16 October 2019

News Flash

बरवेंचा चित्रविचार

चित्रकारांच्या तीन पिढय़ांवर ज्यांच्या दृश्यविचारांचा प्रभाव आहे.

चित्रकारांच्या तीन पिढय़ांवर ज्यांच्या दृश्यविचारांचा प्रभाव आहे, त्या दिवंगत चित्रकार प्रभाकर बरवे यांच्या लेख, रोजनिशीतील नोंदी, टिपणे, पत्रे, कविता, रेखाटनांचा समावेश असलेल्या ‘चित्र-वस्तू विचार’ या पुस्तकास ज्येष्ठ कवी-समीक्षक वसंत आबाजी डहाके यांनी लिहिलेल्या प्रस्तावनेतील संपादित अंश..

प्रभाकर बरवे यांच्या ‘चित्र-वस्तू विचार’ या ग्रंथाचे स्वरूप त्यांच्या ‘कोरा कॅनव्हास’ (१९९०) या ग्रंथाहून निराळे आहे. ‘चित्र-वस्तू विचार’ या ग्रंथात बरवे यांचे लेख तर आहेतच, याशिवाय रोजनिशीतील नोंदी, टिपणे, पत्रे आहेत; आणखी एक विशेष म्हणजे बरवे यांच्या कविताही आहेत. ‘कोरा कॅनव्हास’प्रमाणे येथेही बरवे यांची अनेक रेखाटने आहेत. एक चित्रकार समजून घेण्याच्या दृष्टीने आणि त्या चित्रकाराचा चित्र-वस्तू विचार समजून घेण्याच्या दृष्टीने हा ग्रंथही ‘कोरा कॅनव्हास’इतकाच महत्त्वाचा आहे.

या ग्रंथातील सुरुवातीच्या‘कलाक्षेत्रातील आत्मवंचना’ या लेखात बरवे यांनी महाराष्ट्रातील लोकांच्या चित्रविषयक अभिरुचीविषयी खंत व्यक्त केली आहे. दृश्यकलेत आवश्यक असलेली सौंदर्यदृष्टी येथे अभावानेच आढळते, असे ते म्हणतात. ते वास्तवाला धरूनच आहे. साहित्य, नाटक, संगीत या कलांमध्ये महाराष्ट्रीय रसिक जेवढा रस घेतो, तेवढा तो चित्र-शिल्प या दृश्य कलांमध्ये रस घेत नाही. त्यामुळे चित्रकलाविषयक अभिरुची विकसित झाली नाही. चित्रकलेत आकार, रंग, अवकाश हे घटक महत्त्वाचे असतात याची त्यांना जाण नाही. त्यामुळे हुबेहूबपणा, श्लील-अश्लील, व्यक्तिचित्र-व्यंगचित्र यांना अवास्तव महत्त्व, नाटकाचे पडदे व नेपथ्य, जाहिरात-चित्रे हीच खरी कला असे विविध गोंधळ दृष्टीस पडतात. एकंदरीतच जागतिक चित्रकलेच्या वाटचालीविषयी हे लोक अनभिज्ञ आहेत. बरवे यांचे हे आक्षेप वस्तुस्थितीला धरूनच आहेत. आपले कलाकारही काळाच्या दृष्टीने मागे पडलेले आहेत, हाही बरवे यांचा आक्षेप आहे. जगातील कलाविश्वात ज्यांचे स्थान निर्विवाद टिकून राहील अशी दोनच नावे नोंदवावी असे बरवे यांना वाटते- एक चित्रकार वासुदेव गायतोंडे आणि दुसरे कवी अरुण कोलटकर! बरवे यांच्या या लेखातील विधानांत तथ्य आहेच; परंतु तरीही ती अव्याप्त/ अतिव्याप्त आहेत असे म्हणावेसे वाटते. मात्र, चित्ररसिकांच्या अभिरुचीविषयीचे त्यांचे म्हणणे बहुतांशी खरेच आहे याचा पडताळा आजही येतोच!

