News Flash

इंग्रजीप्रेम!

जर भाषेचे मूल्यमापन करता आले तर इंग्रजी ही इंग्लंडमधून निर्यात होणारी बहुमूल्य गोष्ट आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. ज्या राज्यावर सूर्यास्त होत नाही

| June 14, 2015 12:16 pm

जर भाषेचे मूल्यमापन करता आले तर इंग्रजी ही इंग्लंडमधून निर्यात होणारी बहुमूल्य गोष्ट आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. ज्या राज्यावर सूर्यास्त होत नाही असे ब्रिटिश एम्पायर आज जरी खालसा झाले असले तरीही त्याच्या खुणा इंग्रजी भाषेच्या रूपाने साऱ्या जगभर पसरल्या आहेत. किंबहुना, दिवसागणिक या भाषेचा वापर वाढत आहे. उदाहरणार्थ, भिन्न भाषा बोलणाऱ्या युरोपच्या एकत्रित पार्लमेंटमध्ये lr10बहुतेकवेळा इंग्रजीचाच वापर अधिकपणे जाणवतो.
काळानुरूप इंग्रजी भाषा बदलली आहे. अन्य भाषेतील शब्दांना ती आपलेसे करून परिपक्व होत आहे. तरीही, शेक्सपिअरच्या इंग्रजीची मोहिनी कमी झालेली नाही. लंडनच्या थेम्स नदीच्या काठावर ‘शेक्सपिअर्स ग्लोब’ आणि शेक्सपिअरच्या जन्मगावी स्टँटफर्ड-अपॉन-एव्हॉन इथे असलेले नाटय़गृह आजही हाऊसफुल शो करीत असतात.
शेक्सपिअर्स ग्लोब येथील नाटके तत्कालीन स्टेजचा वापर करून खुल्या आकाशाखाली सादर केली जातात. संपूर्णत: लाकडी बांधकाम आणि पुरातन काळचे ‘थॅच’चे छप्पर ही या गोलाकार नाटय़गृहाची वैशिष्टय़े. वसंतऋतूच्या आगमनाबरोर येथे नाटकांची नांदी सुरू होते आणि उन्हाळा संपेपर्यंत लोक या वास्तूत शेक्सपिअरच्या जगप्रसिद्ध नाटकांचा आनंद लुटायला येतात.
‘All the world’s a stage’, ‘To be or not to be’, ‘Parting is such a sweet sorrow’  अशा आणि इतर अनेक अर्थग्रहीत वाक्यांनी शेक्सपिअरने इंग्रजी भाषा समृद्ध केली आहे.
या नाटकांची मुख्य गोष्ट म्हणजे, सारे संवाद शेक्सपिअरच्या काळातील आहेत. त्यामुळे मला तर आधुनिक इंग्रजीत भाषांतर केलेले नाटकाचे पुस्तक जवळ ठेवूनच ग्लोबमध्ये नाटके पाहता येतात. पण स्थानिक इंग्रजी लोकांनाही ही शेक्सपिअरची भाषा कळतेच असे नाही. त्यामुळे मध्यंतरात बरेचदा शेजारी बसलेले माझ्या पुस्तकात ‘How Interesting!’ म्हणत डोकावत असतात.
ग्लोबचे आकर्षण स्थानिक लोकांपेक्षा परप्रांतीयांनाच जास्त आहे. ‘A midnight summer’s dream’ चा शो पाहून भारावून गेलेली हेदर दरवर्षी दोन-तीन आठवडे सुट्टी काढून कॅनडाहून केवळ ग्लोब आणि इतर नाटय़गृहांमध्ये इंग्रजी नाटके पाहायला येते. ‘Romeo & Juliet’ चे शो पाहायला इटालियन (हमखास) गर्दी करतात. थंडी, वारा, पाऊस यांचा विचार न करता काही क्षणांसाठी सारे शेक्सपिअरमय होतात. त्याकाळची भाषा लोकांना कळत नाही, तरीही कलाकारांनी साकारलेले भाव प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतात.
रिजंट पार्कचे ओपन एअर थिएटर आणि वेस्ट एंडची नामांकित नाटय़गृहे वर्षभर नाटक, म्युझिकल्स, ऑपेरा याद्वारे जगभरातील लोकांना आकर्षित करतात. किंबहुना, आर्थिक मंदीच्या काळातही या नाटय़गृहाचा गल्ला कमी झाला नाही; तर वाढलाच. पण इंग्रजी ही काही सामान्य भाषा नाही. बोली भाषा आणि व्यावहारिक भाषा या व्यतिरिक्त याला भौगोलिक कारणेही आहेत. भारतातून तर्खडकरी इंग्रजीचे बाळकडू घेऊन आल्याने मला वाटले होते की, हे वाघिणीचे दूध प्यायला फार जड जाणार नाही. पण तिकीटच्या खिडकीपाशी ‘Do you have a fiver?’ असा प्रश्न जेव्हा मला विचारण्यात आला; तेव्हा मला मलेरिया नसल्याचे डॉक्टरचे सर्टिफिकेट मी सादर केले! त्याने मग पाच पौंडाची नोट माझ्यासमोर नाचविली. ‘Tener (टेनर) म्हणजे दहा पौंड’ हे समजायला आणखी काही दिवस लागले!
