गेली तीनेक दशके स्त्रियांच्या जगण्याचे अंतर्बाह्य़ आयाम कवितेतून मांडणाऱ्या कवयित्री अश्विनी धोंगडे यांच्या आजवरच्या चार कवितासंग्रहांतील निवडक कवितांचा ‘समग्र स्त्रीसूक्त’ हा संग्रह नुकताच उन्मेश प्रकाशनातर्फे प्रसिद्ध झाला. स्त्रीवाद, कविता आणि समाजवास्तव यांचा वेध घेणाऱ्या या संग्रहातील त्यांच्या प्रस्तावनालेखाचा संपादित अंश..

भारतीय भाषांमधील स्त्रीवादी साहित्याचे पुस्तक संपादित करताना काही लेखक भगिनींनी शारीरिक छळ सोसल्याचे वाचले. काहींच्या कवितांवर सामाजिक बहिष्कार टाकला गेला, काहींच्या कवितांना जन्मापूर्वीच ठेचण्यात आले, काहींवर अश्लीलतेचा खटला झाला. हे सगळे वाचताना महाराष्ट्रात आम्ही खूप सुदैवी आणि सुरक्षित आहोत असे वाटले. स्त्रीवादी कवितांचा, कथांचा, आत्मचरित्रांचा एक सशक्त प्रवाह गेल्या ३५ वर्षांत निर्माण झाला आहे. त्याचे काही पुरुष समीक्षक, वाचकांनी स्वागत केले, पारितोषिके दिली. महाराष्ट्रातील उदारमतवादी परंपरेशी हे सुसंगतच आहे. पण अजूनही साठोत्तरी साहित्याच्या समीक्षेत एक-दोन अपवाद सोडले, तर स्त्रीवादी साहित्याची आवर्जून दखल घेतली जात नाही. पण मुख्य म्हणजे स्त्रीस्वातंत्र्य, स्त्रीमुक्ती, स्त्रीवाद या शब्दांबद्दल एक छुपी भीती पुरुषांच्या, त्याचप्रमाणे अनेक स्त्रियांच्या मनात आहे. स्त्रीवादी बायका स्वत:च्या वैवाहिक जीवनात असमाधानी, अयशस्वी असणाऱ्या आहेत, त्या कुटुंब फोडणाऱ्या आहेत, खालमानेनं जगणाऱ्या स्त्रीला भडकवणाऱ्या आहेत, मुक्त लैंगिक जीवनाचा पुरस्कार करणाऱ्या आहेत, मुख्यत: पुरुषांविरोधात आरडाओरडा करणाऱ्या, पुरुषांवर सूड उगवणाऱ्या, पुरुषांवर अन्याय करणाऱ्या आहेत.. अशा दृढ कल्पनेनं स्त्रीवादाविरोधात एक घट्ट भावना रुजलेली आहे. ती किती अनाठायी आणि चुकीची आहे, हे स्त्रीवादी साहित्य वाचले, समजून घेतले तर कळून येईल. काही स्त्री-पुरुष समंजसपणाने ते समजून घेऊ लागलेही आहेत. पण अजूनही खूप मोठा पल्ला गाठायचा आहे.

Sadguru, Sadguru news, Sadguru latest news,
‘सद्गुरुंकडे’ यापेक्षाही वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता येऊ शकते; ते असे…
NCERT tweaks Class 12th History book: Harappans indigenous, doubts over Aryan migration
एनसीईआरटी अभ्यासक्रमात बदल; ‘आता आर्य भारतातलेच’, काय सांगते नवे संशोधन?
upsc exam preparation guidance mpsc exam preparation tips in marathi
MPSC मंत्र : सामान्य विज्ञान
article about upsc exam preparation guidance upsc exam preparation tips
यूपीएससीची तयारी :  भूगोल (भाग २)

