News Flash

त्या लिहितात, मुलं ‘ऐकतात’!

गेली काही वर्षे लेखन, रेखाटनं, संपादन, अनुवाद या माध्यमांतून मुलांसाठी मोलाची साहित्यनिर्मिती करणाऱ्या माधुरी पुरंदरे यांना बालदिनी, १४ नोव्हेंबरला  यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार बंगळूरु येथे

| November 16, 2014 06:04 am

गेली काही वर्षे लेखन, रेखाटनं, संपादन, अनुवाद या माध्यमांतून मुलांसाठी मोलाची साहित्यनिर्मिती करणाऱ्या माधुरी पुरंदरे यांना बालदिनी, १४ नोव्हेंबरला  यंदाचा साहित्य अकादमी पुरस्कार बंगळूरु येथे एका समारंभात प्रदान करण्यात आला.  
त्यानिमित्ताने..

स मोरच्या मुलांना हसू आवरत नव्हतं! माधुरी पुरंदरे यांचं ‘परी, मी आणि हिप्पोपोटॅमस’ हे पुस्तक भाषाविकास वर्गातल्या मुलांना मी वाचून दाखवत होते. जीनची पॅण्ट घालणारी परी, तिच्या सारख्या हरवणाऱ्या छडय़ा, परीची परीक्षा, तिला पासच होता न येणं, तिची जादू चुकणं आणि त्यामुळे दगडाची करंजी न होता ढब्बू मिरची होणं.. अशी विलक्षण परी त्यांना पहिल्यांदाच भेटत होती. मुलांच्या खिदळण्यामुळे वाचून दाखवताना हसू आवरणं मलाही कठीण जात होतं आणि तरी वाचून दाखवायचा उत्साह दुणावत होता. मुलांच्या प्रतिसादामुळे वाचून दाखवण्याच्या धुंदीत मीही रंगून गेले होते. वाचनसाहित्य उत्तम दर्जाचं असेल, रेखाटनं ताकदीची असतील, तर मुलांबरोबर एकत्र वाचण्याचा अनुभव किती सकस होऊ शकतो याचा मला पुन्हा एकदा प्रत्यय आला. गेली वीस-पंचवीस र्वष वेगवेगळ्या वयोगटाच्या मुलांना मी गोष्टी वाचून दाखवत आले आहे. माधुरीताईंची गोष्ट वाचून दाखवली आणि मुलांनी ती उचलून धरली नाही असं होतच नाही!
संगीत, नाटक, चित्रपट, साहित्य, चित्रकला अशा विविध क्षेत्रांत आपला ठसा उमटवणाऱ्या माधुरीताईंनी साधारणपणे तीस-बत्तीस वर्षांपूर्वी मुलांसाठी पहिल्यांदा लिहिलं. त्यावेळी ‘वनस्थळी’ या नियतकालिकाच्या संपादिका म्हणून त्या काम करत होत्या. अंकाची सजावटही त्या स्वत:च करत. ‘बालवाडी’ आणि ‘छोटय़ांची वनस्थळी’ या सदरात त्यांच्या बालांसाठीच्या लेखनाची सुरुवात झाली. तेव्हापासून हळूहळू ‘सर्कस’मधली मधुरा, ‘लालू बोका आणि चिचू उंदीर’, ‘सुपरबाबा’मधले संजू-राजू, ‘नंदू आणि बुवा कूऽक’मधला बागुलबुवा, वर्षभर आंबे देणारं झाड शोधणारी राजकन्या, दात घासण्याचा कंटाळा असलेला राजा, राधा-यश, वाचनाची आवड असलेली राणी, धांदरट, वेंधळ्या पऱ्या, चुकून फजिती झालेला परम, डच्चू मधुमििलद पाचवडेकर हा कुत्रा, ‘सिल्व्हरस्टार’मधला