News Flash

‘ते पुढे गेले’

‘तेपुढे गेले’ या नाटकाबाबत मी या सदरात काही लिहावे अशी अपेक्षा आहे. हे नाटक माझ्या त्या कालखंडातील साहित्याच्या प्रवासातले एक टोक होते.

| March 8, 2015 06:45 am

‘तेपुढे गेले’ या नाटकाबाबत मी या सदरात काही लिहावे अशी अपेक्षा आहे. हे नाटक माझ्या त्या कालखंडातील साहित्याच्या प्रवासातले एक टोक होते. तेव्हा केवळ त्या नाटकाबाबत लिहिण्याऐवजी त्या lok01प्रवासाबाबत लिहिणे आणि मग त्या नाटकाबाबत भूमिका मांडणे मला अधिक सयुक्तिक वाटते.
कोठलाही लेखक लिहायला सुरुवात करतो तेव्हा आधीच्या काळात तरुण वयात मनात वेगाने उचंबळून येणारे विचार फारसा विवेक न करता धडाधड कागदावर उतरतात. तसेच काहीसे माझेही झाले. आशयापासून फॉर्मपर्यंत जाणीवपूर्वक फारसा विचार न करता अंत:स्फूर्तीने जे काही बाहेर येऊ पाहत होते ते बाहेर येत गेले. आता मागे वळून पाहता असे जाणवते की, आशयदृष्टय़ा मला जवळची वाटणारी काही कळीची सूत्रे त्या सुरुवातीच्या लिखाणात नेणिवेच्या पातळीवर येतच होती. उदा. विज्ञान आणि तंत्रज्ञान, त्यांचा समाजावर आणि मानसिकतेवर होणारा प्रभाव, विज्ञानाचा तत्त्वज्ञानात्मक आणि नीतिमूल्यात्मक विचार आणि काही मूलभूत सामाजिक तत्त्वप्रणाल्यांचे आकर्षण.. जसे की मार्क्‍सवाद! या काळातले लेखन तीव्रतेने प्रायोगिक होते. आणि त्यामुळे अर्थातच त्याचा प्रेक्षकही खूपच मर्यादित होता. तो तसा आहे याने मला फार त्रास होत नसला तरी कुठल्याही लेखकाला आपले लिखाण काही किमान संख्येच्या लोकांपर्यंत पोहोचावेसे वाटतेच. त्यासाठी जी मंडळी तडजोड करायला तयार होतात, ती एकतर पूर्णपणे व्यावयायिक लिखाणाकडे तरी वळतात, किंवा किमान आपल्याला वास्तवाविषयी जे काही उत्कटतेने इतरांना सांगावेसे वाटते आहे, त्याची तीव्रता कमी करून एक मध्यम मार्ग काढू पाहतात.
जी व्यक्ती या दोन्ही गोष्टी करणे नाकारते, तिलाही अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचायचे नसते असे नव्हे. मग तिला काही प्रश्न पडू लागतात. त्यातले महत्त्वाचे प्रश्न दोन.. पहिला- ‘मी कोण आहे?’ हा प्रश्न सामाजिक अंगाने पडलेला प्रश्न आहे; आध्यात्मिक नव्हे. आणि दुसरा प्रश्न : ‘मी का आणि कोणासाठी लिहितो?’ किंवा ‘एकंदरीने समाजाचे आणि वास्तवाचे माझ्या लिखाणाशी नाते काय?’ माझ्या लिखाणाचा सांधा कुठलीही तडजोड न करता इतर कोणाबरोबर जोडला जायचा असला तर या दोन प्रश्नांची उत्तरे शोधणे मला आवश्यक वाटू लागले. त्यातून मला अधिक संख्येने वाचक/ प्रेक्षक लाभेल अशी खात्री तर जाऊच द्या; शक्यताही नव्हती. हे माझे विचार मग साहजिकपणेच सामाजिक-राजकीय वास्तव आणि त्यातले माझे आणि माझ्या साहित्याचे स्थान यांच्याकडे वळले. सामाजिक-राजकीय याचा अर्थ समस्याप्रधानता नव्हे. समस्याप्रधान कलाकृती बहुतेक वेळा फक्त लक्षणांना भिडते; रोगाला नाही. पॅरॅसिटेमॉल देऊन ताप तात्पुरता खाली आणावा तसे हे आहे. मूळ रोग वा जंतुसंसर्गापर्यंत न गेल्यास ताप परत चढतोच!
