विसाव्या शतकातल्या प्रतिभावंत शास्त्रज्ञांच्या मांदियाळीतील एक तेजस्वी तारका म्हणून मारी क्युरीला सारं जग ओळखतं. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत अभ्यास करून फ्रान्समधल्या सुप्रसिद्ध सोबरेन विद्यापीठाकडून डॉक्टरेटची पदवी मिळवणारी ती पहिली स्त्री. पती पिएर क्युरीबरोबर ‘किरणोत्सर्गा’च्या घटनेच्या शोधाबद्दल नोबेल परितोषिकावर (भौतिकशास्त्र) तिनं नाव कोरलं. पतीच्या मृत्यूनंतर त्यांचं काम तिनं एकटीनं पुढे चालवलं. आठ वर्षांनंतर ‘रेडियम’ धातूच्या शोधाकरिता तिला रसायनशास्त्रातलं दुसरं नोबेल जाहीर झालं. तिच्या जीवनाची चित्तरकथा तिच्या धाकटय़ा मुलीनं – ईव्ह क्युरीनं लिहिली. १९३७ lr18साली प्रथम प्रकाशित झालेलं हे चरित्र जगभर गाजलं. या पुस्तकाचा मराठीत अनुवाद केला आहे प्रसिद्ध शास्त्रीय गायिका अश्विनी भिडे-देशपांडे यांनी. या अनुवादाचं प्रकाशन ग्रंथालीतर्फे ७ एप्रिलला सायंकाळी ७ वाजता स्वा. सावरकर स्मारक सभागृह, शिवाजी पार्क येथे होत आहे, त्यानिमित्ताने अनुवादिकेच्या ‘मनोभूमिके’तून..
शा ळेच्या वयात भौतिकशास्त्र हा विषय मला नेहमीच कठीण वाटत असे. विज्ञानाची आवड तर मला होती; पण माझा कल नेहमी पदार्थविज्ञानापेक्षा जैवविज्ञानाकडेच जास्त झुकत असे.  वडिलांच्या प्रभावामुळे संशोधनकार्याच्या क्षेत्रात रुची निर्माण झाली. त्याचमुळे बीएस्सी पदवीसाठी मी सूक्ष्मजीवशास्त्र (मायक्रोबायोलॉजी) हा विषय निवडला. मग त्यातच एमएस्सी केलं; आणि शेवटी जीवरसायनशास्त्रात (बायोकेमिस्ट्री) पीएचडीकरिता मला भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटर (बीएआरसी) सारख्या जगविख्यात संशोधन केंद्रात काम करण्याची संधीही मिळाली. बीएआरसीमधल्या पीएचडीच्या सहा वर्षांत संशोधन क्षेत्राशी माझी ओळखच नव्हे, तर मैत्रीही झाली.  पण देवाजीच्या मनात माझ्या जीवनाची रूपरेषा काही वेगळ्या तऱ्हेनं आखलेली होती. शालेय अन् महाविद्यालयीन शैक्षणिक कालखंडात माझी संगीतसाधना आईच्या मार्गदर्शनाखाली समांतरपणे कायम चालूच होती. पण शिक्षणाला प्राथमिकता दिलेली असल्यामुळे (अभ्यास सांभाळून सगळे बाकीचे ‘उद्योग’ करण्याची टिपिकल मध्यमवर्गीय मानसिकता!) संगीतासाठी मात्र मी कधीच पूर्ण वेळ देऊ  शकले नव्हते. म्हणून शिक्षणाची (पीएचडीची) यशस्वी पूर्तता केल्यानंतर मी काही दिवस तरी विज्ञानाला तात्पुरता रामराम ठोकून संगीतसाधनेच्या क्षेत्रात उडी घेण्याचा साहसी प्रयोग आरंभला.  
