20 January 2021

News Flash

रफ स्केचेस् : गहन-गूढ जी. ए.

सहवास लाभलेल्या विलक्षण व्यक्तिमत्त्वांची आणि त्यांच्यासोबतच्या आनंदयात्रेची!

सुभाष अवचट.. wSubhash.awchat@ gmail.com

सुभाष अवचट.. चित्रकलेच्या दुनियेत मनमुक्त विहार करणारं कलंदर व्यक्तिमत्त्व. या साप्ताहिक सदरात ते शब्दचित्रं रेखाटणार आहेत.. सहवास लाभलेल्या विलक्षण व्यक्तिमत्त्वांची आणि त्यांच्यासोबतच्या आनंदयात्रेची!

जी. ए. कुलकर्णी आणि माझा तसा काहीच संबंध नव्हता. तो श्री. पुं.नी आणला.

मौजेचे श्री. पु. भागवत हे माझ्या अगदी विरुद्ध स्वभावाचे. आम्ही दोघे म्हणजे अक्षरश: दोन ध्रुव. ते एकदम व्यवस्थित, टापटीप राहणारे, मोजकं बोलणारे, मोजका आहार करणारे गृहस्थ. पेन्सिल कशी साळायची, तिचं टोक न तुटता कसं छिलायचं, कसं टोकदार करायचं, हे त्यांनी शिकवलं मला. त्यांच्यासाठी कित्येक पुस्तकांची मुखपृष्ठं, कथांसाठी रेखाचित्रं मी केली आहेत. श्री. पु. त्यासाठी माझ्याकडे पुण्याला येत असत. माझी तशी अटच असायची. ते जेव्हा येत असत, तेव्हा त्यांच्या हातात पुस्तक असे. ते तीन जिने चढून टिळक रोडवरच्या स्टुडिओत येत. मुखपृष्ठासाठीचं पुस्तक माझ्या हाती देत. मी माझ्या कामात अडकलेला असायचो. ते शांतपणे समोर बसून राहत. कसलीच प्रतिक्रिया देत नसत. मलाही काम करताना कितीही गर्दी असली, आरडाओरडा असला तरी त्याचा त्रास होत नसे. श्री. पु. तर शांत बसून राहत. मग मी त्यांना सांगे, ‘गुर्जी, पुस्तकाचं कव्हर करेन, पण तुम्हाला उसाचा रस प्यावा लागेल.’ बाहेरचं काहीही न खाणारे, पिणारे श्री. पु. मान हलवत व मग उसाचा रस पित. शेजारी काका हलवायाचं दुकान होतं. तिथून गरम गरम सामोसे मी मागवे. त्यांना खायला देई. ते निमूटपणे खात.

एकदा एका पावसाळ्यात श्री. पु. भागवतांचा निरोप आला, ‘मुंबईला या. एका कथेसाठी चित्रं करायची आहेत.’ मी ‘कथा पाठवून द्या’ असं म्हणालो. त्यांचं उत्तर : ‘नाही. तुम्ही गहाळ केली तर? मी तिकिटं पाठवतो. तुम्ही या.’ मला पावसाळ्यात भटकायला आवडतं. मी निघालो. डेक्कन क्वीनमध्ये आमची एक गँग होती. त्यांच्याबरोबर मुंबईत आलो. खटाववाडीतील मौजेच्या कार्यालयात पोचलो. धो-धो पाऊस पडत होता. मला पाहताच स्मितहास्य करून श्री. पु. म्हणाले, ‘या. चहा घेताय?’ मी- ‘अहो, आत्ताच मुंबईत आलो. पाजा चहा.’ श्री. पु. म्हणाले, ‘ही माझी खोली. मी इथं बसतो. तुम्ही इथं बसा. मी स्क्रिप्ट देतो, ते वाचा व नंतर पुण्यात जाऊन त्यावर चित्रं काढून द्या. दिवाळी अंकासाठी हवी आहेत.’

