चित्रपटांतील योगदानाबद्दल हिंदी चित्रपटसृष्टीतील  संवेदनशील दिग्दर्शक, कवी आणि गीतकार गुलजार यांना नुकताच दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यानिमित्ताने त्यांच्या चित्रपटीय व्यक्तित्त्वावर प्रकाश टाकणारा धर्मवीर भारती यांचा लेख.
लोकवाङ्मय गृहातर्फे प्रकाशित होत असलेल्या ‘निवडक ऋतुरंग’ या अरुण शेवते संपादित पुस्तकातून साभार..
चि त्रपटांची राजधानी असलेल्या मुंबईत राहत असूनसुद्धा चित्रपट क्षेत्राबद्दलचं माझं ज्ञान असून नसल्यासारखंच आहे, हे माझं सुखद अज्ञान आहे असंच मी मानतो. पटकथालेखक, निर्माते, अभिनेते असे  विविधरूपी मित्र माझ्या यादीत असूनसुद्धा त्यांच्या चित्रपटेतर पैलूंशीच मी निगडित असतो. मधूनमधून त्यांच्या बोलण्यात काही नावं येतात आणि ती अवचित ध्यानात राहतात.
असंच एक नाव माझ्या आठवणीत िहदकळत राहतं- गुलजार! त्याकाळी अख्ख्या महानगरात, विशेषत: फिल्मी दिवाणखान्यांत, मीनाकुमारीच्याच नावाचा बोलवा होता. तिनं घर सोडलं होतं आणि ती एकटीच राहू लागली होती. त्या अनुषंगानेच गुलजारचं नाव माझ्या ऐकण्यात आलं. ते बिमल रॉय यांचे साहाय्यक असल्याचंही समजलं. ते शीख आहेत असंही कुणीतरी म्हणालं. त्यांच्या कवित्वाची प्रशंसाही ऐकण्या-वाचण्यात आली.
हे सर्व ऐकल्यावर माझ्या डोळय़ांसमोर दाढी-मिशीवाला, उंचपुरा, धिप्पाड, पगडीवाला तरुण उभा राहिला! तर मग मीनाकुमारीशी त्याचा काय संबंध? मीनाकुमारी म्हणजे सुकुमार, हळुवार, संवेदनशील, मोगली नजाकतीची ‘बोंगाली’ रसधाराच जणू! असो! हे सारं ऐकलं आणि विसरून गेलो. गुलजारचं नाव आतल्या कप्प्यात कुठंतरी निपचित पडून राहिलं.
माझा एक खूप जुना मित्र आहे. बासू. होय. तोच तो.. प्रख्यात दिग्दर्शक बासू भट्टाचार्य. त्याचे काही चित्रपट मला खूप आवडले, तर काही अत्यंत सामान्य वाटले. पण त्याच्या सामान्य चित्रपटांतूनसुद्धा काहीतरी असामान्य हमखास असतंच. असाच एक चित्रपट बघितला, पण मनाचं समाधान झालं नाही. तरीही त्यातील गीता दत्तच्या गाण्यानं माझ्या मनाचा ठाव घेतलाच. ते गाणं होतं :
मेरी जां
मुझे जां न कहो मेरी जां!
किशोरावस्थेपासूनच मला एक सवय जडली. फावल्या वेळात मी सतत गाणं गुणगुणत असतो. मग हे गाणं माझ्या तावडीतून कसं बरं सुटलं असतं? जेवताना हुक्की आली की ‘मेरी जां..’, आंघोळ करताना प्रात:स्मरण म्हणून ओठांवर ‘मुझे जां न कहो..’
एके दिवशी मला प्रश्न पडला की, यापुढच्या ओळी काय असतील? ही उत्सुकता शमवण्यासाठी ती तबकडी लावली :
जां न कहो अनजान मुझे
जान कहाँ रहती है सदा
अनजाने क्या जाने
जान से जाए कौन भला
मेरी जां,
मुझे जां न कहो, मेरी जां!
