सुभाष अवचट

रेखाचित्र : अन्वर हुसेन

IPL 2024 CSK Themed Wedding Invitation Card Went Viral
IPL 2024: चेन्नईच्या चाहत्यांचा नाद खुळा! CSK ची थीम अन् आयपीएलच्या तिकीटासारखी लग्नपत्रिका होतेय व्हायरल
Netanyahu
अग्रलेख: मिरवण्याच्या मर्यादा!
Shikhar Dhawan and Shubman Gill
 IPL 2024, GT vs PBKS: पंजाबच्या फलंदाजांचा कस! आज गुजरात टायटन्सचे आव्हान; गिल, धवनकडे लक्ष
Actor Sonu Sood made an anonymous post about trolling of Hardik Pandya
IPL 2024 : एक दिवस कौतुक करायचं, दुसऱ्या दिवशी हुर्यो उडवायची अशी वागणूक देशाच्या हिरोंना देऊ नका – सोनू सूद

माझा थोरला भाऊ अनिल! माझी आजी त्याला ‘नादिष्ट’ म्हणायची. लहानपणापासून त्याला अनेक गोष्टींचं कुतूहल असायचं. उकरणं-जोडणं या नादाने (अजूनही त्याला आहेच!) रेडिओ, घडय़ाळं, चाव्या, बासरी, पेटी, कॅमेरे, ओरोगामी, चित्रं, लाकूड साळणं, लिहिणं ते साबुदाणा खिचडी करणं अशा अनेक करामती तो करत आला आहे.

तो एम. बी. बी. एस. करत असतानाचे हे दिवस होते. त्याला पुतळे बनवण्याचा छंद लागला. ऑइल पेंटिंगही त्याचवेळी सुरू होतं. मला आठवतं, लोकमान्य नगरच्या त्या छोटय़ा घरात माती आली, प्लास्टर ऑफ पॅरिस, स्टूल, हत्यारे आली. बहुधा आइनस्टाईनचा पुतळा होणार होता. घरभर पसारा, पांढरी धूळ असायची. पुतळ्याला आकार येऊ लागला. त्याचे पानघंटी वगैरे मित्र तो पाहायला, चर्चा करायला यायचे. त्यात ‘शरद त्रिभुवन’ होता. चहाबरोबर सल्लामसलतही व्हायची. शरद त्रिभुवन हा चित्रकार होता. अनिलने काढलेल्या चित्रांवर तो बोलत असे. असे अनेक महिने झाल्यावर शेवटी आइनस्टाईन झाला. पण अनिलच्या मित्रांच्या बैठकी सुरूच राहिल्या. माझी आजी झोपताना त्या पुतळ्यावर टॉवेल टाकायची आणि म्हणायची, ‘‘मला त्या म्हाताऱ्याची भीती वाटते. सारखा एकटक बघतो.’’ अनिलच्या या छंदामुळे मीही त्यात लुडबुड करायला लागलो. तो जे करेल ते मी करावं असं वाटायचं. त्याच्याकडे छोटय़ा ऑइल कलरच्या टय़ूब्स असायच्या. तो अत्यंत जपून वापरायचा. एकदा मीही काही चित्रे काढली. त्याच्या जपून ठेवलेल्या टय़ूबा पिळूनच. आता रविवारी त्रिभुवन आला की त्याला चित्रे दाखवायची. आणि मी रविवारची वाट पाहू लागलो. शेवटी तो आला. त्यांच्या चर्चा सुरू असतानाच मीही त्यात घुसलो. हातातली चित्रे त्रिभुवनला दाखवीत म्हणालो, ‘‘ही माझी चित्रे!’’

त्रिभुवनने ती हातात घेतली. बराच वेळ पाहत राहिला असावा. मी खाली मित्रांबरोबर खेळायला गेलो. चित्रे, त्रिभुवन वगैरेंचा विसर पडला.

काही वेळाने त्रिभुवन खाली उतरला तेव्हा सायकल घेऊन ग्राऊंडमध्ये माझ्याकडे आला आणि म्हणाला, ‘‘अरे, तुझी चित्रे मला आवडली. तू चित्रकार होणार. माझ्या घरी ये. मग बोलू.’’

तो सायकलवरून निघूनही गेला. खेळायच्या नादात मी त्याचे निमंत्रणही विसरून गेलो.