साधारण याच कालखंडात मादाम क्युरींशी माझी पहिली हृदयभेट झाली. तसं पाहायला गेलं तर शाळेत विज्ञान विषयाचा अभ्यास करीत असताना मादाम क्युरींशी जुजबी ओळख झाली होती. रेडिओअ‍ॅक्टिव्हिटी – ‘किरणोत्सर्ग’ या घटनेचा शोध लावणाऱ्या, त्यासाठी नोबेल पुरस्कार मिळवणाऱ्या, प्रकांड बुद्धिमत्तेच्या जगप्रसिद्ध संशोधिका म्हणून मादाम माहितीच्या होत्या. पण त्यांच्याभोवती एक गूढरम्य असं वलय असल्यासारखं वाटायचं. १९८० च्या दशकाच्या उत्तरार्धात, माझ्या लग्नानंतर मी ‘साहित्य सहवासा’त राहायला आले. लेखिका दीपाताई गोवारीकरांचं कुटुंब आमच्या शेजारच्या इमारतीत वास्तव्याला होतं; त्यांच्या नि आमच्या कुटुंबांचा घरोबाही होता. दीपाताईंचा स्वभाव फार लाघवी! मी ‘विज्ञानसंशोधन’ वगैरे करते म्हणून त्यांना माझं कोण कौतुक! त्यांनी एकदा कुठूनशी ‘मादाम क्युरीं’ची जीर्णशीर्ण झालेली प्रत पैदा करून मला वाचायला दिली, ‘अमुक इतक्या दिवसांत नक्की परत दे; वाचून संपली किंवा नाही संपली तरी!’ असं सांगून!
१९३७ साली प्रथम प्रसिद्ध झालेलं मादाम क्युरींचं माझ्या हाती पडलेलं हे चरित्र त्यांच्या धाकटय़ा मुलीनं – ईव्ह क्युरीनं लिहिलं होतं.  मुळात फ्रेंचमध्ये असलेल्या पुस्तकाचं हे इंग्रजी भाषांतर होतं! मादामचं तेजस्वी व्यक्तिमत्त्व; आणि कल्पनेपेक्षाही विलक्षण असलेली आईची गोष्ट तिच्या मुलीनं ज्या नितांतसुंदर शैलीत सांगितली आहे, ती मुलीची ओघवती भाषाशैली यांनी मी त्या वेळी भारून गेले होते. त्यामुळे पुढली काही र्वष मी माझ्या नव्या संसारात, बालसंगोपनात आणि नंतर पूर्णवेळ पत्करलेल्या संगीताच्या साधनेत पार बुडून गेले असले, तरी मनाच्या कप्प्यात कुठेतरी खोलवर मादामची अन् तिच्या मुलीची ही गोष्ट दबा धरून राहिली असणार!
पंचवीस र्वष उलटली. जगाला संगणक, इंटरनेट वगैरेंचा सराव होऊ  लागला. माझी मुलगी आता ‘विज्ञानसंशोधना’साठी अमेरिकेत थडकली होती. तिच्याकडच्या माझ्या वास्तव्यादरम्यान २०१० साली मी केलेल्या ‘रिकामटेकडेपणच्या उद्योगां’त ‘अमेझॉन डॉट कॉम’ या संकेतस्थळावर मादामच्या चरित्राची नवीकोरी प्रत (२००१ साली प्रसिद्ध झालेली) हाताला लागली, आणि माझी मादामशी पुन्हा गळाभेट झाली! वाचताना मला जाणवलं, की आज पंचवीस वर्षांनंतरही मादामच्या जीवनाच्या चित्तरकथेनं मला तितकंच खिळवून ठेवलं होतं.
खरं तर मादाम क्युरींबद्दल सारं जग जाणतं. असामान्य, लखलखत्या बुद्धिमत्तेच्या या स्त्रीनं विज्ञानजगतात नवे मापदंड प्रस्थापित केले. त्यांची कोणतीही कर्तबगारी ‘सर्वप्रथम’, ‘एकमेव’, ‘अपूर्व’, ‘अद्वितीय’  अशा विशेषणांशिवाय सांगता येत नाही. फ्रान्सच्या जगप्रसिद्ध सोबरेन विद्यापीठातून डॉक्टरेटची पदवी मिळवणारी मारी ही पहिलीच विद्यार्थिनी; अन् ही पदवी जगातल्या कोणत्याही विद्यापीठातून भौतिकशास्त्र या विषयात मिळवणारी ती पहिलीच स्त्री! नोबेल पुरस्कार मिळवणारी पहिली स्त्री तर ती होतीच; पण दोन वेळा नोबेल पुरस्कारावर नाव कोरणारी ती सर्वप्रथम व्यक्ती (स्त्री किंवा पुरुष) होती; अन् एकापेक्षा जास्त नोबेल पुरस्कार पटकावणारी ती आजतागायत एकमेव स्त्री आहे!
