16 October 2019

News Flash

नाटकाचा जमाखर्च

नाटकवाला

|| मकरंद देशपांडे

नाटक करताना मी नेहमीच डेडलाइन पाळली. म्हणजे मी पृथ्वीच्या तारखा आधी घ्यायचो आणि त्या, त्या वेळ-काळातले माझ्या मनातले प्रश्न, तर्क नाटकाद्वारे मांडायचो. साधारण १९९७ पर्यंत माझ्या नाटकाचा प्रेक्षकवर्ग तयार झाला होता. काहीतरी नवीन प्रयोग बघायला मिळणार असा विश्वास त्यांना होता, म्हणून नाटक लिहीत गेलो. काही वेळा एखादं नाटक जादा लिहिलं जायचं. मग ते तसंच पडून राहायचं.. पुढच्या तारखांची वाट पाहत! काही नाटकं आजही तशीच पडून आहेत. कदाचित रुसलीही असतील.

तसेच काही प्रेक्षकसुद्धा रुसलेले, रागावलेले आहेत, कारण काही नाटकांचे जास्त प्रयोग करण्याआधीच ती मी बंद केली. त्याला दोन कारणं : एक म्हणजे नवीन नाटक लिहिलेलं असायचं. दुसरं कारण नटांना राग येईल असं आहे. प्रयोग झाल्यावर मला असं वाटायचं की, हे नाटक आपल्याला तेवढं जमलेलं नाहीये. आणि मी नाटकाची डागडुजी किंवा रिपेअर वर्कमध्ये कधी विश्वास ठेवायचो नाही. नाटक हे प्रेक्षकांसमोर सादर केल्यावरच कळतं, की त्यात किती नाटक आहे. मग प्रेक्षकांत बसलेली अगदी मित्रमंडळी, नातेवाईक का असेना; त्यांना नाटक पाहिल्याचा आनंद मिळाला की नाही, हे कळतंच!!

‘योद्धा’ हे नाटक सीमेवर मरून पडलेल्या एका योद्धय़ाबद्दल होतं. आणि तो अशा ठिकाणी पडलेला असतो ज्याला ‘नो मॅन्स लॅण्ड’ म्हणतात. त्यामुळे दोन्ही देश ‘तो आमच्या देशाचा नाही..’ असं सांगतात. कारण मेलेला योद्धा म्हणजे हार! नंतर दोन्ही देश असं जाहीर करतात की, खरं तर तो योद्धा हा एका वाघाशी लढताना मेला, आणि त्याला वाचवायला आणखीन एक योद्धा गेला, जो दुसऱ्या देशाचा होता. तिसरा शत्रू वाघ असल्याने त्याला मारण्यासाठी तो त्याच्या मागे गेला. तेव्हा सीमेवर पडलेल्या योद्धय़ाला कुण्या एका देशाचा मानून  हार-जीत ठरवता येणार नाही.

दोन्ही राष्ट्रांत पुन्हा त्या वाघामुळे मत्री झाली. मत्रीचं नाटक की शत्रुत्वाचं नाटक? या दोन्ही प्रश्नांना उत्तर नाही. आहे ते फक्त एका योद्धय़ाचं सीमेवर ठरलेलं मरण!!  कंबरेला ध्वजाची काठी बांधून, डोक्यावर फडफडणारी ध्वजा घेऊन मंचावर फिरणारा योद्धा जेव्हा एखाद्या स्पॉटमध्ये उभा राहायचा तेव्हा तो अख्खा देश उभा राहायचा. पण या नाटकात वाघ दाखवणं हे एक आव्हान होतं. बरं, ते एखाद्या ड्रेसवाल्याकडे जाऊन वाघाचा मास्क आणि कपडे घालून त्याचा बाल हिंस्रपणा दाखवता आला असता. पण मला दाखवायचं होतं की हा वाघ म्हणजे भीती, एक कल्पित शत्रू आहे.. दोन्ही देशांनी आपल्या सोयीनुसार बनवलेला आणि प्रसंगी झालेली हिंसा त्याच्यावर ढकलून द्यायला तयार केलेला.

