|| अभिराम भडकमकर

लोकसभा निवडणुकांच्या ऐन धामधुमीत काही लेखक आणि विविध क्षेत्रांतील कलावंतांनी पत्रक काढून ‘एका ठरावीक विचाराविरुद्ध ’ लोकांनी मतदान करावे असे आवाहन केले होते. त्यानंतर त्यास प्रतिआव्हान देत आणखी काही लेखक-कलावंतांनी या विचाराविरोधात पत्रक काढून विशिष्ट पक्षाला मतदान करण्याचे आवाहन केले. त्यावर समाज माध्यमांच्या चव्हाटय़ावर दोन-तीन दिवस शिमगा झाला. परंतु या वादावर उभयपक्षी जी वैचारिक घुसळण व्हायला हवी होती तशी मात्र झाली नाही. त्यानंतर सारं कसं शांत शांत आहे. कानठळ्या बसवणारी ही भीषण शांतता हे  निश्चितच दुश्चिन्ह आहे.

नुकतीच महाराष्ट्राच्या विचारविश्वात एक महत्त्वाची घडामोड झाली. सहाशे अधिक एकशे पाच लेखक-रंगचित्रकर्मीनी एक पत्रक काढून ‘एका ठरावीक विचाराविरुद्ध’ मतदारांनी मतदान करावे अशा अर्थाचे आवाहन केले. त्यानंतर याच क्षेत्रांतील नऊशे सात अधिक चारशे लोकांनी या विचाराच्या विरुद्ध मत मांडत एका विशिष्ट पक्षाला मत देण्याचे आवाहन केले. माझ्या दृष्टीने ही एक अत्यंत महत्त्वाची घटना होती. दोन्ही बाजूच्यांनी मतदारांच्या सदसद्विवेकाला साद घालत आपला मुद्दा मांडला होता. महाराष्ट्राच्या विचारविश्वात असा मतांचा गलबला नवा नाही. या देशात तर तो नवा नाहीच. अगदी द्वैत-अद्वैत वादापासून ते मागील शतकातल्या ‘जहाल-मवाळ’ किंवा साहित्यविश्वातल्या ‘जीवनासाठी कला की कलेसाठी कला?’ या वादापर्यंत! या सर्व वादांच्या पाश्र्वभूमीवर समाजात एक घुसळण झाली. विचार झाला. विचाराला विचार घासला गेला. त्यातून एक प्रतिपादन झालं. आणि त्याचा तितकाच टोकदार प्रतिवाद झाला. त्यातून नवी मांडणी झाली. विचार पुढे गेला; अन् पर्यायानं समाजही!

पण मला या गोष्टीची खंत वाटतेय, की पत्रकं निघाली, समाज माध्यमांत दोनेक दिवस त्यावर विनोद, टोमणे, शेरेबाजी झाली आणि परत सगळं सुरळीत सुरू झालं. खरं तर गेल्या काही काळात समाजात दोन विचारप्रवाह ठळकपणे पुढे येत आहेत. विचारविश्वात दोन्ही प्रवाह ताकदीने सामोरे येत आहेत. अशा काळात पत्रकांनंतरची शांतता मला एक दुश्चिन्ह वाटते.

दोन्ही एकाच क्षेत्रातले, एकत्र काम केलेले, करणारे.. मग एकमेकांशी वाद का झडले नाहीत? वृत्तपत्रे, पाक्षिके यांतून या विचारप्रवाहांचे खंडनमंडन का झाले नाही? एकमेकांच्या विचारांतल्या त्रुटी का मांडल्या गेल्या नाहीत? हे सर्व केवळ निवडणुकांना केंद्रस्थानी मानूनच का केलं गेलं?

आणीबाणीचा काळ पाहिला तर दुर्गाबाईंनी केवळ अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा लढाच दिला नाही, तर त्यासंदर्भात एक मांडणी केली. आजही त्यांची पत्रे, लेख, मुलाखती समाजाला पथदर्शक ठरतात. विचारवंतांना स्वातंत्र्य व मुक्तीसंदर्भातलं त्यांचं विवेचन आजही काही पायाभूत सिद्धान्त देणारं ठरतं. या बदलत्या काळात सरकार व व्यक्तता यासंदर्भातलं त्यांचं आग्रही प्रतिपादन कुणी स्वीकारेल, कुणी त्यातल्या त्रुटी मांडत ते पुढे नेईल, कुणी पूर्ण नाकारेलही. पण त्या काळात त्यांनी एक महत्त्वाचा दस्तावेज दिला, एक वाट घालून दिली. यामागे दुर्गाबाईंची स्वातंत्र्याची आस तर दिसलीच, पण एक पक्की वैचारिक बठकही दिसून आली.

