प्रेम ही भावना एवढी अमर्याद आहे की, त्यावर कितीही लिहावं तेवढं थोडंच आहे. प्रेमाची अभिव्यक्तीच इतक्या अनेक रूपांनी होत असते. समाजावरील, कुटुंबावरील, एकमेकांवरील प्रेम अनेक प्रकारांनी व्यक्त होत असतं. त्यातही विवेकाचे, अविवेकाचे रंग दिसतात. त्यातील विवेकाचा रंग कसा आपलासा करता येईल ते प्रत्येकाने बघायचं आहे. एकूणच प्रेम ही भावनाच अशी आहे की, ज्यामुळे जग त्यावर आनंदात राहातं. एका प्रसिद्ध नाटय़गीतात म्हटलंच आहे –
‘प्रेमभावे जीव जगी या नटला..’
तर कविवर्य मंगेश पाडगांवकर यांचं एक प्रसिद्ध गीत आहे- ‘या जन्मावर, या जगण्यावर शतदा प्रेम करावे’. खरंच, या कवितेतून किती सुंदर संदेश पाडगावकरांनी दिला आहे.
या मनुष्य जन्मावर, माणसाच्या जगण्यावर एकदा नव्हे अनेकदा- शतदा प्रेम करावं, म्हणजेच आपलं जगणं हे आनंदाचं करावं. जेव्हा माणूस आपल्या जगण्यावर
प्रेम करतो तेव्हा तो इतरांच्याही जगण्यावर त्याच प्रेमाचा वर्षांव करू शकतो. आणि म्हणूनच जे नीट जगू शकत नाहीत, ज्यांना समस्या आहेत, त्यांच्याविषयी
अधिक प्रेमाने, आपुलकीने विचार करूलागतो. काही जण तर हेच प्रेम वाटण्याचंच ध्येय घेऊन स्वत:च्या जगण्याबरोबर इतरांच्याही जगण्यात ‘आनंदवन’ फुलवतात. होय, बाबा आमटेंबद्दलच हे लिहितोय. अनेक कुष्ठरोग पीडितांना आपल्या प्रेमाने सुखी करणारे, जीवनाच्या, जगण्याच्या प्रवाहात आणून त्यांनाही जगण्यावर प्रेम करायला शिकवणरे बाबा, साधनाताई खरोखरच प्रेमभावाची निरांजनेच आहेत. प्रेमभाव किती ध्येयासक्त करू शकतो व त्यातून किती आयुष्यांमध्ये नंदनवन फुलवू शकतो हे त्यांच्या जीवनातून कळतं. हाच प्रेमभावाचा वारसा त्यांच्या पुढच्या दोन पिढय़ांत तसाच (कुठचाही स्वामित्वभाव न
आणल्यामुळेच) प्रवाही राहिला आहे, हे विशेष! नाहीतर बऱ्याचदा ‘दिव्याखाली अंधार’ अशी स्थिती होते. परंतु बाबांनी, ताईंनी हा ‘भाव’ आपल्या वागण्यातून पुढच्या पिढीत रुजवला व आता प्रकाश आमटे, मंदाताई, विकास आमटे यांनी तोच पुढे रुजवला. प्रेमाचा हा वटवृक्ष म्हणूनच खरोखर वाखाणण्यासारखा आहे.
या प्रेमात त्यागाची, समर्पणाची वृत्ती आहे. अर्थात, प्रत्येकालाच एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर त्याग, समर्पण किंवा एवढं मोठं कार्य करता येत नाही. परंतु खारीचा वाटा उचलणारेही आपल्या समाजात कमी नाहीत. परवाच आपल्या मुलीच्या अभ्यासाविषयीच्या समस्येसाठी आई-वडील तिला माझ्याकडे घेऊन आले होते. त्यांना स्वत:चे मूल असूनही त्यांनी ही दुसरी मुलगी दत्तक घेतली होती. तिला अगदी पोटच्या मुलीसारखी माया त्या घरात मिळत होती. तिची समस्या डिसलेक्सिया गटातील होती. परंतु प्रेमाने तिचं पालनपोषण होत होतं व आई-वडिलांचं तिच्याकडेही व्यवस्थित लक्ष होतं. या आई-वडिलांसारखेच असे किती तरी माता-पिता मी पाहिले आहेत, ज्यांना स्वत:चं मूल असूनही ते दत्तक मुला-मुलींवर मायेची पखरण करतात. खरंच धन्य आहे त्यांच्या या उदात्त प्रेमाची!