सॅम.. अशा व्यक्तिरेखा त्यांच्या शब्दांमधून आणि रंगरेषांमधून आकाराला आल्या. त्यांच्यासह, त्यांच्याभोवती त्यांनी गोष्टी रचल्या. या गोष्टींच्या आणि व्यक्तिरेखांच्या निर्मितीच्या जोडीनंच माधुरीताईंना त्यांची स्वत:ची अशी एक लेखनशैली सापडत गेलेली जाणवते. माधुरीताईंच्या लिखाणात मुलांच्या अवतीभोवतीचं भौतिक जग आणि आतलं, मुलांच्या मनातलं जग अतिशय तरल, सूक्ष्म अशा तपशिलांसकट उमटतं. सभोवती असणाऱ्या, दिसणाऱ्या, घडणाऱ्या गोष्टी मुलं कशा पाहतात, त्यांना कशाची उत्सुकता वाटते, मजा वाटते, कशाचा विस्मय वाटतो, कशाची भीती वाटते, ती कधी खट्ट होतात, कशानं बावचळतात, बुचकळ्यात पडतात, त्यांना कोणते प्रश्न पडतात, माणसं त्यांना कशी दिसतात, नात्यांचा अर्थ मुलं कसा लावतात, आणि हे सगळं करता करता मुलं कशी बदलतात, मोठी होतात, हे माधुरीताईंच्या लेखनात जागोजागी प्रतििबबित झालेलं आहे. मग ते लेखन वाचून दाखवलेलं, मांडीवर बसून ऐकण्याच्या वयासाठीचं असो वा किशोरांसाठीचं.
मोठय़ा साहित्यकृतीमध्ये लेखकानं आंतरिक तर्काची एक संगतवार रचना केलेली असते. मुलांसाठी लिहिलेल्या माधुरीताईंच्या लहान लहान कथांमध्येसुद्धा अशाच रचनेचं एक छोटं रूप पाहायला मिळतं आणि मुलांबरोबर ती रचना उलगडून बघत जाता येते. नंतर काय घडलं, कोण काय म्हणालं, कसं वागलं, याचा आधीच्याशी संबंध जोडून दाखवता येतो. आधी काय दिसतंय, काय घडतंय, यातून पुढे काय घडेल, हे कसं रचत नेलं आहे, याकडे मुलांचं लक्ष वेधता येतं. उदाहरणार्थ, ‘यश’ या पुस्तकमालिकेतल्या ‘पाहुणी’ या गोष्टीत ताई रिक्षात मुक्ताला मांडीवर घेऊन बसली आहे.. इथपासून यशची नाराजी चित्रांमधून उमटायला सुरुवात होते. आजोबा मुक्तालाच आत नेतात हे पाहून खट्ट झालेला यश, आई मुक्ताचे बूट काढते आणि आपले मात्र आपल्यालाच काढायला लागतात याचा यशला बसलेला धक्का, आईनं मुक्ताला ‘शहाणी’ म्हटल्यामुळे यशचं आठय़ांनी भरलेलं कपाळ आणि बाल्कनीकडे जाणाऱ्या त्याच्या पावलातला राग, गजांतून पाय खाली सोडून बसलेला रुसका यश आणि मुक्ताकडून आपली गाडी हिसकावून घेऊन ओरडणारा यश- हे सारे तपशील मुलांना रंगरेषांमधून दिसतात. पुढे यश जेव्हा रागानं आईला म्हणतो, ‘‘मी तुझा मुलगा आहे ना? आहे की नाही?..’’ आणि गाडी, बूट, रिक्षा वगरे दुखऱ्या तपशिलांचे उल्लेख करतो तेव्हा हा मजकूर आणि त्याचे संदर्भ असलेली आधीची चित्रं यांचा संबंध जोडायला मुलांना आवडतं. अगदी साडेतीन-चार वर्षांची मुलंही ही जोडणी रस घेऊन करतात. माणसामाणसांमधल्या नात्यांचा अर्थ लावण्याची ओढ माणसाला अखंडपणे वाटत असते. एका पातळीवर मुलंही याला अपवाद नसतात. या नात्यांचा अर्थ लावण्याचा मुलांचा प्रयत्न माधुरीताईंच्या पुस्तकांमध्ये जागोजागी दिसतो. उदाहरणार्थ, राधाच्या नजरेला दिसणारा शिदूकाका ‘मोठय़ानं गाणं लावून डांगचिक डांगचिक नाच करत असतो’ किंवा ‘मत्रिणी घरी आल्या की तो त्यांच्याशीच बोलत बसतो, राधाकडे लक्षसुद्धा देत नाही.’ माधुरीताईंच्या येऊ घातलेल्या ‘पाचवी गल्ली’ या पुस्तकामधील केतकी ‘चंद्रसदन’मध्ये आपल्या आईबरोबर राहते. बाबा त्यांच्याबरोबर राहत नाही, पण दर आठवडय़ाला केतकीला भेटतो. आई आणि बाबा दोघांनाही हसताना पाहून तिला प्रश्न पडतो, ‘दोघांनाही इतकं छान हसता येतं, तर कट्टी कशाला केलीये?’ ‘खजिना’ या गोष्टीमधला चुटकीचा बाबा, ज्यांचं मोल पशात मोजता येणार नाही अशा गोष्टी म्हणजे कसा आपला खरा खजिना असतो, हे तिला हळुवारपणे समजावून सांगतो. अशी अनेक उदाहरणं देता येतील.
गेल्या दोन-अडीच दशकांत विविध लेखकांची, अनेक प्रकाशनांची मूळ मराठीतली आणि अनुवादित अशी अनेक सचित्र, रंगीत पुस्तकं मुलांसाठी आली. त्यातील विषय आणि चित्रं चांगली असली तरी त्यांची भाषा फारशी चांगली नसते. या पाश्र्वभूमीवर माधुरीताईंच्या पुस्तकांमध्ये एकही अमराठी शब्दरचना वा वाक्यरचना आढळत नाही. (अपवाद- त्यांच्या अमराठी व्यक्तिरेखांचा!) उलट, मराठीच्या भाषिक धाटणीकडे मुलांचं लक्ष वेधता येईल अशा अनेक जागा सापडतात, ही त्यांच्या पुस्तकांची आणखी एक जमेची बाजू. व्यक्तिरेखांच्या चित्रणासाठी आणि घटनांच्या वर्णनासाठी चपखल शब्दांची निवड हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्टय़ आहे. त्यामुळं भाषेचा नेमका आणि प्रभावी वापर कसा करता येतो, याविषयी मुलांशी बोलण्याच्या संधी माधुरीताईंच्या गोष्टी वाचताना जागोजागी मिळतात.
‘तिसरा पाय’मधली राणी चुणचुणीत आहे, कारण तिला पुस्तकं वाचण्याची आवड आहे. परीचं नाव ‘किनई’ आहे. ती धांदरट, वेंधळी आणि विसरभोळीही आहे. जादूच्या छडीऐवजी ती मोबाइल वापरते आणि तिच्या हातावर टॅटूसुद्धा काढलेला आहे! लालू बोक्याच्या गोष्टीमधला चिचू उंदीर लालूला जरासुद्धा घाबरत नाही, कारण या आळशी बोक्याला उंदीर मारायचाच कंटाळा आहे! ‘नंदू आणि बुवा कूऽक’मधला बागुलबुवा तुरुतुरु पळणारा, छतावर उलटा चालणारा, कोलांटी उडी मारणारा आणि नंदूला हसवणारा आहे. या आणि अशा अनपेक्षिततेतून मुलांना या गोष्टी वाचताना येणारी मजा आणखीच वाढते.