विंगेतून वाघाची शेपटी मंचावर पडलेली असायची आणि ती शेपटी देशांच्या ध्वजांबरोबर वर-खाली व्हायची. वाघ हा दोन्ही देशांच्या राष्ट्रगीताला उभाही राहायचा.. एखाद्या सर्कसच्या वाघाप्रमाणे; आणि प्रसंगी अपमानही करायचा. हे सगळं रंगमंचावर फक्त शेपटीनं दाखवलं होतं. शेपटीचा एवढा वापर केला होता, की ते एक शेपटीशास्त्र म्हणून नाटय़शास्त्रात जोडायला हरकत नाही. असो. हनुमानाची शेपटी उचलताना भीमाचा आपल्या शक्तीचा अहंकार नष्ट झाला, पण या वाघाच्या शेपटीनं मात्र दोन्ही देशांत असंतोष निर्माण केला.

पंकज सारस्वत या नटाला मी ऐनवेळी टक्कल करायला सांगितलं. कारण टॉप लाइट जेव्हा डोक्यावर पडतो तेव्हा पूर्ण टक्कलाला जात, धर्म, देश नसतो. पंकजने पटकन् होकार दिला. टक्कल करून आला. त्यानं हा विचार केला नाही, की आता आपल्या फिल्म किंवा सीरिअलच्या कामाचं काय होईल? त्याच्या हे लक्षात आलं होतं की, लेखक-दिग्दर्शक नाटकाच्या प्रभावासाठी हे करायला सांगतो आहे. कधी कधी बा जगातील वेळ, काळ, घटना नाटकाच्या प्रयोगाला वेगळीच रिअ‍ॅलिटी आणतात. ज्याला आपण ‘सुपर रिअ‍ॅलिटी’ म्हणू शकतो.

‘योद्धा’ नाटकाचा शो पृथ्वीला ज्या दिवशी होता नेमकी त्याच दिवशी भारत-पाकिस्तान क्रिकेट मॅच होती. त्यामुळे मला सगळ्यांनीच सांगितलं की, ऑडिअन्स खूप कमी येणार. १९९७-९८ साली प्राइव्हेट टीव्ही चॅनल्सचं आक्रमण नसल्यानं क्रिकेट मॅच.. त्यातून भारत-पाकिस्तान मॅच म्हणजे उत्कंठा शिगेला पोहोचायची. त्यातूनही काही नाटय़वेडे प्रेक्षक नाटक पाहायला पृथ्वीला आले होते. रस्त्यावर शुकशुकाट होता. पण थिएटरच्या आत गर्दी होती. मी शक्यतो प्रयोगाआधी प्रेक्षकांशी दोन मिनिटं बोलतो. कारण एवढंच, की प्रेक्षकांनी बाहेरून आणलेली टेन्शन्स, प्रश्न कमी करायचे आणि सगळ्यांचा फोकस प्रयोगावर केंद्रित करायचा. मी नाटकाबद्दलची भूमिका विशद करताना अचानक सांगितलं की, नाटक चालू असताना मी मधे मधे नटांकरवी स्कोअर सांगत जाईन. नटांकडून!! ते ऐकून लोक हसले. मग विचारात पडले की, हे कसं करणार?

नाटक सुरू झालं. दोन राष्ट्रांमधलं युद्ध. मी काही त्यात देशांची नावं घेतली नव्हती, पण प्रेक्षकांकडून ‘भारत-पाकिस्तान’ अशी पुटपुट ऐकू आली. फक्त वाघ- जो या नाटकात भीतीचं प्रतीक होता- त्याला काय म्हणावं हे त्यांना कळत नसावं. पण एक वेगळीच गंमत वाढली. जसजसं नाटक पुढे जात होतं, मधेच मी नटाकरवी लाइव्ह स्कोअर सांगायचो. प्रेक्षकांमधून टाळ्या!!!