पण माझ्या आयुष्यातल्या नवीन पर्वाची सुरुवात होणार होती, हे मला ठाऊक नव्हते.

त्रिभुवन हा एखाद्या स्पोर्ट्समनसारखा दिसे. त्याच्या मिशा, सावळा रंग, त्याचे दाट ट्रिम केलेले केस, व्यवस्थित खोचलेला शर्ट, बूट. तो चालतही मोजकी पावलं टाकीत असे. तो खडकीतल्या आर्मी वर्कशॉपमध्ये कामाला होता. खडकमाळ आळीत तो राहत असे.

बऱ्याच दिवसांनी मी त्याचं घर शोधीत गेलो. ही सर्व ख्रिश्चन लोकांची वस्ती होती. एका घरापाशी थांबून मी चौकशी केली तेव्हा कळले, दोन्ही बाजूच्या घरांच्या एका बोळात शेवटची कौलारू खोली त्याची होती. तो डेड एंडच होता. दुतर्फा घरांच्या पायऱ्यांपाशी फुलांच्या कुंडय़ा होत्या. दरवाजांना पांढऱ्या जाळीचे पडदे होते. त्या बोळात तिरकी उन्हं पसरली होती. त्यात चुन्याच्या पांढऱ्या भिंती अजून उठून आल्या होत्या. मी चालत त्याच्या खोलीपाशी आलो. समोरच्या पांढऱ्या भिंतीपाशी एक काळी बकरी उभी होती. कडेला झाकून ठेवलेलं एक ड्रम होतं. त्यात कोठला तरी पेंट मुरवायला ठेवला होता. त्रिभुवनची खोली मजेशीर होती. उजव्या बाजूला एक कॉट होती. दुसऱ्या भिंतीपाशी शेल्फवर  रंगाचे डबे, कॅनव्हास बोर्ड आणि कपाट होतं. सारे स्वच्छ. आणि फर्निचर ग्रे कलरमध्ये रंगवलं होतं. हा रंग त्रिभुवनने स्वत: तयार केला होता हे मला नंतर कळलं. आणि तो प्लॅस्टिक इमल्शन होता. त्यावेळी तो बाजारात आला नव्हता. रंगावर त्याने अनेक प्रयोग केले होते.

तेथे त्रिभुवनचे भिंतीवरचे चित्र मला आजही आठवते. ते कात्रज घाटाजवळच्या एक वस्तीचे होते. ऑइलमध्ये जाड थरात बनवले होते. एकात एक घुसलेली छोटी घरे, उतरत आलेली टेकडी, मागचे आकाश.. त्यात कोणतीही आऊटलाइन नव्हती. केवळ रंगांच्या विविध घरांचे आभास होते. इम्प्रेशनिझम्मध्येच त्याचे ते काम होते. त्यावेळी मला इतर चित्रकारांपेक्षा त्याचा वेगळा अ‍ॅप्रोच जाणवला.

मला म्हणाला, ‘‘चल, तुला आता बोर्ड करून देतो. एका हार्डबोर्डचा १५़ २० इंचाचा तुकडा त्याने घेतला. त्याच्या रफ साइडला त्याने ‘हबक’ मारला. हा ‘हबक’ म्हणजे प्रायमर आत्ताचा!

‘‘आता तो वाळला की त्यावर चित्र काढ!’’

पुढच्या भेटीत तोही एक मोठय़ा आकारातलं पेंटिंग करीत होता. मी विचारले, ‘‘हे कोठे पाठवणार?’’ तो म्हणाला, ‘‘बॉम्बे आर्ट सोसायटीचं प्रदर्शन आहे मुंबईला! तेथे पाठवणार.’’ मी खोलीच्या बाहेर हार्ड बोर्डवर पेंटिंगला सुरुवात केली. विषय अगदी साधा होता. तीन माणसे टेबलावर बसून गप्पा मारताहेत.

मला पेंटिंगचे कोठलेही अ‍ॅकॅडेमिक शिक्षण नव्हते. पुढेही झाले नाही. तीन डोकी आणि शरीराचे फॉर्म असेच ते चित्र झाले.

मला तो म्हणाला, ‘‘आता सही कर.’’ मी डौलात सही केली. मी अगदी मनमोकळा आणि आनंदी होतो. मी निघालो. पांढऱ्या भिंतीसमोरची काळी बकरी मान तिरकी करून बघत होती. तेव्हा ‘अभिनव कला’मध्ये मी पहिल्या वर्षांला होतो.