‘नवचित्रकला आणि सामाजिक बांधिलकी’ या लेखात बरवे यांनी चित्रकारांच्या सामाजिक वा तत्सम बाह्य़ बांधिलकीचा प्रश्न गौण मानला आहे. त्यांच्या मते, कलेचे विशुद्ध स्वरूप माणसाला अंतर्मुख बनवते, जीवनाकडे पाहण्याची वेगळी दृष्टी त्यामुळे प्राप्त होते. बरवे यांच्या मते, चित्रसर्जनाच्या विविध प्रक्रियांमध्ये चित्रकार गुंतलेला असताना त्याच्याकडून सामाजिक बांधिलकीच्या भानाची अपेक्षा करणे अन्यायकारक आहे. समजा, सामाजिक बांधिलकीशी एकनिष्ठ राहून चित्रे काढली तर ती ढोबळ, प्रचारकी थाटाची होतील. इतकेच नव्हे तर अशा चित्रातील संदेश समाजापर्यंत पोहोचून काही सामाजिक परिवर्तन घडून येण्याची शक्यताही नाही, असेही बरवे म्हणतात. अर्थात, येथे बरवे यांनी सामाजिक बांधिलकीचा अर्थ वरवरचा घेतलेला आहे. या बाबतीत बरवे यांचाही नाइलाजच म्हटला पाहिजे. कारण आपल्याकडे सामाजिक बांधिलकीचा अर्थ विशिष्ट विचारसरणीच्या अनुषंगाने प्रचारकी लेखन करणे असाच घेतला जात होता. तेथे कलामूल्ये गौण मानली जात होती. बरवे यांचे म्हणणे बरोबरच आहे, की चित्राचा विषय प्रबळ होऊन बाकी सर्व मूल्ये नष्ट होतील.

शब्दांमधून जसे विचार मांडता येतात तसे चित्रामधून मांडता येत नाहीत. चित्रकला हे माध्यम साहित्याहून पूर्णपणे भिन्न आहे. केवळ वैचारिक पातळीवरून चित्राचा बोध होऊ शकत नाही. चित्रकलेत आकार, रंग, अवकाश हे घटक महत्त्वाचे असतात. त्या अनुषंगाने चित्राचा आशय समजून घेतला पाहिजे. शब्द, भाषा, विचार यांच्याच आधारे चित्रार्थ समजून घेण्याच्या प्रयत्नात आशय निसटून जाऊ शकतो. पुढे याच लेखात बरवे यांनी एक महत्त्वाचा विचार मांडलेला आहे. सामाजिक किंवा अन्य कोणतीही बांधिलकी चित्रातून वा दृक्माध्यमातून व्यक्त करायची झाल्यास चित्रप्रदर्शनाचा सध्या अस्तित्वात असलेला ढाचा, रूढ चित्रफलक हे सारे काही बदलावे लागेल, असे ते सांगतात. त्याचप्रमाणे या कलाकृती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, तरच तत्त्वांचा अगर मूल्यांचा प्रसार होऊ शकेल. बरवे यांनी भित्तिचित्रे आणि वर्तमानपत्रे ही दोन माध्यमे सुचवली आहेत. आजच्या काळात विचारांची अभिव्यक्ती करण्यासाठी हॅपनिंग्ज आणि इन्स्टॉलेशन्स यांसारखी माध्यमे आलेली आहेत. त्यांना प्रतिसादही चांगला मिळत आहे. सामाजिक-राजकीय आशय व्यक्त करण्यासाठी मांडण-चित्र-शिल्पाचा मोठय़ा प्रमाणात उपयोग होऊ लागला आहे.

