News Flash

‘द लॉर्ड ऑफ द रिंग्ज’चे महाकाय शिवधनुष्य

जे. आर. आर. टॉल्किन्स यांची ‘द लॉर्ड ऑफ द िरग्ज’ ही कादंबरी त्यांनी निर्मिलेल्या दंतकथा साम्राज्यातील एक सर्वात महत्त्वाची, सर्वात लोकप्रिय कादंबरी समजली जाते.

| June 28, 2015 12:21 pm

जे. आर. आर. टॉल्किन्स यांची ‘द लॉर्ड ऑफ द रिंग्ज’ ही जगभरातील आबालवृद्धांना खिळवून ठेवणारी महाकाय अद्भुतरम्य महाकादंबरी. आजवर तिचे जगातील ३८ भाषांतून अनुवाद झाले आहेत. मराठीत मुग्धा कर्णिक यांनी ‘स्वामी मुद्रिकांचा’ या नावाने तिचा नुकताच त्रिखंडात्मक अनुवाद केला आहे. डायमंड प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या अनुवादकाचे हे मनोगत..
जे. आर. आर. टॉल्किन्स यांची ‘द लॉर्ड ऑफ द िरग्ज’ ही कादंबरी त्यांनी निर्मिलेल्या दंतकथा साम्राज्यातील एक सर्वात महत्त्वाची, सर्वात लोकप्रिय कादंबरी समजली जाते. लेजंडॅरियम किंवा मायथोपिया म्हणतात त्या साम्राज्याला. यात ‘द सिल्मारिलिऑन’, ‘द हॉबिट’ आणि मग ‘द लॉर्ड ऑफ द िरग्ज’चे तीन भाग अशी पाच पुस्तके आहेत. १९५४ मध्ये प्रकाशित झालेल्या या कादंबरीच्या मागेपुढे असलेल्या अनेक कथानकांवर, उपकथानकांवर त्यांनी आणखी अनेक पुस्तके लिहिली. उपसंहार, परिशिष्टे यातूनही भरभरून कथा येतात. पण या दंतकथा साम्राज्यात सर्वात लोकप्रिय ठरली ती ‘द लॉर्ड ऑफ द िरग्ज’ ही तीन भागांतील कादंबरी. ‘द हॉबिट’, ‘द लॉर्ड ऑफ द िरग्ज’ या साहित्यकृतींची माहिती आपल्याकडे बहुतेकांना अगदी अलीकडे त्यावर हॉलीवूड चित्रपट आल्यानंतर झाली. पण पाश्चिमात्य जगात या कलाकृती वाचकांच्या मनावर गेली अनेक वष्रे अधिराज्य करीत आहेत. साहस, सुष्ट-दुष्टांची लढाई, रहस्ये, जादू वगरे किशोरांना आवडणारे सर्व स्वाद घेऊन आलेली ही फॅण्टसी प्रकारातली साहित्यकृती आहे. फॅण्टसीज्- अद्भुतरम्य साहित्यकृती तर जगभरच्या अनेक भाषांत आहेत; पण टॉल्किन्सच्या भाषावैभवामुळे, लालित्यामुळे या फॅण्टसीची मजा काही और आहे.
१९५४ साली टॉल्किन्सची ‘द लॉर्ड ऑफ द िरग्ज’ ही महाकादंबरी प्रथम प्रसिद्ध झाली. आजवर या पुस्तकाच्या १५० कोटींच्या वर प्रती खपल्या आहेत. जगभरातील ३८ भाषांमध्ये या महाकादंबरीचे अनुवाद झालेले आहेत. आता या अनुवादामुळे मराठी ही ३९ वी भाषा ठरली आहे.
