|| पराग कुलकर्णी

तुम्हाला तुमच्या लहानपणीचे (फक्त दूरदर्शनवर) पाहिलेले कार्यक्रम आठवतायेत का? रंगोली, छायागीत, चित्रहार आणि शनिवारी-रविवारी हिंदी-मराठी चित्रपट.. ‘जंगल जंगल बात चली है..’ गाणे ऐकून लहानपणीची रविवार सकाळ तुम्हाला अजूनही आठवते का? आधी पुस्तकात वाचून, मग दुरून पाहून आणि शेवटी प्रत्यक्ष वापरायला लागेपर्यंतचा संगणक आणि इंटरनेट सोबत झालेला मत्रीचा प्रवास तुमच्या लक्षात आहे का? STD-ISD-PCO बूथ आणि तिथे रात्री रांग लावून तुम्ही कधी फोन लावला आहे का? आणि हे सर्व अनुभवणाऱ्या तुमचा जन्म १९८० ते २००० च्या मध्ये झाला असेल तर तुम्ही स्वत:ला खुशाल ‘मिलेनिअल’ म्हणून घेऊ शकता! पण हे ‘मिलेनिअल’ प्रकरण नेमके काय आहे? बऱ्याच गोष्टींप्रमाणे याचाही उगम पश्चिमी राष्ट्रांतच आहे.

विसाव्या शतकाच्या सुरुवातीला पिढय़ांना नावे देण्याची पद्धती सुरू झाली. प्रत्येक पिढी एका विशिष्ट परिस्थितीत वाढते. काही राजकीय-सामाजिक-आíथक घटनेतून तयार होणाऱ्या संकटांना आणि संधींना सामोरे जाते आणि त्यातून त्या पिढीची काही स्वभाववैशिष्टय़े बनून त्यांची एक वेगळी ओळख तयार होत असते. या अशा वैशिष्टय़ांवरूनच पिढय़ांना नावे देण्यात आली- लॉस्ट जनरेशन, ग्रेटेस्ट जनरेशन सायलेंट जनरेशन, दुसऱ्या महायुद्धानंतर अचानक लोकसंख्या वाढली आणि त्या नवीन पिढीला बेबी बूमर असे नाव देण्यात आले. बेबी बूमरची पुढची पिढी म्हणजे Gen X (१९६०-१९८०) आणि त्यानंतर १९८०- २००० जन्माला आलेली पिढी म्हणजे GenY किंवा मिलेनिअल्स! २००० सालच्या मिलेनियमच्या वेळेस मोठी होत असलेली आणि तारुण्यात आलेली पिढी या अर्थाने हा शब्द वापरात आला आणि Gen Y पेक्षा हा शब्दच जास्त लोकप्रिय झाला. यापुढची पिढी- जी नवीन शतकात जन्माला अली तिला Gen Z असे नाव देण्यात आले. पण पिढीला नाव देणे (आणि नावे ठेवणे) ही फक्त एक सुरुवात असते. त्या त्या काळात तारुण्यात येणारी नवीन पिढी समजावून घेण्याचा प्रयत्न केला जातो. या पिढीच्या समस्या काय आहेत, कोणत्या राजकीय, आíथक आणि सामाजिक परिस्थितीत त्यांचे बालपण गेले, त्याचा त्यांच्या मन:स्थितीवर काय परिणाम झाला, विज्ञान-तंत्रज्ञानाने या पिढीला काय नव्या संधी उपलब्ध करून दिल्या आणि कोणत्या नव्या समस्या निर्माण केल्या, कुटुंब संस्था, आरोग्य, पर्यावरण आणि इतर सामाजिक परिस्थितीकडे ही नवीन पिढी कशी बघते या सर्वाचे काही ठोकताळे मांडले जातात. या नव्या पिढीतूनच उद्याचे नेते, व्यावसायिक, उद्योजक आणि समाज तयार होत असल्याने त्यांचा अभ्यास महत्त्वपूर्ण ठरतो. अर्थात हा अभ्यास फक्त अभ्यासासाठीच नसून, त्याचा उपयोग व्यावसायिक फायद्यासाठीही करून घेण्यात येतो. उदा. मिलेनिअल्सची काही स्वभाव वैशिष्टय़े सांगण्यात येतात. त्यातील महत्त्वाचा एक म्हणजे, बदलत्या नवीन तंत्रज्ञानाशी त्यांनी जुळवून घेतले आहे. कॉम्पुटर, स्मार्टफोन आणि इंटरनेट याचा मुक्त वापर या पिढीकडून होतो. आता तुम्हाला या मिलेनिअल्सला काही वस्तू विकायची असेल तर तुम्हाला जाहिरातीही फेसबुक, ट्विटर, यूटय़ूबवर कराव्या लागतील. अशाच अभ्यासात अजून एक गोष्ट आढळून आली, ती म्हणजे मिलेनिअल्स एखादे उत्पादन त्याचा ब्रँड बघून घेत नाहीत, तर त्यांचा भर असतो त्यांचे मित्र-मत्रीण आणि इतर लोक त्या उत्पादनाबद्दल काय म्हणतात हे जाणून घेण्यावर. आता तुमचे उत्पादन अशा प्रॉडक्ट रिवू असणाऱ्या ऑनलाइन दुकानातून (अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट) विकल्याशिवाय ते जास्तीत जास्त मिलेनिअल्सपर्यंत पोहोचणारच नाही. मिलेनिअल्स हा एक कमावणारा आणि खर्च करणारा मोठा वर्ग आहे हे लक्षात घेतल्यावर अशा अभ्यासाचे महत्त्व अजूनच वाढते.