या विचारांमुळे त्या काळानंतर माझी नाटके अधिकाधिक थेटपणे राजकीय होत गेली. सामाजिक-राजकीय विचार आधीच्या नाटकात नव्हते असे नव्हे. उदा. ‘चारशे कोटी विसरभोळे’ हे नाटक उघडपणे मार्क्‍सवादी होते. पण त्याची जाणीवपूर्वकता ‘सूर्य पाहिलेला माणूस’पासून उत्तरोत्तर वाढत गेली. त्यानंतर आलेली नाटके ‘चौक’, ‘गोळायुग’, ‘दलपतसिंग येती गावा’ आणि ‘ते पुढे गेले’ या नाटकांतून याचे दर्शन घडते. ‘ते पुढे गेले’ हे नाटक या प्रवाहाचे टोक म्हणता येईल. आजच्या काळातील सामाजिक-राजकीय वास्तवाचा विचार करता ते पूर्वीपेक्षा खूपच अधिक गुंतागुंतीचे, गोंधळाचे आणि अनेकरेषीय झाले आहे, यावर बहुतेकांचे एकमत झालेले आढळेल. त्यामुळे आपल्याला त्याचा आवाका येऊ शकत नाही, असे म्हणून त्यापासून पळून जाण्याकडे आज कल झालेला आढळतो. किंवा मग त्याचे सुलभीकरण करून, सोपे शत्रू निवडून (उदा. राजकारणी, बिल्डर्स, पोलीस, इ.) आपली या प्रकरणात काहीच जबाबदारी नाही अशी भूमिका घेतली जाताना दिसते. कितीही गोंधळाची परिस्थिती असली तरी आपली जबाबदारी न टाळता विचारपूर्वक भूमिका घेता येते असे मला वाटते. वर उल्लेखिलेल्या नाटकांतून आणि ‘अच्युत आठवले’सारख्या कादंबऱ्यांमधून याची मांडणी करण्याचा प्रयत्न मी केला. त्यासाठी नाटक वा कादंबऱ्यांना काय करावे लागेल, याची मांडणी करणारा एक दीर्घ लेखही मी याच काळात लिहिला. (‘जागतिकीकरण आणि सांस्कृतिक अस्मिता’!) त्या प्रयत्नांची दिशाही ‘ते पुढे गेले’मध्ये काहीशी बदलली. म्हणजे असे की, या गुंतागुंतीच्या परिस्थितीचे सर्व आयाम न मांडता त्यातला अग्रक्रमाचा (प्रायॉरिटी) प्रश्न कुठला, ते ठरवून त्यावर लक्ष केंद्रित केल्यास काय हाती लागेल, ते पाहण्याचा हा प्रयोग होता.
सामाजिक अंगाने पाहता आजमितीस विषमता आणि त्यामुळे समाजात पडणाऱ्या दऱ्या, विशेषत: समाजातील मध्यमवर्गात इतर समूहांबाबत निर्माण होणारी उदासीनता आणि संवेदनशून्यता, भांडवलशाहीच्या आताच्या अवस्थेतली कधीच न संपणारी वखवख, जातीयतेचे नवे स्वरूप याला अग्रक्रम द्यायला हवा असे वाटू लागले.