आजपासून सव्वाशे वर्षांपूर्वीचा तो कालखंडच जादूनं भारलेला होता. १८९३ साली शिकागो इथल्या सर्वधर्म परिषदेत जेव्हा स्वामी विवेकानंदांनी आपलं जगप्रसिद्ध भाषण दिलं, त्याच वर्षी सोबरेन विद्यापीठातून मारी स्क्वोदोवस्कानं आपली भौतिकशास्त्रातली ‘मास्टर्स’ची पदवी घेतली. रेडिओअ‍ॅक्टिव्हिटी – किरणोत्सार या शास्त्रीय घटनेचा शोध, त्या वैशिष्टय़ानं परिपूर्ण असलेल्या, ‘रेडियम’ या जगाला अद्याप अज्ञात असलेल्या ‘नव्या’ मूलद्रव्याची शक्यता सूचित करणारा पती पिएरबरोबरचा मारीचा पेपर १९०२ साली प्रकाशित झाला अन् त्याबद्दल क्युरी दाम्पत्याला (हेन्री बेकरेलबरोबर विभागून) १९०३ सालचं नोबेल पारितोषिक जाहीर झालं. आइनस्टाइनचा सुप्रसिद्ध ‘थिअरी ऑफ रिलेटिव्हिटी’चा पेपर १९०५ सालचा, पिएर-मारी यांचं नोबेल जाहीर झालं १० डिसेंबर १९०४ या दिवशी; अन् त्यानंतर एकाच आठवडय़ात १७ डिसेंबर १९०४ या दिवशी राइट बंधूंनी अमेरिकेत आपलं पहिलं यशस्वी विमानोड्डाण (अठरा मिनिटं हवेत) केलं. मोटारगाडय़ांचं पेटंट कार्ल बेंझनं १८८९ साली घेतलं, अन् १९१३ साली हेन्री फोर्डनं अमेरिकेत पहिला मोटारींचा कारखाना सुरू केला. मादामना दुसरं नोबेल मिळालं ते १९११ साली आणि १९१३ साली आपल्या गुरुदेव रवींद्रनाथांना साहित्याचं नोबेल मिळालं! आज आपण गृहीत धरतो त्यांपैकी कित्येक गोष्टी त्या काळात नव्हत्याच! विमानप्रवास, टेलिफोन, विजेवर चालणारी घरांची हीटिंगव्यवस्था.. अगदी मोटारगाडीचा प्रवासही ताशी ४५ मैलांच्या वेगानं करणं शक्य झालं म्हणजे ‘अचीव्हमेंट’ वाटावी असा तो काळ होता.
त्या काळी, पारतंत्र्यात पिचून निघालेलं पोलंड आपली स्वतंत्र अस्मिता राखून ठेवायची धडपड करणारं एक शूर राष्ट्र मानलं जात होतं. रशियन झारच्या अधिपत्याखाली असलेल्या वॉर्सा या राजधानीच्या शहरातली पोलिश जनता राज्यकर्त्यांच्या जुलमी राजवटीमध्ये भरडून निघत होती. पोलिश लोकांना मातृभाषेत बोलायची मोकळीक नव्हती. पोलिश रीतीरिवाज पाळायला बंदी होती.  शालेय शिक्षण तर सक्तीनं रशियन भाषेत घ्यावं लागेच, पण रोजची देवाची प्रार्थनादेखील परक्या रशियन भाषेतच म्हणावी लागे! अशा काळात, एका गरीब शाळामास्तराच्या घरी मारिया ऊर्फ मान्या या तेजस्वी मुलीनं जन्म घेतला.  पाच भावंडांतलं हे शेंडेफळ!  