‘लोकरंग’मधील (२ जून) ‘..त्यांनी गिळावे सूर्यासी’ हा अतुल देऊळगावकर यांचा लेख वाचला. जगभरातील लहानग्यांना असलेले पर्यावरणभान आणि स्वत:चा काळवंडलेला भविष्यकाळ उजळवण्यासाठी त्यांचे प्रयत्न पाहून भर दुष्काळातही मनात आशेची पालवी फुटली.

आज पालकवर्ग आपल्या मुलांच्या भवितव्यासाठी पैसे कमावणे आणि ते साठवणे याला महत्त्व देत आहे. परंतु आपल्या पुढच्या पिढीचे अस्तित्व तेव्हाच टिकेल जेव्हा त्यांना शुद्ध पाणी, शुद्ध हवा मिळेल. विकसित देश विकसनशील देशांवर कुरघोडी करण्याच्या नादात वारेमाप कर्ब उत्सर्जन करत आहेत. परंतु ही भौतिक प्रगतीची स्पर्धा सगळ्यांसाठीच जीवघेणी ठरणार आहे. डॉ. जेम्स हॅन्सेन यांनी ३० वर्षांपूर्वी केलेली पृथ्वीच्या कडेलोटाची भविष्यवाणी खरी ठरताना दिसत आहे.

या पाश्र्वभूमीवर ही मुले देत असलेला लढा आणि त्याला जगभरातून मिळणारा पाठिंबा बघता, हे छोटे वीर अमेरिकी महासत्तेला वाकवणार यात तिळमात्र शंका नाही. सर्व पालकांनीही आपल्या पाल्यांच्या शाश्वत भवितव्यासाठी त्यांना साथ द्यावी. मूठभर भांडवलदारांच्या फायद्यासाठी प्रत्येक देशाच्या शासनकर्त्यांनी पृथ्वीचे अस्तित्व पणाला लावू नये. नाही तर जागतिक तापमानवाढीचा भस्मासूर त्यांच्या डोक्यावर हात ठेवल्याशिवाय राहणार नाही.

– बागेश्री झांबरे, नाशिक

 

विकास कोणत्या किमतीवर हवा?

अतुल देऊळगावकर यांचा ‘..त्यांनी गिळावे सूर्यासी’ हा लेख वाचला. जागतिक तापमानवाढ हा आज सर्वाधिक महत्त्वाचा प्रश्न आहे. ‘इंटरगव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज’ (आयपीसीसी) या हवामानबदलाचा अभ्यास करणाऱ्या संस्थेच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या अहवालात तापमानवाढीचा निर्वाणीचा इशारा जगाला आणि धोरणकर्त्यांना देण्यात आला आहे. सुमारे २५ वर्षांपूर्वीच- म्हणजेच १९९२ साली विज्ञान क्षेत्रातील अनेक नोबेल पारितोषिक विजेते व ‘युनियन ऑफ कन्सर्नड् सायंटिस्ट्स’ यांनी संयुक्तरीत्या मानवी समाजाला उद्देशून लिहिलेल्या पत्रात- ‘मानवी हस्तक्षेपामुळे पर्यावरणावर अतिशय गंभीर परिणाम’ होत असल्याचा इशारा दिला होता. तर २०१७ मध्ये जगभरातील तब्बल १५ हजार शास्त्रज्ञांनी- ‘आपण पृथ्वीच्या सहनशक्तीच्या सर्व मर्यादा ओलांडून जलद गतीने विनाशाकडे मार्गक्रमण करीत आहेत’ असे मत नोंदवले होते. मध्यंतरी ‘वर्ल्डवाइड फंड फॉर नेचर’चा ‘लिव्हिंग प्लॅनेट’ या शीर्षकाचा अहवाल प्रसिद्ध झाला. त्यात मानवाचा तथाकथित प्रगतीचा एकूणच हव्यास प्राणिमात्रांच्या- जैवविविधतेच्या कसा मुळावर आला आहे, याचे भयानक वास्तव सप्रमाण मांडले आहे. एकुणात, विकास हवाच; पण तो कोणत्या किमतीवर, याचे सारासार भान मानवाने गमावले असल्याचे दिसून येत आहे.

– बाळकृष्ण शिंदे, पुणे

 

रोग तसाच, मलमपट्टी झकास!

‘लोकरंग’मधील (२ जून) दत्तप्रसाद दाभोळकर यांच्या लेखाचे जे शीर्षक आहे, तोच प्रश्न विचारावासा वाटतो की- ‘पर्यावरण आपणास खरंच समजलंय का?’ कारण ‘पर्यावरण समजणे’ म्हणजे- आता ज्या देशांमध्ये समृद्धी (तथाकथित) आहे, तशी गरीब देशांमध्ये आणणे, कर वाढवून प्लास्टिक कचरा गोळा करणाऱ्यांना जास्त पैसे मिळवून देणे, रिसायकलिंगचे उद्योग वाढवणे, तंत्रज्ञान साक्षरता आणणे, औद्योगिक दूषित पाणी शुद्ध करून नद्यांमध्ये सोडणे एवढेच अभिप्रेत आहे का? हे तर अतिशय वरवरचे उपाय आहेत. ते करायला हवेच आहेत; पण ते करणे म्हणजे पर्यावरण समजणे नव्हे. ऊर्जेचा अफाट वापर कमी करणे, कारखान्यांत उपभोगाच्या वस्तूंच्या राक्षसी उत्पादनाला लगाम घालणे, नैसर्गिक संसाधनांचा विचारपूर्वक वापर करणे, अतिउपभोगाला आळा घालणे व पर्यावरणाचे मूलभूत शिक्षण देणे या गोष्टींचा विचार पुढे आला, तर ‘पर्यावरण समजले’ असे म्हणता येईल. तंत्रज्ञानाच्या अतिरेकी वापरामुळे तर पर्यावरण जास्तच धोक्यात आले आहे, हे लक्षात घ्यायला हवे.

