28 January 2020

News Flash

किशोरवयातल्या प्रवासाला प्रौढत्वाच्या चिंतनाची जोड

'माझा प्रवास’, ‘कुण्या एकाची भ्रमणगाथा’ यांसारख्या आत्मचरित्रात्मक प्रवासवर्णनाच्या परंपरेत शोभेल असे ‘महातीर्थाचा अखेरचा यात्रिक’ हे पुस्तक आहे.

| August 17, 2014 06:13 am

‘माझा प्रवास’, ‘कुण्या एकाची भ्रमणगाथा’ यांसारख्या आत्मचरित्रात्मक प्रवासवर्णनाच्या परंपरेत शोभेल असे ‘महातीर्थाचा अखेरचा यात्रिक’ हे पुस्तक आहे. तारुण्याच्या उंबरठय़ावर पाऊल ठेवलेल्या एका किशोरवयीन मुलाने निरुद्देशपणे, नि:संग मनाने घेतलेल्या आत्मशोधाचा हा प्रवास आहे.
विमल डे या युवकाने सोळाव्या-सतराव्या वर्षीच घर सोडले. कलकत्त्यातले घर सोडून तो गयेला पोहोचला. गयेतल्या रस्त्यांवर एका सत्तर वर्षांच्या साधूबाबांची त्याने सेवा केली. एक दिवस ते साधूबाबा या युवकाच्या नकळत गया सोडून गंगटोकला गेले. या साधूबाबांच्या शोधासाठी खिशात एकही पैसा नसताना त्याने गंगटोकपर्यंत प्रवास केला. प्रसंगी हमालीही केली, पण त्यांचा शोध लागेपर्यंत जिद्द सोडली नाही. पुनर्भेट झाल्यानंतर हे साधूबाबा एक वृद्ध लामा आहेत हे त्याच्या लक्षात आले. नंतर याच वृद्ध लामांच्या नेतृत्वाखाली ३० लामांच्या गटाबरोबर त्याने नेपाळच्या परवानापत्रावर गियात्से-सामदिंग-चाकसाम-द्रेपुंग-ल्हासा असा खडतर प्रवास केला. ल्हासा ते शिगात्से या प्रवासादरम्यान तो या गटाबरोबरच होता. परंतु तिथून चिनी सैनिकांच्या नियमामुळे त्याला गटाची साथ सोडावी लागली. नंतर त्याने एकटय़ाने मानसरोवर व कैलासनाथाची यात्रा कशी पूर्ण केली याचे अतिशय अद्भुत वर्णन या पुस्तकात वाचायला मिळते.
या प्रवासाच्या काळात चीनने सैन्य घुसवून तिबेटवर आपला कब्जा जमवायला सुरुवात केलेली होती. त्याच वेळी भारत आणि चीनचे संबंध ताणलेले असल्यामुळे भारतीयांना तिबेटमध्ये जायला बंदी होती. त्यामुळे लेखकाला मौनीबाबा बनून हा प्रवास करायला लागला. प्रवास करत असताना लेखकाचे जिज्ञासूपणे निरीक्षण करणे अधिक परिणामकारक ठरले. त्यावेळी कधी कागदाचे कपडे, कधी पाठकोरे कागद, कधी कोणीतरी दिलेल्या वह्य़ा यात लेखक स्वत:चे विचार, अनुभव, भावना नोंदवत गेला. त्या नोंदीच्या आधारे लिहिलेल्या या पुस्तकात धार्मिक, आध्यात्मिक, भौगोलिक, शैक्षणिक अशा अनेक पैलूंचे दर्शन घडते.
हा प्रवास केल्यानंतर अनेक वर्षांनी लेखकाच्या असे लक्षात आले की, ज्या पथकासोबत लेखकाने तिबेटची यात्रा केली ते या महातीर्थाची यात्रा करणारे शेवटचे पथक होते.
या यात्रेतून मिळालेल्या प्रेरणेची शिदोरी घेऊन लेखकाने भारताच्या कानाकोपऱ्यांतून भटकंती केली. एवढेच नव्हे तर एका जुन्या सायकलच्या आधारे खिशात फक्त १८ रुपये असताना आशिया, आफ्रिका, युरोप, अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया असा विश्वप्रवास केला. त्यानंतर लेखकाच्या असे लक्षात आले की, हिमालय, आल्पस, रॉकी, करदियार इत्यादी पर्वतांमध्ये ‘हिमालय’ सर्वश्रेष्ठ आहे. तसेच जिनिव्हापासून तितिकापर्यंत कोणतीही सरोवरे पाहिली तरी ‘मानसरोवरा’चे सौंदर्य अतुलनीय आहे. यामुळेच ते कैलासनाथाच्या यात्रेचे अनुभव शब्दबद्ध करण्यास प्रवृत्त झाले.