हुशार, चुणचुणीत अन् सर्वाची लाडकी मान्या अगदी लाडाकोडात वाढत होती. सगळ्यांच्या कौतुकास पात्र ठरत होती. पण दहा वर्षांच्या कोवळ्या वयात आईचं छत्र हरपलं! वडिलांची बचतपुंजी- एका शाळामास्तराची बचत तरी काय असणार? पाच मुलांच्या संगोपनात कापरासारखी उडून जात असे. पोलंडमध्ये तर शाळेनंतरच्या उच्च शिक्षणासाठी विश्वविद्यालयामध्ये (युनिव्हर्सिटी) मुलींना प्रवेशच नव्हता. अशा वेळी, शाळेतून नुकतीच बाहेर पडलेली ही तडफदार मुलगी मोठय़ा बहिणीची उच्च शिक्षणासाठीची तळमळ जाणून, तिनं फ्रान्सला जाऊन डॉक्टर बनावं यासाठी तिला प्रेरित करते; त्यासाठी स्वत: परक्यांच्या घरी राहून, गव्हर्नेसची नोकरी करून स्वत:च्या पगारातून बहिणीला आर्थिक मदत पुरवते; अन् मग बहिणीच्या ध्येयप्राप्तीनंतर तिच्याच आधारानं स्वत:च्या उच्चशिक्षणासाठी दूरदेशी फ्रान्सला प्रयाण करते.. हलाखीच्या परिस्थितीत अत्यंत काटकसरीनं राहून, अपार परिश्रम करून आपल्या ध्येयाकडे वाटचाल करते.. हे सारंच मोठं विलक्षण आहे, प्रेरणादायी आहे.  ज्या मूल्यांना तिनं मानलं, त्यांवर संपूर्ण निष्ठा ठेवली आणि कितीही मोठं आकर्षण समोर उभं राहिलं तरी ती ढळू दिली नाहीत. हे सारं फार हृद्य आहे. वडिलांनी मुलांवर केलेले संस्कार इतके मूल्यवान आहेत, बहिणी-बहिणींचं (अन् इतर भावंडांचं) नातं इतकं बोलकं आहे, देशप्रेमाची प्रेरणा इतकी जाज्वल्य आहे, आणि नवरा-बायको (पिएर-मारी- जे एकमेकांचे कार्यालयीन सहकारीदेखील होते!) यांची व्यक्तिमत्त्वं इतकी परस्परपूरक आहेत, की आजच्या घसरत्या मूल्यांच्या काळात त्यांचा परामर्श घेणं फार गरजेचं वाटतं.
ज्ञानार्जनाच्या (शिक्षणाच्या नव्हे!) ध्यासानं वेडावलेल्या या मुलीच्या आयुष्यात मौजमजा, ऐषाराम, चैन या गोष्टींना स्थान तर नव्हतंच; पण तिच्या वयाला साजेशा प्रेमभावनेलादेखील तिनं थारा दिला नव्हता. अन् तरीदेखील परमेश्वरी योजनेनुसार पिएर क्युरीच्या रूपात तिला उदात्त प्रेमाची देणगी लाभली. कसं असेल त्या दोघांचं नातं? मारी तर ध्येयानं पछाडलेली म्हणता येईल अशी होती.. आपल्याला आवडणारं असं उच्चशिक्षण- जे आपल्या देशात मिळत नाहीये, ते फ्रान्समध्ये पदरात पाडून घ्यायचं, मग मायदेशी पोलंडला आपल्या मायेच्या माणसांत परतायचं, आपल्या समाजाच्या जडणघडणीकरिता झटायचं, आपल्या देशबांधवांच्या उन्नतीला कारणीभूत व्हायचं, वृद्ध वडिलांची सेवा करायची अशी तिची स्वप्नं होती! आणि पिएर? विज्ञानाला आणि त्याच्याच शब्दांत सांगायचं तर स्वत:च्या विचारांना वाहून घेतलेला हा संशोधक. अतिशय स्वप्नाळू अन् कविमनाचा; विज्ञानसंशोधन हेच आपल्या आयुष्याचं ध्येय मानणारा आणि त्याकरिता लग्न, कुटुंब, मुलंबाळं; फार काय प्रेमाचीही बंधनं असले ‘अडथळे’ नकोसे असणारा..  