किशोरांपासून प्रौढ वयातील वाचकांच्याही हृदयात स्थान मिळवलेल्या ‘लॉर्ड ऑफ द िरग्ज’ या जे. आर. आर. टॉल्किन्सच्या महाकादंबरीचा ‘स्वामी मुद्रिकांचा’ हा अनुवाद मी केला तो माझी मुलगी अमृता कर्णिक हिच्या प्रेमाग्रहाखातर. माझी दोन्ही मुले टॉल्किन्सच्या लेखनशैलीची, भाषेची चाहती. मी मुळात ते पुस्तक वाचले ते त्यांच्या आग्रहानेच. पंधरा वर्षांपूर्वी टायफॉईडने आजारी असताना सक्तीच्या विश्रांतीने बांधून घातल्यावर ‘एलोटीआर’ (याच संक्षिप्त नावाने हे पुस्तक जगभर ओळखले जाते.) दहा दिवसांत वाचून पूर्ण केले होते. अनुवाद करताना १० एप्रिल २०१३ ते २६ सप्टेंबर २०१४ एवढा काळ लागला. ‘अॅटलस श्रग्ड’ किंवा ‘फाऊंटनहेड’ या दोन्ही अनुवादांच्या वेळी जो वैचारिक ताण, दु:खाची टोचणी जाणवत होती, तिचा लवलेशही हा अनुवाद करताना जाणवत नव्हता. एक आनंदयात्राच होती ती. टॉल्किन्सने ही कादंबरी कशाचेही रूपक म्हणून लिहिलेली नसल्याचा दावा केला असला तरीही तसा संशय खासच येतो. त्यातली साहसकथा आणि कथनशैली यापलीकडे मला त्या तथाकथित रूपकात किंवा त्यातून डोकावू पाहणाऱ्या मतात यित्कचितही रस नाही, हे मी येथे विशेषत्वाने सांगू इच्छिते. त्यात उघडच भासणारा आक्रस्ताळा उद्योग, तंत्रज्ञानविरोध हा मला सर्वस्वी त्याज्यच वाटतो. पण तरीही एक गोष्ट म्हणून विचार करायचा तर- किती प्रचंड काम करून ठेवलं होतं जॉन रोनाल्ड रुएल टॉल्किन्सने! एक काल्पनिक काळ- आद्ययुग ते चतुर्थ युग- ही कथा जिथे घडते तो एक काल्पनिक भूभाग- मध्य वसुंधरा.. त्याचा तपशीलवार नकाशा आणि प्रत्येक घटनेच्या वेळी अचूकपणे दिशांचे भान ठेवण्याची काळजी घेणे, त्यातील काल्पनिक लोक हॉबिट्स, ड्वाव्र्ज, एल्व्ज, ऑर्क्स, एन्ट्स, जादूगार, त्यांच्या विविध भाषा, प्राचीन-अर्वाचीनांचे फरक, त्यांचे इतिहास आणि मग कथा घडते तो त्यांचा वर्तमानकाळ.. एक महाकॅनव्हास!
जे. आर. आर. टॉल्किन्स स्वत: एक चांगले चित्रकार होते. सुरुवातीला त्यांनी आपल्या कल्पनेतून स्फुरलेल्या अनेक पात्रांना, भूप्रदेशांना चित्ररूप दिले होते. त्यांच्या रेखाटनांचे, रंगचित्रांचे एक पुस्तकही प्रसिद्ध झाले आहे. त्यांनी उभ्या केलेल्या प्रत्येक वंशात त्यांनी अनेकविध पात्रे निर्माण केली आहेत. कथानायक एकच नसून अनेक आहेत. खलनायकही अनेक आहेत. प्रमुख खलनायक तर कुठेही समोर येत नाही; पण त्याची छाया- काळी छाया संपूर्ण कथानकात संपृक्त आहे. भूप्रदेशांच्या वर्णनांचेही तेच. दिवस-रात्रीच्या प्रहरांच्या, ऋतुचित्रांच्या वर्णनांचेही तेच. टॉल्किन्सची तपशील भरण्याची शैली एखाद्या फ्लेमिश मास्टर चित्रकारासारखी आहे. विशेषत: रुबेन्सच्या रंगशैलीची आठवण होईल, अशी. तो एखादा धावत सुटलेला कुत्राही चित्रात पकडतो. तसंच टॉल्किन्स घटना घडत असताना कुठूनतरी डोकावणाऱ्या कोल्ह्य़ाचाही संदर्भ शब्दांत पकडतात.