ते बाहेर गेले. माझ्या खुर्चीच्या मागून खटाववाडी दिसत होती. पाऊस मी म्हणत होता. मी चहा पिऊन कथा वाचायला लागलो. जी. ए. कुलकर्णी यांची ‘इस्किलार’ नावाची कथा होती ती. त्या कथेच्या गूढात मी गुंगून गेलो. एका दमात ती कथा वाचून काढली. मनात त्यावरून काही इम्प्रेशन्स तयार झाली होती. मी राम पटवर्धनांकडे कागद व पेन मागितलं. काही वेळातच टेबलावर सुंदर मॅप्लिथो कागदाची चळत, शाईची दौत, टाक, पेनं असं सारं येऊन पडलं. मी तिथंच बसून चित्रं काढली. काही वेळाने श्री. पु. आले. मला म्हणाले, ‘झाली का कथा वाचून? काही खाल्लं- प्यायलात की नाही? आता शांतपणे पुण्याला जाऊन मला चित्रं पाठवून द्या.’ मी- ‘अहो, पाठवून द्या काय? ही घ्या चित्रं.’ त्यांनी चित्रं पाहिली आणि खुशीत माझ्याकडे बघत स्मितहास्य केलं. ‘मी जाऊ?’ त्यांनी मान डोलवली. तेवढय़ात मला एक-दोन शिंका आल्या. श्री. पु.- ‘का हो? प्रकृती बरी नाही का?’ मी- ‘काही नाही, साधी सर्दी झालीय.’ त्यानंतर पुढचे तीन-चार महिने त्यांनी फोन केला की पहिली चौकशी- ‘आता प्रकृती कशी आहे? औषध घेता की नाही?’ अखेरीस मी त्यांना म्हणालो, ‘मास्तर.. अहो, साधं पडसं होतं ते. पुण्यात येईपर्यंत बरंही झालं.’ पण श्री. पुं.ची चौकशी कधीही थांबली नाही.

मौजेचा दिवाळी अंक यथावकाश प्रसिद्ध झाला. माझं काम जोरात सुरू होतं. एक दिवस राम पटवर्धनांचं पत्र आलं : ‘जी. एं.नी विचारलंय, हे सुभाष अवचट कोण आहेत, त्यांना मला भेटायचं आहे. अवचटांनी केलेली मूळ चित्रं मला हवी आहेत. तर आम्ही ती चित्रं त्यांना देऊ का?’ माझं उत्तर- ‘अहो, त्यांच्यासाठीच केली होती. बेलाशक द्या त्यांना.’ पटवर्धनांनी ती चित्रं जी. एं.कडे पाठवली. पोस्टाच्या कारभारामुळे ती थोडीशी खराब झाली.

काही दिवसांनी जी. एं.चं पत्र आलं आणि मग पत्रव्यवहाराचा सिलसिला सुरू झाला. त्यांनी मला दीड-दोनशे पत्रं लिहिली आहेत. (ही पत्रं कुठं कुठं प्रसिद्धही झाली आहेत. ‘जी. ए.- एक पोट्र्रेट’ या माझ्या पुस्तकातही त्यातली काही आलेली आहेत.)

मला जी. ए. कुलकर्णी ही काय चीज आहे, याची तोवर ओळख झालेली नव्हती. त्यांचा दबदबा केवढा आहे हे कळलं नव्हतं. मी आपला माझ्या जगात मश्गूल. हळूहळू जी. ए. काय आहेत, ते कसे कोणाला भेटत नाहीत, आपल्या घरात कोणाला घेत नाहीत, अगदी मंगेशकरांनाही त्यांनी घरात घेतलं नाही अशा गोष्टी कानावर आल्या. टीकाकारांच्या जगात ते एक मिथ म्हणून तयार झाले, हेही कळलं. एक कथाकार म्हणून त्यांचं ग्लॅमर तयार झालेलं होतं.

एकदा त्यांचं पत्र आलं- ‘मी तुम्हाला पाहिलं.’ मी विचारलं, ‘कुठे?’ जी. ए. – ‘तुमच्या स्टुडिओच्या खाली मी उभा होतो. तुम्हाला खाली उतरलेलं पाहिलं.’ ‘मग हाक मारायचीत की!’ त्यांनी लिहिलं, ‘नाही मारली.’ असे जी. ए.!

