मॉलच्या गल्ल्यासमोर (कॅश काऊंटर) सामानाच्या ढकलगाडय़ा (ट्रॉली) घेऊन माणसे रांगेत उभी असतात. मनसोक्त खरेदी केल्यावर पैसे चुकते करण्याची वेळ येते आणि त्या रांगेत माणसाच्या संयमाची परीक्षा सुरू होते. कोणाचे कार्ड ‘स्वाइप’ होत नाही. कोणाकडे दोन ट्रॉली सामान असते. रांग काही हलत नाही. आयांच्या आणि वडिलांच्या अंगाला लटकणारी मुले तर भयंकर कंटाळतात. आणि याच क्षणासाठी बनविलेले कॅश काऊंटरचे डिझाइन एक नवा पेचप्रसंग उभा करते. रांगेत उभे असताना कॅश काऊंटरच्या बाजूला ठेवलेले चॉकलेटचे बॉक्स आणि कार्टूनच्या रूपातल्या बाहुल्या एका चार-पाच वर्षांच्या कन्येच्या डोळ्यात भरतात. मम्मी-पप्पाकडे सामोपचाराने मागणी केली जाते. दोघेही आपापल्या व्हॉटस् अ‍ॅपवरचे लक्ष ढळू देत नाहीत. मुलगी जमिनीवर बसकण मारते. आई-बापाला ती निर्वाणीचा इशारा देते- ‘मी रडेन.’ पण आई-वडील अविचल राहतात. आपल्या धमकीचा फारसा परिणाम दिसत नाही म्हटल्यावर मुलगी वरचा ‘सा’ लावते. तिची मम्मी तरीही िखड लढवत असते. ‘नो बेटा.. नो बेटा’चा पाढा चालू होतो. मग मात्र मुलगी आपल्याकडील ठेवणीतील ब्रह्मास्त्र बाहेर काढते. मॉलच्या गुळगुळीत फरशीवर लोळून रडण्याचा कार्यक्रम चालू होतो.
कदाचित इथपर्यंतचा प्रसंग कमी-अधिक फरकाने आपण सगळ्यांनी बघितला असेल. मॉल, आठवडी बाजार, जत्रेतला बाजार किंवा अगदी शाळेच्या समोरच्या रस्त्यावर असले प्रसंग सहज बघायला मिळतात. अशा प्रसंगांचा शेवट हमखास दोन प्रकारे होतो : आई-बाप मुलांच्या हट्टाला दाती तृण धरून शरण जातात, नाहीतर प्रेमाने समजूत घालून किंवा दमबाजीने किंवा फटके देऊन मुलांचा हट्ट मोडून काढतात.
पण वरील प्रसंगात जे काही बघितले ते मात्र थोडे वेगळे होते. मुलीच्या वडिलांनी शांतपणे स्वत:चे पशाचे पाकीट उघडले आणि मुलीसमोर धरून तिला सांगितले, ‘यातील सगळे पसे आपण घेतलेल्या सामानासाठी खर्च होणार आहेत आणि मग त्या बाहुली खरेदीसाठी पसेच नसतील आपल्याकडे.’ रडून रडून चेहरा लाल झालेल्या त्या मुलीच्या चेहऱ्यावर क्षणभर एक भलेमोठे प्रश्नचिन्ह अवतरले. पण फक्त एका क्षणासाठीच! कारण दुसऱ्या क्षणाला त्या मुलीचा हात वडिलांच्या पाकिटाकडे गेला आणि त्यातील कार्ड हातात घेऊन ती म्हणाली, ‘‘बाहेर ते मशीन ठेवले आहे ना, त्यात हे कार्ड घाला आणि पसे घेऊन या.’’ माझ्यासकट रांगेतील बहुतेक सगळेच पालक क्लीनबोल्ड झालेले दिसत होते. त्या मुलीच्या वडिलांचा गोरामोरा चेहरा बरेच काही बोलून गेला. पुढे काय घडले ते बघायला मी काही थांबले नाही, पण मनातील सगळी गणिते, सगळे आडाखे बदलून गेले.
सध्या बाल्यावस्थेत- म्हणजे तीन ते दहा वष्रे वय असलेल्या मंडळींनी पसे फारच लवकर बघितले असावेत असे मला वाटते. माझ्या या मताला काही शास्त्रोक्तआधार नाही, पण माझ्या आजूबाजूला या वयोगटातील अनेक मुले मला बघायला मिळतात. अगदी तीन वर्षांच्या मुलांना पसे कळतात. ते सांभाळून ठेवायचे, हेही त्यांना कळते. आणि सगळ्यात महत्त्वाचे-त्या पशाची क्रयशक्तीदेखील त्यांना कळते. छोटा शिशूमध्ये शिकणाऱ्या माझ्या मुलीच्या शाळेत शिक्षक-पालक सभेत ‘मुलांच्या दप्तरात पसे सापडतात, त्यांना पसे देऊ नका,’ असे सांगणाऱ्या शिक्षिका बघितल्या की मला माझे बालपण आठवते. नेहमी घरून जेवणाचा डबा घेऊन शाळेत जाणाऱ्या माझ्या हाती ‘खाऊ’चे पसे कदाचित मी सातवी-आठवीत गेल्यावर पहिल्यांदा मिळाले असावेत. आणि तेही कदाचित अपवादात्मक परिस्थितीतच! मी अगदीच बावळट होते असे असले तरी आज आई-वडिलांचे बोट धरून शाळेत येणाऱ्या माझ्या मुलीच्या वर्गातील मुलांच्या दप्तरात पसे सापडतात, हे पचायला कठीण जाते. पण ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही.
