16 January 2021

News Flash

थांग वर्तनाचा! : मानवी वर्तनाची पाळंमुळं

अथांग मानवी व्यवहारांचा थांग लावू पाहणारं पाक्षिक सदर..

अंजली चिपलकट्टी wanjalichip@gmail.com

अंजली चिपलकट्टी.. विज्ञान अभ्यासक आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील संशोधक. समाजशास्त्र, इतिहास, मानसशास्त्र, शिक्षण अशा आंतर-विद्याशाखीय अभ्यासात रस. न्यूरॉलॉजी, जनुकशास्त्र, अंत:स्रावशास्त्र या ज्ञानशाखा मानवाच्या वर्तणुकीवर आपापल्या परीने प्रकाश टाकत असतात. त्याबद्दल जाणून घेणारं आणि अथांग मानवी व्यवहारांचा थांग लावू पाहणारं पाक्षिक सदर..

गेल्या काही वर्षांत सगळ्यात जास्त संशोधन आणि माहिती संकलन झालेल्या काही मोजक्या विषयांपैकी एक म्हणजे मानवी वर्तणूक आणि मानसशास्त्र. माणूस जे वागतो, तसा तो का वागतो? त्यामागची स्वभाववैशिष्टय़ं कोणती? धारणा कोणत्या? त्या धारणा कशा तयार होतात? त्यावर प्रभाव टाकणारे घटक कोणते? काही गोष्टींमुळे आपण सहज प्रभावित होतो किंवा भावनाशील होतो, ते का? याविषयीचे सखोल संशोधन मानवी वर्तनशास्त्रात होत आहे. पण या संशोधनाचा हेतू नि उपयोग काय? कुतूहल? मानवजातीचं कल्याण? – हो आणि नाही. कारण याचा वापर ‘मार्केट’ आणि ‘सत्ता’ यांनी करायला सुरुवात केली आहे. माध्यमं, जाहिरात कंपन्या, निवडणुकांची स्ट्रॅटेजी आखून देणाऱ्या कंपन्या, शेअर मार्केटमधील बडय़ा असामी इत्यादी मानसशास्त्रज्ञ नेमतात व मानसशास्त्रीय संशोधनाला पैसा पुरवतात, ते उगीच नव्हे! आपल्या मालासाठी अनुकूल ग्राहक घडवणं, ‘अजेंडा’ला अनुकूल मतदार घडवणं हे या बाजाराचं उद्दिष्ट आहे. कोणी काही लपून कट-कारस्थानं वगैरे करत नाही. त्याची काही गरजच उरली नाही. कारण माणसांच्या धारणांवर प्रभाव पाडून त्या हव्या तशा वळवता आल्या तर त्या समूहांचा ताबा अलगद घेता येतो हे गेल्या काही वर्षांपासून ‘वरच्या’ लोकांना लक्षात आलंय आणि त्यानुसार ते व्यूह रचून राज्य करत आहेत.  आपण सर्वच जण प्रत्यक्ष यात सहभागी आहोत. मुद्दा हा आहे की, हे प्रभाव आपल्यावर कसे पडतात याबाबत आपण पुरेसे जाणकार नाही. आपली मागणी नसताना अनेक निर्णय जणू आपल्या कल्याणासाठी आहेत, हे पटवलं जातंय. ते कसं काय बुवा? हे समजून घ्यायचं असेल तर आपल्या मनाला ‘त्यांच्या’इतकंच आपणही समजून घेणं आवश्यक ठरतं. हेच या लेखमालेचं प्रयोजन आहे.

मानवी वैयक्तिक वर्तन आणि समूहवर्तन हे एकमेकांपासून वेगळे काढता येत नाहीत. किंबहुना, त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्यासारख्या परस्परपूरक अथवा भेदक असतात. (भेदक? का, ते नंतर ओघात येईलच.) समजा, एक माणूस आपल्या खोलीत बसून विचार करून काही निर्णय घेतो, किंवा घरात, मित्र-मैत्रिणींबरोबर बोलतो तेव्हा त्याला आपलं हे वर्तन ‘स्वेच्छे’नं केलेलं आहे असंच वाटत असतं. प्रत्यक्षात त्याच्यावर त्यानं पाहिलेल्या अनेक घटनांचा, माध्यमांतून पाहिलेल्या/ वाचलेल्या गोष्टींचा, अगदी सिनेमांचादेखील अदृश्य प्रभाव सतत काम करत असतो. हे प्रभाव एकत्रितपणे आपल्यावर परिणाम करतात आणि त्यातून आपल्या धारणा आणि वर्तन घडत असतं.

