हातान भरल्या हिरव्या बांगडय़ा
बांगडय़ा गो लग्नाच्या
हलदीनं भरलंय पातळ बायोचं
पातळ गो लग्नाचं..
रंगमंचावरची मुलं-मुली कोळीगीताच्या तालावर देहभान हरपून नाचत होती. गाण्यातल्या शब्दांनुसार चेहऱ्यावरचे आणि हावभावांतले लवचिक भावदर्शन, लयबद्ध हालचाली आणि त्यातली नजाकत अवघ्या देहबोलीतून साकारताना नृत्याचा आनंदही ती लुटत होती. कोळीगीतांच्या तालावरच नवरा-नवरीचं लग्न लागतं. त्यानंतर निघालेल्या वरातीत तर धमाल दंगा करताना मुलं स्वत:ला पार विसरूनच गेली होती. प्रेक्षकांमध्ये बसलेली त्यांच्या बरोबरीची इतर मुलंही जागेवरून उठून वरातीत उत्साहानं नाचू लागली. मुलांच्या या आनंदोत्सवानं भावुक झालेले त्यांचे शिक्षक-शिक्षिकाही मग वरातीत उत्स्फूर्तपणे सामील होत नाचू लागले. तेव्हा तर मुलांच्या आनंदाला पारावरच उरला नाही. आपल्या मुलांनी जग जिंकल्याचा आनंद त्या सहभागात होता. हे जगावेगळं दृश्य पाहताना प्रेक्षकांत बसलेल्या मुलांच्या पालकांच्या डोळ्यांतही अश्रू दाटले होते. पाणावलेल्या डोळ्यांनी आपल्या मुलांचं हे कौतुक अनुभवताना ‘खरंच, ही आपलीच मुलं का?,’ असा सुखद प्रश्नही त्यांना पडला होता. ज्यांच्या भविष्याबद्दलच्या चिंतेनं त्यांना रात्र-रात्र झोप लागत नव्हती, ती त्यांची मुलं आज सर्वसामान्य मुलांसारखी, किंबहुना त्यांच्यासारखीच एकापाठोपाठ एक सरस परफॉर्मन्सेस सादर करीत होती. नाचताना, गाताना, अभिनय करताना मधेच चोरून आपल्या पालक वा शिक्षकांकडे पाहताना त्या मुलांच्या नजरेत आत्मविश्वास ओसंडून वाहत होता. आम्हाला हे येतं, आम्ही हे करू शकतो, हा दुर्दम्य विश्वास त्यात होता. त्यांना त्यांचं स्वत्व सापडलं होतं.  
..कार्यक्रम संपला आणि सगळ्या मुलांवर कौतुकाचा एकच वर्षांव झाला. मुलांचे पालक, शिक्षक आणि निमंत्रित पाहुणे- सगळेच बेहद्द खूश झाले होते. बुजुर्ग अभिनेते प्रसाद सावकार आणि गोंयचे साहित्यिक व गोवा कला अकादमीचे माजी संचालक डॉ. पांडुरंग फळदेसाई यांनी या ‘विशेष’ मुलांचं भरभरून कौतुक केलं आणि या शिबिराची उपलब्धी आम्ही ‘याचि देही..’ अनुभवल्याची पावती त्यांनी दिली. ‘नाटय़शाला’ने विशेष मुलांसाठीचा हा उपक्रम एकदाच न करता गोव्यातल्या विशेष मुलांसाठी विविध कलांच्या प्रशिक्षणाचं कायमस्वरूपी केंद्र त्यांनी गोव्यात सुरू करावं, अशी विनंती लोकविश्वास प्रतिष्ठानचे विश्वस्त अनुप प्रियोळकर यांनी यावेळी केली. यासंदर्भात लोकविश्वास प्रतिष्ठान पुढाकार घेऊन सर्वतोपरी साहाय्य करील, असे भरभक्कम आश्वासनही त्यांनी दिले. इतक्या प्रचंड प्रमाणावर यशस्वी झालेलं शिबीर यापूर्वी आपण पाहिलेलं नाही, असे कौतुकोद्गार ज्येष्ठ रंगकर्मी आणि नाटय़शालेचे मार्गदर्शक प्रा. कमलाकर सोनटक्के यांनी याप्रसंगी काढले.