२००७ साली हे नाटक रंगमंचावर आले. त्याच्या थोडेच आधी वर्तमानपत्रातील पहिल्या पानावर एकाच दिवशी दोन बातम्या आल्या होत्या. पहिली होती- संपूर्ण जगभरातील अब्जाधीशांच्या यादीत पहिल्या दहा क्रमांकांत दोन की चार भारतीय कसे आहेत, याची. दुसरी होती- ह्युमन डेव्हलेपमेंट इंडेक्सच्या जागतिक यादीत भारताचे स्थान अनेक अंकांनी घसरून १५० च्याही पुढे कसे गेले आहे, याची. त्याच्याच खाली एक जाहिरात होती- ‘ये दिल मांगे मोअर’! या घटनेच्याच आसपास एका चौकात ट्रॅफिक सिग्नलला थांबलेलो असताना मला शेजारी स्कूटरवर असणाऱ्या दोन युवकांच्या बोलण्यातला एक तुकडा ऐकू आला. एकजण दुसऱ्याला म्हणत होता, ‘कुछ भी हो, लाइफ में आगे निकलना है यार!’ आणि माझ्या मनात आले- ‘आगे’ म्हणजे नक्की कुठे? या परिस्थितीचे सर्वात नागडे दर्शन कशात होत असेल, तर ते गेल्या दशकात प्रचंड प्रमाणात वाढलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्यांमध्ये! या विषयावर तोपर्यंत फारशी नाटके वा सिनेमाही आलेले नव्हते. नंतर जे आले त्यातील बहुतेकांची मांडणी शेतकऱ्यांची विपन्नावस्था दाखवणे यापुरतीच सीमित होती. मी शेतकरी नसल्याने मला याचा थेट अनुभव नव्हता. तसा अनुभव नसताना, वा दोन-चार दिवस त्या समाजात काढून त्या पाठबळावर तसे काही लिहावे, हे मला नेहमीच गैर वाटत आलेले आहे. पण कुठल्याही शोषणाच्या विरोधात दोन प्रकारे लिहिता येते.. एक- शोषितांची अवस्था वर्णन करून, आणि दोन- शोषकांची भयानक क्रूर आणि स्वार्थी मानसिकता दाखवून. त्यातही मी आधी लिहिल्याप्रमाणे या ‘लक्षणा’पलीकडील प्रत्यक्ष रोग- म्हणजे व्यापक राजकीय वास्तव मांडले गेले पाहिजे अशी माझी इच्छा होती. इतक्या संख्येने शेतकरी आत्महत्या करत असताना ही व्यवस्था टिकून कशी राहते? त्यामुळे या परिस्थितीमागील माझ्या मतीला जाणवणारी कारणे या नाटकात आली.
चळवळीतली नाटके/ सिनेमे बहुतेकदा आधीच ज्यांचे उद्बोधन झालेले आहे त्यांनाच काही सांगू बघतात. प्रीचिंग द ऑलरेडी कन्व्हर्टेड. त्यापलीकडे जाऊन कळत-नकळत ज्यांचा या शोषणप्रक्रियेत काही सहभाग आहे, त्यांना या प्रक्रियेतले दडलेले घटक दाखवून काही टोचणी लावण्याचा हा प्रयत्न होता.
या नाटकात दोन उच्च मध्यमवर्गीय माणसे-सामान्यत: ज्यांना आपण पापभीरू आणि चांगली माणसे म्हणू अशी माणसे- मृत्यूनंतर एका विलक्षण जागेत भेटतात. तिथे त्यांच्या नैतिकतेतील पोकळपणा, कसोटीचा प्रसंग आल्यानंतर त्यांचा उफाळून येणारा स्वार्थ आणि वखवख.. जी आजच्या भांडलशाहीचे द्योतक बनली आहे, त्यातून निर्माण होणारी विषमता आणि त्यामागे असणारी पिळवणूक यांबाबत विवरण व्हावे असा माझा हेतू होता. मेल्यानंतरच्या त्या जागेतही त्यांना ‘पुढे जायचे’ आहे. पुढे म्हणजे कुठे, त्यांचा पत्ता लागत नसतानाही! त्यासाठी ते दोघे सामूहिक बलात्कारही करू इच्छितात. ‘पुढे जाणे’, बलात्कार या गोष्टी अर्थातच आजच्या सामाजिक वास्तवाचे रूपक आहेत.
ते मांडण्यासाठी त्यातले दोन घटक महत्त्वाचे होते. एक तर त्याचं डिझाइन त्याच्या आशयाला अनुसरून- म्हणजे ‘मिनिमॅलिस्ट’ पद्धतीने व्हावे. आणि दुसरे- त्याचा प्रयोग कुठेही कमी खर्चात करता यावा. या प्रकारे हे नाटक व्हावे, या विचारातून या नाटकाचे दिग्दर्शन मीच करावे असे या नाटकाशी संबंधित असणाऱ्या जवळच्यांशी केलेल्या चर्चेतून ठरले. मी स्वत:ला उत्तम दिग्दर्शक मानत नाही. या मर्यादेत काम करण्यासाठी विषयाची दाहकता आणि आशयाची खोली कुठेही कमी होऊ नये यासाठी मला दोन खरोखरच उत्तम आणि ज्यांना या विषयाबाबत किमान बांधिलकी आहे असे अभिनेते आवश्यक होते. गजानन परांजपे आणि किरण यज्ञोपवीत यांच्या रूपाने ते मला मिळाले. हे घडून येण्यासाठी आम्ही तालमीची नेहमीची पद्धत न पाळता वर्कशॉपस्वरूपी काही वेगळे प्रयोगही केले. केवळ दोनच नट आणि दोन स्टुले आणि साडीत गुंडाळलेल्या दोन उशा वगळता कुठलाही सेट वा प्रॉपर्टी नसलेल्या या नाटकांच्या तालमी मात्र कित्येक महिने चालू होत्या.