दोन-तीन महिन्यांनंतर त्रिभुवन अचानक घरी आला. ‘‘अभिनंदन!’’ मला म्हणाला.

‘‘कशाबद्दल?’’ मी विचारले.

‘‘अरे, तुझे चित्र बॉम्बे आर्ट सोसायटीला सिलेक्ट झाले. मी तुला न विचारता पाठवले होते.’’ आता मला- बॉम्बे आर्ट सोसायटी काय आहे? प्रदर्शन कसे असते? त्याचे काय महत्त्व असते? याची काही कल्पना नव्हती. मी विचारले, ‘‘तुझे मोठे पेंटिंग?’’

‘‘नाही, ते सिलेक्ट झाले नाही!’’ त्याने हे सांगितल्यावर मला राग आला तो त्या प्रदर्शनाचा!

पण त्रिभुवन आनंदी होता.

पुढे मला त्याने सांगितले की, भारतातील हे फार मोठे प्रदर्शन असते. अनेक मोठय़ा चित्रकारांची चित्रे त्यात असतात. फार मोठा मान असतो, वगैरे.

महिने उलटले. मी क्लासमध्ये काम करीत होतो. तेवढय़ात शंकर शिपाई आला आणि म्हणाला, ‘‘अवचट, डेंगळे प्राचार्यानी बोलावलंय.’’

मला धस्स झालं. सारे मित्र माझ्याकडे पाहू लागले.

‘‘अवच्या, आता तू काय केलेस?’’

मी प्राचार्याच्या केबिनमध्ये गेलो. तेथे खुर्च्यात अनोळखी लोक बसलेले होते.

डेंगळे म्हणाले, ‘‘हा तो अवचट!!’’

सारे लोक आश्चर्याने माझ्याकडे बघत होते. डेंगळे म्हणाले, ‘‘अरे, हे सारे मोठे चित्रकार आहेत. बॉम्बे आर्टचं प्रदर्शन येथे येणार आहे. त्यांना तुला भेटायचं आहे.’’

मला सारे भेटले. मी इतका लहान आहे यावर त्यांचा विश्वास बसत नव्हता. हिंदीमध्ये त्यांनी डेंगळ्यांना सांगितले, ‘‘इसका अच्छा काम है! जरा संभलना उसको!’’

त्रिभुवनने माझे ते चित्र पाठवून मला धक्का दिलाच होता.. हा दुसरा धक्का.

डेंगळ्यांनी शब्द पाळला. मला म्हणाले, ‘‘लँडस्केपला जा. मला चित्रे दाखवत जा!’’

आणि मग काय? मी शेफारलो. मला वाटले, मी आता मोठा चित्रकार झालो. माझी त्या वयात अचानक कॉलर ताठ झाली.

पंधरा-वीस चित्रं काढली. थाटात त्रिभुवनच्या घरी गेलो. मला आता अ‍ॅटिटय़ूड होती. त्रिभुवनने सारी चित्रं पाहिली. झाडे, रस्ते, गाई, म्हशी, देवळे अशी ती निसर्गचित्रे होती. मला म्हणाला, ‘‘स्टुलावर बस!’’ मी बसलो. एकेक करून त्याने सारी चित्रं फाडून टाकली. मला रडायला आलं. तो शांतपणे म्हणाला, ‘‘तुला खरा चित्रकार व्हायला खूप वर्षे आहेत. अशी चित्रं काढत जाऊ नकोस. ही तुझी स्टाईल नाही.’’

माझं सारं अवसान गळून गेलं होतं. मूर्ख गंड संपला होता. जमिनीवरच्या तुकडय़ांकडे पाहताना मला चित्रकलेतला पहिला धडा शिकायला मिळाला होता. पास झाल्यावर माझा स्टुडिओ टिळक रोडला होता. त्यावेळी मी अफाट काम करू लागलो होतो. वर्तमानपत्रांतील कंपन्यांच्या जाहिराती, डॉक्युमेंटरी कॅम्पेन, प्लॅनिंग, पुस्तकांची कव्हरे, कॅलेंडर्स, अ‍ॅन्युअल रिपोर्टस् अशा भरगच्च कामात मी डुबलेला होतो.

