वाघांच्या सुरक्षेसाठी दीर्घकालीन उपायांची गरज

‘लोकरंग’ मधील (१९ जानेवारी)‘..तर वाघ-मानव संघर्ष अटळ’ हा राखी चव्हाण यांचा लेख वाचला. ज्या वनात वाघांचा अधिवास असतो ते वन समृद्ध आहे असे मानले जाते. महाराष्ट्रात व्याघ्रसंख्या जरी वाढत असली तरी नवजात बछडय़ांचा मृत्यू आणि मानव-वन्यजीव संघर्ष यातून कमी होणाऱ्या वाघांची संख्या लक्षणीय आहे. अनेकदा इतर तृणभक्षी प्राण्यांच्या शिकारीसाठी वापरल्या जाणाऱ्या सापळ्यात अडकून वाघांचे पंजे शरीरावेगळे होतात. त्यामुळे जीवनाचा अविभाज्य घटक असलेला तसेच वाघांची विशेष ओळख ज्यामुळे टिकून राहते, तो अवयवच नाहीसा झाला की वाघ आपसूकच प्राण सोडतात. अन्नसाखळीमध्ये असणाऱ्या या सर्वोच्च भक्षकाची मनुष्याकडून होणारी हालअपेष्टा खूपच चिंताजनक आहे. वने सुरक्षित राहतात ती वाघांमुळे आणि वाघ सुरक्षित राहतात ते वनांमुळे. तेव्हा परस्परावलंबी अशा या जीवसृष्टीय वैश्विक प्रश्नावर दीर्घकालीन उपाय लवकरात लवकर शोधणे गरजेचे आहे.

– प्रवीण भोमकर, कोल्हापूर</p>

असे चित्र भारतातही दिसावे!

‘लोकरंग’ मधील (१९ जानेवारी) ‘रंग बदलत्या दुबईचे..’ हा सिद्धार्थ खांडेकर यांचा लेख वाचला. लेख वाचताना जणू आपण दुबई शॉपिंग फेस्टिव्हलमध्येच आहोत असे वाटत होते. पूर्ण वाळवंटात अत्यंत कष्टाने व नियोजनपूर्वक फुलवलेले ‘नंदनवन’ म्हणजे दुबई. जिथे पाण्याची वानवा आहे त्या जमिनीवर डोळ्याचे पारणे फिटेल अशा वास्तू उभ्या करणे.. शॉपिंग मॉल्स, आधुनिक अभियांत्रिकीची वास्तुशिल्पे, टुमदार रेस्टॉरंट्स, ग्लोबल व्हिलेज निर्माण करणे आणि या सगळ्याचा उपयोग पर्यटन व्यवसायवृद्धीसाठी करणे खरेच कौतुकास्पद आहे. दुबई फेस्टिव्हलसारखे जागतिक आकर्षण निर्माण करणारे फेस्टिव्हल साजरे करून जगात लौकिक मिळवण्याच्या तसेच देशाची अर्थव्यवस्था सुदृढ करण्याच्या तेथील राज्यकर्त्यांच्या दूरदृष्टीलाही सलाम! दुबई फेस्टिव्हलसह पूर्ण अर्थव्यवस्थेला तेथे वास्तव्याला असलेले अनेक देशांतील अनेक धर्माचे लोक हातभार लावत आहेत. हा मुद्दा तर सध्या आपल्याकडे असलेल्या ‘राजकीय’ व  ‘सामाजिक’ वातावरणाच्या पाश्र्वभूमीवर विचार करण्यासारखा आहे. मोठा भूभाग असूनही तसेच अनेक ऐतिहासिक वास्तू, स्थळे, किल्ले, मंदिरे, मशिदी, चच्रेस असूनही आपण मात्र दुबईच्या तुलनेत या सगळ्याचा पुरेपूर वापर पर्यटनासाठी व देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी, परदेशी पर्यटकांना आकर्षति करून घेण्यासाठी करत नाही. कारण आपल्या राज्यकर्त्यांचा देशाच्या विकासाकडे, अर्थव्यवस्थेकडे बघण्याचा दृष्टिकोन! हे चित्र बदलले तर भारताचेही नाव पर्यटन क्षेत्रात आदराने घेतले जाईल.

– मिलिंद नेरलेकर, डोंबिवली