मुलांच्या हाती पसे द्यायचे की नाही, यावर बालमानसशास्त्रात काय लिहिले आहे, ते मला माहीत नाही. पण जर या मुलांसमोर पसे येणार असतील, तर त्यांना पशाकडे पाहण्याचा एक सुदृढ दृष्टिकोन आपण देऊ शकतो का, हा विचार करणे आवश्यक आहे. माझ्या लहानपणी ‘पिगी बँक’ अस्तित्वात होत्या. काहीच नाही, तर आई-वडील मुलांना एखाद्या प्लास्टिकच्या डब्याला खाच पाडून त्यात नाणी टाकायला सांगत असत. आजही या पिगी बँक मिळतात. रंगीबेरंगी आणि मुलांच्या आवडीच्या कार्टूनच्या रूपातल्या या पिगी बँक निश्चितच आकर्षक असतात. मुलांना तिथून सुरुवात करायला काहीच हरकत नाही. त्यामुळे पसे साठवायची शिकवण निश्चितच मिळेल. माझ्या लहानपणी पिगी बँक भरायला एखाद् दोन वष्रे लागत असत. आज मात्र पिगी बँक तीन महिन्यांत सहज भरते. कारण एक आणि दोन रुपयांच्या नाण्यांची क्रयशक्ती घसरल्यामुळे आज सहजच दिवसाला दोन-चार नाणी मुलांना देणे आई-वडिलांना शक्य आहे. इथेच मुलांच्या अर्थसाक्षरतेची पुढील पायरी आहे. मुलाच्या नावे एक वेगळे बँक खाते उघडणे आणि पिगी बँकेतील नाण्यांच्या बदल्यात एक नोट बँकेत मुलाच्या खात्यावर मुलाच्या उपस्थितीत भरणे, यातूनदेखील पशाकडे आणि बचतीकडे बघायचा एक जबाबदार दृष्टिकोन आपण मुलांना देऊ शकतो. तीन-चार वर्षांच्या मुलांना बँकेचे नाव लक्षात राहते. आणि त्यांना त्यांच्या बँकेचे नाव जरी वाचता येत नसले तरी लोगो सहज ओळखता येतात. एकदा प्रयोग करून बघाच.
अनेकदा पालक मुलांना एटीएममधून पसे काढताना आपल्याबरोबर नेतात. त्यामुळे मुलांना मशीन पसे देते, हे कळते. कधी कधी हीच मुले मग कुतूहलापोटी विचारतात- ‘या मशीनमध्ये पसे कुठून येतात?’ हा सुवर्णक्षण चुकवू नका. आई-वडील नोकरी-व्यवसाय करतात, घरापासून दूर राहतात, तेव्हा त्यांना उत्पन्न मिळते व तेच उत्पन्न बँक या मशीनच्या माध्यमातून त्यांना देते, हे मुलांना सांगायला काहीच हरकत नाही. खात्यात असलेल्या पशापेक्षा जास्त पसे मिळत नाहीत, हेही मुलांना कळू देत. एखाद्या खात्यात शून्य शिल्लक असताना मशीन पसे देत नाही, हेदेखील त्यांना कळू द्या. एटीएम म्हणजे ‘असतील तरच मिळतील’ हे त्यांना कळू द्या. साधारण मोठय़ा मुलांना (८ ते  १० वयोगट) बँकेत ठेवलेल्या पशावर मिळणाऱ्या व्याजाबद्दल सोप्या शब्दांत सांगायला हरकत नाही. त्यांना काय कळते, असे म्हणायचे दिवस फार पूर्वीच संपले आहेत.
मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी कोणती गुंतवणूक करू, असे विचारणारे अनेक पालक भेटतात. मुलाच्या नावाने गुंतवणूक केल्यास गुंतवणुकीवर मिळणाऱ्या उत्पन्नावर भरायचा आयकर काही कमी होत नाही. मुलाच्या नावावरील गुंतवणुकीचे करपात्र उत्पन्न त्याच्या पालकापकी ज्याचे उत्पन्न अधिक आहे, त्याच्या उत्पन्नात जोडले जाते आणि कर भरावा लागतोच. मुलाच्या नावाने आयुर्वमिा पॉलिसी काढण्यापेक्षा त्यांना अर्थसाक्षर करणे आवश्यक आहे. त्यामुळे त्यांना पशांचे महत्त्व निश्चितच कळेल आणि माणसांचेही.