27 May 2020

News Flash

मायलेकींचा हृदयस्पर्शी संघर्ष

ऊर्मिलाताईंची कन्या जन्मत:च बहिरी आहे. तिला ११० डेसिबलचा आवाज ऐकू येत नाही, हे समजताच त्या मनाने कोसळल्या.

(संग्रहित छायाचित्र)

डॉ. अनिल गांधी

मनी ‘मानसी’ हे एका आईचं आत्मकथन.  एका आईच्या आत्मकथनात विशेष काय असणार, असा वरकरणी समज अगदी कुणाचाही होऊ शकतो. मात्र नेमक्या याच समजाला छेद देणारे हे पुस्तक आहे. लेखिकेचं आत्मकथन भावूक करून सोडणारं तर आहेच, पण ते अंतर्मुख करायला लावणारंही आहे. हे आत्मक थन वाचून आईचा महिमा सांगणारी माधव जुलियन यांची ‘प्रेमस्वरुप आई, वात्सल्यसिंधू आई’ ही कविता आठवली.

या पुस्तकात लेखिकेने- ऊर्मिलाताईंनी आपल्या लेकीसाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करत सतत २० वर्षे अडचणींचे हिमालय आणि तुफानांचे सागर पार के ले आहेत. हा सारा प्रवास थक्क करायला लावणारा आहे.

आपल्या तान्हुल्याच्या भुकेची वेळ टळून जाते आहे म्हणून उंच कडय़ावरून गडाखाली उतरत आपल्या तान्हुल्याला पदराखाली घेऊन त्याची भूक भागवल्यावर हिरकणीच्या चेहऱ्यावर जे समाधान दिसले असेल, तसेच समाधान ऊर्मिलाताईंनी आपल्या मूकबधिर कन्येला बोलायला, समाजात वावरायला शिकवताना वेळोवेळी कसे अनुभवले, हे वाचणे खरेच हृदयस्पर्शी आहे.

ऊर्मिलाताईंची कन्या जन्मत:च बहिरी आहे. तिला ११० डेसिबलचा आवाज ऐकू येत नाही, हे समजताच त्या मनाने कोसळल्या. त्यांना नैराश्याने घेरले. वैद्यकीय गृहीतकच आहे की, शरीराचा अवयव किंवा क्षमता वापरात नसेल तर त्याचा ऱ्हास होऊन तो भाग निकामी होतो. मनुष्य बोलायला शिकतो ते ऐकूनच. ऐकणेच शक्य नसेल तर मेंदूचे प्रशिक्षण, स्मरण, अनुभव ही शंृखलाच निर्माण होत नाही. त्यामुळे स्वरयंत्राला स्वर उच्चारण्याची सूचनाच मेंदूकडून मिळाली नाही तर शब्दोच्चार, बोलणे शक्य होत नाही. वयाच्या चार-पाच वर्षांपर्यंत वापर नसला तर स्वरयंत्र नंतर कार्यरत होत नाही. याला वापरा किंवा विसरा (यूज ईट ऑर लूझ इट) असे म्हणतात. जवळपास असेच लेखिकेच्या कन्येसोबत घडले.

विजीगिषु प्रवृत्तीमुळे माणसात चिकाटी आणि जिद्द निर्माण होते, तर नैराश्याने वैफल्य!  ऊर्मिलाताईंनी या नैराश्याला जिद्दीने उत्तर दिले. अथक प्रयत्नांनी आपल्या कन्येचे भविष्य उजळवून काढले. तिचा आत्मविश्वास वाढवला.

आपल्या पोटी जन्मलेले मूल अंध, मूकबधिर किंवा अपंग असेल तर देवाची इच्छा, मागच्या जन्मीचं प्रारब्ध असं मानण्याची भारतीयमनाची धारणा! अशा मुलांना समाजाचा व प्रसंगी जन्मदात्यांचाही दु:स्वास सोसावा लागतो. या मानसिकतेला छेद देऊन प्रयत्नांती परमेश्वर हा मंत्र जपून आपल्या कर्णबधिर कन्येचे उज्ज्वल भविष्य घडविण्यात लेखिकेने खूप मोठा पुरुषार्थच दाखवला आहे.

