24 January 2021

News Flash

मोकळे आकाश.. :  दुधाची  पिशवी

आज हा सारा भूतकाळ एका लटकवलेल्या पिशवीमुळे मनात जागा झाला होता.    

डॉ. संजय ओक wsanjayoak1959@gmail.com 

डॉ. संजय ओक .. प्रख्यात सर्जन. राज्याच्या कोविड टास्क फोर्सचे प्रमुख. आयुष्य व्रतस्थतेनं रुग्णसेवेत व्यतीत करत असतानाच अचानकपणे उद्भवलेल्या सर्वसंहारी करोनाकाळाचे आव्हान पेलण्याची जबाबदारी त्यांच्यावर येऊन पडली. या काळातील अनुभवांचं  मनमोकळं साप्ताहिक सदर..

आज सकाळी साडेपाचला उठून नित्यनेमानुसार चालून आल्यावर मजल्यावरच्या प्रत्येक फ्लॅटच्या जाळीच्या दारात अडकवलेली एकेक पिशवी माझ्या नजरेत भरली. कुठे कापडाची. कुठे ज्यूूटची. कुठे विणलेल्या नायलॉनची. एक चट्टेरी-पट्टेरी पायजम्याच्या उरलेल्या कपडय़ात बसवलेली. रंग, रूप, आकार वेगवेगळा. उद्देश मात्र एकच : ‘दुधाची पिशवी’! करोनाच्या सहा महिन्यांत तिचे कोरडे लटकणे मला अस्वस्थ करीत होते. अनेकांनी तर तिची ग्रिलला मारलेली गाठ सोडवली होती आणि ती पिशवी घेऊनच मंडळी खाली दूध आणायला जात.

मला माझे पुण्यातील लहानपण आठवले.  चितळे डेरीचा माणूस सायकलला मोठाले हंडे लटकवून कॉलनीत यायचा आणि साडेपाचच्या सुमारास ‘ओक’ अशी आरोळी आली की पप्पा दुधाचे भांडे घेऊन शेराच्या मापटय़ाने दूध घेऊन घरात यायचे. काळ बदलला. काचेच्या बाटल्या आल्या. त्याकाळी होल व टोन्डची निरनिराळ्या रंगांची झाकणेही मी जमवली. आणि मग दूध पिशवीच्या पॉलीपॅकमधून घरी येऊ लागले. इंग्लंडमध्ये काम करताना पहिल्यांदा पुठ्ठय़ाच्या खोक्यातील वऌळ दूध अनुभवले. आणि पुढे महानगरपालिकेच्या शालेय सुगंधी दुधाचा प्रस्ताव अभ्यासताना या विषयावरचा अक्षरश: पीएच. डी. होण्यापर्यंतचा अभ्यास मी पूर्ण केला. आज हा सारा भूतकाळ एका लटकवलेल्या पिशवीमुळे मनात जागा झाला होता.

दारावर लटकवलेल्या या दुधाच्या पिशवीत मला प्रेम, घरगुती आपलेपण आणि प्रामाणिकपणा जाणवतो. संध्याकाळी ‘बसण्यासाठी’ लागणारी ‘चपटी’ आणण्याची पिशवी वेगळी. ती मिरवता येत नाही, तर घडी घालून खिशात ठेवावी लागते. दुधाची पिशवी राजरोसपणे दरवाजाला लटकते. येणाऱ्या पाहुण्याला चहाचे निमंत्रण देते. रविवारी आठ-नऊ वाजेपर्यंत लोळपटलो तरी पिशवीला कोणी हात लावत नाही. चोरीचे प्रसंगही क्वचित. पिशवी टाकणाऱ्या उत्तर प्रदेशी राजूचे कसब मोठे वाखाणण्याजोगे. कोणाकडे किती व कोणत्या कंपनीचा माल टाकायचा, हे डोक्यात फिक्स्ड. आणि पिशवीत दूध ठेवताना कडीचा आवाजही न होऊ देणे महत्त्वाचे. नाहीतर ‘टाइमपास’- मधल्या शाकाल लेलेसारखा एखादा आतून करवादायचा. पण नाही. अशी चूक नाहीच. महिनाअखेरीस हिशेबही पक्का. या अशा ‘सिस्टीम्स’ आपल्याला आपल्याच देशात पाहावयास मिळतात. फक्त राज्यागणिक स्वरूप बदलते.  कुठे ते ‘भय्या का दूध’ म्हणून प्रचलित होते, तर कुठे ‘मशीन का दूध’!

पिशवीत पॉलीपॅक टाकणारा भय्या केवळ दूध नाही, तर माणसा-माणसांमधला विश्वास भरीस टाकत असतो असे मला वाटते. करोनाच्या काळात अर्धोन्मीलित डोळ्यांनी, तोंडावर मास्क चढवून, प्रसंगी दात घासण्याचा ब्रश तोंडात ठेवून बििल्डगच्या तळमजल्यावर जाऊन चरफडत दूध आणताना आपल्यापकी प्रत्येकाला दारावर लटकवलेल्या पिशवीचे आयुष्यातील स्थान कळले आहे.

काळ बदलतो आहे. करोना रेंगाळतो आहे. तंत्रज्ञान पुढे येते आहे. कदाचित आपण लवकरच पूर्णपणे वऌळ दुधाकडे मार्गक्रमण करू, किंवा बििल्डगच्या लॉबीमधल्या व्हेंिडग मशिनमधून आपले दूध घ्यायला लागू. सुरक्षित अंतर राखताना माणसा-माणसांमधला हा दुवा तुटत जाईल आणि सेफ्टी डोअरच्या ग्रिलवरून ही लटकवलेली पिशवी कायमची दिसेनाशी होईल. पण पांढऱ्याशुभ्र दुधासारखे घट्ट  स्नेहाचे नाते जपले गेले म्हणजे मिळवली.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2021 6:02 am

Web Title: loksatta mokale aakash dr sanjay oak article about experience in coronavirus pandemic zws 70
Next Stories
1 पुस्तक परीक्षण : करोनाकाळाला फिक्शनचा तडका
2 वेगळ्या वाटेवरच्या प्रेरणादायी व्यक्ती
3 भ्रमयुगातले चतुर मौन!
Just Now!
X