|| आश्लेषा महाजन

‘गगन जीवन तेजोमय’ हा डॉ. छाया महाजन यांच्या ललितलेखांचा संग्रह विश्वकर्मा पब्लिकेशन्सने प्रकाशित केला आहे. लेखिका इंग्रजी विषयाच्या निवृत्त प्राध्यापक. कथा, कादंबरी, ललितगद्य, चरित्रलेखन, अनुवाद, बालसाहित्य इत्यादी साहित्यप्रकारांत त्यांनी विपुल लेखन केलेले आहे. जीवनाला भिडणाऱ्या साध्या साध्या प्रसंगांतून लेखाचे बीज घेऊन त्याचा लालित्यपूर्ण विस्तार करण्याची लेखिकेची या पुस्तकातील शैली रंजक आहे. ललित लेखक जीवनोत्सुक, समाजाभिमुख असतो. ललित लेखनात मानवी मनाचा, भावभावनांचा, समाज व्यवहाराचा, निसर्गातील घटितांचा, एकूणच जगण्याचा वेध व शोध असतो. अवघ्या जगण्याकडे बघण्याचा विलक्षण कलात्मक, चिंतनशील, प्रगल्भ दृष्टिकोन असतो. या पुस्तकातील १७ लेखांमध्ये असाच वेध, शोध दिसतो.

‘आकाशीचा राजा’ या पहिल्याच लेखात सूर्य, वेगवेगळ्या प्रदेशातले सूर्योदय, त्याच्याशी संबंधित आठवणी, प्रकाशाचे महत्त्व, एकूणच तेजोत्सवाचा महिमा वर्णन केलेला आहे. संदर्भसंपन्नता हे लेखिकेचे वैशिष्टय़ आहे. त्यात आध्यात्मिक मिथके, मानसोपचारातील किस्से, इंग्रजी साहित्यातील उदाहरणे असे खूप सारे ओघाने येते. त्यामुळे वाचकाला अनेक मितींचा आस्वाद घेता येतो. माकड व टोपीवाल्याच्या गोष्टीने ज्याची सुरुवात आहे, असा ‘अनुकरण’ हा लेख अनुकरणप्रिय माणसाच्या नानाविध कंगोऱ्यांना स्पर्श करतो. गुरु-शिष्य परंपरा ही सुरुवातीला अनुकरणातून बहरते. जाहिरातींचे अनुकरण वा अंधानुकरण, मौखिक अनुकरण, पाश्चात्त्यांचे अंधानुकरण अशा अनेक गोष्टींवर त्यात चर्चा आहे. लेखिका जे जाणवले ते शब्दांतून मांडते. त्यातून काय घ्यायचे, काय टाळायचे, हे वाचकांवर सोडते.

साध्याच विषयात सखोल आशय शोधण्याची लेखिकेची रीत आहे. ‘आभारी आहे’ या लेखात आभाराचे महत्त्व, डोळ्यांतून वा कृतीतून आभार मानण्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. ‘दे हाता’ या लेखात हात, बोटे, आजीचे जाळीदार हात, कडक हात, मिंधे हात, गुन्हेगारांचे हात.. अशा विविध हातांविषयी भरभरून लिहिले आहे. लेखांचे विषय लेखिकेला आसपास सहज सापडतात असे दिसते. ‘मास मॅनिया’ या समर्पक शीर्षकाच्या लेखात समाजात पाझरणाऱ्या अनेक वेडेपणाच्या गोष्टींवर मल्लिनाथी केली आहे. त्यात फॅशन, पिढीतील अंतर, हेअर कट, श्रीमंत होण्याचे वेड, रॅट रेस अशा अनेक वेडांविषयीचे विवरण आहे. जागतिकीकरणाच्या रेटय़ात प्रादेशिकतेचे वैशिष्टय़ धुसर होत चाललेय, या गंभीर गोष्टीकडे लेखिका लक्ष वेधते. काही ललितलेखांत व्यक्तिचित्रणे अंतर्भूत आहेत. ‘जवा एवढय़ाचे। सुखाची सावली’ या लेखात जुन्या जमान्याचे प्रतिनिधी असणारे, शून्यातून घर-गृहस्ती निर्माण करणारे काकासाहेब आणि त्यांची मॉडर्न, संवेदनाहीन सून यांची सत्यकथा आहे. सुख म्हणजे नेमके काय, प्रत्येकाची सुखाची व्याख्या कशी वेगळी असते, सुनेला सुख दुखते का.. अशी चर्चा वाचकांना अंतर्मुख करणारी आहे.

