16 January 2021

News Flash

पुस्तक परीक्षण : करोनाकाळाला फिक्शनचा तडका

‘लव्ह इन द टाइम ऑफ करोना’-

जुई कुलकर्णी

मार्च महिन्यात करोनाचं संकट भारतात आलं. संपूर्ण जगाचंच रूप पालटून टाकणारी अशी संकटं क्वचितच येतात. अकल्पनीय परिस्थिती निर्माण झाली आणि जगभरात एकच घुसळण झाली. लेखक हाही जगाचाच भाग असतो. त्यामुळे या अकल्पित परिस्थितीचा त्याच्यावरही परिणाम होतो आणि त्यातून विलक्षण असं साहित्य निर्माण होऊ शकतं. विशेषत: करोनासारखा आजार- ज्याने माणसा-माणसांमधले नातेसंबंधच बदलून टाकले.. त्यांच्या जगण्याची समीकरणंच बदलून गेली. रोहन प्रकाशनचं कौतुक यासाठी करायला हवं, की या विचित्र परिस्थितीतही त्यांनी काही लेखकांना ‘करोना आणि प्रेम’ या थीमवर कथा लिहायला प्रवृत्त केलं आणि लॉकडाऊनमध्ये झपाटय़ाने काम पूर्ण करत हे नवं पुस्तक वाचकांसमोर आणलं. आठ लेखकांनी ‘करोना’ हा विषय घेऊन लिहिलेल्या वैशिष्टय़पूर्ण कथांचा ‘लव्ह इन द टाइम ऑफ करोना’ हा संग्रह आहे. हे शीर्षक वाचून काही जणांना ‘लव्ह इन द टाइम ऑफ कॉलरा’ ही कादंबरी आठवेल. नोबेल पुरस्कारविजेते लेखक गॅब्रिएल गार्सयिा माक्र्वेझ यांची ही गाजलेली कादंबरी. करोना आणि प्रेम या दोन्ही गोष्टी या कथांमध्ये असणं अपेक्षित होतं.

यातली नीरजा यांची कथा ‘एक तुकडा आभाळाचा’ वाचताना सुरुवातीला करोनाकाळातली एखाद्या वृद्ध बाईंची डायरी वा फेसबुक पोस्ट वाचतोय असं वाटायला लागतं. कथेच्या मध्यावर आल्यावर नक्की गोष्ट काय आहे याचा शोध लागतो. सध्या वृद्धत्वात असलेल्या लोकांचं तारुण्य अव्यक्त प्रेम करण्यात गेलं. तो त्या काळाचा विशेष होता. आता अचानक सोशल मीडियावर हे हरवलेलं प्रेम सापडलं तर? नकोशा लग्नात बरीच र्वष गुदमरून गेलेली कथानायिका करोनाच्या कृपेनं संसारातून मोकळी होते व भूतकाळातील त्या प्रेमाला धुमारे फुटतात.

गणेश मतकरी यांची कथा ‘नाऊ यू सी मी’ ही सत्य आणि आभास यांच्या सीमारेषेवर वावरते. कथानायक मुंबईत आहे आणि त्याचे वडील लॉकडाऊनमध्ये पुण्यात आहेत. अशात लहानपणी वडलांनी आणलेलं मांजर कथानायकाला सतत दिसतं. यासंबंधी श्रोडींजर कॅटचा उल्लेख कथेत आहे. कथा वडील-मुलाचं प्रेम, लग्नातला दुरावा, शहरी कुटुंबांत करोनानं अजूनच आलेलं तुटलेपण अशा अनेक पलूंसोबत पुढे जाते.

परेश जयश्री मनोहर यांची ‘मायं गाव कोनतं’ ही कथा करोनासंदर्भात व चटका लावणारी आहे, पण त्यात ‘लव्ह’अँगल नाही. करोनाच्या सुरुवातीच्या काळात लॉकडाऊनमुळे अनेक मजूर चालत शेकडो किलोमीटर अंतरावर असलेल्या आपापल्या गावी गेले. अशाच एका कुटुंबाची परवड या कथेत आहे. कदाचित गावावरील प्रेम हा अँगल पकडून ही कथा या संग्रहात घेतली असावी. पण ती एकूण कथागुच्छात काहीशी अस्थानी वाटते.