समकालीन बालसाहित्यात दुर्मीळ असणारी गोष्ट आणि बालसाहित्यकार म्हणून माधुरीताईंचं खास वैशिष्टय़ म्हणजे भाषा आणि चित्रं ही दोन्ही माध्यमं लीलया हाताळू शकणं. त्यांच्या गोष्टी जेव्हा जेव्हा मी मुलांना वाचून दाखवते, तेव्हा तेव्हा शेजारची चित्रं पाहिली, की सोबतच्या वाक्यांचा ‘टोन’ मला ऐकू येतो आणि वाचताना कुठल्या शब्दांपाशी आवाज खुला करावा, कुठं आवाजात ‘मूलपणा’चा हट्ट उमटावा, कुठे स्वर आतुर करावा, कुठे आवाजात लगबग आणावी, कधी रुसकेपणाची झलक दिसावी हे ठरवायला त्यांची मदत होते. चित्रं, रंग, रेषा यांविषयीच्या चर्चामध्ये नेहमी अवकाशाच्या परिणामकारक वापराबद्दल बोललं जातं. माधुरीताईंच्या पुस्तकांमधल्या रेखाटनांमुळं चित्रांच्या ‘आवाजा’च्या पलूबद्दलही बोललं जायला हवं असं वाटतं!
चित्रांमधल्या मुला-माणसांचे, प्राण्यांचे भाव, आविर्भाव, स्वभाव; त्यांच्या बसण्या-उठण्या- वाकण्याच्या, उभं राहण्याच्या लकबी; बघण्याच्या तऱ्हा, नजरा; त्यांचे कपडे आणि कपडय़ांच्या नाना स्थिती; व्यक्तिरेखांच्या भोवतालातले विचारपूर्वक गाळलेले तपशील आणि दाखवलेले वेचक तपशील; रेषांचे निरनिराळे पोत, रंगांच्या छटा, संगती या सगळ्यांतून पुस्तकातल्या मजकुराला एक उठाव मिळतो. लेखिका स्वत:च चित्रकार असल्यामुळे भाषिक आशय आणि चित्रित आशय यांच्यातल्या तोलाचा डौल अगदी सहज सांभाळला जातो.
मुलांसाठी माधुरीताईंनी काढलेली चित्रं पाहून, रेखाटनकार म्हणून त्यांचं प्रशिक्षण झालेलं नाही हे खरं वाटणार नाही. त्या म्हणतात, ‘‘लिहिताना आणि रेखाटनं करताना मुलांना काय, कसं दिसेल याचा विचार केला जातो. चित्रपट-नाटकातल्या सक्रिय कामामुळं, त्याविषयीच्या विचारामुळं, दुसऱ्याच्या जागी स्वत:ला ठेवून पाहणं, दुसऱ्याची एखाद्या गोष्टीकडे पाहण्याची दृष्टी आणि त्या संदर्भातली जाणीव यांना धार येत गेली. ही जाण असण्याची इथे मदत होते. पुस्तकात उपलब्ध असलेल्या अवकाशाची नेमकी कल्पना असल्यानं, केलेलं रेखाटनाचं काम सहसा वाया जात नाही. मात्र ‘सुचण्या’ची प्रक्रिया खूप वेळ घेणारी असते.. त्यामुळं काम सुरू करायला मला वेळ लागतो..’’ ‘सिल्व्हरस्टार’ या किशोर कादंबरीचं आणि ‘यश’ या पुस्तकमालिकेचं उदाहरण देऊन त्या सांगतात, ‘‘मजकुरानुसार रेषेचा पोत ठरतो, रंग ठरतात.. मनातली व्यक्तिरेखा कागदावर उमटते तेव्हा िवगेतून ते पात्र मंचावर यावं असं काहीसं घडतं!.. पेन्सिल, शाई, जलरंग मुलांच्या वेगवेगळ्या कथांसाठी आजपर्यंत वापरले. कधी तरी अॅक्रिलिक/ ऑइलपेंट वापरून मुलांसाठी काम करायची इच्छा आहे.. मला कामात अपेक्षित असलेलं वैविध्य मात्र अजून साध्य व्हायचं आहे..’’