काव्य-शास्त्र-विनोदात रममाण होणे आणि त्यातून आशावादी जगण्याचा टपोरा आशय वेचणे ही ललित लेखकाची पॅशनच असते. ‘गाणं! घेई छंद’ या लेखात संगीताचे जीवनातील स्थान वर्णन करताना लेखिका म्हणते : ‘मानवी भावनांशी संगीताइतकी कोणतीही जवळची गोष्ट नाही. मानवाची मानसिक अवस्था बदलण्याचे सामथ्र्य यात आहे. यासाठी फ्रॉईडसारख्या मनोवैज्ञानिकाची गरज नाही.’ डॉ. महाजन यांची कथनशैली प्रासादिक, ओघवती व अनलंकृत आहे. काही ठिकाणी ती चित्रदर्शी तपशीलही देते.

‘ही वाट दूर जाते’, ‘बाजार’, ‘सवय’ अशा कितीतरी लेखांमध्ये छोटय़ाशा विषय-बीजातून फुलवत नेलेला लालित्य-वृक्ष दिसतो. त्यात लेखिकेच्या इंग्रजी साहित्यातले, अध्यापनातले संदर्भ तर येतातच, पण विविध देशांमध्ये केलेल्या मुशाफिरीचे संदर्भही चपखलपणे येतात. स्मरणरंजन हेही काही लेखांचे वैशिष्टय़ आहे. आपले मूळ गाव, तिथला निसर्ग, बालपण, घर, नातलग, शेजारी, शाळा, मित्र या तर मर्मबंधातल्या ठेवी असतात. ‘स्मरणस्थळ’, ‘अस्तित्वखूण’, ‘धुळीच्या चमकत्या पडद्याआड’, ‘हस्तांतरित’ या लेखांत आठवणींचे कवडसे आहेत. पठण, शेगाव, गोदावरी नदी, तिचा महापूर, काठावरची तीर्थस्थळे, नाथमंदिर, विविध मठ, षष्ठी जत्रा, नागघाटाशेजारची पालथी नगरी, तिथली मोठी घराणी अशा अनेक पलूंवर प्रकाश टाकणारा ‘स्मरणस्थळ’ हा लेख वाचकांनी मुळातूनच वाचावा. ‘हस्तांतरित’ हा लेखही वेगळाच उमटलाय. लेखिकेला एका पुस्तकाच्या दुकानात एक पुस्तक चाळत असताना शाळूवयातली सातव्या इयत्तेतली कविता अचानक ‘भेटते’ नि सुरू होतो आठवणींचा प्रवास. एखादी कविता किंवा गाणे त्याच्या आठवणींसह स्मृतिपटलावर गोंदले जाते, याचे हृद्य वर्णन ‘हस्तांतरित’ या लेखात आहे.

लेखिकेची निरीक्षणशक्ती तीव्र व सूक्ष्म आहे. एकामागून एक विचारांच्या लडी उलगडत विषयाच्या विविध झालरी विणत जाण्याची आणि एका प्रगल्भ विचारापाशी नेणारी लेखिकेची शैली आहे. त्यामुळेच पुस्तकात मुद्रितशोधनाच्या काही त्रुटी/ चुका असल्या, तरी ललित साहित्यात हे एक महत्त्वाचे पुस्तक ठरावे.

 

‘गगन जीवन तेजोमय’ – डॉ. छाया महाजन,

विश्वकर्मा पब्लिकेशन्स, पुणे,

पृष्ठे – १२८, मूल्य – १७५ रुपये

ashleshamahajan@rediffmail.com