मनोहर पारनेरकर – samdhun12@gmail.com

१६ सप्टेंबर ही गेल्या शतकातील महान संगीतकारांच्या जन्मदिवसांच्या वार्षिक कॅलेंडरमधली एक महत्त्वाची तारीख आहे. कारण ही तारीख ‘नाइटिंगेल ऑफ इंडिया’ (सरोजिनी नायडू यांनी त्यांचं असं वर्णन केलं आहे.) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महान गायिका एम. एस. सुब्बुलक्ष्मी (१९१६-२००४) यांचा जन्मदिवस आहे. ‘भारतरत्न’ हा सर्वोच्च नागरी सन्मान मिळवणाऱ्या पाच भारतीय स्त्रियांपैकी त्या एक आहेत. मदर तेरेसा, इंदिरा गांधी, अरुणा असफअली आणि लता मंगेशकर या त्या अन्य चार महिला आहेत. (यापुढे एम. एस. सुब्बुलक्ष्मी यांचा उल्लेख ‘एमेस’ या त्यांच्या लोकप्रिय टोपणनावाने आपण करणार आहोत.)

not a single word about Sharad Pawar in pm narendra modis speech in wardha
मोदींच्या भाषणात शरद पवारांबाबत चकार शब्द नाही, काय असावे कारण…
Sharad Pawar insulted daughters-in-law of Maharashtra strong reaction from Ajit Pawar group on that statement
“शरद पवारांनी महाराष्ट्रातील सुनांचा अपमान केला”, ‘त्या’ वक्तव्यावरून अजित पवार गटाची तीव्र प्रतिक्रिया
sanjay raut on yogi adityanath
योगी आदित्यनाथ यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून संजय राऊतांचे टीकास्र; म्हणाले, “योगींनी यूपीतच थांबावं, तिथे…”
kolhapur, cracks on ambabai mahalaxmi idol
अंबाबाई – महालक्ष्मी मूर्तीवर तडे, तातडीने संवर्धन गरजेचे; पुरातत्व खात्याच्या निवृत्त अधिकाऱ्यांच्या पाहणी अहवालात निष्कर्ष

एमेस यांच्या मीरा भजनांनी महात्मा गांधीजी कसे मंत्रमुग्ध होत असत हे आपणा सर्वाना माहीत आहे. तसेच ‘‘या गानसम्राज्ञीसमोर मी कोण? मी एक सामान्य पंतप्रधान आहे..’’ हे पंडित नेहरूयांनी त्यांच्याबद्दल काढलेले गौरवोद्गारदेखील आपल्या परिचयाचे आहेत. पण ही दोन्ही महान व्यक्तिमत्त्वं काही संगीतातील जाणकार नव्हती. शास्त्रीय संगीतातली तर नव्हतीच नव्हती. म्हणून पं. रविशंकर आणि लता मंगेशकर ही संगीतातली दोन प्रतिभावान आणि त्यांच्यासारखीच ‘भारतरत्न’ या सन्मानाने विभूषित व्यक्तिमत्त्वं एमेसबद्दल काय म्हणतात ते बघू या. ‘‘एमेस यांच्याबद्दल जेव्हा मी विचार करतो तेव्हा ‘देवी’ हा एकच शब्द माझ्या मनात येतो. संगीताला आध्यात्मिक पातळीच्या उंचीवर नेणारी दुसरी व्यक्ती माझ्या तरी पाहण्यात आलेली नाही,’’ असे उद्गार पं. रविशंकर यांनी काढले आहेत. तर ‘‘एमेस एक महान तपस्विनी होत्या,’’ असं लता मंगेशकर त्यांच्याबद्दल म्हणत आल्या आहेत.

खरं सांगायचं तर हा लेख मुख्यत्वेकरून एमेस आणि त्यांच्या संगीताबद्दल नसून त्यांच्या महाराष्ट्राशी जडलेल्या अतूट नात्यासंबंधी आहे. सुरुवातीला हे नातं कसं सुरू झालं याबद्दल थोडंसं आणि त्यानंतर पं. नारायणराव व्यास, शांता आपटे, वसंत देसाई, उस्ताद अल्लादिया खॉं, केसरबाई केरकर या कलाजगतातील प्रख्यात महाराष्ट्रीय व्यक्तींबरोबर असलेल्या त्यांच्या संबंधांबद्दल विस्ताराने..

प्रथम दहा वर्षांच्या एमेसनं आपली गायन कारकीर्द एका मराठी भजनाने सुरू केली त्याबद्दल : मदुराई इथल्या एका शाळेत एमेस यांची आई षण्मुखवाटिवू यांच्या एका कार्यक्रमात दहा वर्षीय एमेसनं (नातेवाईक आणि जवळचे मित्र त्यांना ‘कुंजम्मा’ या नावाने हाक मारत असत.) ‘आनंद गानंद हरिनाम’ हे मराठी भजन गाऊन त्यांनी आपली गायन कारकीर्द सुरू केली होती. आणि याच भजनाने त्यांचं महाराष्ट्राशी असलेलं नातं सुरू झालं.. जे उत्तरोत्तर अधिक घनिष्ठ आणि समृद्ध होत गेलं.