मुलांसाठी त्यांनी केलेली इतरही कामं आपल्या निराळेपणामुळं महत्त्वाची ठरली आहेत. ‘चित्रवाचन’सारखं चित्रांचं पुस्तक मुलांच्या निरीक्षणशक्तीला चालना देतं. भारतीय शहरी आणि ग्रामीण संदर्भ असलेली यातली चित्रं मुलांच्या भाषाविकासाला, कल्पनाशक्तीला, तर्कविकासाला योग्य असे खेळ घेण्यासाठी उत्तम माध्यम ठरतात. पारंपरिक भारतीय चित्रकलेच्या धाग्याशी जोडून घेत त्यांनी केलेले ‘कागदी खेळ’ही वैशिष्टय़पूर्ण आहेत. मूलगामी प्रकाशनानं विविध आदिवासी भाषांमध्ये मुलांसाठी केलेल्या ‘आमच्या गोष्टी’ या द्विभाषिक वाचनसाहित्यासाठी त्यांनी केलेली रेखाटनं अतिशय बोलकी आहेत. प्रथम बुक्स, ऊर्जा, राजहंस या प्रकाशनांनी माधुरीताईंची पुस्तकं प्रकाशित केली आहेत, पण त्यांचं सर्वात जास्त काम ज्योत्स्ना प्रकाशनानं प्रकाशित केलं आहे.
‘वाचू आनंदे’ हे त्यांनी संपादित केलेले वेचक मराठी साहित्याचे चार भाग आणि दोन भागांतलं ‘लिहावे नेटके’ ही कामंही मुलांच्या भाषासमृद्धीच्या दृष्टीनं मोलाची आहेत. विशिष्ट विषयाकडे निरनिराळे साहित्यिक कसं पाहतात, भाषेतून साहित्यिकांनी मांडलेला विषय चित्रकार अवकाशाच्या संदर्भात रेषा आणि आकारांच्या माध्यमातून कसा व्यक्त करतात, या दोहोंमध्ये काही समान धागा सापडतो का? याची चर्चा मुलांशी करण्यासाठी पुरेपूर वाव ‘वाचू आनंदे’मधून मिळतो. मुलांचा मराठीतल्या दिग्गज साहित्यिकांशी परिचय करून देण्याची उत्तम संधी त्यातून मिळते. ‘लिहावे नेटके’चा मुख्य हेतू जरी अचूक, मराठी धाटणीच्या लेखनासाठी मार्गदर्शन करणं आणि सराव पुरवणं हा असला तरी त्या अनुभवाला भाषास्वादाची डूब कशी देता येते आणि दृक्संवेदनांचा परिपोष करत करत तो अनुभव कसा देता येतो हे त्यात उत्तम प्रकारे साध्य झालं आहे. ज्यां जिएनो यांचं ‘झाडे लावणारा माणूस’ आणि कॅरन लीवाइन यांचं ‘हॅनाची सूटकेस’ ही दोन पुस्तकं माधुरीताईंनी अनुवादित केलेली आहेत. या पुस्तकांचा आशय मुलांना भावणारा आहेच, शिवाय, मजकुराची मराठी धाटणी राखून मूळ आशय मराठीत कसा आणावा याची उदाहरणं म्हणूनही या पुस्तकांकडे पाहता येतं.
भाषेकडे, साहित्याकडे आणि जगाकडे पाहण्याच्या मुलांच्या दृष्टीचा परिपोष होण्यासाठी लेखन, रेखाटनं, संपादन, अनुवाद अशा अनेक अंगांनी निर्मिती करत बालसाहित्य समृद्ध करण्यात माधुरीताई मोलाचा वाटा उचलत आहेत.       

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 16, 2014 6:04 am

Web Title: madhuri purandare gets sahitya akademi award
Next Stories
1 औषध दरनियंत्रणाची ऐशीतैशी
2 सदाशिवचं जाणं!
3 महाराष्ट्र ‘सापडला’.. पुढे काय?
Just Now!
X