सगळ्याच पिढय़ा त्यांच्या पुढच्या पिढीला आळशी आणि बेजबाबदार समजतात. मिलेनिअल्स बाबतीतही हेच म्हटले जाते आणि गंमत म्हणजे त्यांच्या आधीच्या पिढीलाही (Gen X) हेच म्हटले गेले होते. स्वत:च्याच प्रेमात असणारी आत्मपूजक (narcissist), आत्ममग्न, आत्मविश्वासू, बदलांना सामोरी जाणारी आणि म्हणूनच कदाचित तणावाखाली असलेली, उदारमतवादी आणि सहकार्यावर विश्वास असणारी अशी मिलेनिअल्सची अजून काही वैशिष्टय़े अभ्यासात आढळून आली आहेत. YOLO (You  Live Only Once) आणि FOMO (Fear Of Missing Out) यातून मिलेनिअल्सचा जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन दिसून येतो. अर्थात यात थोडे सामान्यीकरण (generalisation) असले तरीही ढोबळ मानाने एका पिढीला समजून घेण्यात अशा साच्यांची मदत होते.

पण वर म्हटल्याप्रमाणे, हे अभ्यास पश्चिमी राष्टांत झालेले आहेत. जरी काही गोष्टी जगभरात सर्वाना लागू पडतात तरीही विकासाच्या कोणत्या पायरीवर आपला देश आहे आणि त्यातून निर्माण होणाऱ्या कोणत्या परिस्थितीत ही पिढी वाढली हेही लक्षात घेतले पाहिजे.

तुम्ही कोणत्या पिढीचे आहात? बेबी बूमर, Gen X, Gen Y (मिलेनिअल्स) का Gen Z तुमच्या वाढत्या वयातील आजूबाजूची परिस्थिती आणि सामाजिक, राजकीय, आíथक घटना याचा कोणता परिणाम तुमच्या पिढीवर झाला असे तुम्हाला वाटते? मराठी मातीतल्या अनुभवावरून तयार झालेली मराठी मिलेनिअल्सची अशी काही वेगळी स्वभाव वैशिष्टय़े आहेत का? तुम्हाला काय वाटते?

parag2211@gmail.com