आईच्या उदरात गर्भाची वाढ होत असताना त्या अर्भकाला अंधत्व, मूकबधिरता किंवा इतर अपंगत्व असेल तर अशा अवयवांसाठी मेंदूतील जो भाग राखीव असतो त्याचे वाटप इतर ज्ञानेंद्रियांना झुकते माप देऊन निसर्ग भरपाई करतो. अंध किंवा मूकबधिर बालकांचे स्पर्श, गंध, श्रवण, चव, दृष्टी याचे ज्ञान खूपच सक्षम असते (वैगुण्य वगळून). हे शास्त्रीय सत्य आहे. गैरसोयीवर मात करण्याचा हा निसर्गाचा प्रयत्न असतो. अशा उर्वरित ज्ञानेंद्रियांचा योग्य वापर लवकरात लवकर, शक्य तितक्या लहान वयात वयात सुरू केला तर अशी बालके जवळपास सामान्य जीवन जगू शकतात. अशा बालकांच्या प्रशिक्षणाचे मार्ग या तत्त्वानुसार शोधलेले आहेत. अंधांसाठी ब्रेल लिपी तर मूकबधिर मुलांसाठी ओठांच्या हालचाली व चेहऱ्यावरचे भाव पाहून भाषा समजते.

‘गरज ही शोधाची जननी आहे’ असे म्हटले जाते. गरजेपोटी ऊर्मिलाताईंनी मानसीच्या आईची आणि शिक्षिकेची अशी दुहेरी भूमिका अतिशय सक्षमपणे पेलली. त्यांनी स्वत: प्रशिक्षण घेऊन पुणे, मुंबई अशा ठिकाणी एकटे राहून, आर्थिक, शारीरिक ओढाताण सोसून जे साध्य केले त्यापुढे नतमस्तक व्हावेसे वाटते.

व्यंग असलेल्या आपल्या बालकाचा उत्तमरीत्या सांभाळ करताना अनेकदा पालकांनाही मानसिक ताण, शीण येतो. या ताणाला सामोरे जाणे हेही एक आव्हानच आहे. मात्र या सर्व संकटांना तोंड देत ऊर्मिलाताईंनी मानसीला नुसतं बोलायला शिकवलं नाही, तर ज्ञानप्रबोधिनीच्या सोलापूरच्या शाळेत तिला गुणवत्तेवर प्रवेश मिळाला, असे तिला घडवले. शालेय शिक्षणाबरोबरच नृत्य, चित्रकला आणि वक्तृत्व यामध्येही ती अग्रणी राहिली. दहावीच्या परीक्षेत ८१ टक्के गुण मिळवून ती उत्तीर्ण झाली. इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि डिग्री दोन्हीत विशेष प्राविण्य (७० टक्के गुण) हा केवढा मोठा पराक्रम!

इंजिनिअरिंगच्या तोंडी परीक्षांच्या वेळी मानसीने परीक्षकांना सांगितले, ‘‘मला अजिबात ऐकू येत नाही. कृपया प्रश्न विचारताना थोडं सावकाश बोला. तुमच्या ओठांच्या हालचाली आणि चेहऱ्याचे भाव पाहून मी प्रश्नांची उत्तरं देईन. मी बोलते ते स्पष्ट वाटले नाही तर मी लिहून उत्तरे देईन.’’ परीक्षकांनी तिच्या जिद्दीचे, धाडसाचे कौतुक केले. जास्त प्रश्न विचारले आणि गुणवत्तेनुसार गुण दिले. तिची सर्वागीण प्रगती आणि संपूर्ण बहिरेपणावर तिने केलेली मात पाहून तिच्या कॉलेजच्या प्रशासनाने १५ ऑगस्टला झेंडावंदनासाठी प्रमुख अतिथी म्हणून  तिला सन्मान दिला आणि भाषण करण्याची विनंती केली. या सन्मानाने मानसीच्या कुटुंबीयांना कृतकृत्य वाटले.