‘करमरकर, पॉल क्ली आणि निळा ढग’ या लेखात बरवे यांनी स्वत:च्या जडणघडणीसंबंधी लिहिले आहे. त्यातून त्यांचा चित्र-वस्तू विचारही व्यक्त झाला आहे. आर्ट स्कूलमधील यथार्थवादापासून बरवे दूर गेले, याचे कारण कलाकाराने मुळातल्यासारखी हुबेहूब प्रतिकृती घडवण्यात काय हशील, असे त्यांना वाटत होते. यथार्थवाद शैलीत प्रतिकृती घडवण्याचे कौशल्य कलेपेक्षा अधिक महत्त्वाचे मानले जात होते. बरवे यांच्या मते, नुसते कौशल्य म्हणजे कला नव्हे. वस्तूसंबंधीचे वा व्यक्तीसंबंधीचे चित्रकाराचे आकलन त्याच्या कलाकृतीत आविष्कृत व्हावे ही कलाकृतीची कला ठरण्यासाठी आवश्यक अट आहे. बरवे म्हणतात, कोठल्याही चित्रकलेमध्ये पहिला आणि मूळ घटक म्हणजे अवकाश. अवकाशाची जाण म्हणजे चित्रकलेची जाण. रंग व आकार यांच्यातील नाते, आकार व अवकाश यांच्यातील नाते- ही नाती चित्रकाराला जाणवतात. आणखी एक मुद्दा या लेखात बरवे यांनी मांडलेला आहे. ते म्हणतात, चित्रकलेचा आस्वाद घेताना, त्याच्याविषयी चर्चा करताना किंवा त्याचे विश्लेषण करताना साहित्यामधून निर्माण होणाऱ्या ज्या संकल्पना आहेत त्या जशाच्या तशा वापरता येणार नाहीत. या व्यवहाराला वेगळेच निकष लावावे लागतील. बरवे यांच्या मते, दृश्य-अदृश्याच्या परस्परसंबंधातून एक अनुभव निर्माण करणे व तो अनुभव आस्वादकांपर्यंत पोहोचवणे हा चित्रकलेचा मूळ हेतू आहे. त्यामुळे या परस्परसंबंधाच्या आधारेच त्या अनुभवाच्या पदरांचा शोध घेणे शक्य होईल.

बरवे यांच्या या विवेचनातील ‘साहित्यामधून निर्माण होणाऱ्या ज्या संकल्पना आहेत त्या जशाच्या तशा वापरता येणार नाहीत’ हे म्हणणे बरोबरच आहे. साहित्य आणि चित्रकला या दोन भिन्न कला आहेत, त्यांची माध्यमे वेगळी आहेत. चित्रकला ही दृश्यकला आहे, तर साहित्य ही मनोगम्य कला आहे. साहित्यात शब्दांच्या साहाय्याने दृश्याचे, प्रसंगाचे, व्यक्तींचे, वस्तूंचे वर्णन केले जाते. साहित्यातही प्रतिमा, प्रतीके असतात; ती शब्दांतूनच निर्माण होतात. डोळ्यांनी चित्र पाहणे आणि शब्द, वाक्ये वाचून मनात प्रसंग उभा होणे यांत निश्चितच फरक आहे. कथनात्मक, यथार्थवादी चित्रकृतीचे वर्णन करणे, अर्थ शब्दांत सांगणे शक्य होते; तसे अमूर्त चित्रकृतीबद्दल शक्य होत नाही. अमूर्त चित्र हा प्रतीतीचा विषय आहे. अवकाश, आकार, रंग यांच्यातून मानसिक बोध होतो; संवेदना, भावना, कल्पना यांचा उदय होतो. ते शब्दांत मांडणे कठीण असते. बरवे म्हणतात, चित्राचा आस्वाद घेणाऱ्याला प्रथम दृश्यानुभव समजावा लागतो; नंतर ज्ञानात्मक किंवा भावनात्मक अनुभव!