साधारणत: विसाव्या शतकाचे सातवे-आठवे दशक. त्या काळात तरुण, विवाहित झालेल्या माझ्या पिढीतल्या बहुतेक जणी विविध क्षेत्रांतल्या पदवीधर होत्या. काही नोकरी करत होत्या, बऱ्याच जणी ‘सुगृहिणी’ होण्याचे धडे गिरवत होत्या. पण आमची ही पिढी ना पूर्ण आधुनिक होती, ना पारंपरिक! एका बाजूला आपापल्या कार्यक्षेत्रात चांगली कामगिरी करत वरची स्थाने मिळवण्याची स्वप्ने होती, नोकरी-व्यवसायातल्या स्पर्धाचेही आव्हान होते. तर दुसरीकडे कामानिमित्ताने एकटीदुकटीने प्रवास करणे, बाहेर लॉजमध्ये राहणे, पुरुष सहकाऱ्यांशी मोकळेपणाने बोलणे या गोष्टी ही पिढी नव्याने शिकत होती.

बुद्धी, उत्साह, जिद्द, आत्मविश्वास यांची नव्याने ओळख होऊ लागली होती. घराबाहेर राहण्यातला एक मोकळेपणाचा आनंद होता. पण बाहेरचे जग, नोकरी यात पूर्णपणे रमण्याचा, झोकून देण्याचा आनंद मात्र घेता येत नव्हता. एक अपराधगंड मनाच्या तळाशी कुठे तरी बोचत होता. कारण एक पाय तळ्यात, एक पाय मळ्यात ठेवणारी आमची पिढी दोन्हीकडे नीट ताठ उभे राहण्याची धडपड करत होती. आम्हाला सुगृहिणी म्हणूनही मिरवायचे होते आणि नोकरीतही झोकून देऊन काम करायचे होते. यात काही गफलत आहे असे आत कुठेतरी बोचू लागले, तरी ते पृष्ठभागावर आणण्याइतका धीटपणाही नव्हता.

एकूणच जीवनाच्या अनेक क्षेत्रांत बायकांना बुद्धय़ाच दुय्यम स्थान दिले जात आहे असे अनुभव आमच्या पिढीला येऊ लागले होते. परंतु त्याबद्दल कुठे जोरकस नापसंती व्यक्त होत नव्हती. अशा दुय्यमपणाबद्दल बोलणाऱ्या-लिहिणाऱ्या बायका वेगळ्या पडत होत्या. त्यांच्याकडे इतर बायकाही संशयाने पाहत होत्या. ‘हे काय नवीनच फॅड!’ असे म्हणण्याची सर्वसाधारण मनोवृत्ती होती. समस्त पुरुषवर्गाला आपली बायको अशा प्रकारचा विचार करणाऱ्या स्त्रियांच्या संपर्कात येऊ नये अशी दक्षता घेण्याची गरज वाटत होती. घरातल्या उतरंडीत ‘अहो’ हेच एकमेव राजे होते आणि त्यांच्या आज्ञा सर्वानाच शिरसावंद्य वाटून घेण्याचा काळ होता. वटपौर्णिमा, हरतालिका उपवास, हळदीकुंकू, सौभाग्यचिन्हे, गळ्यातले ठसठशीत मंगळसूत्र आणि कपाळावरची लाल टिकली अभिमानाने मिरवण्याचाच तो काळ होता.

नेहमी एक पाऊल पुढे टाकण्यातली अस्वस्थता काळानुसार, पण फार संथपणे येत गेली. आपली स्वतंत्र मते आपण किती दिवस दडपून ठेवणार? किती दिवस न पटले तरी हो ला हो म्हणत हाताला हात लावून बसणार?  पिढय़ान्पिढय़ा आत दडून राहिलेल्या धुमसत्या वाफेचा कधीतरी स्फोट होणारच, तसा तो चहुअंगांनी होत गेला. त्यात स्त्रियांच्या कथा-कादंबऱ्यांतून विद्रोही नायिका दिसू लागल्या. आत्मचरित्रातून खासगी आयुष्यातला असंतोष जळजळीतपणे बाहेर टाकण्याचे धर्य दिसू लागले. कवितेतून तर फार मोठय़ा संख्येने शारीरिक, मानसिक अत्याचारांना वाट मिळाली. मध्यमवर्गीय स्त्रीच्या रोजच्या जगण्यातली अंधारवाट कवितेतून प्रथम ‘स्त्रीसूक्त’मध्ये एवढय़ा प्रखर शब्दांत व्यक्त झाली.