दाभोळकरांनी सांगितलेले उपाय म्हणजे ‘रोग तसाच, मलमपट्टी झकास’ असे आहेत. मुळात समृद्धीची व्याख्या विचारपूर्वक तयार करायला हवी. आताच्या ऊर्जेच्या वापरावर व नैसर्गिक संसाधनांच्या ऱ्हासावर आधारित असलेल्या आणि शोषणवादी देशांनी लादलेल्या समृद्धीच्या व्याख्येमागे आपण लागलो; तर जैवविविधता नष्ट होईलच, पण तथाकथित समृद्धी नेहमीच दूर पळत राहणार. कर्जावर आधारित अर्थव्यवस्था आपण बदलत नाही तोपर्यंत आपल्याला ‘पर्यावरण समजले आहे’ असे म्हणता येत नाही. उद्योगांना सर्व संसाधने वापरायला मोकळे रान, त्यांनी उत्पादित केलेल्या उत्पादनांच्या विक्रीचे ओझे आणि त्या रेटय़ाखाली पिचलेला देश हे चित्र बदलण्यासाठी ‘पर्यावरण समजणे’ गरजेचे आहे. शिवाय अमर्याद लोकसंख्येबद्दल तर कोणीच अवाक्षरही काढत नाही. उलट ‘ते’ जास्त मुले जन्माला घालत असतील, तर ‘तुम्ही’ही घाला अशी विचारसरणी फोफावते आहे.

– भारती केळकर

 

धर्मच पर्यावरण वाचवेल का?

‘पर्यावरण आपणास खरंच समजलंय का?’ हा दत्तप्रसाद दाभोळकर यांचा लेख वाचला. ‘धर्म’ हा त्या लेखाचा विषय नसला तरी लेखाचा बराच भाग धर्मविषयक संकल्पनांवर खर्ची घातलेला आहे. त्यामुळे पर्यावरणाच्या प्रश्नातील गुंतागुंत आणि धर्म यांचा एकत्रित विचार मनात येतो आणि त्यामधून म्हटला तर गमतीदार, म्हटला तर गंभीर असा निष्कर्ष निघतो. पर्यावरणविषयक गुंतागुंत, हवा-पाण्याचे प्रदूषण आणि त्यामुळे होणारे दुष्परिणाम गंभीर रूप धारण करून जीवसृष्टीच्या मुळावर यायला हजारो वर्षे लागतात. माणसाची वृत्ती मात्र तात्कालिक स्वार्थ पाहण्याची असते. प्रदूषणामुळे इतर जीव मेले, समुद्राची पातळी वाढून काही माणसांचे जीव धोक्यात आले, मी राहतो तोच प्रदेश दोनशे वर्षांनी मानवी वस्तीस अनुकूल राहणार नाही, तरी मला काय त्याचे; कारण ‘मी तर तेव्हा नसेन..’ अशी विचारसरणी असते. विज्ञानाने कितीही सत्य सांगितले, शिक्षणाने कितीही समंजसपणा आणायचा प्रयत्न केला, तरी माणूस स्वत:च्या ‘आज’च्या स्वार्थाखेरीज दुसरा कुठलाही विचार गंभीरपणे करत नाही- अगदी स्वत:च्याच पुढच्या एखाद् दोन पिढय़ांचाही नाही- हेच कटू सत्य आहे. ‘प्रगत देशांनी हवे ते केले, मग आता विकसनशील देशांनी का म्हणून मागे राहायचे?’ हासुद्धा तसाच तात्कालिक स्वार्थविचार आहे.

अशा वेळी ‘मृत्यूनंतरही तुझे अस्तित्व राहणार आहे’, ‘या जन्मी केलेल्या चांगल्या-वाईट कृत्यांचा सारा हिशेब पुढच्या जन्मी इथेच येऊन चुकता करावा लागणार आहे’ अशी धारणाच मानवाला त्या तात्कालिक स्वार्थापलीकडे पाहायला भाग पाडेल का, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. लेखातच म्हटल्याप्रमाणे सर्व धर्म माणसाला त्याच्या अनादिअनंत काळच्या अस्तित्वाची ग्वाही देतात. पर्यावरणासारखे साऱ्या जीवसृष्टीला कवेत घेणारे, माणसाच्या अनेक पिढय़ांना पुरून उरणारे विषय आणि त्यातील समस्या सोडवायला शेवटी तोच धर्मविचार उपयोगी पडेल की काय, असा प्रश्न पडतो. आधुनिक वैज्ञानिक युगातील माणसाला पर्यावरणासारख्या जटिल समस्यांचे मूलभूत स्वरूप आणि त्याचे उत्तर शेवटी पौराणिक धर्मविचारातच मिळणार का?

– प्रसाद दीक्षित, ठाणे</strong>