’ आणि मग तेजस पुन्हा फोनवर डोकावला. अरिनचा मेसेज ग्रुपवर पडला होता : ‘‘डिअर दा आणि डिअर माही, शांत बसून हे लिहितोय. गेले तीन दिवस धमाल करतोय. फिरतोय. नवं बघतोय. कोण कोण तात्पुरतं ओळखीचं होतं तेव्हा गप्पा मारतोय. परवा त्या जर्मन पोरीसोबत लांब चक्करही मारली. पण मुळात एकटा आहे. आणि धमाल येते आहे. मस्त वाटतंय. खरं सांगतो, मी मिस नाही करत आहे कुणाला! आज मी बटुंग पर्वतावर ट्रेकला गेलेलो. तिथे जाम गर्दी होती. पण मी एकटा होतो. भारतीयही कुणी दिसले नाहीत. शांतपणे पहाटेआधीच्या अंधारात मी चढत होतो. दमलो शेवटी. पहाट फुटली तेव्हा झपाझप वर चढत अखेर ज्वालामुखीच्या तोंडाशी आलो. हा अ‍ॅक्टिव्ह व्होल्कॅनो आहे. नुकताच २००० साली फुटलाय. त्या खड्ड्यात बघताना वाटलं, आत्ताही एकदम लाव्हारस येईल आणि मला घेऊन जाईल! पण मला भीती नाही वाटली! वाटायला हवी होती; पण नाही वाटली. तिथे मात्र मला सगळे आठवले! आई-बाबा, शाळेतले दोस्त, आजी आणि तुम्ही! चक, मॅन, दॅट सेन्स वॉज ऑसम!’’ तेजसला एकदम वाचताना जाणवलं की, आपली वळकटी बांधून निदान आपण दोन दिवस ताडोबाला तरी एकटं जायला पाहिजे! माहीला फोटो बघताना लक्षात आलं की, अनेक मुली एकेकटय़ा ट्रेकच्या रस्त्याला चढाई करत आहेत! Pack a pillow and a blanket. अनेक सुंदर फोटो सोबत होते. सूर्योदयाचा. अरिन अंधारात डोक्याला हेडलॅम्प लावून वाट काढतोय त्याचा. ट्रेकनंतर गरम पाण्याच्या कुंडामध्ये कुणा अनोळखी ऑस्ट्रेलियन कंपूसोबत गप्पा मारत अरिन विसावलाय- असाही.

अरिनचे फोटो रात्री लोळत बघताना तेजसला त्याचा मुलगा डोळ्यापुढे आला आणि त्यांनी मिळून पाहिलेला सिनेमाही आठवला. त्याला भासलं की तो, मिगेल व अरिन गिटार खांद्यावर टाकून त्या ज्वालामुखीच्या तोंडाशी निवांत गप्पा मारत बसले आहेत! प्रवास तर सुरू झालाच होता. चाळीस पूर्ण झालंच की! आता पुढचा प्रवास मस्त करायचा, हे खरं. पण आपल्या पोराचा प्रवास जास्त मोलाचा. आपल्यासारखा तो एकेरी नक्की नाही होऊ द्यायचा. त्या चित्रपटामधला मिगेल ज्या मृत्युलोकात असतो तिथेही आधी वेटिंग असतं! आणि मग समोर केशरी गर्द फुलांचा एक अतिसुंदर पूल असतो- जो आत्म्याला अंतिम विश्रामाचं निधान दाखवत असतो. त्या सुंदर पुलावरून अखेर एकटं एकटं ‘सोलो ट्रॅव्हल’ करत आपल्याला काही काळाने जायचं आहे! तेजसच्या अंगावर शहारा आला. पण मग क्षणभर थांबून निर्धाराने तो स्वत:शीच म्हणाला, ‘‘लेट्स डू इट! लेट्स डू इट!’’

ashudentist@gmail.com

First Published on March 3, 2019 12:08 am

Web Title: loksatta lokrang marathi article 5