|| अरुण विश्वंभर

१९५६ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो अनुयायांसह बौद्ध धम्म स्वीकारल्यानंतर समाजात एक नवी सांस्कृतिक चेतना निर्माण झाली. अनेकांनी त्या मार्गाने जाण्याचे पसंत केले. गेल्या काही वर्षांपासून यास व्यापक चळवळीचे स्वरूप प्राप्त होऊ  लागले आहे. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विविध भागांतील लोक बौद्ध धम्म स्वीकाराची भूमिका घेऊन मोठय़ा संख्येने पुढे येताना दिसत आहेत. या प्रक्रियेत पुरुष आघाडीवर आहेतच, परंतु स्त्रियाही मागे नाहीत. मागच्या २०-२५ वर्षांत अशा अनेक महिलांनी हे उघडपणे सांगितले आहे. यांतील निवडक स्त्रियांनी लिहिलेली विचारप्रवर्तक मनोगतं संदीप सारंग आणि वंदना महाजन यांनी संपादित केलेल्या ‘कल्चरली करेक्ट’ या ग्रंथाद्वारे नुकतीच वाचकांसमोर आली आहेत. ही मनोगतं अंतर्मुख करणारी असून त्यातून त्यांचा वैचारिक, मानसिक, कौटुंबिक, सामाजिक प्रवास उलगडला गेला आहे.

या स्त्रियांपैकी बऱ्याच स्त्रियांनी बौद्ध धम्म स्वीकारण्याचा विचार केला आहे. त्यातल्या काहीजणींनी प्रत्यक्ष धर्मातर केले आहे. काहीजणी बौद्धवाद दैनंदिन जीवनात अनुसरत आहेत, तर काहीजणी बुद्धाच्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास आणि मांडणी करत आहेत. या महिला बौद्ध धम्माच्या आकर्षणाच्या बाबतीत वेगवेगळ्या टप्प्यांवर असल्या, तरी त्यांच्या मनात चाललेले वैचारिक-सांस्कृतिक स्थित्यंतर अतिशय वैशिष्टय़पूर्ण आणि अभिनव असे आहे. त्यांच्या मनातील ही खळबळ हे एका अर्थाने सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेतले ऐतिहासिक पर्व असून ते समाजासमोर आणणे अत्यंत गरजेचे होते. हीच बाब ध्यानात घेऊन संपादकांनी हा महत्त्वपूर्ण ग्रंथ सिद्धीस नेला आहे. जाणीवपूर्वक धर्मातर करून बौद्ध धम्म स्वीकारणे ही वाटते तेवढी सोपी गोष्ट नाही. हे अत्यंत धाडसाचे काम आहे. याच धाडसाचा शोध घेण्याची भूमिका या ग्रंथनिर्मितीच्या मुळाशी आहे.

संपादक डॉ. वंदना महाजन यांच्यासह डॉ. रूपा कुळकर्णी, डॉ. गेल ऑमव्हेट, डॉ. संबोधी देशपांडे, डॉ. लता प्रतिभा मधुकर, डॉ. चैत्रा रेडकर, डॉ. लता छत्रे, प्रा. वंदना भागवत, प्रा. पल्लवी हर्षे, अ‍ॅड. वर्षां देशपांडे.. अशा आपापल्या क्षेत्रात हिरिरीने कार्य करणाऱ्या, मात्र ते करत असताना बुद्धविचार महत्त्वाचा असल्याचे लक्षात आलेल्या तब्बल ३३ स्त्रियांनी या ग्रंथातून आपली भूमिका निर्भीडपणे मांडली आहे.

मुक्तीचा मार्ग शोधणाऱ्या या स्त्रियांची ही मनोगतं समजून घेतली पाहिजेत. त्यांच्या संघर्षमय प्रवासातील टप्पे आणि मुद्दे स्वच्छंद अवकाशाला गवसणी घालू पाहणाऱ्या स्त्रियांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरू शकतील. भारतीय स्त्रियांच्या मुक्तीच्या मार्गातील नेमक्या भूमिका काय आहेत, कोणते सिद्धान्तन स्वीकारून, कोणती वैचारिक बांधिलकी मानून या मार्गावरचा प्रवास करता येऊ  शकतो, निर्भय आणि मुक्त जगण्यासाठी कोणते सांस्कृतिक पर्यावरण योग्य असू शकते, अशा अनेक प्रश्नांची उत्तरे या मनोगतांमधून मिळू शकतात. त्यासाठी हे पुस्तक वाचायलाच हवे.

‘कल्चरली करेक्ट’

संपादन : संदीप सारंग, वंदना महाजन,

ग्रंथाली प्रकाशन, मुंबई,

पृष्ठे- ३७६, मूल्य- ३५० रुपये