मानवी वर्तणुकीची मुळं शोधण्यासाठी विज्ञानाने काहीएक प्रवास केला आहे. माणूस म्हणजे जणू कोरी पाटी असून, त्याचं वर्तन त्याच्या पर्यावरणातील घटकांनुसार घडवता येतं, असा एक प्रवाह आहे (वर्तनवाद)! माणसाला जशा उद्दीपना/ प्रेरणा मिळतात, तसा त्याचा प्रतिसाद असतो आणि त्यातून ‘कंडिशनिंग’ होऊन त्याचं वर्तन हवं तसं बदलता येतं असं ही थिअरी मानते. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला याचा खूप प्रभाव होता. यातली त्रुटी म्हणजे माणसाच्या आंतरिक नैसर्गिक क्षमतांना/ प्रेरणांना यात फारसं महत्त्व दिलेलं नाही.

न्यूरॉलॉजी, जनुकशास्त्र, अंत:स्रावशास्त्र या शाखा मानवी वर्तनावर त्याची जनुके, शरीरात स्रवणारी संप्रेरके, शरीरातून मेंदूपर्यंत पोचणाऱ्या संवेदना, त्यांची तीव्रता ठरवणारी मेंदूतली संप्रेरके अशा जीवशास्त्रीय रचना आणि साखळ्या कसा परिणाम करतात हे अभ्यासतात.

याही पलीकडे उत्क्रांतीचा अभ्यास हा माणसाच्या वर्तनाचं मूळ हे त्याच्या ‘प्राणी-> आदिमानव—> मानव’ या प्रवासात कोणत्या सवयी त्याच्यात विकसित झाल्या, का झाल्या, त्या सवयींचं जनुकांत आणि मेंदूमध्ये ‘हार्ड वायरिंग’ कसं झालं असेल याचा अंदाज करत पुढे जातं. मनुष्य हा प्राणीच असून तो इतर सर्व सजीवांशी उत्क्रांतीच्या नात्याने जोडला गेला आहे. बोनोबो-चिम्पांझी अगदी जवळचे नातलग, उंदीर थोडा दूरचा, पक्षी-मासे-किडे-झाडे.. अशी ही नातलगांची गाडी सूक्ष्म जीवांपाशी येऊन थांबते. त्यातून काही समान जीवशास्त्रीय वारसा आपण उचलला आहेच. त्यामुळे माणसाच्या वर्तनाचा अभ्यास करताना काही प्राण्यांशी असलेलं त्याचं साधम्र्य लक्षात घेत, नेमके भेद कोणते, आदी बारकावे जाणत उत्क्रांतीचा अभ्यास आपल्याला सूक्ष्म दृष्टी देतो.

समाजशास्त्र माणसाचं समूहवर्तन, त्यातील बदल, पॅटर्न, माणूस-समाज यांतील अन्योन्य क्रिया, त्याची चिकित्सा आणि भाकितं असा व्यापक अभ्यासपट मांडते. माणसाचं काही इतर प्राण्यांशी असलेलं जीवशास्त्रीय साधम्र्य तसंच उत्क्रांतीतील नात्याचा आधार घेत मानवी वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी प्राण्यांवर प्रयोग केले जातात. काही प्राण्यांचा अभ्यास त्यांच्या नैसर्गिक अधिवासात केला जातो. अशा अभ्यासात (ए३ँ’ॠ८) कोणत्या पर्यावरणातील घटकाला कसा प्रतिसाद दिला, त्यामुळे काय बदल झाले, कोणत्या अनुकूलनामुळे मदत झाली असावी, नेमका कोणता जनुक संच बदलला असा माग काढत जावं लागतं. वैज्ञानिक प्रयोगशाळेत अभ्यास करण्यासाठी बऱ्याचदा उंदरांवर प्रयोग करतात.  ठरावीक उद्दीपनाला अपेक्षित प्रतिसाद मिळणं/ न मिळणं असा ‘रिडक्शनिस्ट’ दृष्टिकोन नसतो. प्राण्यांची नैसर्गिक अधिवासात निरीक्षणं केली जातात. त्यातून एखाद्या घटकावर विशिष्ट संदर्भात लक्ष केंद्रित करून प्रयोग केले जातात. पण इतर प्राण्यांची निरीक्षणं/ निष्कर्ष माणसाला कसे लागू करणार? तर असं सरसकटपणे इतर प्राणी = माणूस असं लागू केलं जात नाही. अनेक संदर्भानुसार वेगवेगळ्या घटकांचा एकमेकांवर होणारा परिणाम कसा असतो याचा सूक्ष्म अभ्यास केल्याशिवाय ते संशोधन योग्य समजलं जात नाही. विज्ञान नेहमी अभ्यासपूर्ण अंदाजच वर्तवतं.. ज्यानुसार ‘थिअरी’ तयार होते.