पण एक पत्रक यापलीकडे आज आपण गेलो का? एकूणच आविष्कार वा स्वातंत्र्य यासंदर्भात काही मंथन का झाले नाही? स्वातंत्र्य म्हणजे काय? अगदी ते हवेच का? कसे हवे? त्याचे स्वरूप आणि काळानुसार त्याचे बदलते संदर्भ या सगळ्याबाबत कुणीच काही मांडणी का केली नसावी? जी पुढल्या कित्येक पिढय़ांना दिशादर्शक किंवा किमान संदर्भासाठी तरी उपयुक्त ठरावी.

पण त्या काळातला समाज जसा ‘जहाल- मवाळ’ वा ‘कलेसाठी की जीवनासाठी कला’सारख्या वादांनी विस्मयचकित झाला होता, तसा आजचा समाज या वादांनी का झाला नाही? या दोन गटांतील वादांच्या ठिणग्यांच्या प्रकाशात आपली बौद्धिक वाट का उजळवून घेताना दिसला नाही? याचं महत्त्वाचं कारण- वादच झाले नाहीत. आणि हे मला काळजीचं वाटतं. म्हणजे दोन्ही गट आपापल्या बेटांवर सुखेनव राहत आहेत का? आपल्याला हत्तीचा जो अवयव सापडला तोच आणि तितकाच हत्ती आहे असे मानून सुखात जगताहेत का? इतर क्षेत्रांचं सोडा, पण विचारविश्वातलं हे साचलेपण धोक्याचं नाही का?

समाज माध्यमांच्या आगमनानं या लढय़ाची युद्धभूमी बदलली आहे असंही म्हटलं जाईल. पण तिथल्या लढायांचा विचार केला तर हाती काय लागतं? नुकताच मी एक अनुभव घेतला. सध्या नरेंद्र मोदी केंद्रस्थानी आहेत. त्यांना समर्थन देणारे (भक्त) किंवा विरोध करणारे (द्वेष्टे) यांनी समाज व्यापला आहे. लेखक-कलावंत म्हणून मला या माणसाच्या प्रवासाचं कुतूहल असणं स्वाभाविक आहे. सध्या मोदी व पत्रकार परिषदा हा विषय ऐरणीवर आहे. मोदींच्या पत्रकारांकडे दुर्लक्ष करण्यामागं एक सूत्र मला सापडतं. या दुर्लक्षामागचा त्यांचा विचार व प्रवासही मला रंजक वाटतो. अर्थातच तो प्रसारमाध्यमांना आवडणारा नाहीच. त्या सगळ्या मांडणीतून मी काही निष्कर्ष काढले. अर्थात कुठल्याही लेखकाची स्वत:ची अशी एक दृष्टी असते, ज्याला त्याचा ‘बायस’ असेही म्हणू आपण. त्याचं सावट त्या मांडणीवर येऊ शकतं. तसं ते आलंही असेल. मी ते नाकारत नाही. आणि त्यानंतर प्रतिक्रिया आल्या.

त्यातल्या दहा-बारा टक्के प्रतिक्रिया नजर फिरवून बाजूला टाकण्यासारख्या असणं स्वाभाविक आहे. ज्यात एकीकडे ‘कसलं तोडलंयस.. ठासलीच आहेस.. काय हाणलायस मर्दा’ अशा काही, तर दुसरीकडे लेखकाच्या हेतूवर संशय, भाटगिरी वगरे दर्जाचे आरोप आणि त्यायोगे वैयक्तिक मळमळ. हेही स्वाभाविकच. कारण समाज माध्यमं हा खुला चव्हाटा. त्यामुळे हौशै-गवशे-नवशेसुद्धा सहभागी होणारच. या दहा-बारा टक्क्यांना दुर्लक्षून बाकी चर्चा पाहिली तर काय हाती आलं? मुळात मी करत असलेलं विश्लेषण कसं पूर्ण चुकीचं आहे, त्यामागचं तथ्य चुकतंय, गृहितकं सदोष आहेत, आणि एकूणच मांडणीतल्या गफलती काय, हे मांडण्याऐवजी असा काही विचार केला जाऊ शकतो यावरच आक्षेप कसा काय असू शकतो?