युरोपमध्ये सौंदर्यस्थळाच्या ठिकाणी मद्यगृहे असतात, अमेरिकेत अशा ठिकाणी ‘सुवेनियर स्टॉल’ असतात. पण भारतात मात्र प्राचीन काळापासून जिथे सौंदर्य आहे तिथे ईश्वर आहे अशी भावना असते. म्हणूनच हिमालयातील प्रत्येक ठिकाणी मंदिर, गुहा आणि चैत्य दिसतात. तिथली सत्यम्, शिवम्, सुंदरम् ही मूळ भावना अंतर्मुख करते.
या भावनेमुळेच लेखकाने किशोरवयात केलेल्या प्रवासाला प्रौढत्वाच्या चिंतनाची जोड मिळाली आहे. लामांबरोबर प्रवास केल्यामुळे माणसाचे मनोव्यापार, बौद्धधर्माची उपासनापद्धती, ईश्वराचे अस्तित्व यांचा ऊहापोह केला आहे. त्याचबरोबर तिबेटी लोकजीवन-भाषा, राजकारण यांवरही रोचकपणे लिहिले आहे.
तिबेटच्या भाषेचा परिचय करून देताना लेखकाने तिथल्या भाषिक जडणघडणीमागील नैसर्गिक कारणेही दिली आहेत. तिबेटी लोकांना एक पूर्ण वाक्य बोलायला बऱ्याच वेळा थांबावे लागते. त्यामागे तिथली अतिथंड हवा हे कारण असावे असे लेखकाला वाटते. ज्याप्रमाणे थंडीत कुडकूडत लोक एक एक शब्द उच्चारतात, त्याचप्रमाणे उच्चार करण्याची पद्धत रूढ झाली असावी हे निरीक्षण नोंद घेण्याजोगे आहे.
निसर्गसौंदर्याचे वरदान लाभलेल्या या प्रदेशात प्रवास करताना लेखकाला अनेक नद्या पार कराव्या लागल्या. पर्वत ओलांडावे लागले आणि कार्यकारणभाव सिद्ध करता येणार नाही असे अनेक गूढ अनुभवही आले. त्यामुळे स्वत:च्या संपूर्ण शक्तीचा कस लावत त्याच्या व्यक्तिमत्त्वाचाही विकास झाला.
राजहंस, सारस यांसारखे पक्षी, यमद्रक सरोवर, ब्रह्मपुत्रा नदी यांचे वर्णन करताना लेखकाची शैली चित्रमय होते. यमद्रक सरोवराचे वर्णन लेखक ‘‘ब्रह्मपुत्रेचा घाटमाथा आणि यमद्रक सरोवर पर्वताच्या पायथ्याला दिसत होते. एवढय़ा उंचीवर पाणी पाण्याप्रमाणे दिसत नव्हते, ते निद्रिस्त विंचवाप्रमाणे दिसत होते. कदाचित याच कारणासाठी भारतीय तीर्थयात्रींनी या सरोवराचा उल्लेख ‘वृश्चिक-हृद’ असा केला असावा,’’ असे नेमकेपणाने करतो.
लेखकाने बौद्ध लामांबरोबर प्रवास केल्यामुळे या वर्णनाला अत्यंत साहजिकपणे तात्त्विक विचारांची पाश्र्वभूमी आहे. त्यामुळे मानवी मनोव्यापारांचे दर्शन घडवणारी आणि वाचकाला अंतर्मुख करणारी अनेक सुभाषितवजा वाक्ये जागोजागी आढळतात. ‘‘इच्छाशक्तीच्या अभावातून अंध:कार निर्माण होतो. इच्छाशक्तीची निर्मिती हाच प्रकाश आहे.’’ यांसारखे विचार सध्याच्या तथाकथित ‘सेल्फ हेल्फ’च्या पुस्तकांच्या गर्दीत निश्चितच नोंद घेण्याजोगे आहेत.
‘महातीर्थ के अंतिम यात्री’ या मूळ पुस्तकाचे विजय हरिपंत शिंदे यांनी केलेले भाषांतर अतिशय ओघवते आणि सुटसुटीत झाले आहे. परंतु मूळ पुस्तकाची पहिली आवृत्ती कधी प्रकाशित झाली होती याचा उल्लेख पुस्तकात कुठेही आढळत नाही. त्यामुळे लेखकाने १९५६ साली केलेला हा प्रवास नेमका कधी शब्दबद्ध केला याची माहिती मिळत नाही. ही एक बाब सोडली तर वेगळ्या विषयाचा शोध घेणारे हे पुस्तक नक्कीच वाचण्याजोगे आहे.
‘महातीर्थाचा अखेरचा यात्रिक’ – विमल डे, अनुवाद : विजय हरिपंत शिंदे, पद्मगंधा प्रकाशन, पुणे, पृष्ठे – ३९९, मूल्ये – ४०० रुपये.    

First Published on August 17, 2014 6:13 am

Web Title: mahatirthacha akhercha yatri by vimal de
Next Stories
1 अ‍ॅसिड प्रकरणामुळे माझी शाळा सुटली..
2 वास्तवाभिमुख जीवनचित्रण करणारी कादंबरी
3 आगामी : ‘नशायात्रे’चं अंधारं अधोजग
Just Now!
X