05 August 2020

News Flash

हास्य आणि भाष्य : प्रेम म्हणजे, प्रेम म्हणजे..

पेने यांच्या व्यंगचित्रात साधारणत: दोन व्यक्तिरेखा दिसतात.. अर्थातच प्रियकर आणि प्रेयसी. रेखाटन तसं साधंच असतं

(संग्रहित छायाचित्र)

प्रशांत कुलकर्णी

prashantcartoonist@gmail.com

प्रेम हा विषय इतका गहन आणि सदैव ताजा राहणारा आहे की त्यावर जगातल्या अनेक प्रतिभावंत साहित्यिक व कवींनी असंख्य कविता, कथा, कादंबऱ्या लिहिल्या आहेत. अनेक भाषांतल्या प्रतिभावंत लेखक, दिग्दर्शक, अभिनेत्यांनी नाटकं, चित्रपट साकारले आहेत. चित्रकारांनी अजरामर पेंटिंग्ज केली आहेत. शिल्पकारांनी शिल्पं केली आहेत. गीतकार, संगीतकार आणि गायकांनी लोकांच्या ओठांवर दशकानुदशकं खेळणारी गाणी रचली आहेत. तर मग अशा प्रेम नावाच्या चिरंतन मूल्यापासून व्यंगचित्रकार दूर कसे राहतील? प्रियकर आणि प्रेयसी यांच्यात उद्भवणाऱ्या गंभीर, गमतीदार, मजेशीर, उत्कट, लडिवाळ वगैरे, वगैरे, वगैरे भावनांना किंवा प्रसंगांना जगभरातील व्यंगचित्रकारांनी आपल्या प्रतिभेनं रेखाटलं आहे.

तर अशा प्रेम या सदाबहार विषयावर ज्यांनी असंख्य व्यंगचित्रं काढली आहेत त्यात रेमण्ड पेने या (अर्थातच) फ्रेंच व्यंगचित्रकाराचा उल्लेख प्रामुख्यानं करावा लागेल. गेल्या शतकातील पहिली पन्नास वर्ष निव्वळ फ्रान्सचेच नव्हे, तर इंग्लंड, डेन्मार्क, जर्मनी इत्यादी देशांतील रसिकही पेने यांच्या प्रेमावरील व्यंगचित्रांच्या प्रेमात होते. यादरम्यान दोन महायुद्धं होऊन गेल्यानंतरसुद्धा पेने यांचं प्रेमाच्या व्यंगचित्रांचं प्रेम-रेखाटन कमी झालं नाही. पेने यांच्या व्यंगचित्रांच्या प्रेमात असंख्य सामान्य आणि असामान्य रसिकही होते. एकदा इंग्लंडच्या राणीच्या पॅरिस दौऱ्यात तिला बारा बाहुल्या भेट देण्यात आल्या. त्याचं डिझाइन पेने यांनीच केलं होतं आणि त्या बाहुल्या पेने यांच्या प्रेमी युगुलांवरच आधारित होत्या.

पेने यांच्या व्यंगचित्रात साधारणत: दोन व्यक्तिरेखा दिसतात.. अर्थातच प्रियकर आणि प्रेयसी. रेखाटन तसं साधंच असतं. ब्रशने केलेलं. चेहरेही बहुतेक एकसारखेच. नाजूक. तारुण्यात असल्याने आणि त्यातही फ्रेंच असल्याने दोघंही शिडशिडीत आणि त्या काळातील फ्रेंच वेशभूषा परिधान केलेले. चेहऱ्यावरचे भाव प्रेमात अखंड बुडाल्यासारखे. जणू काही सीन नदीच्या काठी एका धुंद संध्याकाळी फ्रेंच वाइनचे घुटके घेत एकमेकांच्या बाहुपाशात विसावले आहेत आणि त्या शांततेत एकमेकांची हृदयंच फक्त संवाद करताहेत असं वाटावं! अशा पाश्र्वभूमीवर पेने यांनी अनेक प्रसंग चितारले आहेत. एकमेकांची वाट पाहणारे, हनीमूनला जाणारे, एकमेकांच्या मनातलं ओळखणारे, प्रवास करणारे, पावसात भिजणारे असे अनेक क्षण आहेत. या चित्रांचा एकूणच बाज किंवा मूड हा लडिवाळ आणि प्रेमात आकंठ बुडालेल्या रेषेचा आहे!