आता वर उल्लेखिलेल्या पाच व्यक्ती आणि त्यांच्या संबंधाबद्दल..

पं. नारायणराव व्यास

ग्वाल्हेर घराण्याचे प्रख्यात गायक आणि पं. विष्णू दिगंबर पलुस्कर यांचे शिष्य पं. नारायणराव व्यास (१९०२-१९८४) हे एमेस यांचे हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातले पहिले गुरू होते. त्यांना फार काळ काही पंडितजींची तालीम मिळाली नाही तरी बेहलावा आणि लयकारी या ग्वाल्हेर घराण्याच्या खास गोष्टी आणि काही बंदिशी त्यांनी आपल्या गुरूकडून शिकून घेतल्या. पंडितजींनी गायलेलं आणि अतिशय लोकप्रिय झालेलं ‘शाम सुंदर मदन मोहन’ हे तिलंग रागातलं गाणंही एमेसनी त्यांच्याकडून शिकून घेतलं.

शांता आपटे

१९४१ साली प्रदर्शित झालेला ‘सावित्री’ हा सिनेमा तमिळ सिनेमामधला एक मैलाचा दगड ठरला होता आणि त्याची मुख्य दोन कारणं होती. एक म्हणजे एमेस यांनी या सिनेमात जी भूमिका केली होती ती सावित्रीची नसून नारदाची होती. (ती त्यांनी अप्रतिम केली होती.) आणि दुसरं म्हणजे तमिळ सिनेजगताला पूर्णपणे अपरिचित, पण हिंदी/मराठी सिनेमाच्या प्रसिद्ध स्टार अभिनेत्री-गायिका शांता आपटे (१९१६-१९६४) यांनी या सिनेमात केलेली सावित्रीची प्रमुख भूमिका. सिनेमाचे दिग्दर्शक वाय. व्ही. राव- ज्यांनी सत्यवानाची भूमिका केली होती- हे जन्माने तेलगू असूनदेखील एक अष्टपैलू आणि उद्यमशील तमिळ निर्माता-दिग्दर्शक म्हणून प्रसिद्ध होते. शांता आपटे यांनी ज्यावेळी हा सिनेमा स्वीकारला त्यावेळी त्यांना तमिळ भाषेचा एक शब्दही येत नव्हता हे ऐकून आपल्याला आश्चर्य वाटेल. पण त्या एकदम परफेक्शनिस्ट होत्या. अतिशय चिकाटीने आणि उत्साहाने त्या तमिळ शिकल्या अािण सावित्रीची प्रमुख भूमिका त्यांनी उत्तम रीतीने साकार केली.

‘सावित्री’ सिनेमात एकूण अठरा गाणी होती. ही गाण्यांची संख्या त्याकाळच्या किंवा कुठल्याही काळाच्या मानाने जवळजवळ दुप्पट होती. त्यातली आठ गाणी शांता आपटे यांनी आणि सहा गाणी एमेस यांनी गायली. याशिवाय शांता आपटे आणि वाय. व्ही. राव यांनी दोन युगुलगीते गायली होती. एमेस आणि शांता आपटे यांची दोन गाणी त्याकाळी खूपच लोकप्रिय झाली होती. हा सिनेमा हिट् जरी झाला होता तरी त्याला ‘ब्लॉकबस्टर’ म्हणता येणार नाही. या चित्रपटामुळे शांता आपटे यांच्या राष्ट्रीय स्तरावरील लोकप्रियेत जरी फारसा फरक झाला नसला तरी त्यानं एमेस यांना मात्र एकदम स्टार बनवलं.