या प्रेमात समर्पण आहे, सहानुभूती नाही. पूर्णपणे त्यांच्या भावभावनांची अनुभूती स्वत: घेणं, याला खूप विशाल मन लागतं. अशा या समíपत प्रेमभावात त्यामुळे कुठेही ‘अहं’ चा लवलेश नसतो. बाबा आमटे किंवा त्यांच्यासारखे समíपत भावनेने कार्य करणारे, समाजावर प्रेम करणारे अनेक कार्यकत्रे (जगभरातील) या अहंभावापासून खूप पुढे गेलेले असतात आणि म्हणूनच त्यांचे कार्य एखाद्या दीपस्तंभासारखं मार्गदर्शक ठरत राहातं.
सहानुभूतीने फक्त मदत केली जाते तर समर्पणाने दीर्घकाळ टिकणारं कार्य उभं राहात असतं.
अनेक नातेसंबंधांत हाच प्रेमभाव असतो. प्रेमाच्या बंधामुळेच अनेक नातेसंबंध टिकून राहतात. पण अर्थात हा प्रेमभाव दोन्ही बाजूंनी असायला हवा हे खूप महत्त्वाचं आहे. नाही तर अनेकदा अनेक कुटुंबांमध्ये कोणाच्या तरी सततच्या ‘त्यागा’मुळे नातेबंध टिकलेले आढळतात. कुणी तरी एकाने मागं राहाणं, सतत मनातील आकांक्षांना त्यागणं/तिलांजली देणं किंबहुना त्याहीपुढे जाऊन त्या ‘त्यागा’बद्दल त्या व्यक्तीला इतरांनी कायम गृहीत धरणं असं जिथे होत असतं, तिथे त्या ‘त्यागमूर्तीच्या सहनशक्तीचा अंत झाला की नातेसंबंधही तुटून जातात. म्हणून नात्यांमधील प्रेमभाव हा एकखांबी तंबू नसावा तर सर्व खांब एकमेकांच्या आधाराने, सहाय्याने तंबूला उभारणारे असे असावेत. बऱ्याचदा या त्यागमूर्ती स्त्रियाच असतात हे नक्की! परंतु असं कोणाच्या तरी त्यागावर वा कोणी तरी
एकाच व्यक्तीवर अवलंबून असलेले नातेसंबंध हे ‘विवेका’वर आधारित नसतात. एकमेकांचं अवकाश जपत, एकमेकांच्या हातात हात घालून पुढं जाणं
विवेकी प्रेमभावनेत अपेक्षित आहे. काहीवेळा एखाद्या व्यक्तीला स्वत:च्या ‘त्यागा’ची सुद्धा नशा चढल्यासारखी होते. त्यामुळे हेसुद्धा ‘विवेकी’ वागणं नक्कीच नाही.
तरुणपणीच्या प्रेमाबद्दल तर काय सांगू? आपल्याकडे लला-मजनू, हीर-रांझापासून ते कयामत से कयामत तक, मंने प्यार किया वा तत्सम अनेक कथांत, सिनेमांत प्रेमासाठी एकमेकांनी जीव देणं, स्वत:ला संपवणं या ‘अविवेकाचं’ नको तेवढं उदात्तीकरण केलं. ‘देवदास’सारख्या सिनेमातही तेच, प्रेमात असफल झालो तर स्वत:ला कणाकणाने संपवणं या ‘अविवेका’चं उदात्तीकरण केलं, तर ‘डर’सारख्या सिनेमातून तर ‘तू है मेरी किरण, तू हां कर या ना कर,’ असं म्हणून प्रेमाचं विकृतीकरणचं केलं.
एका कवीने म्हटलं आहे-
प्रेमात वाद नको, संवाद हवा,
प्रेमात राग नसावा, अनुराग असावा,
नको जीव देणे तर हवे जीव लावणे!