शायरचे गाव, टॉम बॉम्बाडीलचे प्राचीन जंगल, लॉथलोरिएनचे सुवर्णारण्य, निम्रोडेलचा झरा, मिररमिअर अशा सुंदर अनुभवांसाठी त्यांचे शब्द झुळझुळतात. गूढ भासणाऱ्या फॅनगॉर्नच्या अरण्यासाठी ते जणू धुक्यात बुडी मारतात. ऑथॅंक, मोरिया, बाराद-डूर आणि अंतपर्वताच्या भयप्रद रंगांसाठी त्यांचे शब्द जणू विविध कृष्णछटा लेऊन येतात.
ट्रीबिअर्ड या चालत्या-बोलत्या वृक्षाचे- खरे तर वृक्षपाळ एन्टचे पात्र उभे करताना टॉल्किन्सने स्वत:चेही सारे भाषाप्रभुत्व मागे टाकले आहे. जगाच्या प्रारंभापासून असलेल्या या प्रजातीच्या संवेदना, समज, जगाबद्दलची भावना आणि त्यांच्या डोळ्यांतले भाव मांडताना टॉल्किन्सने शब्दांमधून जी खोली दिली आहे, त्यातून भूशास्त्राची माहिती असलेले वाचक सहजपणे डेवोनियन कालखंडाच्या अखेरीस- सुमारे अडतीस कोटी पन्नास लक्ष वर्षांपूर्वीच्या वृक्षविश्वात पोहोचतात. साधेपणाने वृक्षांबद्दल प्रेम असलेले सारे वाचक मोहून जातात.
त्याच कौशल्याची परिसीमा गॉल्लम या नियतीवश खलजीवाचे लिबलिबीत, गिळगिळीत, खुनशी आणि तरीही केविलवाणे व्यक्तिमत्त्व उभे करताना त्यांनी दाखवली आहे.
प्रचंडच होते हे शब्दचित्रलेपन. या साऱ्या शब्दचित्राचा तितक्याच तपशिलांसकट- कुठेही काटछाट, संक्षिप्तीकरणाचा शॉर्टकट न मारता शब्दभावनिष्ठ अनुवाद करण्याचे काम मी माझ्या मला येत असलेल्या भाषांवरील- मराठीवरील आणि इंग्रजीवरील- प्रेमाने केले आहे. क्वचितच कधीतरी झोपेच्या अमलाखाली जाऊन पचपचित अनुवाद केलाच, तर जागवणारी टोचरी बुद्धी अमृता, धनंजय आणि नीलेश यांच्या सावचित्त देखरेखीने तो न कंटाळता बदललाही. त्यात आलेली पद्य्ो, कविता अनुवाद करताना मराठीतून टॉल्किन्सच्या भाषासौंदर्याचे आव्हान पेलायचे होते. पद्यांचा अनुवाद करताना चिकाटीने तीन-चार वेळा अनुवाद बदलला. त्यांनी वापरलेल्या विविध भाषांचे सारेच पलू मराठीतून आणणे शक्य होत नाही. पण काही मराठीचे विशेष पलूही मला वापरता आले. एक अभ्यासक म्हणतात की, टॉल्किन्सने शेक्सपिअरच्या ‘किंग लिअर’मधील विलापावर आधारित काही संवाद रचले आहेत. सुंदर ते घेण्याची इच्छा कुणाही सर्जनशीलाला होतेच. सलील चौधरींनी मोझार्टच्या सिंफनीमधला तुकडा उचलला आणि त्यावर आपली बांधणी केली, हे सांगताना त्यांना अभिमान वाटायचा. टॉम बॉम्बाडीलच्या नदीकन्या गोल्डबेरीच्या वर्णनात किंवा त्या संपूर्ण भागातच बालकवींच्या शब्दरचनेची मला ठायी ठायी आठवण येत होती. आणि मग त्यांना प्रणाम करताना त्यांचे शब्द मी नदीकन्येवरल्या त्याच्या पदाच्या अनुवादात वापरले आहेत..
त्या डोहाच्या काठावरती
प्रथम गवसली होती मजला
ही सुंदरशी नदीकन्या
‘हरिततृणांच्या मखमालीवर’
बसली होती सोनपरी
सुंदर माझी गोल्डबेरी
स्पंदन स्पंदन गोड सुरांचे
गीत गातसे गोल्डबेरी..