आपल्या प्रत्यक्ष आयुष्यात एमेस आणि शांता आपटे या दोन स्त्रिया म्हणजे दोन टोकांची व्यक्तिमत्त्वं होती. एमेस शांत, दयाळू आणि सदाचारी व आध्यात्मिक वृत्तीच्या होत्या. त्या मीराबाई आणि सावित्री या भारतीय स्त्रीत्वाच्या आदर्श मानल्या गेलेल्या दोन व्यक्तिमत्त्वांच्या खूप जवळ जाणाऱ्या होत्या. त्यातली मीराबाई त्यांनी ‘मीरा’ (१९४५) या सिनेमाद्वारे पडद्यावर अजरामर केली. सावित्रीची भूमिका करण्याची संधी मात्र त्यांना कधीच मिळाली नाही. याउलट, शांता आपटे ‘जर्मेन ग्रीयर’ यांच्या साच्यातल्या एक मुक्त व्यक्तिमत्त्व होतं. सनातनी ब्राह्मण मध्यमवर्गीय कुटुंबाच्या (ज्यात त्यांचा जन्म झाला होता.) पाश्र्वभूमीवर तर ही गोष्ट नीतिनियम पूर्णपणे झुगारून देणारी होती. पडद्यावर त्यांनी रंगवलेल्या सावित्रीच्या रूपाच्या अगदी विरुद्ध टोकाचं असं त्यांचं प्रत्यक्ष आयुष्यातील रूप होतं. त्या काळातल्या फारच थोडय़ा स्त्रिया त्यांच्याइतक्या मुक्त वृत्तीच्या असतील. आणि हे महत्त्वाचं आहे, कारण त्या फक्त अविवाहित होत्या म्हणून नव्हे, तर त्या स्वभावत:च बंडखोर आणि धाडसी वृत्तीच्या होत्या. (त्याकाळी ज्यांची सर्वाना भीती वाटायची अशा ‘फिल्म इंडिया’ मासिकाचे संपादक बाबूराव पटेल यांच्या ऑफिसमध्ये जाऊन शांता आपटे यांनी त्यांना छडीने मारलं होतं. कारण त्यांनी बाईंबद्दल आपल्या मासिकात अश्लाघ्य मजकूर प्रसिद्ध केला होता. हा किस्सा तंतोतंत खरा आहे.)

हे सगळं जरी असलं तरी त्यांच्या काळातल्या या दोन असामान्य स्त्रियांमध्ये बऱ्याच गोष्टी समानही होत्या. उदाहरणार्थ, दोघींचा जन्म १९१६ सालचा. दोघीही शास्त्रीय संगीत शिकलेल्या होत्या. दोघीही अतिशय महत्त्वाकांक्षी, निश्चयी आणि करारी होत्या. त्याकाळच्या अतिशय पुरुषप्रधान अशा समाजातील लिंगभेदाच्या भिंती दोघींनीही तोडल्या होत्या. दोघींनी अनेक भारतीय भाषांमध्ये गाणी गायली होती. (एमेस यांनी दहा, तर शांता आपटे यांनी पाच भाषांमध्ये.) दोघींनी रवींद्र संगीत उत्तम रीतीने गायलं आहे.. एखाद्या निष्णात बंगाली गायिकेसारखं! दोघींनी एक तरी इंग्रजी कविता जाहीररीत्या सादर केली होती. एमेस यांनी युनोमध्ये राजाजी यांनी इंग्रजीत अनुवादित केलेली ऋ चा, तर शांता आपटे यांनी हेन्री वॅर्डस्वर्थ लाँगफेलो यांची ‘ळँी ढ२ं’े ऋ  छ्रऋी’ ही कविता व्ही. शांताराम यांच्या १९३७ सालातील ‘कुंकू’ या मराठी सिनेमात (हिंदीत ‘दुनिया ना माने’!) गायली होती.

वसंत देसाई

२३ ऑक्टोबर १९६६ या दिवशी एमेस यांनी चक्रवर्ती राजगोपालचारी यांनी अनुवाद केलेली विश्वशांतीविषयक ऋ चा युनोच्या व्यासपीठावरून गायली. हा कार्यक्रम युनोच्या न्यूयॉर्कस्थित मुख्य वास्तूमध्ये साजरा झाला आणि त्याला प्रेक्षकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला. या कार्यक्रमात सादर केलेली दुसरी रचना कांची पीठाचे जगद्गुरूश्री चंद्रशेखरानंद सरस्वती यांनी लिहिलेली एक आशीर्वचनपर संस्कृत भाषेतील रचना असून, तिचं शीर्षक ‘मैत्रीम भजत’ असं होतं. एमेस आणि त्यांचे पती सदाशिवम् हे जगद्गुरूंच्या या उदात्त आणि पवित्र रचनेला न्याय देईल अशा एका संगीतकाराच्या शोधात होते. म्हणजे त्या संगीतकाराला संस्कृत भाषेची बऱ्यापैकी समज आणि रागदारी संगीतावर आधारित चाली लावण्याचे कसब या दोन्ही गोष्टी अवगत असणे आवश्यक होते. त्यांचा हा शोध ‘हमको मन की शक्ती देना’ या गाण्याचे मुंबईस्थित प्रसिद्ध संगीतकार वसंत देसाई (१९१२-१९७५) यांच्यापाशी येऊन थांबला यात आश्चर्य वाटण्यासारखं काही नव्हतं. कारण वसंतराव या सर्व निकषांच्या कसोटय़ांवर सहजपणे उत्तीर्ण होत होते. जगद्गुरूंच्या त्या रचनेला रागमालेत संगीतबद्ध करून तिला त्यांनी पूर्ण न्याय दिला.