‘चित्र’ या लेखात बरवे यांनी आपला चित्रविचार सविस्तर मांडला आहे. त्यातील काही मुद्दय़ांचा परामर्श घेऊ. बरवे यांच्या चित्रचिंतनातला कळीचा मुद्दा येथे सुरुवातीलाच आलेला आहे. बरवे लिहितात, चित्राचा मूलभूत पाया म्हणजे दृश्य-अदृश्याचा खेळ. तो इतका गहन आहे, की त्यातून नित्य नव्या दृश्य शक्यतांचा उगम होत असतो. रेषा, बिंदू, चिन्ह यांतून उद्भवणारे आकार, त्या आकारांत सामावलेली सूचकता, अदृश्यता, अमूर्तता, त्याचप्रमाणे रंगलेपन, रंगच्छटा, रंगांचे शरीर- घन, तरल, विरल, पारदर्शक.. अशा अगणित शक्यता एकमेकीत गुंतलेल्या आणि तो अवकाश सर्व सामावलेला, सर्व सामावून घेणारा, सर्वसमावेशक! या सर्व घटकांच्या एकत्रित परिणामातून व्यक्त होणारा आशय कोणता?

बरवे म्हणतात, हा प्रश्न- जीवनाचा अर्थ काय, अशा स्वरूपाचा आणि प्रत्यक्ष जीवनाइतकाच व्यापक आणि गहन आहे. साहित्यकृतीतून प्रकट होणाऱ्या आशयापेक्षा चित्रातून सूचित होणारा आशय अगदी भिन्न स्वरूपाचा असतो, असे बरवे म्हणतात. याचे कारण, एखाद्या दृक्प्रत्ययातून चित्राची निर्मिती होते. अशा दृक्प्रत्ययाचे चित्रात प्रकटीकरण होताना चित्रकाराला त्याच्या चित्रकलेतील प्रभुत्वाचा उपयोग होतो. चित्रातून जो दृक्प्रत्यय येतो, तो साहित्यकृतीतून येत नाही. बरवे म्हणतात, पूर्वनियोजित आशयाच्या मर्यादित रूपापेक्षा प्रत्यक्ष चित्रावकाशातून स्फुरलेल्या दृश्य शक्यतांतून उमटणारा आशय हा केव्हाही अधिक व्यापक व महत्त्वपूर्ण असणे स्वाभाविक आहे. ते म्हणतात, अमूर्त चित्राच्या संदर्भात कधी शुद्ध दृश्यानुभव इतकाच आशय उरतो.

पुढे बरवे यांनी हा विचार अधिक सूक्ष्मतेने व्यक्त केला आहे. ते म्हणतात, कलादृष्टी ही अंतर्दृष्टी आहे. आपण नेहमी पाहतो त्या पाहण्यात आणि या पाहण्यात काहीसा फरक आहे. येथे वस्तूचे एक प्रकारे समग्र दर्शन होऊन, त्या वस्तूचे अदृश्य वा अज्ञात असे आणखी एखादे रूप स्पष्टपणे दिसू लागते. अशा तऱ्हेने एखादे दडपलेले रूप शोधून ते चित्रातून व्यक्त करण्याचा प्रयत्न करणे, म्हणजेच एक नवा दृश्यानुभव निर्माण करणे. चित्राचे निव्वळ हेच प्रयोजन असणे असाही एक आशय कलाकृतीमध्ये असू शकतो.