‘द रेड बुक’ नावाच्या काल्पनिक पुस्तकाचा वेस्ट्रॉन या इंग्रजीसदृश भाषेत आपण हा अनुवाद केला आहे, अशी मांडणी टॉल्किन्सने केली आहे. पात्रांची बोलण्याची भाषा वेगवेगळी असली तरीही सोयीसाठी सारेजण एकच सामान्य संपर्कभाषा वापरतात, हेही कौशल्याने दर्शवले आहे. जुन्या इंग्रजी भाषेतील शब्द आणि अर्थ वापरूनच त्यांनी कथेतील अनेक विशेषनामे तयार केली आहेत. आणि म्हणून त्यातील गंमत निघून जाऊ नये म्हणून त्या नावांचा अनुवाद टाळणे आवश्यक आहे असे त्याचे सांगणे असे. एल्विश भाषा तर त्यांनी बऱ्याच प्रमाणात व्याकरणासहित रचल्यासारखी लिहून काढली आहे. एल्विश भाषेतील संवादांचा अनुवाद म्हणूनच इंग्रजीतही नाही आणि मराठीतही नाही. ही महाकादंबरी म्हणजे टॉल्किन्सच्या भाषानपुण्याचा, इंग्लिश भाषा आणि तिच्या सभोवतीच्या अनेक भाषा, जम्रेनिक भाषांच्या आंतरसंबंधांतून स्फुरलेल्या शब्दांचा, विशेषनामांचा जो जादूई खेळ केला, त्याचा कळसाध्याय आहे. ज्या भाषांच्या संगमातून टॉल्किन्सची शब्दकळा घडली आहे, त्यांची जातकुळीच वेगळी असल्यामुळे मराठीत ती त्या प्रकारे आणता येणे अवघड आहे. पण अखेर आजची मराठीही जुनी मराठी, प्राकृत, संस्कृत, फारसी, िहदी यांच्या संगमातूनच घडली आहे. त्यामुळे मराठी अनुवादकाची शब्दसंपदा, भाषासमृद्धी महत्त्वाची होती. दोन महाकादंबऱ्यांचा अनुवाद केल्यानंतर, स्वत:च्या ताकदीचा पूर्ण अंदाज आल्यानंतरच ‘द लॉर्ड ऑफ द िरग्ज’चा हा मराठी अवतार होऊ शकला..
टॉल्किन्सचे साहित्य हे गंभीर अभ्यासाचा विषय ठरू शकते की नाही, यावर विद्वानांमध्ये तीव्र मतभेद आहेत. तरीही अनेक अभ्यासक त्यांच्या शैलीचा, भाषेचा तुलनात्मक अभ्यास करीत आले आहेत. टॉल्किन्स आणि त्यांच्या पुस्तकांचा, कथासाम्राज्याचा तपशिलात विचार करणाऱ्या आणि माहिती देणाऱ्या कित्येक वेबसाइट्स आहेत. मराठी भाषेत तशा तोडीचे भाग्य कुणाही अर्वाचीन लेखकाला लाभलेले नाही.
जे. आर. आर. टॉल्किन्स हे ऑक्सफर्ड विद्यापीठात प्राध्यापक होते. पहिल्या महायुद्धातील लढण्याचा, युद्धजन्य क्रौर्याचा अनुभव त्यांच्या मनावर खोलवर परिणाम करून गेला होता. या परिणामानेच या कथांतील सुष्ट-दुष्ट संघर्षांत रंग भरले असावेत. टॉल्किन्स हे स्वत: भाषेतिहासाचे अभ्यासक होते. वाङ्मय समीक्षा, वाङ्मयेतिहास आणि भाषेचा अभ्यास हे त्यांच्या अभ्यासविषयाचे अविभाज्य भाग होते. सातव्या ते दहाव्या शतकाच्या कालखंडात कधीतरी लिहिले गेलेले नॉवेल कोडेक्स किंवा बिओवुल्फ (त्यातील नायकाचे नाव) या नावाने संग्रहित झालेले जुन्या इंग्रजीतील एक दीर्घकाव्यही जे. आर. आर. टॉल्किन्स यांनी अनुवादित केले होते. गेली अनेक वष्रे अप्रकाशित राहिलेला तो अनुवाद याच वर्षी प्रकाशित झाला आहे. जुन्या भाषा आणि रोमांचक साहसकथा यांच्या प्रेमातूनच टॉल्किन्सने हे कामही केले होते, हे स्पष्ट आहे.