खरं तर तुम्ही म्हणाल, स्वत: लेखक-दिग्दर्शकच आपल्या नाटकाचा विचका करतोय. पण त्या वेळेस पृथ्वी थिएटरच्या बाहेरच्या जगात दोन राष्ट्रांत शत्रुत्वाच्या भावनेने मॅच आणि आत दोन राष्ट्रांतील मत्रीपूर्ण शत्रुत्व सुरू होतं. सगळंच अकल्पित. आणि अशातच वीज गेली. प्रतीकात्मक अंधार पसरला. मी प्रेक्षकांना म्हटलं, ज्यांना मॅच बघायला जायचंय ते जाऊ शकतात. मॅच चुरशीची चालू होती. मी पण आपलं काम चालू ठेवलं. ‘शो मस्ट गो ऑन’या भावनेने मी पेट्रोमॅक्स मागवले. पृथ्वीचे दरवाजे उघडले. आणि थांबलेल्या प्रेक्षकांसमोर दोन राष्ट्रांमधलं युद्ध पेट्रोमॅक्सच्या प्रकाशात दाखवलं. वाघाची शेपटी आणि पूर्ण टक्कल केलेला पंकज दोन्ही गोष्टी त्या प्रकाशात भीषण वाटल्या. ती मॅच कोण जिंकलं हे आता आठवत नाही, पण नाटक अंगावर आलं!!

या नाटकाचे त्यानंतर दोन प्रयोग केले गेले आणि ‘१९४७ ऊठ’ हे नाटक लिहिलं गेलं आणि मी त्यात अडकलो. पंकज सारस्वतने मला विचारलं की, पुन्हा केस वाढवू का? मी म्हटलं, पहिल्या प्रयोगाला जे काही जमून आलं होतं तसं आता होणार नाही. (क्रिकेट मॅच, वीज जाणं वगरे) दोन राष्ट्रांतला नाटकातला आणि नाटकाबाहेरचा संघर्ष एका वेळी होणे नाही, तेव्हा या नाटकाचे प्रयोग होणे नाही.

पंकज पुढे दिग्दर्शक झाला. त्यानं लाफ्टर चॅलेंजआणि कॉमेडी शोज्चं दिग्दर्शन केलं. टीव्हीचा सक्सेसफुल दिग्दर्शक म्हणून तो नावाजला गेला. ‘केस कापलेले असताना डोक्यात दिग्दर्शनाचं वारं गेलं..’ असं तो म्हणाल्याचं मला अंधुकसं आठवतंय.

यश टॉन्क हा ‘योद्धा’ हे नाटक बंद झाल्यामुळे टीव्ही नट झाला. खूप नामांकित मालिकांमध्ये त्यानं कामं केली. दुसरा योद्धा विजय वर्मा याने नाटक बंद झाल्यावर मॉडेलिंग केलं आणि मग हरियाणाला परत गेला. तिथे तो एक शाळा चालवतो. वर्षभरापूर्वी त्याचा फोन आला, की त्याच्या मुलाला नट व्हायचं आहे. आता हे माहीत नाही की, मुलाला नट व्हायचं आहे की वडिलांना आपलं अर्धवट राहिलेलं स्वप्न मुलाकडून पुरं करून घ्यायचं आहे. पण एक नाटक बंद झाल्याने तिघांची आयुष्यं आपापल्या वळणानं गेली.

खरंच, नाटक करून मला खूप काही मिळालं. वर्ष, पैसा आणि जमाखर्च मांडला तर सगळ्यांनाच काहीतरी मिळालं. काहींना आयुष्य खर्च करून घर, गाडी, सुखसोयी मिळाल्या, तर काहींना आयुष्य खर्च करून अनुभवांचा खजिना मिळाला. काही अनुभव नाटक बनले, तर काही अनुभूती झाले.

जय क्रिकेट

जय अनुभव

जय नाटक !!!

mvd248@gmail.com

First Published on March 3, 2019 12:05 am

Web Title: loksatta lokrang marathi article 8