या चित्रांना बोचणारे आणखी दोन आयाम होते. पहिला म्हणजे, आपल्या फायद्यासाठी आपल्या स्त्रीत्वाचा वापर करणाऱ्या बायका. अशा स्त्रिया सर्व स्त्री जातीचेच अवमूल्यन करत असतात. स्त्री ही उपभोगाची वस्तू आहे असा संदेश देत असतात. स्त्री-चळवळींना सर्व स्त्रियांचे बळ न मिळण्याच्या अनेक कारणांपैकी  हे एक महत्त्वाचे कारण आहे. पुरुषसत्ताकाच्या विरोधातच फक्त माझी कविता सूर लावत नाही. ती अशा स्त्रियांवरही शरसंधान करते. त्यामुळे स्त्रीवादी कविता पुरुषांच्या वर्चस्वाविरोधात लिहिल्या जातात, असा कोणी आक्रोश करू नये. त्या आत्मपरीक्षणही करतात.

दुसरा सल हा माध्यमातील स्त्री प्रतिमेचा होता. ज्या प्रकारचे हिंदी चित्रपट लोकप्रिय होते, त्यातील नायकांची प्रतिमा ‘लार्जर दॅन लाइफ’ होती. ते सगळे ‘सुपरमेन’ होते. अंगाने किरकोळ असले, तरी नायिकेसाठी प्राणाची बाजी लावून एका वेळी आठ-दहा आडदांड गुंडांशी दोन हात करून त्यांना लोळवत होते. मात्र, वास्तव जगात असा एखादाही तडफदार तरुण पाहण्यात वा बातम्यांतून सापडला नाही. नायकाचा पराक्रम प्रेक्षकांच्या मनावर ठसवायचा तर नायिका स्वसंरक्षण करण्यास पूर्णपणे असमर्थ, परावलंबी, सुंदर, चवळीच्या शेंगेसारखी बारीक, हळवी, रडकी दाखवायला हवी. तिचा पराक्रम म्हणजे फार तर श्रीमंत बापाच्या घरातून नायकाबरोबर पळून जाणे आणि नायकाबरोबर कुठेही अगदी रस्त्यातही नाच करणे. पाहायला मनोरंजन म्हणून हे सगळे छान वाटले, तरी वास्तवातल्या स्त्री-पुरुषांशी त्यांचे काहीही नाते नव्हते. तेव्हा ‘आयटम साँग’ हा लोकांच्या भावना चाळवणारा प्रकार ‘कॅब्रे’ या नावाखाली सरसकट सर्व चित्रपटांत असे. अत्यंत तोकडय़ा कपडय़ांत शरीराच्या उठावांचे प्रदर्शन पाहणे केवळ डोळ्यांना सुखावत नाही, ते पुरुषांच्या मनात स्त्री-शरीराबद्दल विकृत आकर्षण निर्माण करून विघातक कृत्यांना प्रेरणा देते.

त्या काळाच्या धारणेप्रमाणे स्त्री-कवीही पुरुषश्रेष्ठत्वाच्याच प्रतिमा वापरत होत्या. त्यात त्यांचा काहीच दोष नव्हता. त्यांच्या कवितांमधली स्त्री ‘असंयमी’ आहे. तिला शिकवणाऱ्या, संयमी बनवणाऱ्या पुरुषाच्या आधाराची गरज आहे. स्त्री-पुरुष नात्यात ती आनंदाने दुय्यमत्व स्वीकारते. दुसऱ्यासाठी हरवून जाण्यात ती स्वत:ला सापडते. या प्रेमामध्ये प्रियकराचे दैवत मानून पूजन आहे. परिपूर्णता म्हणजे पुरुष आणि अपूर्णता, चंचलता, समर्पिता म्हणजे स्त्री हे भारतीय परंपरेतील कृष्ण-राधेचे नाते इथे अनेक प्रतिमांमधून व्यक्त होते. मात्र, काळाप्रमाणे या स्त्री-कवींच्या अभिव्यक्तीत थोडे का होईना, बदल झाले आणि स्त्रीच्या अस्मितेचा शोध घेणाऱ्या कविता त्या लिहू लागल्या हे विशेष!