आणि म्हणूनच विवेकी प्रेमात असं एकमेकांना जीव लावणं अपेक्षित आहे. प्रेमात पडल्यावर जोडीदार होता येत नसेल तरी जीव देणं वगरे अविवेकी वर्तन आहे.
जोडीदार होण्यातले अडथळे सांमजस्याने दूर करत राहाणं हा विवेकी विचार आहे. दुसरा अविवेक असा की, प्रेमात पडलं म्हणजे आयुष्याचे जोडीदार व्हायलाच पाहिजे. त्यामुळे मग तसं होता येत नाही मग जगायचं कसं एकमेकांशिवाय? त्यापेक्षा जीव द्यावा असं अविवेकी वागणं होतं. मग विवेक काय सांगतो, तर प्रेमात पडलो म्हणजे आयुष्याचे जोडीदार होण्याचा निश्चित प्रयत्न करू पण ते सहज नाही जमलं तर एकमेकांसाठी वेगळंही व्हायची तयारी ठेवू. एकमेकांना जीव लावणारे आहोत, एकमेकांच्या दीर्घकालीन उज्ज्वल भविष्यासाठी प्रसंगी एकमेकांपासून वेगळं होण्याचीही तयारी ठेवू. प्रेमाला प्रतिसाद नाही मिळाला म्हणून जीव देणं वा दारू वा तत्सम व्यसनात स्वत:ला बुडवून कणाकणाने मरणं हेही अविवेकी वर्तन आहे. माझ्या प्रेमाला प्रतिसाद मिळालाच पाहिजे, नाही मिळाला म्हणजे मीच असफल असा अविवेक स्वत:ला संपवायला बघतो. किंवा मला प्रतिसाद मिळत नाही म्हणजे काय, मला अपयश मिळालंच कसं, ती प्रतिसाद न देणारी व्यक्तीच मग नको, प्रेम नको माझं, तर जगू पण नको असा अविवेक समोरच्या नकार देणाऱ्या व्यक्तीला संपवायला बघते. मला जसं प्रेम करण्याचा हक्क आहे तसा समोरच्या व्यक्तीला ते नाकारण्याचा हक्कपण आहे. मी प्रेम केलं म्हणून समोरच्याने केलंच पाहिजे हा अट्टहास नसणं म्हणजे विवेकी प्रेम!
मीरेचं कृष्णावरील प्रेम, राधेचं कृष्णावरील प्रेम, द्रौपदीचं कृष्णावरील प्रेम हे भक्तिमार्गातून जाणारं आहे. ते कृष्णविचारांवरील प्रेम आहे. सर्व संतांचं विठ्ठलप्रेम हेही असंच भक्तिमार्गी आहे. भक्तिरसात ओथंबलेलंच आहे.
बोलावा विठ्ठल। पहावा विठ्ठल॥
करावा विठ्ठल। जीवेभावे॥
म्हणजे विठ्ठल विचारांना, विवेकी विचारांना, (जे संतांनी त्यांच्या साहित्यात मांडले आहेत.) आपलंसं करावं असा त्याचा अर्थ आहे. पण आज आपण त्या कृष्णाने सांगितलेल्या गीतेतील, संतांनी सांगितलेल्या त्यांच्या साहित्यातील विचारांवर प्रेम करण्याऐवजी त्या कृष्णाच्या, विठ्ठलाच्या मूर्तीवर प्रेम करत आहोत. हा किती विरोधाभास आहे. हा विरोधाभास आपण मिटवला पाहिजे, या विठ्ठल विचारांवर, ‘विवेका’वर प्रेम करायला शिकूया
व आत्मसात करूया, म्हणजे खरं प्रेम वाढीला लागेल यात शंका नाही!

arguments with the team
ताणाची उलगड : वादाला महत्त्व किती?
in china son in law service provide by agency
चिनी पुरुष श्रीमंत पत्नीच्या शोधात, घरजावई होण्यास इच्छुक; नेमके कारण काय?
singer suresh wadkar praises pm narendra modi
उलटा चष्मा : दिव्यत्वाची प्रचीती…
kamal nath
भाजपात जाण्याच्या चर्चांवर कमलनाथांची रोखठोक भूमिका, प्रसारमाध्यमांवर संताप व्यक्त करत म्हणाले…