मानवी वर्तनासारखा गुंतागुंतीचा विषय अभ्यासताना वैज्ञानिकांना वरील विषयांच्या चौकटी एकमेकांत गुंफलेल्या आहेत याचं भान ठेवत आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन बाळगून; हळूवार, तरीही काटेकोरपणे एकेक गाठ उकलत गुंता सोडवावा लागतो. ते बघणं एखाद्या थ्रिलर सिनेमाइतकंच रोमांचक आहे.

मानवी वर्तनाचा अभ्यास जीवशास्त्रीय अंगाने करणं काही समाजशास्त्रज्ञांना रुचत नाही. कारण तसे केल्याने मानवी वर्तन हे ‘नियतीवादी’ (डिटरमिनिस्टिक) ठरवण्याचा प्रयत्न होतो असं त्यांना वाटतं. पण ही भीती बाजूला ठेवून खोल पाण्यात उतरलो तर तळ स्वच्छ दिसेल व त्यातून स्वभान व समाजभान दोन्ही मिळवता येईल.

मानवाच्या स्वभाववैशिष्टय़ांमध्ये विविधता असली तरी त्यात अनेक साम्यस्थळं, नियमितता (पॅटर्न) आहेत. आक्रमकता-हिंसकपणा, ताण-चिंताप्रवणता, चौकस बुद्धी, भाषाप्रवीणता, नावीन्याची ओढ, साहचर्य, प्रेम, लैंगिकता, सह-अनुभूती, करुणा ही वैशिष्टय़ं काही इतर प्राण्यांत दिसत असली तरी माणसाने काही खास अशी पातळी गाठली आहे.

विविध मानवी समूह आणि मानवी मनातील विविध भाव-जाणिवा व वर्तन यांत सध्या कधी नव्हे इतका विरोधाभास व संघर्ष दिसून येत आहे. विचारांमधल्या ग्रे-शेड्स नाहीशा होऊन मनं व समूह दुभंगल्यासारखे एकांगी झाले आहेत. असं का होतंय याची उत्तरं शोधणं हे विचारी मनाचं लक्षण तर आहेच; पण त्याकडे दुर्लक्ष करणं मानवी समाजाला महागात पडू शकतं.

अंदाजे १०० वर्षांपूर्वी कार्ल युंग या मानसशास्त्रज्ञाने असं म्हटलं होतं की, अबोध अंतर्मन हे एकेकाळी आपलं लपण्याचं आश्रयस्थान होतं. पण तेच आता भयस्थान झालं आहे. कारण तेही विज्ञान उलगडून दाखवतंय.  सध्या या संशोधनाचं जे उपयोजन चाललं आहे ते पाहता युंग हा द्रष्टा होता असंच वाटतं.

मन-शरीर यांच्यातलं अद्वैत, जाणीव-नेणीव हे विषय आता फक्त अध्यात्मात/ तत्त्वज्ञानात अभ्यासायचे विषय राहिले नसून, त्यांचा विज्ञानात प्रयोगांवर आधारित अतिशय काटेकोर आणि सखोल अभ्यास होतोय. मानवी स्वभाव, प्रेरणांचं गणित पूर्णाशाने सुटलं नसलं तरी खास मानवी असे पूर्वग्रह ओळखून त्या प्रेरणांना उद्दीपित कसं करायचं, हे मात्र ‘मार्केट’ने आत्मसात केलं आहे. त्यामुळे आपण सावध राहिलो नाही तर नक्कीच सावज होऊ! सावध राहायचं म्हणजे काय करायचं? तर मानवी वर्तनाचे, स्वभावाचे, पूर्वग्रहांचे आयाम समजून घेऊन सर्व मानवांना सामावून घेणारा विवेकी आणि बुद्धिप्रणीत विचार व वर्तन आपण करतो आहोत की नाही, हे सतत तपासत राहणं.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 10, 2021 6:08 am

Web Title: loksatta thang vartanacha anjali chipalkatty article about human behavior zws 70
Next Stories
1 मोकळे आकाश.. :  दुधाची  पिशवी
2 पुस्तक परीक्षण : करोनाकाळाला फिक्शनचा तडका
3 वेगळ्या वाटेवरच्या प्रेरणादायी व्यक्ती
Just Now!
X