याच नव्हे, तर एकूणच समाज माध्यमांच्या चर्चामध्ये एका क्षणात लेबल लावून बौद्धिक चर्चापासून लांब राहायचा प्रघात पडतो आहे का? कारण एकदा लेबल लावणं म्हणजे सुलभीकरण. मग त्यात विविध कंगोरे, चहुअंगानं विचार यापासून पळता येतं. जटिलता टाळता येते. म्हणजे परत ‘आमचं ठरलंय’, ‘माझा विचार पक्का आहे’! त्याचं पुनरावलोकन करायला आम्ही तयार नाही का? म्हणजे परत एका बौद्धिक साचलेपणाकडेच आपण जातोय का? मोदी असोत, राहुल असोत, मनमोहन सिंग असोत वा अगदी पंडितजी- मी रेखाटलेल्या त्यांच्या प्रतिमेपलीकडे काही मांडलं जाणार असेल तर मी ते मांडणंच नाकारेन.. असं होतंय का? परत एकदा या चर्चा वैचारिक घुसळणीपासून लांबच राहणार आहेत का? समाज माध्यमं हे व्यासपीठ म्हणून अधिकाधिक कर्मठ आणि एकांगीच होत जाणार आहे का?

आणि ते करत असताना आपले चष्मे ठरून गेलेत, असं होतंय का? माझा दिग्दर्शक मित्र विजय केंकरे अशा वादांबद्दल जो नेहमी एक प्रश्न करतो, त्याची इथं आठवण होते. ‘सगळं ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइटच असतं असं का मानायचं? तिसरा एक ग्रे रंग आहे याचा आपल्याला विसर पडलाय का?’ कारण जग दोन गटांत विभागायला निघालेलं असताना कला- साहित्याच्या प्रांतांत वावरणाऱ्यांची ही अधिक जबाबदारी नाही का? या तात्कालिक सहाशे विरुद्ध नऊशे वादात उतरूनही एक वेगळी शक्यताही आहेच/ असतेच, हे कलावंत म्हणून आपण विसरणार आहोत का? आपापली मांडणी म्हणत असताना या एका तिसऱ्या मांडणीचं अस्तित्वही आपण विचारात घेणार की नाही? की कलेचं प्रयोजन म्हणजे सत्याचा शोध असं एकीकडे म्हणत तात्कालिक चळवळी वा इझम्सच्या पाठराखणीतच आपण अडकून राहणार आहोत?

त्याहीपेक्षा काळजी करावी असा एक भाग नुकत्याच झालेल्या एका गदारोळात दिसून आला. ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले हे केवळ पोटार्थी नट नव्हेत. त्यांच्या दिवंगत वडिलांसारखाच सामाजिक कार्यात त्यांचा सहभाग असतो. पण त्यांनी ‘आविष्कार स्वातंत्र्याची गळचेपी होते असे म्हणणाऱ्यांच्या मुस्काटीत मारा..’ असं विधान केलं. सहाशे जणांना आविष्काराची गळचेपी होतेय असं वाटतं. आणि गोखलेंसारख्यांना ‘ती होत नाहीये, हा कांगावा आहे’ असं वाटतं. दोघांनाही असं वाटण्याचा अधिकार आहे असं आपण मान्य करू. मात्र, हा विचार मांडताना विक्रमजींची अभिव्यक्ती कठोर झाली, अतिरेकी झाली, हे कुणीही मान्यच करेल. मीही करतो. त्यावर गदारोळही झाला.