अशी ही मूलत: भिन्न प्रकृतीची दोन माणसं एकमेकांकडे कशामुळे आकर्षिली गेली? त्यांना बांधून ठेवणारा समान धागा तरी कोणता होता? कधी त्यांचं नातं सखी-सहचराचं, कधी सहकाऱ्यांचं तर कधी गुरू-शिष्यांचं- ज्यात गुरू आणि शिष्य या भूमिका दोघांनीही आलटूनपालटून जगलेल्या दिसतात! पिएरनं त्याच्या अंतरात वसलेल्या कविहृदयाचा आविष्कार करीत कित्येकदा मारीकडे प्रेमयाचना केली आहे; अन् मारीनं आपल्या कर्तव्यनिष्ठेला जागून किती वेळा त्याला नकार दिला आहे! तरीदेखील समान ध्येयानं पछाडलेल्या या दोन विज्ञानवेडय़ा माणसांचं शेवटी मीलन होतं त्या वेळी त्या दोघांइतकेच आपण वाचकही कसे खूश होतो! घरगुती साध्याशा लग्नसमारंभानंतर त्यांनी सायकलींवरून केलेल्या फ्रान्सच्या भटकंतीची वर्णनंही हृदयंगम आहेत. अगदी त्यांच्या स्वभावांना साजेशी. आणि ‘रेडियम’चा शोध लागल्यानंतर मारी आणि पिएर दोघेही आपल्या शोधाचं ‘पेटंट’ घ्यायला नकार देतात! का? तर मानवजातीला उपयुक्त ठरणाऱ्या वैज्ञानिक शोधांची माहिती समाजापुढे खुली न करता तिचं पेटंट घेऊन स्वत:चं भविष्य सुरक्षित करून ठेवणं हे त्यांना ‘विज्ञानमूल्यांच्या विरोधी’ वाटतं म्हणून! या वेळी तर आपली अवस्था ‘दिव्यत्वाची जेथ प्रचीती तेथे कर माझे जुळती’ अशी होते.
पण.. अनेक चांगल्या गोष्टींप्रमाणेच पिएर-मारीचं हे नातंही अल्पजीवी ठरलं. मारीच्या पदरी दोन लहानग्या मुली टाकून नियतीनं पिएरला निष्ठुरपणे उचलून नेलं. त्या वेळचं मारीचं भावनिक रिकामपण, त्यातून तिला बाहेर काढायला सासऱ्यांनी, दिरानं केलेली मदत, मारीच्या भावंडांचा आधार, या साऱ्याच गोष्टींचं लेखिकेनं केलेलं अवलोकन अप्रतिमच म्हणावं लागेल.
आयरीन या मोठय़ा मुलीच्या रूपानं मारीला पुनश्च एकवार आत्मिक सहचरी भेटली. आईच्याच कार्यक्षेत्रात, आईच्याच कामाला उचलून घेत, त्यात आपलं योगदान देत, ते पुढे नेत या मुलीनं आईसारखंच नोबेल पारितोषिकावर आपलं नाव कोरलं. (मादामनंतर चोवीस वर्षांनी नोबेल मिळवणारी ती दुसरी स्त्री!) विशेष म्हणजे, या सन्मानात (अन् तिच्या कामातही!) तिच्या जोडीला तिच्या जीवनाचा सहचर फ्रेडरिक ज्योलियो हाही होता. अगदी तिच्या आईवडिलांसारखीच परिस्थिती! फक्त हे सुख अनुभवणं मारीच्या नशिबात नव्हतं; आईच्या मृत्यूनंतरच मुलीला अन् जावयाला नोबेल जाहीर झालं. जसं मारीला मिळालेलं नोबेल पाहण्याचं सुख तिच्या वडिलांना मिळालं नाही, तसंच!  