बाप रे! कोडं अवघडच दिसतंय की! लक्ष देऊन दोनदा ऐकल्यावर अर्थ ध्यानात आला.. जान (प्रेयसी), जान (प्राण). अशा प्रकारे श्लेष साधून हळुवारपणे एक तार छेडण्याचा त्यानं प्रयत्न केलाय. एरवी हिंदी चित्रपटगीतं म्हणजे शुद्ध वाह्यातपणाच असतो. घासून गुळगुळीत झालेल्या अर्थानुरोधानंच त्यांत शब्द गोवलेले आढळतात. व्याकरण आणि साहित्यिक अभिरुचीसंपन्न चित्रपटगीतं हाताच्या बोटांवर मोजण्याइतकीच सापडतील. अशा गदारोळात वर उल्लेखलेल्या गाण्यातल्या शब्दांची निवड, त्यांची कलात्मक गुंफण, श्लेषयोजना इत्यादींमुळे त्याचं वेगळेपण प्रकर्षांनं जाणवलं. चित्रपटगीतांना सूक्ष्म भावछटांचा साज चढवण्याचा प्रयत्न कुणीतरी करतंय हे पाहून बरं वाटलं.
कुणी लिहिलंय हे गाणं? उत्तर मिळालं, ‘गुलजारनं!’
त्यानंतर मग त्यांची गाणी पुन: पुन्हा कानावर येऊ लागली-
‘मेरा गोरा अंग लइले
मोहे श्याम रंग दइ दे’
‘तेरे बिना जिया जाए ना!’
‘गंगा आए कहाँ से, गंगा जाए कहाँ रे..’
अशा सर्व भावगीतांशी पुन्हा त्याच नावाचा संबंध- गुलजार! त्यांची भावगीतं उद्वेलित करतात. शैलेद्रनं पूरबी हिंदीच्या शब्दांची पेरणी करून उत्तम गाणी लिहिली. पण गुलजारच्या गाण्यांत खडीबोली हिंदीची थोडीशी सरमिसळ असल्याचं जाणवतं. अद्याप गुलजार यांना मी बघितलं नव्हतं, त्यांचा परिचय झाला नव्हता; इतकंच काय, त्यांचा एकही चित्रपट पाहण्यात आला नव्हता. पण ही गाणी ऐकून असं वाटत राहिलं की, उर्दू आणि पंजाबीच्या सावलीत वाढलेला गुलजार जणू काहीतरी शोधतोय. अपूर्णत्वातून पूर्णत्वाकडे जाण्यासाठी धडपडतोय. आणि या पूर्णत्वासाठी विरहानं ओथंबलेल्या जाणिवांची त्यांना नितांत आवश्यकता असल्याचं बरोबर लक्षात येत होतं. हा विरह-विदग्ध रस अवधी आणि बंगाली लोकगीतांमध्ये, तसंच सगुण-निर्गुण भक्ती करण्यात ओतप्रोत भरलेला असतो. विलक्षण उत्कट आणि आगळावेगळा. पण गुलजार आपला वारसाही सोडत नव्हते आणि पूरबी हिंदीशी नाळ जोडू पाहत होते. ते त्यांचे चाचपडण्याचे दिवस होते. खडीबोली (उर्दू)च्या संस्कारात काहीतरी निसटत होतं आणि पूरबी नारीसुलभ सुकोमलता हाती लागत नव्हती!
..आळसावलेल्या त्या दुपारी चित्रपट पाहण्याची हुक्की मला आली. पिक्चर पाहिल्याला कितीतरी महिने झाले होते. जाहिराती नजरेखाली घातल्या तर ‘मेरे अपने’ दिसला. जवळच्याच एका थिएटरात तो लागला होता. काही महिन्यांपूर्वी रिलीज होऊन लवकरच उतरलेला.. त्यामानाने त्याला जुनाच म्हणायला हवा. लेखक-दिग्दर्शक गुलजार! चला, बघू या तरी एकदा गुलजार कसा काय आहे तो!