आता या ‘मैत्रीम भजत’ प्रकल्पासंबंधी एका छोटय़ा, पण सूचक गोष्टीबद्दल.. जेव्हा एमेस आणि वसंत देसाई यांची या प्रकल्पाबद्दल चर्चा झाली तेव्हा मानधनाचा मुद्दा कधीच उपस्थित झाला नव्हता. पण आपल्या औदार्याबद्दल प्रसिद्ध असलेल्या आणि उदार अंत:करणाच्या एमेस या वसंत देसाई यांच्या नकळत त्यांच्या ऑफिसमध्ये मानधनाचा चेक ठेवून आल्या होत्या. आपले वसंतराव हे अतिशय संवेदनशील आणि भावुक होते. त्यांनी तो चेक कधीच वठवला नाही. मात्र कर्नाटक संगीताची सम्राज्ञी एमेस यांच्याकडून मिळालेली ती भेट आहे असं समजून त्यांनी तो  कायम जपून ठेवला.

उस्ताद अल्लादिया खॉं

जयपूर-अत्रौली घराण्याचे अध्वर्यु उस्ताद अल्लादिया खॉंसाहेब मुंबईत उपचार घेत असताना १९४५ च्या सुमारास एमेस त्यांना भेटायला गेल्या होत्या. नव्वदेक वर्षांचे खॉंसाहेब खूपच क्षीण झालेले असले तरी त्यांचा आब टिकून होता. त्याप्रसंगी एमेस यांनी खॉंसाहेबांना ‘पंतुवैराळी’ या कर्नाटक संगीतातल्या रागातील एक  रचना गाऊन दाखवली. (हा राग आपल्या पुरिया धनाश्री रागाच्या जवळ जाणारा आहे.) एमेस यांचं गाणं ऐकून खॉंसाहेबांचा चेहरा उजळला आणि तेदेखील त्यांच्याबरोबर गुणगुणायला लागले. त्यांनी एमेस यांना तोंडभरून आशीर्वाद दिला- जो या महान गायिकेने अखेपर्यंत आपल्या हृदयात जपून ठेवला होता.

केसरबाई केरकर

१९४७ साली एमेस उस्ताद अल्लादिया खॉंसाहेबांच्या शिष्या आणि हिंदुस्थानी संगीतातील देदीप्यमान तारका म्हणून प्रसिद्ध असलेल्या सूरश्री केसरबाई केरकर यांना मुंबईत भेटल्या. जयपूर-अत्रौली घराण्याच्या या सम्राज्ञीच्या लाभार्थ (बेनिफिट) एक कार्यक्रम एमेस यांनी अतिशय आनंदाने सादर केला होता. तिखट स्वभावासाठी प्रसिद्ध असलेल्या केसरबाईंनी या असल्या सूचक कृतीचा स्वीकार कसा काय केला, हे तसं कोडंच आहे. कदाचित एमेस यांचा मोहिनी घालणारा आवाज आणि मीराबाईसारखं व्यक्तिमत्त्व- जे पडद्यावर त्यांनी अजरामर केलं होतं- यांनी ही किमया केली असावी.

जाता जाता दोन मुद्दे : (१) या लेखाचा मसुदा सोपानला दाखविण्याच्या अगोदर मी त्याला सांगितलं की, ‘एमेस आणि लतादीदी या दोघींनीही गोस्वामी तुलसीदासांचे ‘हनुमान चालीसा’ (४० चौपाइयांमध्ये निबद्ध केलेलं एक स्तोत्र) सादर केलेलं आहे.’ त्याने मला विचारलं, ‘दोघांपैकी कोणाचं ‘चालीसा’ जास्त ईश्वरी आहे?’ मी त्याला दिलेलं उत्तर : ‘सोपान, मला असं वाटतं की, खुद्द मारुतीरायालादेखील हे टॉस करून ठरवावं लागेल.’ (२) वाचकहो, यू-टय़ूबवर जाऊन पुढील गाणी तुम्ही नक्की ऐकावी अशी शिफारस मी तुम्हाला करीत आहे.. (अ) एमेस यांनी गायलेला तुकोबारायांचा ‘बा रे पांडुरंगा केव्हा भेट देशी’हा अभंग आणि (ब) त्यांचंच ‘आमार मोल्लिका बोने’ हे रवींद्रगीत. तसंच शांता आपटे यांनी गायलेलं ‘जागोरोने जाय विभाबोरी’ हे एक अतिशय लोकप्रिय रवींद्रगीत!

‘‘Shanta, you are simply magnificent.’’ – हे गीत ऐकल्यानंतर माझ्या एका बंगाली मित्राची ही प्रतिक्रिया!

शब्दांकन : आनंद थत्ते