विज्ञानविश्वात रमलेल्या क्युरींच्या घरात जन्मलेली ईव्ह या पुस्तकाची लेखिका; पिएर – मारी या दाम्पत्याची धाकटी मुलगी- कलाकार होती. आईचे मनोव्यापार समजून घ्यायला लागणारं संवेदनशील मन तिच्यापाशी होतं. तिला आईचा सहवासही सर्वात जास्त लाभला. अखेरच्या आजारात आईची शुश्रूषाही तिनंच केली. पिएर गेला तेव्हा ही मुलगी दीड वर्षांची होती; वडिलांच्या काहीही स्मृती तिच्याजवळ असणं दुरापास्तच होय! त्या वेळेस आईची झालेली अवस्था तिला आठवणं अशक्यच! पण स्वत:च्या संवेदनशीलतेनं तिनं आईची त्या वेळची उद्ध्वस्त अवस्था अतिशय परिणामकारकपणे उभी केली आहे. जाणत्या वयात आल्यानंतरही तोवर जगभरात ख्यातिप्राप्त झालेल्या आपल्या आईचं विज्ञानविश्वात काय स्थान आहे, हेही तिला आकळणं कठीणच होतं. पण आईची पाठराखीण म्हणून तिनं आईबरोबर जगभर प्रवास केला. त्या वेळी तिला ‘मादाम क्युरीं’ची किंमत कदाचित हळूहळू कळत गेली असेल. आईच्या मृत्यूनंतर तीन र्वष या मुलीनं पोलंड, फ्रान्स आणि अन्यत्र जाऊन आईच्या आठवणी, पत्रं, फोटो, चिठय़ाचपाटय़ा गोळा केल्या; नातेवाईकांना, मित्रमंडळींना भेटून मुलाखती घेतल्या आणि आईच्या बालपणाचा, तारुण्यातल्या शैक्षणिक कालखंडाचा धांडोळा घेतला. मग स्वत:ला एका घरात कोंडून घेतलं आणि हे पुस्तक लिहिलं. आईचा स्वभावविशेष, तिची मूल्याधिष्ठित विचारसरणी आणि तिला साजेसे आचार, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिच्या आत्म्याची विशुद्धता हे सारे गुणविशेष या कलाकार मुलीनं टिपले आणि त्यांना तिनं काव्यमय शब्दरूप दिलं. कुठेही फापटपसारा नाही; आईच्या वर्तनाचं स्पष्टीकरण नाही, भावनेचा उद्रेक नाही; अन् तरीदेखील भावनेचा ओलावा कुठेही कमी झालेला नाही.  ईव्ह स्वत: शास्त्रज्ञ नव्हती, त्यामुळे वैज्ञानिक संकल्पनांचा बडिवार तिच्या लेखनात कुठेच आढळत नाही. सामान्य वाचकालाही विज्ञानविषयक बारकाव्यांचा अडथळा कुठेही जाणवत नाही. जाणवतं ते अंत:करण, भावना, उदात्त मूल्यं, त्यांवरची निष्ठा, त्यांना कवटाळून आयुष्य जगण्यासाठी लागणारं असामान्य धैर्य, तेज नि खरेपणा!
आई म्हणून मादाम किती यशस्वी ठरल्या याची साक्ष त्यांच्या दोन्ही मुलींच्या कर्तृत्वाच्या आलेखांतून आपल्याला झळझळीतपणे जाणवते. त्यांच्या दोन मुलींपैकी थोरली आयरिन तर नोबेल पारितोषिक विजेती!  तिच्या कर्तृत्वाला साऱ्या जगानं सलाम केला. मादामची धाकटी मुलगी ईव्ह एक यशस्वी पियानोवादिका आणि युद्धकालीन पत्रकारदेखील! तिनं ‘मादाम क्युरी’ हे आईचं चरित्र आणि युद्धाच्या शौर्यगाथांचं आणखी एक पुस्तक (जर्नी अमंग वॉरियर्स) लिहिलं. दोन्ही गाजली. विज्ञानाच्या क्षेत्राला मादामनी आपलं सर्वस्व अर्पण केल्यामुळे मुलींच्या संगोपनासाठी पुरेसा वेळ देण्यास आपण असमर्थ ठरलो, अशी खंत स्वत:च व्यक्त केली आहे. पण तरीदेखील दोघीही मुलींनी आईलाच ‘रोल-मॉडेल’ मानलं, आणि हे मुलींच्या नजरेतून मुलीच्याच शब्दांत अनुभवणं ही आपल्यासाठी एक आनंदयात्रा ठरते.