अनंतराव कुलकर्णी आणि जी. ए. दोघे मित्र होते. अनंतराव व ते एकमेकांना ‘अरे, तुरे’ करत असत, अशी त्यांची मैत्री. अनंतराव मला म्हणाले, ‘चल धारवाडला- माझं एक काम आहे. ते करू आणि जी. ए.ला भेटून येऊ.’ मी फिरस्ता. निघालो लगेच. त्यांच्याकडे कार होती. आम्ही निघालो. त्यावेळी माझ्यासोबत कॅमेरा असे. संध्याकाळी आम्ही धारवाडला पोहोचलो. अनंतराव मला म्हणाले, ‘तुला माहिती नाही- हा जी. ए. काय प्रकरण आहे ते! तो आता संध्याकाळी एका ब्रिटिशकालीन क्लबात ब्रिज वगैरे खेळत बसला असेल. त्याच्या तिथल्या सवंगडय़ांना हा मराठीतील थोर लेखक आहे याचा पत्ताही नसेल.’ आम्ही त्या क्लबात गेलो. आम्हाला पाहून ते चकित झाले. ‘तुम्ही इथं कसे?’ अनंतरावांनी फर्मान सोडलं, ‘चल, आता आपण जाऊ या.. काही खाऊ-पिऊ या.’ जी. ए. आमच्यासोबत निघाले. अनंतराव मला आधीच म्हणाले होते, ‘हा काहीतरी कारण काढेल आणि निघून जाईल.’ काही अंतर गेल्यावर जी. एं.नी सांगितलं, ‘मला एक काम आठवलंय. मी ते पुरं करतो. उद्या सकाळी भेटू या.’ असं म्हणून ते उतरून गेलेही. काही क्षणानंतर अनंतराव म्हणाले, ‘बाहेर उतरून बघ. जी. ए. कुठेतरी लपला असेल.’ मी उतरलो व बघितलं तर ते खरंच एका विजेच्या खांबाआड दडले होते. मी त्यांना म्हणालो, ‘काय हे जी. ए.? चला.. जेवण करा व मग कुठं जायचे ते जा.’ ते म्हणाले, ‘नाही. तुम्ही जा. मला खरंच काम आहे. उद्या सकाळी भेटू.’

दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही त्यांच्या घरी गेलो. त्यांच्या घराला एक कुंपण होतं व त्याला एक फाटक. फाटक व कुंपण इतकं उंच की माझा पाच वर्षांचा नातू त्यावरून उडी मारून जाईल. फाटकाला कुलूप लावलेलं. दोन नारळाची झाडं. पुढं व्हरांडा. त्यानंतर दार. त्यालाही एक कुलूप.. असं घर. त्यांच्या बहिणीनं पोहे करून आणले. जी. ए. सतत सिगारेट ओढत होते. मी म्हणालो, ‘जरा बाजारात जाऊन येतो.’ माझ्याकडच्या कॅमेऱ्याचा रोल संपत आलेला होता. मी बाजारातून कसाबसा एक रोल मिळवला. धारवाडात तेवढाच रोल उपलब्ध होता, तो जुना होता आणि त्याची छायाचित्रं फॉगी येण्याची शक्यता होती. मी त्यांच्या घरी परतलो व म्हणालो, ‘आता फोटो काढतो.’ जी. ए. गडबडीनं म्हणाले, ‘माझा फोटो काढू नका. मी कोणाला काढू देत नाही.’ माझं उत्तर- ‘तुमचे थोडेच फोटो काढणार आहे? मला कुलपांचे फोटो काढायचे आहेत.’ मी आपला कुलपांचे फोटो काढू लागलो. मग काय मनात आलं कोणास ठाऊक, जी. ए. मला म्हणाले, ‘कुलपांचे फोटो काढता येतात हे मला आत्ताच कळले. चला, आज माझे फोटो काढा.’ जी. एं.चे तेवढेच फोटो आज उपलब्ध आहेत. मी त्यांना गमतीत म्हणालो, ‘तुमचं नाक जरा वाकडं आहे, मी ते ठीक करून घेईन.’ आणि आमची दोघांची मैत्री सुरू झाली. जी. ए. पेंटिंगही करत असत. त्यांच्याबरोबर त्यांच्या पेंटिंगचेही फोटो मी काढले.

ज्या दिवशी इंदिरा गांधींची हत्या झाली, त्या दिवशी मी जी. एं.ना भेटलो होतो. त्या दिवशी गप्पांच्या दरम्यान मी त्यांना विचारलं, ‘तुमच्या कथांत हे इतकं सारं काही गूढ का असतं?’ त्यांनी मला विचारलं, ‘तुझा भुतांवर विश्वास आहे का रे?’ मी म्हणालो, ‘मला भुतं आवडतात. पण कधी भेटली नाहीत.’ ते पुढे म्हणाले, ‘अरे, मी विद्यापीठात जातो तेव्हा बसमध्ये एक लंगडा विद्यार्थी बसलेला दिसायचा. तो नेहमी पुढच्या सीटवर बसायचा. ड्रायव्हरजवळ एक काच असते, त्या काचेमध्ये तो मला दिसायचा. एकदा मी कॉलेजात पोचलो व लायब्ररीत गेलो, तर तो मुलगा तिथं बसलेला होता.’ मी विचारलं, ‘तो पायानं अधू आहे, आणि तुमच्या आधी तो कसा पोहोचला असेल?’ जी. ए. म्हणाले, ‘तेच गूढ आहे.’