बाहेरगावी बिझनेस मीटिंगसाठी जाणारा प्रियकर आपल्या प्रेयसीच्या डोळ्यांतील अश्रू  शाई टिपणाऱ्या टीपकागदाने टिपतोय हे दृश्य गालातल्या गालात हसायला लावणारं आहे. प्रेयसीची वाट पाहत पावसात भिजणारा एक प्रियकर शेवटी पावसाच्या धारांचा गोफ विणताना दाखवला आहे. ही तर अद्भुत काव्यकल्पनाच! टेलिफोनवर बोलताना ‘आजूबाजूच्या पक्ष्यांचे मंजुळ स्वर म्हणजे माझ्या हृदयाची जणू धडधडच..’ असंही एक प्रेयसी आपल्या प्रियकराला ऐकवते. ही चित्रं पाहिल्यावर पेने हा खरं तर रेषांनी कविता रचणारा कवी आहे याची खात्री पटते. आयुष्यात एकदा तरी प्रेमात आकंठ बुडालेल्या प्रेमीजनांना या चित्रांतील भावविभोरता नक्कीच जाणवेल.

प्रेमात आकंठ बुडालेल्या प्रेमी युगुलांच्या भावनांचं चित्रण आपल्याकडे ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांनीही एका चित्रात फारच अद्भुतपणे रेखाटलं आहे. यात प्रियकर-प्रेयसी दोघं जोडीजोडीनं एकमेकांमध्ये जणू मिसळून एका वेगळ्याच विश्वात गेल्यासारखे बसले आहेत. त्यांच्या सायकलीसुद्धा एखाद्या प्रेमी युगुलाप्रमाणे एकमेकांवर रेलल्या आहेत. मासे, पक्षी, इतकंच नव्हे तर पादत्राणंही जोडीजोडीनं रेखाटली आहेत. फुलंही झाडावरून पडताना खेळीमेळीत एकमेकांचा हात धरूनच जमिनीवर हळूहळू विसावत आहेत असं वाटतं. द्वैत कीअद्वैत, असा प्रेमळ प्रश्न विचारणारं हे चित्र म्हणजे मराठीतील एक अविस्मरणीय भावगीत असावं असं वाटतं.

प्रेमाचा हा उत्सव उघडपणे सार्वजनिकरीत्या साजरा करण्यासाठी ‘व्हॅलेंटाइन डे’ हा दिवस हल्ली मुक्रर करण्यात आला आहे. हा प्रकार जवळपास गेल्या पंचवीस-तीस वर्षांमध्ये आपल्याकडे रुजला, वाढला व रुळला. सुरुवातीला हे आणखी एक विदेशी थेर म्हणून अनेक जण त्याकडे कडवटपणे पाहत होते.  बाळासाहेब ठाकरे यांच्या ‘हिंदू’ शिवसेनेला हे आंदोलन करण्याचं जणू एक निमित्तच मिळालं. त्यातूनच मग ग्रीटिंग कार्ड्स विकणाऱ्या दुकानांवर शिवसैनिकांनी हल्ले केले. तिथे लावलेल्या हृदयाच्या आकाराच्या गुलाबी रंगाच्या फुग्यांची नासधूस केली गेली. काही लुटले, चोरले गेले. या बातमीवर अस्मादिकांनी एक व्यंगचित्र रेखाटलं होतं. त्यात एक शिवसैनिक म्हणतोय, ‘हे सारे फुगे मी आता आमच्या नेत्यांना भेट देणार आहे.’ ‘कशासाठी?’ असा प्रश्न दुसऱ्याने विचारल्यावर पहिला म्हणतो, ‘म्हणजे ते आणखी मोठे हृदयसम्राट होतील.’ असो! खुद्द बाळासाहेबांनी मात्र विशाल अंत:करणाने (किंवा हृदयाने!) त्यांच्यावरच्या व्यंगचित्रात्मक टीकेला उमदेपणानंच दाद दिली, हे महत्त्वाचं!

संदर्भ आणि आभार  : १) ‘दि लव्हर्स’- रेमण्ड पेने, पेंग्विन प्रकाशन

२) ‘फडणीस गॅलरी’- शि. द. फडणीस, ज्योत्स्ना प्रकाशन

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 9, 2020 4:18 am

Web Title: love is love lokrang hasya ani bhashya article abn 97
Next Stories
1 इतिहासाचे चष्मे : वसाहतवाद : युगांतराचा मागोवा
2 खेळ मांडला.. : कोबी ब्रायंट समजून घेताना..
3 नंदनवनाला पर्यटकांची प्रतीक्षा
Just Now!
X