मला ईव्ह क्युरीचं हे लेखन अतिशय भावलं. उदात्त गुणांचा परिपोष करणारं आहे म्हणून नव्हे, मादामचे ते गुण तर दैवीच आहेत; पण त्यामागचा मानवी दृष्टिकोन, भावनिक गुंतवणूक, आई – मुलीच्या नातेसंबंधाचा परामर्श हा फार फार मनोज्ञ आहे. तो लिहून ठेवून माझ्यासारख्या वाचकांपर्यंत पोचवल्याबद्दल मी ईव्हची कायमच ऋणी राहीन. मातीशी नातं सांगणारी मारी लौकिक जगाशी असलेली आपली नाळ न तोडतादेखील किती उत्तुंग उंची गाठू शकली, याचं उदाहरण म्हणून मादाम मला जन्मभर प्रेरित करीत राहतील. माणूस म्हणून त्यांची ओळख पुस्तकात वाढत असताना, त्यांच्या प्रखर बुद्धिमत्तेचा अडसर वाचक म्हणून मला कधीही जाणवला नाही. ही तारेवरची कसरत ईव्हनं कशी काय साध्य केली असेल?
या सुंदर पुस्तकाचं भाषांतर करावं ही माझी प्रेरणा तर संपूर्णपणे नैसर्गिक होती. कपोलकल्पित वाटावी अशी मादामच्या आयुष्याची गोष्ट कुणा दुसऱ्याला सांगावी, किंवा जनमानसांत पोचवावी असा साधा विचारही मी केला नव्हता. स्वान्तसुखाय लिहीत गेले, लिहिण्यातला आनंद उपभोगीत गेले. पण म्हणून मादामवर मराठीत स्वतंत्र पुस्तक लिहावं, अशी ऊर्मी मला कधीच वाटली नाही; तेवढा माझा आवाकाही नव्हता.  ईव्हचं हे लिखाण, त्यातलं अंत:करण किती सुंदर आहे, ते मराठीतून वाचावं हीच माझी प्रेरणा असावी बहुतेक! भाषांतराच्या कामात मला नितांत आनंद मिळाला. रात्रीबेरात्री, प्रवासात, हॉटेल रूममधल्या बेडवर बसून किंवा स्टेशनवर चक्क बॅगेवर ठिय्या मांडून मी हे काम अतिशय आनंदाने करीत असे.
हे पुस्तक वाचत असताना माझ्या अंतरंगात एक छोटीशी मादाम वस्तीला आली आहे, असा भास मला नेहमी होत असे. भाषांतराचं काम संपवल्यानंतर माझ्या अंतरात एक छोटीशी ईव्हदेखील वस्तीला आली. मादामची विज्ञाननिष्ठा अन् ईव्हची साहित्यिक प्रतिभा, संवेदनशील, तरल भावनाप्रधानता या दोन्हींचं माझ्यात थोडय़ाफार- नव्हे, फार थोडय़ा प्रमाणात मिश्रण आहे आणि म्हणून मला हे आवडतं आहे, अशी माझी धारणा होती. मात्र, भाषांतर पूर्ण झाल्यानंतर माझा हा पूर्वग्रह कसा तुटपुंजा आहे, त्याचं मला भान आलं! या मायलेकींच्या पासंगालादेखील मी पुरणार नाही याची मला पूर्ण जाणीव झाली! मादाम क्युरींच्या या गोष्टीनं मला जेवढा आनंद दिला, जितकं प्रेरित केलं,
जसं ‘सुफळ संपूर्ण’ केलं तसंच ती इतरांनाही (स्त्रियांना आणि पुरुषांनाही!) करो, या प्रार्थनेसह इथे थांबते.  
ashwinibdesh@gmail.com 

Loksatta kutuhal Creator of artificial intelligence Judea Perl
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेचे रचनाकार – ज्युडेया पर्ल
peter higgs death marathi news, peter higgs god particle marathi news
‘देव कणा’चा सिद्धान्त मांडणारा शास्त्रज्ञ काळाच्या पडद्याआड… पीटर हिग्ज यांच्या ‘हिग्ज बोसॉन’ संशोधनाचे मोल काय?
Candidates Chess Tournament R Pragyanand success in defeating Alireza Firooza sport news
कॅन्डिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा: प्रज्ञानंदने फिरूझाला रोखले! गुकेश-विदित, हम्पी-वैशालीमध्ये पहिल्या फेरीत बरोबरी
Return journey to Alexander
भूगोलाचा इतिहास: ..जेव्हा सम्राट हतबल होतो!