या नाटकाचे आम्ही पुण्या-मुंबईबाहेरही जाऊन छोटय़ा शहरांतूनही बरेच प्रयोग केले. ते थांबवावे लागले याचे कारण प्रेक्षकांचा प्रतिसाद कमी होता हे नसून नट आणि लाइटवाला यांची एकावेळी अनुपलब्धता हे होते. दोनच नट असून ही वेळ यावी, हे आजच्या काळात दुर्दैवी लक्षण. कदाचित दिग्दर्शक म्हणून माझे या नाटकातले योगदान कलात्मक पातळीवर अनेकांना आवडले असले तरी दिग्दर्शक हा आपल्याकडे आयोजकही असतो, त्यात मी कुठेतरी कमी पडलो असेन. तरीही बरेच प्रयोग झाले. आम्ही त्याच संचाकरवी हिंदीतही प्रयोग केले आणि ते महाराष्ट्राबाहेरही झाले. पुढे हे नाटक कन्नड आणि रशियन भाषेत भाषांतरित होऊन प्रसिद्धही झाले. मध्यमवर्गीय रंगभूमीवर अशा गंभीर सामाजिक विषयावरच्या, प्रेक्षकांना विचार करायला लावून, गिल्टी वाटायला लावून त्रास देणाऱ्या नाटकाचे एवीतेवी शेकडय़ांत प्रयोग होणे शक्यच नसते! पण तरीही हा प्रयोग पाहून बहुतेक प्रेक्षक अत्यंत अस्वस्थ होऊन विचारमग्न अवस्थेत घरी जात असत असा अनुभव आम्हाला आला. बहुतेक वेळा प्रयोग संपल्याक्षणी टाळ्या न पडता एक सुन्न शांतता पसरत असे आणि मग काही वेळाने टाळ्या सुरू होत. अनेकजण त्यावेळी बोलत नसत, पण दुसऱ्या दिवशी भेटून वा फोन करून ‘आजच्या परिस्थितीला आपण कसे जबाबदार आहोत..’ हा विचार मनात प्रकर्षांने उद्भवल्याने आपण किती अस्वस्थ झालो हे आवर्जून सांगत. या नाटकात बलात्काराविषयी बरीच उघड (इंग्रजीत ज्याला ‘ग्राफिक’ म्हणतात तशी) मांडणी आहे. ती मांडणी प्रेक्षकांतील स्त्रियांच्याच नव्हे, तर पुरुषांच्याही मनात प्रचंड किळस निर्माण करत असे असा सार्वत्रिक अनुभव आला. काही स्त्रियांनी- उदा. सोनाली कुलकर्णीने अशी प्रतिक्रिया दिली की, ‘सामान्यत: अशी वर्णने ऐकताना वा पाहताना मी एक स्त्री म्हणून त्यांना सामोरी जाते आणि मला वेदना होतात. ते कृत्य करणाऱ्या पुरुषांचा राग येतो. या नाटकात मात्र मी एक स्त्री असूनही मला जणू आपणच बलात्कार करतो आहोत असे वाटून प्रचंड गिल्ट आणि स्वत:बद्दल किळस उत्पन्न झाली.’
या नाटकातील बलात्कार हा शेतकऱ्यांवर मध्यम आणि वरच्या वर्गाने केलेल्या अन्यायाचे, शोषणाचे रूपक होता, हे लक्षात घेतले तर हे या प्रयोगाचे साफल्य असल्याचे ध्यानात येईल. हे नाटक आम्ही किंवा प्रेक्षकांनी ‘एन्जॉय’ करावे असे नव्हतेच. त्यामुळे तसे आम्ही वा प्रेक्षकांनीही केले नाही; तर जो विचार पोहोचवायचा होता तो काही प्रमाणात तरी पोहोचवता आला याचे समाधान वाटते.                

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 8, 2015 6:45 am

Web Title: makarand sathe on marathi play
टॅग : Marathi Play
Next Stories
1 ‘ढोलताशे’
2 ‘ज्याचा त्याचा प्रश्न’
3 ‘किरवंत’.. एका वेदनेचं शल्य!
Just Now!
X