गोव्यातील कवळ्याच्या शांतादुर्गा मंदिराच्या निसर्गरम्य, प्रसन्न परिसरात विशेष मुलांसाठी शैक्षणिक कार्य करणाऱ्या ‘लोकविश्वास प्रतिष्ठान’ या संस्थेनं गोव्यातल्या विशेष मुलांसाठी योजलेल्या या शिबिराच्या संयोजनाची जबाबदारी स्वीकारली होती. महाराष्ट्रात गेली ३२ वर्षे विविध प्रयोगक्षम कलांच्या माध्यमातून विशेष मुलांच्या व्यक्तिमत्त्व विकासाचे कार्य करणाऱ्या ‘नाटय़शाला’ या संस्थेच्या सहयोगानं बारा दिवसांचं हे शिबीर गोव्यातील अंध, मूकबधीर आणि मतिमंद मुलांसाठी आयोजित करण्यात आलं होतं. गोव्यातील निरनिराळ्या शाळांमधील १६० विशेष मुलांनी त्यात सहभाग घेतला होता. शिबिरार्थीमध्ये तीव्र मतिमंद मुलांचं प्रमाण सर्वात जास्त होतं. ऐन सुटीच्या दिवसांत मुलांना या शिबिराला पाठवायला पालक सुरुवातीला अनुत्सुक होते. सकाळी नऊ ते संध्याकाळी साडेचापर्यंत चालणाऱ्या शिबिरात येण्यासाठी गोव्यातल्या निरनिराळ्या भागांत राहणाऱ्या मुलांना सकाळी लवकर घर सोडावं लागणार होतं आणि संध्याकाळी घरी परतायलाही उशीर होणार होता. घरी व शाळेतही अत्यंत सुरक्षित वातावरणात वाढणाऱ्या या मुलांना इतका वेळ बाहेर राहू देण्यास त्यांच्या पालकांचा त्यांच्या काळजीपोटी विरोध असणं स्वाभाविकही होतं. परंतु शिक्षकांच्या पाठपुराव्यामुळे त्यांनी मुलांना पाठवायला संमती दिली. एकदा शिबिरात आल्यावर मात्र मुलं नाच-गाण्यांत, नाटकात, वाद्यवादनात, मल्लखांब तसंच दोरीवरील कसरतींत अशी काही रमली, की कुणीही शिबिराला दांडी मारली नाही. शिबिराच्या सांगता सोहळ्यातील सादरीकरणाच्या वेळी दोन मुलांना बरं नसतानाही ती पालकांकडे हट्ट करून कार्यक्रमाला आवर्जून हजर राहिली.. म्हणजे बघा!  