बरवे यांनी लेखातून मुख्यत: चित्र कसे पाहावे, ते कसे समजून घ्यावे, हे सांगितलेले आहेच; चित्रकारानेही अन्य गोष्टींपेक्षा आकार, रंग, अवकाश या तीन घटकांवर लक्ष केंद्रित करावे हे सुचवलेले आहे. चित्रकाराचा विचार हा केवळ दृश्यविचार हवा, असे ते म्हणतात. शुद्ध आकार, रंग, अवकाश यांचे व्याकरण. या व्याकरणात अवकाश हा कर्ता आणि आकार व रंग हे आळीपाळीने कर्म किंवा क्रियापद होतात. अर्थात, दृश्य-व्याकरण स्वतंत्रच आहे. बरवे यांच्या मते, येथे शब्द, वाक्य, अर्थ असा क्रम नसून कधी वाक्य हाच शब्द, तर कधी शब्द हाच अर्थ अशा शक्यता निर्माण होतात. आपण असे म्हणू की- आकार, रंग, अवकाश या अनेक अर्थच्छटा असलेल्या वाक्यांचे एक महावाक्य म्हणजे चित्रकृती. तेथे शब्दांची निवड आणि जुळणी कशी असेल, हे आधी सांगता येत नाही.

विक्रम मराठे यांना लिहिलेल्या पत्रांतूनही बरवे यांचा चित्रविचार व्यक्त झाला आहे. क्लीच्या चित्रात बरवे यांना काव्यात्मकता आढळते. काव्यात्मकता ही आध्यात्मिकतेच्या जवळची आहे, असे त्यांना वाटते. बरवे यांच्या चित्रांतही काव्यात्मकता आढळते. ‘कोरा कॅनव्हास’मध्ये ‘अध्यात्माचा आधार’ या शीर्षकाचा लेख आहे. त्यात बरवे म्हणतात, चित्रकाराची जीवननिष्ठा जर आध्यात्मिक वृत्तीतून निर्माण झाली असेल, तर साहजिकच त्याला त्याची सर्जनशक्ती हा त्या मूलभूत शक्तीचा एक आविष्कार आहे, त्याच मूलभूत शक्तीचे ते एक रूप आहे ही गोष्ट ध्यानात येईल. काव्यात्मकता व आध्यात्मिकता या बाबतीत बरवे यांचे क्लीशी साम्य आहे असे म्हणता येईल. मराठे यांना लिहिलेल्या दुसऱ्या पत्रात- प्रत्यक्ष जीवन जगत असताना येणाऱ्या विविध अनुभवांतून जर आपल्या चित्राचा आशय तयार होईल तर अशा प्रकारचा ठोस आशय व्यक्त होताना त्याला आपोआपच योग्य तो आकार मिळेल, अशी आपली धारणा असल्याचे ते सांगतात. तिसऱ्या पत्रात ते सांगतात, एखादा विचार ठामपणे दृश्यातून प्रगट झाला पाहिजे. मात्र तो विचार अप्रत्यक्षपणे किंवा दृश्याच्या मूलगामी परिणामातून जाणवला पाहिजे. येथे त्यांनी काझिमिर मालेविच (१८७९-१९३५) या रशियन आवां गार्द चित्रकाराच्या ‘व्हाइट ऑन व्हाइट’ (१९१८) या पेंटिंगचे उदाहरण घेतले आहे. या चित्रात पांढऱ्या अवकाशात एक पांढरा चौकोन चित्रित केलेला आहे. बरवे सांगतात, अमूर्तामध्येही ज्या प्रतिमा निर्माण होतात, त्यांच्या पलीकडे आपण जायला पाहिजे.

बरवे यांच्या नोंदवह्य़ांतील विविध नोंदींमध्ये त्यांचा चित्रविचार विखुरलेला आहे. चित्रकाराच्या स्वातंत्र्याविषयी ते लिहितात : चित्रकाराचं स्वातंत्र्य म्हणजेच चित्राचं स्वयंभूपण. म्हणजेच दृश्य घटना आणि दृश्य घटक यांचं स्वातंत्र्य. चित्रविषयक नियमांपासून घेतलेलं स्वातंत्र्य. चित्राचा विचार चित्रातूनच होतो. चित्र हेच प्रयोजन. चित्र हेच सर्वस्व. चित्रातल्या भावना म्हणजे रंग. चित्रातले विचार आणि विकार म्हणजे आकार. चित्राची मूलभूत प्रेरणाशक्ती म्हणजे चित्राचा अवकाश. चित्रावकाश हेच चित्राचं रहस्य. चित्रावकाश म्हणजे चित्रविश्व.