प्लॅटफॉर्मवर होणाऱ्या उद्घोषणा- ज्या कॉम्प्युटरद्वारे होतात, ते समजायला अगदी सोपे. पण ट्रेनच्या चालकाने केलेली अनाउन्समेंट सुरुवातीला केवळ डुलकीतून उठायलाच मदत करायची. ‘Dew to tecnical folt this trrain wil be terrminated at thnext sttop. Appoligies forr thedelay.’
केवळ BBC च्या बातम्या पाहून सारे इंग्रजी लोक भरजरी इंग्रजी बोलत असतील अशी माझी समजूत, पण Queen’s English म्हणणारे लोक आज फारच कमी आहेत. राणी एलिझाबेथ दुसरी हिच्यानंतर तिचा मुलगा प्रिन्स चार्ल्सचे इंग्रजी उच्चार उच्चभ्रू आहेत. पण स्कॉटिश लोकांचे इंग्रजी आणि वेल्श लोकांचे इंग्रजी उच्चार यातील फरक लक्षात घेतला पाहिजे. त्यात ‘र’वर भर देणारे आयरिश उच्चार!
इंग्लंडच्या उत्तरेकडील लोकांचे इंग्रजी आणि दक्षिण इंग्लंडमधील इंग्रजी यातही लक्षणीय फरक आहे. आणि लंडनमध्ये या सर्व लोकांचे अस्तित्व असल्याने दरवेळी नव्या उच्चारांची ओळख होते. त्यामुळे ट्रेनच्या अनाउन्समेंटने बुचकळ्यात पडणारा मी एकटाच नाही हे समजल्यावर जरा बरे वाटले. म्हणून शेजाऱ्याला मी विचारले, ‘कसली अनाउन्समेंट होती?’ तेव्हा हातातील फोनवरील गेमवरून नजर न उठविता तो म्हणाला, ‘Thhis train not moing, mate. fking shit maan!’ इंग्रजी भाषेचे उच्चार आणि सामाजिक क्लास यांचे नाते अतूट आहे, हे कळायला मला फारसा वेळ लागला नाही!
१९१३ साली जॉर्ज बर्नाड शॉने ‘पिग्मॅलियन’ या नाटकाद्वारे इंग्रजी भाषेचे आणि तत्कालीन समाजाचे अतिशय सुंदर वर्णन केले होते. इंग्रजीमध्ये My fair lady आणि मराठीत पु. ल. देशपांडे यांनी अजरामर केलेले ‘ती फुलराणी’ ही या नाटकावरून प्रेरित झालेल्या कलाकृती आजही इंग्रजीचे उच्चार कसे असावेत, हा एक महत्त्वपूर्ण चर्चेचा विषय आहे.
दोन वर्षांपूर्वी लंडनच्या ब्रिटिश लायब्ररीने एक प्रकल्प हाती घेतला. त्यानुसार विविध लोकांचे उच्चार रेकॉर्ड केले. ‘Controversy’, ‘issues’, ‘Tuesday’, ‘Wedensday’ आदी रोजच्या वापरातील शब्दांचे उच्चार लोक भिन्न पद्धतीने करतात. उदाहरणार्थ, Bath, Baath की ‘Bahth’ यावर अनेकांचे एकमत नाही. (अर्थात, कडक हिवाळ्यात अनेकांचे यावर एकमत असेल. असो!)
इंग्रजीचे उच्चार जरी भिन्न असले तरीही लोकांचे या भाषेवरील प्रेम वाढतच आहे. अगदी छोटय़ा शहरांमध्येसुद्धा एकतरी पुस्तकांचे दुकान आढळतेच. सार्वजनिक वाचनालये या येथील प्रशासनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. ही वाचनालये सर्वासाठी मोफत असतात. बाथमध्ये Mr. B. इ हे एक स्थानिक पुस्तकांचे दुकान आहे. इथे पुस्तक विक्रीव्यतिरिक्त अनेक लेखकांना बोलावून चर्चासत्र आयोजित केले जाते. Chettenham literature festival, Bath Literary festival ही लंडनच्या बाहेर असणारी काही वैचारिक स्वरूपाची चर्चासत्रे अन्य देशातील लोकांनाही आकर्षित करतात. म्हणूनच बहुतांशी इंग्रजांच्या घरी बार नसला तरी एक बुक शेल्फ मात्र नक्कीच असते!

प्रशांत सावंत, लंडन – wizprashant@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 14, 2015 12:16 pm

Web Title: love for english
Next Stories
1 ब्रिटनचे ऋतुमान
2 जलतरंग
3 वाळवंटातील सौंदर्यवती
Just Now!
X