थिएटरात जाताना मनात कुतूहल होतं आणि पिक्चर पाहून परत येताना मन तृप्त झालं होतं. गुलजारची प्रशंसा करावी तेवढी थोडीच असं वाटत होतं. त्यांच्यात असं काहीतरी विशेष होतं- जे त्यांच्या समकालीन इतर दिग्दर्शकांमध्ये नव्हतं, असंच म्हणावं लागेल. त्यांना समस्यांची जाण नेमकी आहे आणि वास्तवाच्या सादरीकरणाची दृष्टीही त्यांच्याजवळ आहे. आणि विशेष म्हणजे आंतरिक भावभावनांचे बारकावे टिपण्याची कलात्मकता त्यांच्यात आहे. त्यामुळेच बारुआ, देवकी बोस यांचा वारसा ते समर्थपणे पुढे चालवताना दिसतात. या भावच्छटा अत्यंत साधेपणाने, पण तितक्याच प्रत्ययकारी पद्धतीने सादर करण्याची कला सध्या तरी फक्त गुलजार यांच्यामध्येच दिसून येते. माणसा-माणसांमधील विविध नात्यांच्या अंर्तसबंधांचे समस्त बारकावे टिपण्याचे व तितक्याच समर्थपणे पडद्यावर साकार करण्याचे कसब या दिग्दर्शकामध्ये आहेच आहे.
‘न्यू थिएटर्स’च्या सुरुवातीच्या चित्रपटांमध्ये हा चमत्कार होता. पण नंतर हळूहळू स्टुडिओंचं आधुनिकीकरण झालं, अद्ययावत कॅमेरे आले, तंत्रात मूलगामी बदल झाले. पण या भूलभुलय्यात परस्पसंबंध, त्यांतील ताणतणाव, इतर आनुषंगिक बारकावे हिंदी चित्रपटांमधून जणू हद्दपार झाले.
फार वर्षांनंतर गुलजारच्या चित्रपटांमधून पुन्हा एकदा हरवलेले गवसल्याचा साक्षात्कार झाला. त्या दुपारी त्या छोटय़ाशा थिएटरच्या अंधारात ‘मेरे अपने’ पाहताना गुलजार प्रत्यक्ष समोर नसूनसुद्धा खऱ्या अर्थाने पहिल्यांदा मी त्यांना भेटलो. नंतर मग कितीतरी वेळा आम्ही भेटत राहिलो- त्यांच्या घरी, ‘मीरा’च्या निमित्ताने, ओम शिवपुरीच्या घरी आयोजिलेल्या काव्यवाचनप्रसंगी..
आणि दोनेकवगळता त्यांचे सर्व चित्रपट मी बघितले आहेत.. कोशिश, परिचय, आँधी, खुशबू, किताब, मौसम. ‘किनारा’ आणि ‘मीरा’ कसे काय सुटले कोण जाणे.
बुद्धी आणि तत्त्वज्ञानाच्या साहाय्याने सत्याच्या केवळ परिघापर्यंतच पोहोचता येते. त्याचा केंद्रबिंदू पकडण्यासाठी काळजाच्या गाभ्यालाच हात घालावा लागतो. हे काम अत्यंत नाजूक आणि कसरतीचं असतं. तरीही गुलजार हीच वाट निवडतात. सामाजिक वास्तवाची री ओढत प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात आरोळी देत पुढे जाता येण्यासारखे कितीतरी रस्ते सहजपणे त्यांना उपलब्ध होते. चित्रपटांमध्ये अशा हडेलहप्पीचा बोलवाही जोरदार असतो.
पण गुलजारनी आडवळणाची वाट निवडली. आणि हे आडवळण काळजाच्या वाटेने जाते.
या वाटेला काय म्हणायचं? समजत नाही. तिला काहीच नाव देता येत नाही! प्रेमासारखंच.. ‘प्यार को प्यार ही रहने दो कोई नाम न दो!’