अचानक त्रिभुवन स्टुडिओत आला. त्याच्याकडे ईझल, ऑइल पेंट्स, ब्रशेस, कॅनव्हास असे सामान होते. त्याने ते सारे नीट लावले आणि म्हणाला, ‘‘तुझं चाललंय हे चांगलं आहे. अधूनमधून पेंटिंग करत राहा.’’ कमर्शियल काम करताना असं वाटतं, पेंटिंग काय, कधीही करता येईल. अशा भ्रमात माझ्या अनेक मित्रांचे पेंटिंग कायमचे दूर गेले ते गेले. पण त्रिभुवनने मला पराभूत होऊ दिले नाहीच; तर माझा रियाझ त्याने चालू ठेवला. एवढेच नाही तर त्यामुळे मी कमर्शियल दुकान कायमचे बंद केले आणि पेंटिंगच्या विश्वात कायमचा आलो.

त्रिभुवन मला घराजवळच्या चर्चमध्ये घेऊन जायचा. त्याचे नाव होते- पंचहौद मिशन! सत्तर सालाच्या आसपासचा हा काळ. या जुन्या चर्चचे मला फार आकर्षण. त्याची रचना, त्या कमानी, तिथली स्पेस मला फार भावली. त्यापेक्षाही मला आकर्षण होतं ते चर्चबेलचं. त्या मनोऱ्यावर मला तो अनेकदा घेऊन गेला. दोरखंडाने ती जड चर्चबेल वाजवायची. अचानक सारी कबुतरे उडायची. त्या चर्चबेलचा आवाज दूपर्यंत जायचा. वरून पुण्याचं गर्द झाडीतलं दर्शन व्हायचं. पण माझ्या या खेळाने त्रिभुवनला फादरने वेळोवेळी दटावले होते. त्रिभुवन कधी प्रार्थनेसाठी चर्चला गेल्याचं मला आठवत नाही. पण त्रिभुवनने मला ‘चर्च’ हा विषय दिला. पुढच्या काळात मी ठिकठिकाणची चर्चेस रंगवली. चर्चच्या आर्किटेक्चरमुळे म्हणा, तेथल्या चर्चबेल, ऑर्गनच्या गंभीर नादामुळे हा विषय पेंट करावासा वाटतो. चर्चच्या पांढऱ्या भिंती, खिडक्या, उंच झाडीत लपलेली गोव्याची, केरळातली ही चर्चेस.. सारं कलेक्शन टाइम्स ऑफ इंडियाकडे आहे.

माझं काम, परदेश प्रवास यांत त्रिभुवनला भेटणं राहून गेलं. मी पुण्यात होतो. अचानक मला त्रिभुवनची आठवण आली. मी माझ्या मित्राबरोबर खडकमाळ आळीत पोहोचलो. दुपारचे चार वाजले असावेत. जुन्या पुण्याने हळूहळू कात टाकायला सुरुवात केली होती. त्रिभुवनचे घर तसेच होते. त्या छोटय़ा बोळीतून मी आत आलो. पांढऱ्या भिंतीपाशी बकरी नव्हती. मी खोलीचं दार उघडलं. पलंगावर त्रिभुवन एकटा पडला होता. त्याचे डोळे पाण्याने भरले होते. मला पाहून तो विषण्ण हसला खरा. अगदी एकाकी झाला होता. मला त्याच्या कुटुंबाबद्दल काहीच माहिती नव्हती. एकदा कानावर आलं होतं, की त्याच्या प्रेमिकेनं त्याला नकार दिला. तो अविवाहितच राहिला. त्या खोलीतलं सामान जसंच्या तसं होतं. एकटेपणामुळं तो व्यसनाच्या आहारी गेल्याची बातमी होतीच. त्या स्टुलावर मी बसलो. जसा एकदा पूर्वी मी बसलो होतो.

मी विचारलं, ‘‘कसा आहेस?’’

त्याचे हात थरथरत होते. तोंडातल्या तोंडात तो काहीतरी पुटपुटत होता. मी उठलो. त्याच्या टेबलावर पाकीट ठेवलं आणि दरवाजा ओढून घेतला.

त्याने मला कलेच्या त्रिभुवनाचा एक छोटा दरवाजा उघडून दिला होता. ते ब्रह्मांड मला आयुष्यभर पुरणारं आहे.

Subhash.awchat @gmail.com