मूकबधिर मुलीचा हा दैदीप्यमान आलेख पाहून वर्तमानपत्रे, आकाशवाणी आणि दूरदर्शनवर तिचे व तिच्या आईचे भरपूर कौतुक झाले. त्यामुळे अशा इतर बालकांचे पालक ऊर्मिलाताईंकडे मार्गदर्शन घेण्यासाठी येऊ लागले. ऊर्मिलाताईंना जग जिंकल्याचा आनंद झाला. आपण समाजाला काही देऊ शकतो, या भावनेने.

सर्वच पालक आपल्या पाल्यांना यथाशक्ती उत्तमोत्तम सुविधा देण्याचा प्रयत्न करतात. पालकांच्या गुणसूत्रांमधून  मधून बालकांना मिळतो तो आनुवंशिकतेचा वारसा. याहीपलीकडे पालक आपल्या अपत्यांना सर्वोत्तम बनवण्यासाठी  शिकवण देतात, संस्कार करतात. हे दोन्ही खूप महत्त्वाचे आहेत. जैविक आनुवंशिकतेत आपण बदल करू शकत नाही, पण दुसरी ‘घडवण्याची’ गोष्ट मात्र प्रयत्नसाध्य असते.

ऊर्मिलाताईंच्या प्रयत्नांना  तोड नाही. त्यांचे यश पाहून त्यांना अनेक संस्थांकडून, मूकबधिर विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शाळांकडून भाषणाची आणि बालक-पालक यांना  मार्गदर्शन करण्यासाठी आमंत्रणं दिली जातात. आपला संघर्ष, कहाणी, अनुभव इतरांसोबत वाटून घेताना या माय-लेकी अनेकांसाठी दीपस्तंभ बनतात.

या पुस्तकात ऊर्मिलाताईंनी ‘कॉक्लीअर इम्प्लांट’बद्दलही थोडे लिहिले आहे, ते महत्वाचे आहे. ही शस्त्रक्रिया मूल जन्मल्यानंतर दोन वर्षांच्या आत केली तर श्रवणदोष असलेली बालके सामान्यपणे ऐकू शकतात. वयाच्या पाचव्या वर्षांनंतर ही शस्त्रक्रिया केली तर फायदा खूप कमी होतो. या शस्त्रक्रियेसाठी ८ ते १० लाख रुपये खर्च येतो, नंतरही थोडा खर्च असतो, पण शस्त्रक्रिया करून नंतर ‘स्पीच थेरपी’ प्रशिक्षण दिल्याने खूप जास्त फायदा होतो. आवाज अजिबातच ऐकू न येण्याने अपघात संभवतो, हेही ऊर्मिलाताईंनी नमूद केले आहे.

आईच्या प्रेमाचे आणि श्रमांचे मोल कधीच करता येत नाही आणि ही तर असंभव ते संभव करुन दाखवणारी आई! या पुस्तकाचा आशय हृदयस्पर्शी आहे, त्याला शब्दांकनाची योग्य साथ असती तर हे पुस्तक बेस्टसेलर झाले असते.

पुस्तकाचे शीर्षक मनी‘मानसी’ हे अतिशय समर्पक आहे. रविमुकुल यांनी साधंच, पण अतिशय बोलकं मुखपृष्ठ रेखाटलं आहे. मानसीचा हा संघर्ष, त्यासाठी आईची असलेली खंबीर साथ, यातून मानसीला असेच सांगायचे असावे,

नोहे मी अपंग

आहे मी अभंग!

‘मनी मानसी – ऊर्मिला आगरकर’

पद्मगंधा प्रकाशन

पृष्ठे – २९२ , किंमत – ३२० रुपये

ganilgulab@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 29, 2019 2:18 am

Web Title: mani manasi by urmila rajendra agarkar book review abn 97
Next Stories
1 मानवी मूल्यांशी प्रामाणिक विज्ञानकथा
2 नाटकवाला : ‘मिस ब्युटिफुल’
3 संज्ञा आणि संकल्पना : इतिहास आणि भूगोल
Just Now!
X