 अरेच्चा! गाण्याच्या या ओळीवरून आठवलं. त्यांच्या गीतांच्या लकबीपासून आपण प्रवास सुरू केला होता. त्या पूरबी लाटेनंतर त्यांची वेगळय़ा प्रकारची गाणीही गाजली. त्यातली काही त्यांच्या स्वत:च्या चित्रपटांतली होती, तर काही गाणी इतरांच्या चित्रपटांसाठी त्यांनी लिहिलेली होती. ‘आँधी’तल्या गीतांचं त्यांनी केलेलं संयोजन मला खूपच भावलं. त्या गाण्यांमध्ये काव्य आहे, साधेपणा आहे आणि कथेतील घटनांच्या अनुषंगाने त्यांची अन्वितीही उत्तम साधली आहे. हे काम वाटतं तेवढं सोपं नाही. सर्वसाधारणपणे भडक दृश्यांशी तरल, हळुवार गीतांचा मेळ बसत नसतो; तर काही वेळा एखाद्या नाजूक, भावविभोर प्रसंगी धडधडत जाणारं गाणं आणि धांगडिधगा संगीताची योजना करून एकूणच त्या दृश्याच्या चिंधडय़ा उडवलेल्या दिसून येतात. पण ‘आँधी’तलं प्रत्येक गाणं चित्रपटाच्या कथानुक्रमात अत्यंत चपखलपणे जुळलेलं दिसून येतं. घटनाक्रमात जे अदृश्य असतं ते या ओळींमधून सहजपणे व्यक्त होतं-
तुम आ गये हो नूर आ गया है
नहीं तो, चिरागों से लौ जा रही थी
जीने की तुमसे वजह मिल गयी है
बडी बेवजह जिंदगी जा रही थी..
शिवाय दुसरीकडे गीत फक्त कथेला पूरकच बनत नाही, तर ते एक गहन व्याख्या बनून जातं-
इस मोड से जाते हैं
कुछ सुस्त कदम रस्ते
कुछ तेज कदम राहें
सर्वसाधारण माणसाप्रमाणे हळूहळू पावलं टाकीत चाकोरीतून पुढे जात असतानाच औदासीन्य आणि एकटेपणा एकीकडे, तर दुसरीकडे राजकारणाच्या महत्त्वाकांक्षी वाटेवरून ढांगा टाकीत लगबगीनं पुढे निघालेल्या जीवाची शोकांतिका या ओळींमधून सहजपणे अभिव्यक्त तर होतेच; पण प्रसंगांच्या अन्वयार्थाची उकल अत्यंत कुशलतेने झालेली जाणवते.
तिसऱ्या प्रकारचं आणखी एक कौशल्य त्यांनी ‘आँधी’त वापरलंय. त्यातलं कव्वालीचं दृश्य बरंच लाऊड आहे. गायकांचे हावभाव, जमावातला आक्रोश, नंतरची दगडफेक.. सर्वाचा चित्रपटातील इतर घटनांशी मेळ कदाचित बसू शकला असता. पण ती अन्विती कायम राखण्यासाठी घातलेल्या कव्वालीत गुलजार म्हणतात- ‘अली जनाब आए हैं’- या शब्दांत लपलेल्या आदरयुक्त कोपरखळीमुळे त्या प्रसंगाचा भडकपणा (लाऊडनेस) आपोआप फिका पडतो.
‘आँधी’तली गाणी प्रसंगोपात अत्यंत सुसंगत असल्यामुळे त्यांतल्या कलात्मकतेचा अस्सल बाज सहज समोर येतो-
हमने देखी है उन आँखों की महकती खुशबू
हाथ से छूके इसे रिश्तों का इल्जाम न दो
सिर्फ अहसास है ये, रुह से महसूस करो
प्यार को प्यार ही रहने दो, कोई नाम न दो!
बरं झालं हे गाणं पहिल्यांदा मी तबकडीवर ऐकलं. पुन: पुन्हा ऐकलं. चित्रपट पाहण्याचं मुद्दाम टाळत आलो. कारण तो पाहिल्याने या ओळींची तीव्रता कमी होईल की काय, अशी दाट शंका अजूनही मला वाटते!
गुलजारच्या या ओळी संवेदनांच्या अशा एका पातळीवर नेऊन ठेवतात, जिथं फक्त जाणिवाच शिल्लक उरलेल्या असतात. हा चमत्कार पूरबीतून खडीबोलीत ते घडवून आणू शकले, ही त्यांची फार मोठी उपलब्धी आहे असं मी म्हणेन. समर्पक शब्दयोजनेच्या पातळीवर ‘मेरा गोरा अंग लई ले’पासून सुरू झालेला त्यांचा प्रवास इथवर येऊन ठेपला. त्यानंतर त्यांचं दुसरं अप्रतिम गाणं ऐकायला मिळालं-
दिल ढूंढता है फिर वही
फुरसत के रात-दिन
बैठे रहे तसव्वुर-ए-जाना किये हुए
जाडों की नर्म धूप और
आँगन में लेटकर
आँखों पर खींचकर तेरे
आँचल के  साये को
औंधे पडम्े रहे, कभी करवट लिए हुए
दिल ढूंढता है..