बरवे यांच्या चित्ररहस्याकडे जाता येईल अशी एक नोंद आहे. अर्धवट वाळलेल्या पानांविषयीची ही नोंद आहे. त्या पानांचे सूक्ष्म निरीक्षण बरवे करतात. ती पाने अशीच्या अशी कॅनव्हासवर चिकटवावीत असेही त्यांना वाटते; परंतु त्यामुळे चित्र काढण्याचा, त्यांचा आकार लहान-मोठा करण्याचा आनंद मिळणार नाही असेही त्यांना वाटते. पानावरच्या रेषांमधून त्यांना असंख्य प्रतिमा सुचतात. पानाचा आनंद हा सौंदर्याचा आनंद आहे अशी त्यांची भावना होते. साक्षात्कारासारखी ही स्थिती आहे. काळाच्या जाणिवेपलीकडे, त्या स्पंदनाच्या पलीकडे जाण्याचा हा अनुभव आहे. पान हे केवळ निमित्त. बरवे यांच्या चित्रांत अनेकदा पान आलेले आहे. ते का आलेले आहे, याची ही चाहूल आहे.

बरवे यांना निसर्गाने खूप काही दिलेले आहे. त्याविषयीच्या त्यांच्या नोंदीही आहेत. एका नोंदीत ते म्हणतात, रंग, आकार, अवकाश यांच्या त्रिविध नात्यांचे, अनेकपदरी रहस्य निसर्गात साठवलेले आहे. निसर्गात सतत होणारे बदल त्यांना जाणवतात. बरवे म्हणतात, त्याच्या या अविरत होणाऱ्या बदलातून तो आपलं रहस्यच सांगत असतो. त्यांना असेही जाणवते, की हिरव्या रंगातच त्याच्या विरुद्ध असलेला तांबडा सुप्तावस्थेत दडलेला असतो. त्याची वेळ झाली, की तो प्रगट होऊ लागतो.

बरवे यांच्या नोंदवहीत ‘नसर्गिक आकार का व कसे बदलतात?’ या शीर्षकाचे एक टिपण आहे. बरवे यांची चित्रे व त्यामागची त्यांची भूमिका समजून घेण्याच्या दृष्टीने हे टिपण महत्त्वाचे आहे. ते म्हणतात, कोणताही नसर्गिक आकार किंवा रंग ज्या वेळेस चित्रामध्ये येतो त्या वेळेस त्याच्यामध्ये जी स्थित्यंतरे होतात; त्यामध्ये केवळ त्या माध्यमाच्या स्वभावधर्माप्रमाणे होणारा बदल हा अटळ तर असतोच, शिवाय तो आवश्यकही असतो. कारण एखादा आकार निसर्गामधून चित्रात- म्हणजे एका जगातून दुसऱ्या जगात प्रवेश करतो, त्या वेळेस साहजिकच त्या आकाराला चित्राच्या चौकटीची व चित्रामधल्या इतर वातावरणाशी समरस होण्याकरिता आपले मूळ स्वरूप सोडून चित्राच्या संदर्भात योग्य असलेले असे रूप धारण करावे लागते. बरवे पुढे सांगतात, हे बदल अपरिहार्य असून ते चित्रकाराच्या मर्जीवर किंवा कुवतीवर अवलंबून नसून, केवळ त्या चित्रचौकटीतल्या वातावरणाची ती मागणी असते. म्हणून हा बदल होतो. हा बदल त्या-त्या माध्यमाचा, साधनांचा व चित्रचौकटीचा असा एकत्रित परिणाम असतो आणि तो अपरिहार्य असतो. हे समजणे आवश्यक आहे, असे बरवे सांगतात.

 

First Published on March 3, 2019 12:06 am

Web Title: loksatta lokrang marathi article 7