एकोणिसावे शतक हे महाराष्ट्राचे प्रबोधनपर्व होते. इंग्रजी सत्ता स्थिरावली आणि औद्योगिक क्रांतीसोबत इंग्रजी शिक्षणामुळे पाश्चात्त्य विचारांच्या परिचय होऊ लागला. त्यामुळे जे बदल इथे वेगाने घडून आले त्याचे मन्वंतर राजकीय, सामाजिक, आíथक, मानसिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक जीवनात दिसून आले. आजच्या पुरोगामी महाराष्ट्राचा पाया रचण्याचा तो आद्य देशी सुधारकांचा काळ.
अनेक सुधारक निरनिराळ्या क्षेत्रांत वेगवेगळे विचार घेऊन पुढे येत होते. समाजाला आणि राष्ट्राला पुढे नेण्यासाठी आवश्यक ती वैचारिक बठक निर्माण करीत होते. पाश्चात्त्य विचारांचा, मूल्यांचा, जीवनपद्धतीचा आणि शिक्षणाचा प्रभाव पडून देशी तत्त्वज्ञानाचा पुनर्वचिार करण्याची वेळ आली होती असा हा काळ. पारतंत्र्य आणि आंतरराष्ट्रीय बदलांचे वारे इंग्रजी शिक्षण व्यवस्थेसोबत नवे प्रश्न निर्माण करीत होते. आद्यशिक्षित तरुणांची पिढी ही नवी आव्हाने विचारांच्या जोरावर स्वीकारत होती.
‘सुधारकांचा महाराष्ट्र’ हे डॉ. रामचंद्र देखणे यांचे पुस्तक अशा सुधारकांचे चरित्र एका वेगळ्या जबाबदारीतून आपल्यासमोर मांडते आणि महाराष्ट्राच्या वैचारिक सद्य:स्थितीबद्दल मनात प्रश्न उभे करते. यात बाळशास्त्री जांभेकर, लोकहितवादी, आगरकर, महात्मा फुले, न्यायमूर्ती रानडे, महर्षी वि. रा. िशदे, स्वा. सावरकर आणि महर्षी कर्वे या आठ सुधारकांचा या पुस्तकात समावेश आहे.
एकोणिसाव्या शतकात या साऱ्या सुधारकांनी मोठे वैचारिक आणि कृतिशील योगदान दिले, पण याच काळात दखल घेण्यासारखी अन्य व्यक्तिमत्त्वे होऊन गेली. त्यांच्याबद्दल लेखकाने कृतज्ञता व्यक्त केली आहे. पण त्या सर्वातून केवळ आठ जणांची निवड कोणत्या आधारे केली ते सांगितले नाही.
काळाचा निकष लावून पाहिला तर या काळात स्वातंत्र्यवीर सावरकर समाविष्ट होऊ शकत नाहीत. सावरकरांचे वय एकोणिसावे शतक संपले तेव्हा सतरा वर्षांचे होते. विसाव्या शतकात त्यांचे राजकीय आणि सामाजिक कर्तृत्व उदयास आले. त्या आधाराने बाबासाहेब आंबेडकर यांचा समावेश अपरिहार्य आणि आवश्यक ठरतो.   
तसेच महर्षी विठ्ठल रामजी िशदे आणि महर्षी धोंडो केशव कर्वे यांच्या सामाजिक कारकिर्दीतील पूर्वार्ध एकोणिसाव्या शतकातील आहे तर विकसित उत्तरार्ध विसाव्या शतकात. नाना शंकरशेट, टिळक, गोखले आणि चिपळूणकर यांचे योगदान ठळक असल्याने एकोणिसाव्या शतकावर त्यांचा ठसा अमिट असाच आहे. त्यांचाही समावेश नसल्याने मनात प्रश्नचिन्ह रेंगाळत राहते.
महाराष्ट्राची ओळख ही अन्य राज्यांच्या तुलनेत नेहमीच पुरोगामी राज्य म्हणून होते. त्याचा पाया या सुधारकांनी एकोणिसाव्या शतकात रचला. त्यासाठी प्रसंगी त्यांना मोठी किंमत मोजावी लागली. पण त्यामुळे महाराष्ट्राला पुरोगामित्वाची ओळख मिळाली. त्या दृष्टीने हे पुस्तक ‘पुरोगामी महाराष्ट्राचे चरित्र’ आहे. आणि हे आठ सुधारक ही जणू त्यातील निरनिराळ्या काळाची आणि वैचारिक योगदानाची प्रकरणे आहेत. सुधारकाच्या जीवनातील अल्पसा चरित्राचा भाग, त्यांची तत्कालीन पाश्र्वभूमी आणि त्यांचे सामाजिक कार्य हा प्रत्येक प्रकरणाचा आकृतिबंध असला तरी त्यांचे सुधारणावादी चिंतन आणि आधुनिक महाराष्ट्र लोकजीवनाला त्यांनी दिलेली पुरोगामी ओळख सांगण्याचा लेखकाचा त्यामागील प्रयत्न आहे.
महाराष्ट्राच्या पुरोगामित्वाबाबत शंका निर्माण होणाऱ्या सध्याच्या काळात ‘सुधारक महाराष्ट्राचे’ हे वाचनीय चरित्र आपल्याला अंतर्मुख करते आणि विचार करायलाही लावते हे मात्र नक्की.
‘सुधारकांचा महाराष्ट्र’ – रामचंद्र देखणे, पद्मगंधा प्रकाशन, पुणे, पृष्ठे – १६८, मूल्य – १६० रुपये.