या सर्व अभ्यासाचा, व्यासंगाचा आणि आवडीचा साज त्यांच्या लेखनशैलीवर चढत गेला. आणि सर्वात महत्त्वाची ठरली ती आपल्या मुलाला गोष्ट सांगण्याची हौस. मुलांना गोष्टी सांगायला मलाही आवडतात. तशा तर सगळ्याच मूळ इंग्रजी परिकथा मी कुठल्या ना कुठल्या पोरांना मराठीतून वेल्हाळपणे सांगत आलेय. ‘मालाकाईट कॅस्केट’ या उरल पर्वतातील रशियन लोककथांचा अनुवादही त्याच खेळातून झाला होता. भाषातज्ज्ञ जे. आर. आर. टॉल्किन्सची अजब महाकथानकाची प्रयोगशील इंग्रजी भाषेतील कादंबरी मराठीतून आणताना आता मला अनुवादाचे फारसे अडथळे कदाचित त्यामुळेच जाणवले नाहीत.
यावेळी माझ्या डोक्यावर लोकांच्या मनापर्यंत कादंबरीतील तत्त्वज्ञान नीट पोहोचेल की नाही, या प्रश्नाचे ओझे नव्हते. केवळ एक मोठ्ठी गोष्ट छानपकी सांगता येतेय की नाही, पोरांना ती नखं कुरतडत हावऱ्यासारखी वाचावीशी वाटेल अशा आकर्षक शैलीत शब्द खळखळत येत आहेत की नाही, एवढाच मुख्य विचार मनाशी ठेवत फ्रोडो आणि त्यांच्या साथीदारांची ही गोष्ट मी माझ्या मराठी वाचणाऱ्या नातवंडांना सांगितली आहे म्हणा! ‘लॉर्ड ऑफ द िरग्ज’ इंग्रजीतून वाचलेले आणि टॉल्किन्स-शैलीवर प्रेम करणारे अनेक वाचक- जे दोन्ही भाषांतून सहज वाचन करतात असे प्रौढ वाचकही ही गोष्ट मराठीतून वाचतील याची मला जाणीव आहे. त्यांचा प्रतिसाद तर अनमोल ठरणार आहे.
या संपूर्ण कादंबरीत टॉल्किन्सच्या भाषेच्या ताकदीला मराठी पुरी पडली आहे का, त्याची वर्णनशैली तितक्याच प्रभावीपणे मराठीत मी उतरवू शकले आहे का, याबद्दलचा प्रतिसाद मला निश्चितच जाणून घ्यायचा आहे.
आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ‘लॉर्ड ऑफ द िरग्ज’वर आमच्याइतकेच प्रेम असलेल्या नीलेश पाष्टे यांचे कौतुकाने आभार. केवळ पुस्तकावरल्या प्रेमापोटी अनुवाद प्रकाशित करणारा, सचित्र पुस्तक हवे, अॅलन ली या चित्रकाराच्या मूळ चित्रासकट हवे, असा हट्ट धरणारा ‘डायमन्ड स्पर्श’ या अनुवादाला लाभला, हे माझ्याबरोबरच अनेक पुस्तकप्रेमींचे भाग्य म्हणावे लागेल.
‘स्वामी मुद्रिकांचा’ हा अनुवाद आपल्या मराठी लहानथोर वाचकांना टॉल्किन्सच्या अद्भुतरम्य कथासृष्टीचा आणि श्रीमंत भाषेतील वर्णन-कथनाचा अनुभव देऊ शकेल असा विश्वास अनुवादक या नात्याने मला निश्चितच वाटतो. जगाने डोक्यावर घेतलेले हे साहित्यरत्न मराठी भाषेच्या कोंदणात मी जीवे जडवले आहे.
मुग्धा कर्णिक – mugdhadkarnik@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 28, 2015 12:21 pm

Web Title: lord of the rings marathi translation
Next Stories
1 ‘अत्रे कट्टा’ नावासारखाच धट्टाकट्टा!
2 ध्यासयोगी डॉ. नागेंद्र
3 ‘जिवंत’ शिल्पकार..
Just Now!
X