महाराष्ट्र हसतोय
खीखी करून खॅखॅ करून,
lok03दोन्ही हातांनी पोट धरून.
कधी खदाखदा, कधी ढसाढसा
हसतोय..
महाराष्ट्र हसतोय..
कोरडय़ाठाक पाणसाठय़ात पाय सोडून हसतोय..
निळ्या- पिवळ्या हंडय़ांच्या रांगांतून हसतोय..
भेगाडलेल्या वावरांतून हसतोय..
विस्कटलेल्या घरांतून हसतोय..
महाराष्ट्र हसतोय..
चकचकीत मॉलमधल्या कूल कूल दुकानांतून हसतोय..
मॉलमागच्या गदळघाण झोपडय़ांतून हसतोय..
लोकलमधल्या गर्दीतून हसतोय..
प्रदूषणी सर्दीतून हसतोय..
मीडियाने मोठय़ा केलेल्या डेंगीचे
डोंगळे डास मारत हसतोय..
महाराष्ट्र हसतोय..
मल्टिप्लेक्सी मक्याचे दाणे खात हसतोय..
न्हाणीची कडी लावून गाणे गात हसतोय..
सिग्नलवर गाडीच्या काचा पुसत हसतोय..
विनोदी मालिकांना हसत हसत हसतोय..
महाराष्ट्र हसतोय..
सचिवालयात, विधानभवनात, आमदार निवासात
लोक गटागटाने कुजबूजताहेत..
तोंडापुढे हात धरून मोबाइलवर बोलताहेत..
व्हॉट्सॅपवर आलेले मेसेज फॉरवर्ड करताहेत..
की महाराष्ट्र हसतोय..
टीव्हीवर ब्रेकिंग न्यूज सुरू झाल्यात..
अँकर दोन्ही हातांनी कोकलताहेत..
त्यांच्या स्टुडिओत त्यांच्या पाहुण्यांना विचारताहेत..
महाराष्ट्र हसतोय- चांद्यापासून बांद्यापर्यंत,
झाडीपट्टीपासून अपरांतापर्यंत महाराष्ट्र हसतोय..
काय सांगाल तुम्ही..
की महाराष्ट्र हसतोय,
मुख्यमंत्री चिंताग्रस्त झालेत.
सचिवांना सांगताहेत,
मातोश्रीला नंतर जोडा, आधी दिल्लीला फोन लावा.
किंवा आधी दिल्लीला फोन करून मग मातोश्रीला जोडा..
किंवा नागपूरशी बोलून घ्या आणि सचिवांना जोडा..
किंवा मलाच फोन जोडा..
विरोधात बसून पाठिंबा देणारे निमविरोधी नेते
राज्याच्या स्थैर्याला हे घातक असून याच्यासंबंधाने निकाल घेतला पाहिजे,
असे म्हणताहेत.
मंत्रालयातले बातमीदार आपापले सोर्स शोधताहेत..
एकमेकांच्या कॉप्या कॉपी करताहेत..
संपादक नुकतेच जाहिरात म्यानेजरास भेटून आलेत व अग्रलेख लिहिताहेत..
की सरकारचे डोळे ठिकाणावर आहेत का?
अजून किती राज्यांनी हसले म्हणजे त्यांना दिसेल,
की महाराष्ट्र हसतोय!
कोणी म्हणतेय, आपल्याच हातांनी आपलेच दात पाडण्याचा मराठी बाणा पाहून महाराष्ट्र हसतोय..
कोणी म्हणतेय, धनुष्यासारखा वाकलेला स्वाभिमानी कणा पाहून महाराष्ट्र हसतोय..
कोणी म्हणतेय, कमरेचे सोडून हाफ पँट नेसलेला राष्ट्रवाद स्वत:च्या पोळ्या भाजताना पाहून महाराष्ट्र हसतोय..
कोणी तर असेही म्हणतेय, की गंध-पावडर अन् लाली लावलेली नैतिकता पाहून महाराष्ट्र हसतोय..
नेमके कोणालाच काही सांगता येत नाही.
पण अफवा अशी आहे,
साऱ्यांनी मिळून कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र.. ते पाहून महाराष्ट्र हसतोय..
डबडबलेल्या डोळ्यांनी हसतोय..
तोंड झाकून हमसाहमशी हसतोय..   lok14