ते पुढं म्हणाले, ‘माझी एक आत्या आहे. ती असल्याच गोष्टी सांगायची. मी तिच्याकडे गेलो होतो. तिच्या परसदारात कपडे वाळत घातलेले होते. आत्या आत काम करत होती. मला बाहेरचे कपडे अचानक पेटलेले दिसले. मी आत्याला ओरडून सांगू लागलो, ‘आत्या कपडे पेटलेत.’ तर ती म्हणाली, ‘अरे, बाहेर कपडे वगैरे काही नाहीये.’ ‘मला सांग- ही भुताटकी नाही तर काय आहे?’ त्यांनी आणखी एक गोष्ट सांगितली : ‘मी एका प्राध्यापक मित्राकडे गेलो होतो. त्याच्याकडे बसलो होतो तर एक छोटा मुलगा आतून बाहेर आला, मला हात लावला आणि गेला. थोडय़ा वेळाने दुसरा तसाच मुलगा आला व मला हात लावून गेला. तेवढय़ात ते प्राध्यापक बाहेर आले. त्यांना मी त्या गोड मुलांबद्दल सांगितलं, तर ते म्हणाले, आम्हाला मुलंच नाहीत.’ अशा इंटरेस्टिंग गोष्टी ते सांगायचे.

जी. ए. सांगत की, कावळ्यांना भुतं दिसतात. त्यांना बाजारात जाताना एका वाडय़ाबाहेर एक म्हातारी बसलेली दिसायची. ती कावळ्यांशी बोलायची. मी हे नेहमी बघत असे. एक दिवस ती म्हातारी व कावळे दिसले नाहीत. मी वाडय़ात जाऊन चौकशी केली, तर तिथली मंडळी म्हणाली, ‘कुठे म्हातारी आहे? इथं तर आम्हीच राहतो.’

हे असं ऐकून एक दिवस मी जी. एं.ना म्हणालो, ‘तुम्हाला भुतं आवडतात, मलाही आवडतात. एक काम करू.. इथं विजापूरजवळ एक गाव आहे. तिथे भुताचे भास होतात म्हणे. तिथं एकदा जाऊ.’

जी. एं.ना मी विचारलं, ‘काय हो, तो तुमच्या घरात आतमध्ये एक जिना आहे, तिथं कोणाला नेत नाही तुम्ही?’ ते म्हणाले, ‘माडीवर माझी खोली आहे. तिथं कोणाला का न्यावं?’ ती गूढ खोली होती. मी- ‘तुमच्या खोलीतून नारळाची झाडं कशी दिसतात?’ जी. ए.- ‘अवचट, मला सारखं वाटतं, नारळाचं झाड माझ्या खिडकीपाशी आलं आहे. त्याच्यावरून कोणीतरी भूत माझ्याकडे नक्की पाहत असणार.’ मी- ‘तुमची ही भुतं मला भयंकर आवडली. तुम्ही काहीतरी लिहा बुवा.’

जी. एं.नी भरपूर लिहिलं. त्यांच्या पुस्तकांची मी कव्हरं केली. ते एकदा पुण्यात आले, पण माझी व त्यांची भेट होऊ शकली नाही. त्यांचं निधन झालं त्यावेळी त्यांची अंत्ययात्रा कव्हर करण्यासाठी दूरदर्शनची मंडळी आली होती. त्यावेळी जी. एं.च्या देहावर पडून काही स्त्रियांनी त्या प्रसंगाचं चित्रीकरण होऊ दिलं नाही. म्हणाल्या, ‘असं चित्रीकरण त्यांना आवडणार नाही.’ मी म्हणालो, ‘इकडे या. जी. ए. गेलेत, पण त्यांचे फोटो मात्र माझ्याकडे आहेत. या अंत्ययात्रेचे चित्रीकरण करू द्या. एक डॉक्युमेंटेशन तयार होईल.’ पण माझं कोणी ऐकलं नाही.

मला नेहमी वाटतं, की पुण्यातल्या रस्त्यानं चालताना अचानक जी. एं.चं भूत भेटेल व आम्ही गप्पा मारत बसू.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2021 6:23 am

Web Title: loksatta rough sketches subhash awchat article about sketches subhash awchat paintings
Next Stories
1 उत्स्फूर्त गप्पा हाच संगीताचा स्वभाव!
2 थांग वर्तनाचा! : मानवी वर्तनाची पाळंमुळं
3 मोकळे आकाश.. :  दुधाची  पिशवी
Just Now!
X