प्रवीण धोपट यांची ‘बी निगेटिव्ह, बी पॉझिटिव्ह’ ही कथा क्लासिक करोनाकथा आहे. या कथेत एक तरुण दाम्पत्य आहे. यातला नवरा स्वप्नील व्हॉट्स अ‍ॅप विद्यापीठाचा पदवीधर आहे. हा उच्च दर्जाचा मूर्ख मनुष्य आहे. त्याला नशिबानं मितालीसारखी हुशार, प्रेमळ पत्नी लाभली आहे. करोनाने स्वप्नीलची नोकरी जाते. रिकाम्या मनात सतानाचं घर असतंच. कथा वाचताना असला भंपक नवरा मितालीच्या आयुष्यातून गेलेलाच बरा असंच वाटू लागतं. पण प्रेम हादेखील करोनासारखाच एक व्हायरस आहे. त्याची बाधा जाणं कठीण असतं.

प्रणव सखदेवची ‘जस्ट ए लव्ह स्टोरी’ ही या संग्रहातील नितांतसुंदर कथा आहे. ही उद्ध्वस्त प्रेमकथा आहे. माणसाच्या नशिबी करोनाकाळात आलेल्या दु:खांना ती स्पर्श करते. या कथेत खरं तर दोन कथा सामावलेल्या आहेत. कथेचं नॅरेशन अतिशय उत्तम झालंय. प्रणवनं लिहिलेली स्त्री- पात्रं नेहमीच वैशिष्टय़पूर्ण असतात. एखादं पोट्र्रेट रेखाटत जावं अशा प्रेमानं तो स्त्री-पात्रं लिहितो. या कथेतील करोनाच्या आघाताने सारं काही गमावून बसलेला कथानायक काहीसा धूसरच आहे. परंतु त्याची प्रेयसी आणि पोलीस हवालदार असलेली त्याची आई मात्र फार उत्तम रीतीने उतरलीय. या कथेच्या सुरुवातीलाच गोष्टीविषयी चिंतन गुंफलेले आहे, ते उत्कट आहे. श्रीकांत बोजेवार यांची ‘निके निके चालन लागी’ ही कथा कल्पनारम्य आहे. कल्पनेतही विचार करता येणार नाही अशी कथावस्तू यात आहे. ‘जादूची बोट’ ही मनस्विनी लता रवींद्रची कथा नावासारखीच अद्भुत आहे. या सीरिअल फिक्शनमध्ये दोन कथा घडत असतात. वास्तवात घडते अशी कथा आणि वास्तवात न येणारी कथेतलीच एक समांतर कथा. या दोन्हीमधला बॅलन्स सहज डळमळायची शक्यता होती. ‘जादूची बोट’मध्ये मात्र तो नीट सांभाळला गेलाय. स्त्रीची सेक्शुअ‍ॅलिटी हा अजूनही आपल्या समाजात दडपण्याचाच विषय आहे. इथं एक पस्तिशीची साधीसुधी संसारी स्त्री कथानायिका आहे. ती नोकरी करणारी, पुरुषी बांध्याची, दोन मुलींची आई आहे. कामाच्या ठिकाणी येणाऱ्या एका पुरुषाकडे ती आकर्षति होते. मग करोना येतो. जग उलटंपालटं होतं. या अव्यक्त प्रेमाला धुमारे फुटतात आणि ही ‘जादूची बोट’ सोशल मीडियाच्या समुद्राआधारे प्रवासाला लागते. या कथेला जातीयवाद, विषमता, शोषण, राजकारण आदी पलू आहेतच. शिवाय ही एक निखळ स्त्रीवादी कथा आहे.

हृषिकेश पाळंदे यांची ‘कुयला’ ही सर्वार्थाने वैशिष्टय़पूर्ण कथा आहे. सुरुवातीला आपण एखादी आदिवासी लोककथा वाचतो आहोत असं वाटतं, पण हळूहळू हे कल्पित कुठल्या वास्तवावर आधारित आहे हे कळायला लागतं आणि हसू येऊ लागतं. शेवटी प्राचीन मातृसत्ताक काळातून ही कथा २०२० मध्ये येते तेव्हा जरासा रसभंग होतो; पण तोही आवश्यकच. मुखपृष्ठावर एखादं अमूर्त चित्र शोभून दिसलं असतं. करोनाच्या भीषण काळाला दिलेला हा फिक्शनचा तडका अनुभवावा असाच आहे.

‘लव्ह इन द टाइम ऑफ करोना’- संपादन : अनुजा जगताप, रोहन प्रकाशन, पुणे. पृष्ठे : २००, किंमत : २५० रु.  ह

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2021 5:57 am

Web Title: loksatta pustak parikshan marathi book review article 01 zws 70
Next Stories
1 वेगळ्या वाटेवरच्या प्रेरणादायी व्यक्ती
2 भ्रमयुगातले चतुर मौन!
3 दिशा उजळताना..
Just Now!
X