स्वत:च्याच मध्यमवर्गीय जाणिवा साहित्यातून व्यक्त होण्याच्या काळात या वृत्तीला प्रथम कोणी हादरे दिले असतील, तर ते दलित साहित्याने! दलित साहित्य आणि स्त्रीवादी साहित्य यांचे नाते फार जवळचे आहे; किंबहुना स्त्रीवादी साहित्याच्या अनेक प्रेरणांपैकी एक निकटची प्रेरणा दलित साहित्याची आहे. दलित आणि स्त्रिया दोघेही पिढय़ान्पिढय़ा शोषित आहेत. दोघेही शिक्षणापासून वंचित होते आणि समाजाच्या मध्यप्रवाहात येण्याची संधी दोघांनाही नाकारण्यात आली. दोघांचेही आवाज सतत दाबले गेले आणि घुसमटीचे आयुष्य त्यांच्या नशिबी आले. घटनेने दोघांनाही समान अधिकार, समान संधी, काही क्षेत्रांत राखीव जागा मिळाल्या. पण वास्तवात हे समान अधिकार राबवण्यासाठी सतत झगडावे लागले. दलित साहित्य व स्त्री साहित्य दोन्हीही अन्यायाविरोधात स्पष्ट भूमिका मांडणारे आहेत, व्यवस्थेविरोधात विद्रोह करणारे आहेत. मात्र, स्त्रियांना विद्रोह जळजळीत शब्दांत व्यक्त करणे जास्त अवघड होते. कारण त्या कुटुंबात राहत होत्या, परावलंबी होत्या. थेट वार करणे त्यांना स्वत:च्या पायावर धोंडा मारून घेण्याइतके अवघड होते. म्हणून कदाचित कथा-कादंबऱ्यांपेक्षा स्त्रिया कवितेतून अधिक व्यक्त झाल्या. कारण उपमा, प्रतिमांच्या जंजाळात स्वत:ची ‘आयडेंटिटी’ लपवणे त्यांना सोपे होते.

स्त्रीवादी साहित्यामागचा दुसरा निकटचा स्रोत म्हणजे स्त्री-चळवळी! १९७५ ते १९८५ हे स्त्री-प्रश्नांच्या घुसळणीचे आंतरराष्ट्रीय महिला दशक. यानिमित्ताने स्त्रियांवरचे अत्याचार, शोषण, बलात्कार, स्त्रियांचे दारिद्रय़, बेकारी, अज्ञान, दुभंगलेपण, दुय्यमत्व, पितृसत्ताक वर्चस्वाखाली होणारी पीछेहाट यांची जाहीर चर्चा लेख, चळवळी, अभ्यासगट, पथनाटय़े इत्यादी माध्यमांतून जोरकसपणे होऊ लागली. देशभर स्त्री-चळवळींचा एक माहोल उभा राहिला. जोरदार निदर्शने करून बलात्कार, कुटुंबातील अत्याचार, हुंडाबळी, हिंसाचार, स्त्री भ्रूणहत्या वगरे अनेक प्रश्नांकडे या चळवळींनी समाजाचे, शासनाचे लक्ष वेधले. पुढच्या काळात स्त्रियांच्या बाजूने जे अनेक कायदे झाले. त्यामध्ये या चळवळींच्या सामूहिक शक्तींचा मोठा वाटा आहे. या चळवळींमुळे स्त्री-लेखकांना मानसिक बळ दिले. पुरुषसत्ताकाविरोधात बोलण्याचे धाडस दिले. आपले शोषण समजून घेणारी स्त्रीजातीय सखी आपल्याबरोबर आहे हा विश्वास कटू वास्तव जगापुढे आणण्याची प्रेरणा देणारा होता. म्हणूनच विद्रोही वाटावे असे स्त्रीसाहित्य प्रकाशात येऊ लागले.