गोव्याच्या निरनिराळ्या शाळांतली, एकमेकांशी जराही परिचय नसलेली ही मुलं शिबिरात इतकी विरघळून गेली होती, की सोबतच्या मुलांना प्रोत्साहन देणं, त्यांचं कौतुक करणं, एखाद्याचं काही चुकलं तर त्याला त्याची न दुखवता जाणीव करून देणं, एकमेकांना सांभाळून घेणं, परस्परांना मदत करणं.. अशा प्रकारचं हृद्य सौहार्द या मुलांमध्ये नकळत निर्माण झालेलं अनुभवायला मिळालं. अंध मुलांची घ्राणेंद्रिये तीक्ष्ण असतात. त्यामुळे नाटकात भाग घेण्यात त्यांना फार अडचण येत नाही. रंगमंचावरील दिशेचं व हालचालींचं ज्ञान व भान योग्य तऱ्हेनं त्यांना दिल्यास ती उत्तम कामं करतात. त्यांना थोडा आत्मविश्वास देणं मात्र गरजेचं असतं. अंध मुलांनी ‘बैल झपाटला’ ही नाटिका अत्यंत सफाईदारपणे पेश केली. समूहगानही त्यांनी उत्तमरीत्या सादर केलं. मूकबधीर मुलांना श्रवण व बोलणं या दोन्ही गोष्टी शक्य नसल्यानं समोरच्याच्या हालचाली व खुणांची भाषा यावरच ती विसंबून असतात. वाद्यवादन, मल्लखांब व नृत्यं आत्मसात करताना त्यांना खुणांची ही भाषाच साथ करते. या मुलांनीही दणकेबाज परफॉर्मन्ससेस दिले. मतिमंद मुलांच्या बाबतीत मात्र अनेक समस्यांशी झगडावं लागतं. एखादी गोष्ट आत्मसात करण्सासाठी त्यांना बरेच कष्ट करावे लागतात. याचं कारण शारीर हालचालींतील समन्वय, बौद्धिक समज, स्मरणशक्तीच्या मर्यादा अशा अनेक त्रुटींवर त्यांना मात करावी लागते. शिबिरात तीव्र मतिमंदत्व असलेली बरीच मुलं होती. त्यांच्या या त्रुटींवर मात करत त्यांना नाच, गाणी, वाद्यवादन, लेझीम वगैरे शिकवायचं होतं. या मुलांकडून मल्लखांबाचे व शारीरिक कवायतीचे प्रकार करवून घेणं हे तर मोठंच आव्हान. परंतु सामान्य मुलांप्रमाणे त्यांना लीलया कसरती करताना पाहून सर्वानीच आ वासून तोंडात बोटं घातली. मुळात मल्लखांबावरील क्रीडाप्रकार त्यांना शिकवता येतील का, याबाबत शिक्षकही सुरुवातीला साशंक होते. ज्यांना साध्या रोजच्या व्यवहारातल्या गोष्टी करतानाही इतरांची मदत घ्यावी लागते, ती शारीरिक व बौद्धिक ताळमेळाची मागणी करणारा हा खेळ कसा काय करू शकतील असं त्यांना वाटत होतं. पण मुलांनी त्यांचा अविश्वास साफ खोटा ठरवला. या शिबिराची ही मोठीच उपलब्धी होय.
प्रयोगक्षम कलांचा विशेष मुलांच्या बाबतीत थेरपीसारखा वापर करण्याचं तंत्र ‘नाटय़शाला’ने गेल्या अनेक वर्षांच्या आपल्या प्रदीर्घ अनुभवांतून विकसित केलेलं आहे. याचा सकारात्मक प्रत्यय नाटय़शालेच्या विशेष मुलांच्या नाटय़स्पर्धातून नेहमीच येतो. लोकविश्वास प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या या शिबिरात हा समृद्ध अनुभव गोव्यातल्या विशेष मुलांच्या शाळांतील शिक्षकांनी समरसून घेतला. विशेष मुलांच्या शाळांमधील बहुसंख्य शिक्षक हे समर्पणवृत्तीनंच काम करीत असतात. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी वाट्टेल ते करायची त्यांची तयारी असते. शिबिरात सहभागी झालेले बहुतेक शिक्षक हे पंचविशीच्या आतले होते. त्यांच्यात नवं काही शिकण्याचा, आत्मसात करण्याचा प्रचंड उत्साह जाणवला. आपल्या मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी जे जे करणं शक्य आहे, ते करण्यास ते मागेपुढे पाहत नाहीत, हा अनुभव याही शिबिरात आला. ‘या शिबिरात शिक्षक म्हणून तुम्हाला काय मिळालं?,’ असं विचारलं असता सर्वानीच ‘हा एक अद्भुत अनुभव होता,’ अशी एकमुखी कबुली दिली. ‘ज्या मुलांना एक गोष्ट शिकवायला आम्हाला वर्गात दोन-दोन दिवस लागतात, ती मुलं इथं चटकन् आत्मसात करताहेत, हा आमच्याकरता चमत्काराचाच क्षण होता. आज आमची मुलं ज्या आत्मविश्वासाने स्टेजवर नाच-गाणी, लेझीम, नाटुकलं, मल्लखांब प्रकार करताहेत, ते पाहताना आम्ही खरंच भरून पावलो. त्यांनी आम्हा सर्वाच्या बारा दिवसांच्या अथक कष्टांचं चीज केलं. ज्या अनेक गोष्टी शिकायला त्यांना कदाचित वर्षे लागली असती, त्या गोष्टी एकाच वेळी आमची मुलं इथं इतक्या अल्प अवधीत शिकली, यावर अद्याप आमचा विश्वास बसत नाहीए. सार्थकतेचे हे क्षण आम्ही कधीच विसरू शकणार नाही. मुलांच्या पालकांनाही आपल्या मुलांमधलं हा आमूलाग्र बदल थक्क करणाराच वाटतोय. नाटय़शालेनं हे तंत्र आम्हा शिक्षकांनाही शिकवायला हवं. विशेष मुलांच्या शालेय अभ्यासक्रमाचा तो एक भाग असायला हवा. नाटय़शालेनं आम्हा शिक्षकांसाठीही असं एखादं शिबीर घ्यायला हवं असं आम्हाला वाटतं..’ शिक्षकांच्या या भावना अत्यंत मन:पूर्वक होत्या. या शिबिरामधलं लोकविश्वास प्रतिष्ठान शाळेचे मुख्याध्यापक अरविंद मोरे सरांचं योगदान शब्दांच्या पलीकडचं आहे. हे गृहस्थ दिवसाचे २४ तास अखंड बारा दिवस (तत्पूर्वी पूर्वतयारीत किती दिवस, कुणास ठाऊक!) राबराब राबत होते. तेही सदा हसतमुख चेहऱ्यानं! नाटय़शालेच्या संचालिका कांचन सोनटक्के यांची सळसळती ऊर्जा, परिपूर्ण नियोजन आणि त्याची काटेकोर अंमलबजावणी, तसंच शिबिरातला त्यांचा अष्टावधानी संचार या शिबिराच्या यशस्वीतेमागे नेहमीप्रमाणे होताच. त्यांच्या बरोबरीनंच नाटय़शालेचे तज्ज्ञ प्रशिक्षक शिवदास घोडके, प्रदीप जोशी, देवेन्द्र शेलार, उदय देशपांडे, रमाकांत मालपेकर, शिवशंकर गवळी आणि विनोद कारकर यांनी या ओल्या मातीच्या कोवळ्या गोळ्यांना आकार देऊन त्यांच्यातले कलागुण बाहेर काढले, ते हळुवार फुंकर घालून फुलवले आणि त्यांचं देखणं रूप विविध सादरीकरणांतून त्यांनी लोकांसमोर पेश केलं. त्यामागचे त्यांचे कष्ट आणि कौशल्य याला दाद द्यावी तेवढी थोडीच. या देखण्या रंगमंचीय सादरीकरणांमागचा अदृश्य चेहरा होता प्रकाशयोजनाकार अरुण मडकईकर यांचा! नाटय़शालेच्या उपक्रमांमागचा समर्थ कणा हेच वर्णन त्यांना लागू पडतं.
गोंयच्या तांबडय़ा मातीतल्या या ‘विशेष’ हिऱ्यांमध्ये दडलेले सुप्त कलागुणांवर चढलेली धूळ झटकून त्यांना योग्य ते पैलू पडताना पाहणं हा एक नितांतसुंदर अनुभव होता यात शंका काही नाही. दिव्यत्वाची ही प्रचीती बाकिबाब बोरकरांच्या शब्दांत सांगायचं तर मनात ‘अजुनि करते दिडदा दिडदा..’