यासंदर्भात एक घटना आठवते. गांधीजींनी चौरीचौरा पोलीस चौकी सत्याग्रहींनी जाळली तेव्हा हे आपलेच सत्याग्रही आहेत म्हणत त्याकडे डोळेझाक केली नव्हती. उलट, त्यांनी आंदोलन मागे घेतले होते. ही गटनिरपेक्ष सहिष्णुता आपण आज का गमावली आहे? म्हणजे आपण मूलत: सहिष्णुतेचे पक्षधर आहोत की फक्त दुसऱ्या गटाच्या असहिष्णुतेचा आम्हाला तिटकारा आहे? दुसऱ्या गटाच्या हिंसेचाच आम्ही निषेध करणार? म्हणजे मी युद्ध केले तर ते शांततेसाठी आणि दुसरा करतो ते अमानुष कृत्य? या ‘आपला’ व ‘त्यांचा’ या वादात आपण आपली विवेकबुद्धीच गमावत चाललोय का? शेवटी मला वाटतं, विसाव्या शतकातले वाद हे दोन गटांत विभागूनही समाजाला एका वैचारिक प्रगल्भतेकडे नेणारे, केवळ बुद्धीगर्भ वाद होते. त्यांनीही शाब्दिक पातळी अनेकदा सोडली, पण मूळ वाद बुद्धिवादाच्या पायावर उभे होते. त्यामागे व्यासंग होता, एक प्रामाणिकपणा होता. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला माणूसपणाचा भक्कम पाया होता. म्हणूनच आगरकर गेल्यावर टिळक धाय मोकलून रडतात. तर आचार्य अत्रेंचे त्यांनी पराकोटीचे वाद घातलेल्या मित्रांबद्दलचे मृत्युलेख आजही गहिवर आणतात. आज आम्ही केवळ कटुता निर्माण करतोय का? मत्र गमावले तरी चालेल अशा टोकाला जातोय का?

इथे पुलंचे रावसाहेब आठवतात. त्यांच्या एका मित्राचा आणि त्यांचा वाद कोर्टात जातो. तारीख पडल्यावर मित्र बेळगावात येतो, पण लॉजवर उतरतो. रावसाहेबांना हे कळल्यावर ते लॉजवर जाऊन सामानासकट मित्राला उचलून घरी आणतात. म्हणतात, ‘‘तुझं-माझं भांडण कोर्टात. इथे नाही.’’

हे माणूसपण- जे शिवराळ आणि आपणा बुद्धिवाद्यांच्या नजरेत असंस्कृत असलेल्या रावसाहेबांना कळतं, ते आपल्याला कळेनासं होत चाललंय का? तसं असेल तर कुठल्या सहिष्णुतेसाठी आपण वाद घालतोय?

आज यावर विचार करणं महत्त्वाचं आहे. कारण येणारा काळ हा आजवरचे एक प्रतिपादन आणि त्याला समांतर असे दुसरे प्रतिपादन यांच्यातल्या झगडय़ाचा असणार आहे. दुसऱ्याचे प्रतिपादन नाकारायचे असेल तर आपले जोरकसपणे (हट्टाग्रहाने नव्हे!) मांडले पाहिजे आणि दुसऱ्याचे प्रतिपादन खोडताना तितक्याच ताकदीने (पुन्हा- वैचारिक ताकद!) खोडावे लागणार आहे. या घुसळणीमधून काही नवं उभं राहण्याचीही शक्यता आहे. अशा वेळी वाद आणि चर्चाची असलेली या मातीची परंपरा त्यातल्या सकारात्मक गुणधर्मासह जपणं महत्त्वाचं आहे. ही सकारात्मकता आज लोप पावते आहे.

दोन्ही पक्ष (म्हणजे राजकीय नव्हे, तर बाजू!) सरसावून उभे आहेत. निवडणुकांचे निकाल काहीही लागोत; आपापली मांडणी महत्त्वाची असणारेय. कारण निवडणुकीच्या एका यशाने विचारसरणी स्थापित होऊ शकत नाही, की एका अपयशाने ती उद्ध्वस्तही होत नाही. त्यासाठी हे असे बुद्धीगर्भ आणि माणूसपणासह घातलेले वादच महत्त्वाचे ठरतात. आधीच्या रूढ विचारधारांच्या अशा संघर्षांतूनच नव्या युगाचा आकार जन्माला येणार आहे. नव्या युगाच्या आकांक्षा आणि साध्य काय असेल, ते या वादांमधूनच स्पष्ट आणि सर्वमान्य होणार आहे. पण ते वाद घालणारे आपण आधी सहिष्णू, दुसऱ्याचं ऐकून घ्यायचा संयम ठेवणारे असणार आहोत का? माणसांशी नव्हे, तर मुद्दय़ांशी वाद घालायच्या मानसिकतेत आहोत का? याचा विचार करणं ही या घडीची गरज आहे. कारण समाजातले विचारवंत वगरे म्हणवणारे आपण दिशा देणारे असतो असे आपण मांडत असू तर विचारांची  शस्त्रे आणि बौद्धिक लढायांपूर्वी मर्ढेकरांच्या ओळी आम्हाला आठवाव्या लागतील..

‘आम्हास आम्ही पुन्हा पाहावे,

काढूनी चश्मा डोळ्यांवरचा..’

abhiram.db@gmail.com