मला अजूनही चांगलं आठवतं की, गिरधारीलाल वैद यांच्या घरी आम्ही काही मित्र जमलो होतो, तेव्हा पहिल्यांदा मी हे गाणं ऐकलं. त्यांनी स्टिरिओ घरी आणला होता आणि बेगम अख्तरच्या दर्दभऱ्या ‘लागे करेजवा कटार’नंतर लगेच हे गाणं लागलं. या गाण्याची तबकडी अजून बाजारात आलेलीसुद्धा नव्हती.. इतकं नवंकोरं हे गाणं होतं. भूपेंद्रच्या भारदस्त आवाजातलं हे उदास स्वरगीत जणू आम्हाला गतकाळातील आठवणींकडे घेऊन जात होतं. आम्ही तन्मयतेनं ते ऐकत होतो. त्यात बुडून गेलो होतो.. बेभान होऊन. गल्लीबोळांतून हुंदडत फिरणारं ते बालपण, अंगण-परसू, गच्चीवर जाऊन उन्हाची ऊबपांघरत घालवलेला हिवाळा, खाटांवर लोळणं, पदराची माया, ग्रीष्मात अंगाची होणारी काहिली, आग ओकणारी दुपार.. आणखीही बरंच काही.
भूपेन्द्रच्या भारदस्त, पहाडी, उत्कट आवाजातलं हे गाणं म्हणजे जणू त्याच उदास स्तब्धतेचा स्वर होता- जो आपल्या सर्वाच्या आयुष्यात केव्हा ना केव्हा डोकावत असतो. त्याच्या अशा डोकावण्यानं कधी कधी खपल्या निघतात, तर कधी त्या धरतात!
मी दबकत विचारलं, ‘कुणाचं आहे हे गाणं?’
दाटलेल्या गळय़ातून आवाज आला, ‘गुलजारचं!’ दुसरं कोण लिहू शकणार इतकं ओथंबलेलं, रसरसलेलं, मनाला चटका लावणारं, कासावीस करणारं गीत?
इतकं सुंदर गाणं चित्रपटात योग्य ठिकाणी जोडलं गेलं नाही याची खंत वाटली. त्यानंतर बऱ्याचदा मी हे गाणं ऐकलं; पण चित्रपटाचा संदर्भ तोडून.
गालिब आणि मीर या दोघांच्याही संवेदना वेगवेगळय़ा असल्या तरीही ते दोघेही सारख्याच उत्कटतेने व्यक्त होतात. गुलजारने गालिबच्या शेरचा आधार घेऊन त्याला आपले शब्द जोडताना मीरचा साधेपणा अंगीकारलाय.. आणि त्यात मिसळलाय हिंदी कवितेचा नितळपणा. खरोखर, हे एक अजब, चमत्कारपूर्ण मिश्रण आहे असंच म्हणावं लागेल!
हे एक नवं वळण आहे. गुलजार यांची गाणी म्हणजे साहित्यिक ठेवा तर आहेतच, पण हिंदी चित्रपटगीतांच्या क्षेत्रातील नवयुगाची नांदीही आहेत. यापुढे त्यांच्या आशयघन शब्दांमधील भावोत्कटता त्यांच्या निरनिराळय़ा गाण्यांतून अधिक तीव्रतेने व्यक्त होईल.. ते इतरही पाऊलवाटा निर्माण करतील अशी आशा बाळगण्यास पूर्ण वाव आहे. भविष्यात याची प्रचीती यायला काहीच हरकत नाही-
कुछ  सुस्त कदम रस्ते
कुछ  तेज कदम राहें..          
      अनुवाद- प्रकाश भातम्ब्रेकर